एरासिस्ट्राटस : (इ. स. पू. सु. ३००—२६०). ग्रीक शारीरशास्त्रज्ञ व शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांना शरीरक्रियाविज्ञानाचे (सजीव आपल्या क्रिया व कार्ये कशी पार पाडतात याच्या अभ्यासाच्या शास्त्राचे) जनक मानण्यात येते. त्यांचा जन्म सीऑस (आता कीऑस) बेटावर झाला. ते मेट्रोडोरस व थीओफ्रॅस्टस यांचे शिष्य होते. प्रथम ते सिरियाचे राजे नायकेटॉर सेल्युकस यांच्या दरबारी वैद्य होते. नंतर ते ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रिया येथे स्थायिक झाले व तेथे त्यांनी हीरॉफ्लीस यांच्या समवेत शारीराचे (शरीराचा आकार व रचना यांचे) शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्यांनी माणसाच्या मेंदूच्या शारीराचा विशेष अभ्यास केला व संवेदनावाहक तंत्रिका ( संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू ) आणि प्रेरक तंत्रिका ( स्‍नायूंच्या हालचाली उद्दीपित करणारे मज्जातंतू ) यांतील भेद शोधून काढला. त्यांनी गती निर्माण होताना होणारी स्नायूंची क्रिया, पोषण आणि विविध स्त्रा व यांच्या प्रक्रिया तसेच स्पंदन आणि रक्तस्त्राव यांची कारणे यांच्याविषयी अभ्यास केला. रोगग्रस्त भागांचा स्थानिक रक्तपुरवठा कमी करून उपचार करण्याच्या तसेच विविध रेचके देण्याच्या त्या काळी रूढ असलेल्या पद्धतीला त्यांनी तीव्र विरोध केला व आरोग्य टिकविण्यासाठी नियमित आहार घेणे व व्यायाम करणे यांवर भर दिला. आरोग्यविज्ञानावर त्यांनी एक ग्रंथही लिहिला. शरीरातील चार द्रव्यांच्या (ह्युमोर) समतोलात बिघाड झाल्यामुळे रोग होतात, हा त्यावेळी प्रचलित असलेला सिद्धांत खोडून काढून शरीरातील वायूचे (न्यूमाचे म्हणजे जीवनावश्यक द्रव्याचे) प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच अपचनामुळे रोग उत्पन्न होतात, असा विचार त्यांनी मांडला. पानथरी (प्लीहा), यकृत आणि पित्त यांसंबंधी तसेच हृदयाचे शारीर यासंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. हृदकपाटांची (हृदयाच्या झडपांची) त्यांना माहिती होती असे दिसते. या कपाटांना त्यांनी नावेही दिलेली होती. त्यांनी लिहिलेल्या चौदा ग्रंथांची नावे ज्ञात आहेत, तथापि गेलेन व इतर लेखकांनी केलेल्या उल्लेखांशिवाय मूळ ग्रंथांविषयी इतर काहीही माहिती उपलब्ध नाही.

कानिटकर, बा. मो.