ओबरहाउझेन : पश्चिम जर्मनी राज्याच्या नॉर्थर्हाईन-वेस्टफेलिया प्रांतातील, बऱ्याच कोळसा खाणी व कारखाने यांच्या वसाहती एकत्र करून झालेले शहर. लोकसंख्या २,४६,१९९ (१९७०). र्हाईन नदीच्या पूर्वेस आठ किमी., र्हाईन–हर्न कालव्यावर आणि बर्लिन-हॅनोव्हर हमरस्त्यावर हे वसले असून, येथून दळणवळणाचे जाळे पसरले आहे. रूरच्या प्रचंड औद्योगिक क्षेत्रात हे शहर असल्याने येथे ओतकाम, जस्त शुद्धीकरण, रंगकाम, सिमेंट, रेल्वे यंत्रशाळा, औष्णिक विद्युत्, बॉयलर्स, पोलादी दोर, औषधे, काचसामान, साखर, साबण, सिगारेट इत्यादींचे कारखाने आहेत. १८६२ मध्ये यास शहराचे स्वरूप येऊन १८७५ नंतर ते भरभराटले. दुसऱ्या महायुद्धात दोस्तांनी यावर अनेक विमानहल्ले केले, पण झालेले नुकसान युद्धसमाप्तीनंतर लवकरच भरून आले. शहरात अनेक अत्याधुनिक सुखसोयी असून दरवर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ते प्रसिद्ध आहे.
शहाणे, मो. ज्ञा.