केल्टिक भाषासमूह : इंडो यूरोपियन भाषाकुटुंबाच्या व्याप्तिक्षेत्रात अगदी पश्चिमेला असलेला हा भाषासमूह आहे. त्याचे वर्गीकरण गेलिक, ब्रायथॉनिक व गॉलिश या गटांत होत असून, गेलिकचे आयरिश, मांक्स व स्कॉच गेलिक आणि ब्रायथॉनिकचे पिकटिश, वेल्श, कॉर्निश आणि ब्रतों हे विभाग आहेत. गॉलिश ही फ्रान्सच्या रहिवाशांची भाषा होती. 

केल्टिक आणि इटालिक यांच्यातील सामान्य वैशिष्ट्यांवरून प्रथम त्यांची एकच शाखा असून पुढे त्या विभक्त झाल्या, असा सिद्धांत आहे. या शाखेला ‘इटालो-केल्टिक’ या नावाने ओळखण्यात येते. 

केल्टिकची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) इंयू. ए ची ई होणे. (२) इंयू. ऋ, लृ यांचे रि, लि होणे. (३) शब्दारंभीच्या व स्वरमध्यस्थ प चा लोप. (४) इंयू. ओष्ठ्य ग्व चा व होणे. (५) भूतकाळाला स हा प्रत्यय लागणे. 

इटालिक आणि केल्टिक यांची विशेष सामान्य वैशिष्ट्ये अशी : ओकारान्त रूपांची ईकारान्त षष्ठी, कर्मणी आणि कर्मणिरूप असणारा कर्तरिप्रयोग, आकारान्त व सयुक्त विध्यर्थी प्रयोग इत्यादी. 

गॉलिश : यूरोपखंडात बोलल्या जाणाऱ्या केल्टिकला ‘गॉलिश’ असे म्हणत. ख्रिस्ती शकारंभापूर्वी ती मध्य यूरोप, गॉल, उत्तर इटली व स्पेन या प्रदेशांत पसरली होती. तिचे अवशेष आशिया मायनरपर्यंतही सापडतात. या भाषेतील अनेक स्थलनामे प्राचीन लेखकांच्या साहित्यांतून किंवा जुन्या लेखांतून आढळतात. याशिवाय सु. शंभर त्रोटक कोरीव लेख उत्तर इटलीत, ऱ्होन नदीच्या खोऱ्यात व फ्रान्सच्या इतर भागांत आढळून आले आहेत. त्यांतील काही इट्रुक्सन लिपीत असून दुर्बोध आहेत. उरलेले ग्रीक किंवा लॅटिन मध्ये आहेत. या लेखांचा कालखंड इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. पहिले शतक हा आहे. लॅटिनच्या दडपणामुळे खुद्द गॉलिश भाषा गॉलमध्येच ख्रिस्ती शकाच्या प्रारंभी नष्ट झाली.

गेलिक : गेलिकची जन्मभूमी आयर्लंड ही असून तिचे पाचव्या शतकाच्या सुमाराचे ओगॅमिक लिपीतील ३५० छोटे कोरीव लेख उपलब्ध आहेत. आयरिशमधील फुटकळ स्वरूपाचे धार्मिक लेखन व त्यावरील लॅटिन टिप्पणी नवव्या शतकापासून मिळतात. अकराव्या शतकापासून त्यांत अत्यंत समृद्ध साहित्य निर्माण झाले. त्याची लिपी लॅटिन किंवा एर्स आहे. पुढे सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत राजकीय घडामोडींमुळे आयरिशला इंग्रजी वर्चस्वापुढे माघार घ्यावी लागली. त्यावेळी तिने खेडीपाडी व डोंगराळ प्रदेश यांचा आश्रय घेतला. [→ गेलिक भाषा गेलिक साहित्य].

आधुनिक आयरिशच्या तीन बोली आहेत : मन्स्टरची दक्षिण, कॉनॉटची पश्चिम आणि डॉनिगॉलची उत्तर. १९२६ पूर्वी आयरिश बोलणारांची संख्या तीन लाखांच्या आसपास होती. स्वातंत्र्योत्तर काळात आयरिश ही राष्ट्रभाषा झाल्यामुळे अभ्यासक्रमात सक्तीची झाली व तिच्या भाषिकांची संख्या तीस लाखांवर गेली.

पाचव्या शतकात आयरिश भाषा इंग्लंडच्या वायव्येला आणि स्कॉटलंडमध्ये गेली. काही काळ भरभराटीत असलेल्या या भाषा आता नष्ट होण्याच्या मार्गाला लागल्या आहेत. गेलिकची एक बोली मांक्स आइल ऑफ मॅनमध्ये बोलली जाते.

ब्रायथॉनिक : रोमन आक्रमणापूर्वी ही भाषा ग्रेट ब्रिटनमध्ये बोलली जात होती. रोमन साम्राज्याच्या काळात, म्हणजे ख्रिस्ती शकाच्या पहिल्या पाचशे वर्षांत ती रोमन प्रभावाखाली आली. पाचव्या शतकापासून सुरू झालेल्या जर्मानिकच्या आक्रमणामुळे ती पश्चिमेकडे वेल्स, कॉर्नवॉल इ. भागांत लोटली गेली. काही लोक देशांतर करून फ्रान्समध्ये गेले. 

वेल्श ही बोली वेल्स व मन्मथशरमध्ये बोलली जात असून, तिचे जवळजवळ दहा लाख भाषिक आहेत. केल्टिक बोलीतील ही एक अतिशय टणक व समृद्ध बोली आहे. आठव्या शतकात तिची लेखनपरंपरा सुरू झाली. मध्ययुगात तिच्यात विपुल काव्यनिर्मिती झाली. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५८८) डॉ. मॉर्गन यांनी बायबलचे  वेल्शमध्ये भाषांतर करून तिला प्रमाणरूप दिले. तिच्या उत्तरेकडील बोली दक्षिणेकडील स्थानिक बोलींपेक्षा भिन्न आहेत. 

कॉर्निश ही कॉर्नवॉलमध्ये राहणाऱ्या लोकांची एकेकाळची भाषा. पूर्वी ती वेल्शच्या सरहद्दीपर्यंत पसरली होती. इंग्रजीच्या आक्रमणामुळे ती अठराव्या शतकाच्या अखेरीला नामशेष झाली. सु. नवव्या-दहाव्या शतकांतील काही टिप्पणी, बाराव्या शतकातील एक शब्दसंग्रह आणि सु. चौदाव्या – सतराव्या शतकांतील काही धार्मिक नाट्यसाहित्य यांसारखा तिचा उपलब्ध पुरावा आहे. [→ कॉर्निश साहित्य].

ब्रतों ही बोली पाचव्या-सहाव्या शतकांत देशांतर करून फ्रान्समध्ये आलेल्या ब्रिटनमधील लोकांची आहे. हे लोक फ्रान्समधील आर्मोरिका या भागात स्थायिक झाले. तिच्या चार पोटबोली आहेत. प्राचीन टिप्पणी व काही आधुनिक लोकगीते यांशिवाय सोळाव्या शतकापासूनचे धार्मिक साहित्यही ब्रतोंमध्ये आहे. तिच्या भाषिकांची संख्या दहा लाखांवर आहे. पण जवळजवळ सर्वांना फ्रेंच येते. 

संदर्भ: Meillet, Antoine Cohen, Marcel, Les languses du monde, Paris, 1954.

कालेलकर, ना. गो.