कोलोरॅडो स्प्रिंग्ज : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो राज्यातील शहर. लोकसंख्या १,३५,०६० (१९७०). हे डेन्व्हर शहराच्या दक्षिणेस १२० किमी., फाउंटन क्रीक आणि मॉन्युमेंट क्रीक यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून १,८०० मी. उंच, पाइक्स राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी असून, उत्तम हवामान व निसर्गसौंदर्य यांमुळे प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. रसायने, कच्ची फिल्म, लाकूड, दुग्धपदार्थ, मोटार, ट्रक, यंत्रे, सोने शुद्ध करणे, लस, मांस डब्यात भरणे वगैरे उद्योग येथे असून, आसमंतात सोने, चांदी व कोळशाच्या खाणी आहेत. कोलोरॅडो महाविद्यालय, कलाकेंद्र, अंध व बहिरे-मुके यांच्याकरिता राज्य सरकारचे विद्यालय, फाउंटन व्हॅली विद्यालय, संग्रहालये व आरोग्यधामे येथे असून हवाई संरक्षण विभागाचा एक हवाईतळ आणि अकादमी येथे आहे. कोलोरॅडो स्प्रिंग्जपासून जवळच काही नामांकित धबधबे, गुहा, शेयेन कॅन्यन, पशुउद्यान इ. आहेत.

लिमये, दि. ह.