हूव्हर धरण : अमेरिकेची संयुक्त संस्थानांमधील सर्वांत मोठे, कोलोरॅडो नदीवरील, काँक्रीटचे प्रसिद्ध कमानी धरण. हे धरण नेव्हाडा राज्यातील लास व्हेगास शहराच्या आग्नेयीस ४० किमी., ॲरिझोनाव नेव्हाडा या राज्याच्या सरहद्दीवर, कोलोरॅडो नदीवर, ब्लॅक कॅन्यन( दरी) मुखाशी बांधलेले आहे. अमेरिकन काँग्रेसने बोल्डर कॅन्यन प्रकल्प १९२८ मध्ये मंजूर केल्यानंतर, कोलोरॅडो नदी प्रकल्पास सुरुवात झाली. या बहुउद्देशीय प्रकल्पाचे पूरनियंत्रण, जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती, घरगुती व उद्योगास आवश्यक पाणीपुरवठा, वाहतूक हे उद्देश आहेत. धरणाचे बांधकाम १९३० ते १९३६ या कालावधीत पूर्ण झालेले आहे. हूव्हर धरणाची उंची २२१ मी., धरणाच्या भिंतीची माथ्यावरील रूंदी १४ मी. व माथ्यावरील लांबी ३७९ मी. आहे. या धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयास मीड सरोवर म्हणतात. जगातील सर्वांत मोठ्या मानवनिर्मित जलाशयांंत याची गणना होते. मीड जलाशयाची लांबी १८५ मी., खोली १८० मी., असून जलाशयाने सु. ६५० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. याची जलधारण क्षमता ३३, ६०,००० घ. मी. आहे. याची विद्युतनिर्मिती क्षमता १३४५ मे. वॉ. आहे. या धरणाद्वारे ॲरिझोना, नेव्हाडा व कोलोरॅडो या तीन राज्यातील सु. ४, ००,००० हे क्षेत्राचे जलसिंचन करण्यात येते. धरणाच्या बांधकामासाठीचे कामगाराचे निवासासाठी येथे बोल्डर शहराची उभारणी केली आहे. या धरणाच्या बांधकामाचा खर्च १६५ द. ल. डॉलर झाला होता. या धरणाचे प्रारंभी नाव बोल्डर धरण असे होते. १९४७ मध्ये अमेरिकन काँग्रेसने अ. सं. सं. चे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर याचे सन्मानार्थ या धरणाचे नामकरण हूव्हर धरण असे केले आहे. दरवर्षी अनेक पर्यटक यास भेट देतात.

गेडाम, संतोष