ओकलंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील औद्योगिक बंदर. लोकसंख्या ३,६१,५६१ (१९७०). हे सॅन फ्रॅन्सिस्को उपसागराच्या पूर्वेस असून उपसागराच्या पश्चिमेकडील सॅन फ्रॅन्सिस्को शहाराशी पुलाने जोडलेले आहे. येथे विमानतळ असून, नाविक तळ व नाविक पुरवठाकेंद्र आहे. मोटारी बांधणे, लाकूड कापणे, तेलशुद्धीकरण, जहाज बांधणे, विद्युत् उपकरणे, काच, दारू गाळणे, रसायने, खाद्य पदार्थ इत्यादींचे उद्योग येथे आहेत. येथे अनेक महाविद्यालये व कॅलिफोर्नियातील हस्तव्यवसाय व हस्तकलांचे महाविद्यालय असून वेधशाळा, उद्याने, संग्रहालये आहेत.

लिमये, दि. ह.