कोलोन–२ : पनामा गणराज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि कोलोन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ९५,३०० (१९७०). हे पनामा कालव्याच्या उत्तरेकडील टोकाशी, पनामा शहरापासून ७७ किमी. आहे. क्रिस्तोबल हे पनामा कालवा विभागातील शहर, कोलोनचे जवळजवळ उपनगरच आहे. मध्य अमेरिकेतील व पनामा कालवामार्गे होणाऱ्या फार मोठ्या व्यापारवाहतुकीचे हे केंद्र असल्याने, येथे अद्ययावत सोयी आहेत. लोक बहुसंख्येने निग्रो असले तरी, जगातील अनेक भागातील लोकांचे मिश्रण येथे आढळते. कालवा विभागाबरोबरच कोलोनची आरोग्यव्यवस्था अमेरिका सरकारने हाताळल्यामुळे, कोलोनचा आसमंत आरोग्यदायक म्हणूनच पर्यटकांना आकर्षक बनला आहे.
शहाणे, मो. ज्ञा.