एरिकेलीझ : फुलझाडांपैकी द्विदलिकित [→ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] वनस्पतींचा एक गण. ह्यामध्ये एकूण पाच कुले असून एरिकेसी हे प्रमुख कुल आहे. ⇨जिरॅनिएलीझ व गटिफेरेलीझ ह्यांपैकी एकापासून एरिकेलीझ हा गण अवतरला असावा अशी विचारसरणी बेसी, हॅलियर, वेटश्टाइन इत्यादींना मांडली आहे. या गणातील बहुतेक सर्व वनस्पती काष्ठमय वृक्ष किवा क्षुपे (झुडपे) आणि काही ओषधी [→ ओषधि] असून त्यांचा प्रसार भारत, पूर्व आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, यूरोप इ. प्रदेशांत आहे. पाने बहुधा चिवट व कधी सुईसारखी बारीक फुले द्विलिंगी, अर-समात्र, बहुधा पंचभागी, सामान्यपणे अवकिंज संदले कधी सुटी प्रदले बहुधा जुळलेली केसरदले सुटी व मधुस्त्रावक बिंबाकडेने चिकटलेली काहींत परागांच्या चौकड्या किंजपुट क्वचित अध:स्थ बीजके एकावरणी व अक्षलग्‍न [→ फूल] फळे शुष्क (बोंड) किंवा मांसल (मृदुफळ) काहींत बिया सपक्ष (बाह्य आवरणाचा पंखासारखा विस्तार असलेल्या) असतात.

एरिकेसी कुलातील काही जातींची फळे (उदा. ब्ल्यूबेरी, कॉर्नबेरी, क्रेनबेरी) खाद्य असतात. एरिका आबोंरिया या जातीचे लाकूड कठीण असून चिलिमीकरिता वापरतात. ⇨र्‍होडोडेंड्रॉनच्या अनेक जाती हिमालयात आढळतात. काहींच्या मुळात कवकतंतू [संकवक, → कवक] असतात. ह्याच कुलातील अझेलियार्‍होडोडेंड्रॉन या वंशांतील काही जाती बागेत शोभेकरिता लावतात. निसर्गत: अनेक जाती अम्‍लीय व अतिथंड जमिनीत वाढतात.

पहा : क्रेनबेरी गंधपुरा दलदल हीद हीदर.

परांडेकर, शं. आ.