क्लूझ : रूमानियाच्या क्लूझ प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,०८,१२५ (१९७२). हे रूमानियाचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून महत्त्वाचे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. बूकारेस्टच्या वायव्येस हे ३२० किमी. असून दारूगोळा, चिलखती पत्रा, लोखंडी व चांदीच्या वस्तू, धातुकामाचे कारखाने, पादत्राणे, कापड, विजेची उपकरणे व तंबाखूचे पदार्थ यांचे कारखाने येथे आहेत. रूमानियातील दोन विद्यापीठे, विज्ञान अकादमी व अन्य वैज्ञानिक संस्थांमुळे याचे शैक्षणिक महत्त्व मोठे आहे. बाराव्या शतकात जर्मनांनी वस्ती केल्यापासून क्लूझला अनेक स्थित्यंतरांचा अनुभव घ्यावा लागला. हंगेरीच्याचा राजा कारव्हायनस मॅथिअसचे हे जन्मगाव असून येथील चौदाव्या शतकापासूनच्या प्राचीन वास्तू प्रेक्षणीय आहेत. मध्ययुगात येथे अनेक कसबी कारागिरांच्या, विशेषतः जवाहिऱ्यांच्या संघटना होत्या. लोकसंख्येपैकी सु. ५०% मग्यार आहेत. ट्रान्ससिल्व्हेनियातील रूमानियन राष्ट्रवाद्यांच्या पुढाऱ्यांची चौकशी १८९५ मध्ये क्लूझलाच झाली होती. अलीकडे भोवतीचे सृष्टिसौंदर्य व हिवाळ्यातील खेळांच्या सोयी यांमुळे क्लूझचे प्रवासी आकर्षण वाढलेले आहे.

ओक, द. ह.