रावळगाव : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील, साखर व मेवामिठाई यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या १३,२५२ (१९८१). हे मालेगाव तालुक्यात मालेगावच्या वायव्येस सु. १९ किमी. अंतरावर वसलेले आहे.

पूर्वी हे एक छोटे खेडेगाव होते. १९२३ नंतर प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी या भागातील सु. ६०७ हे. पडीक जमीन काही भाडेपट्‌ट्याने व काही विकत घेऊन परिश्रमपूर्वक तिचे कृषियोग्य जमिनीत रूपांतर केले. त्यासाठी त्यांनी जवळूनच वाहणाऱ्या गिरणा कालव्याचा उपयोग करून घेतला व मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन सुरू केले. १९३३ साली वालचंद समूहातर्फे त्यांनी रावळगाव शुगर फार्म लि. ची स्थापना करून रावळगाव येथे एक साखरकारखाना उभारला. सांप्रत याची महाराष्ट्रातील मोठ्या व प्रगतिशील साखर कारखान्यांत गणना होते. याच उद्योगसमूहातर्फे १९४० मध्ये येथे खडीसाखरेचे संशोधन केंद्र व कारखाना सुरू करण्यात आला. येथील कारखान्यांचा पुढे विकास होऊन साखरेशिवाय गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर तत्सम वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाली (१९४९). ‘रावळगाव’ या नावाने हा माल प्रसिद्ध आहे. पेपरमिंटच्या वड्या, ताज्या दुधाची टॉफी, लॅको बॉन बॉन, पत्री खडीसाखर इ. येथील खास उत्पादने आहेत. यांशिवाय येथे गूळ तयार करणे, उसापासून मेण व कागद तयार करणे, साखर कारखान्यास आवश्यक अशी यंत्रसामग्री तयार करणे, मिठाईसाठी डबे तयार करणे इ. व्यवसायांचाही विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

कारखान्याच्या सभोवारच्या प्रदेशात एक आदर्श वसाहत स्थापन झाली असून संपूर्ण गावासाठी आरोग्य केंद्रे, रुग्णालय तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळा, डाक व तार कार्यालय, विश्रामधाम इ. सुविधा करण्यात आल्या आहेत. गावात एका दगडी चौथऱ्यावर शनी, राम, महादेव व पिंपळदेव यांची समान आकृतीबंधाची चार मंदिरे असून त्यांच्या समोरच एक हनुमान मंदिर आहे. गावात रविवारी आठवड्याचा बाजार भरतो. या गावाजवळच असलेल्या दाभाडी या गावी सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आहे.

पंडित, भाग्यश्री