क्वॉर्ट्‌झाइट : खडक. हा जवळजवळ सर्वस्वी क्वॉर्ट्‌झाच्या कणांचा बनलेला असतो. याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शुद्ध वालुकाश्मांचे रूपांतरण होऊन म्हणजे मूळच्या वालुकाश्मातील वाळूच्या कणांचे आणि ते कण एकत्र चिकटविणाऱ्या सिलिकामय लुकणाचे पुनःस्फटिकीभवन होऊन तयार झालेला असतो. त्याचे वयन (सूक्ष्मसंरचना,पोत) कणीदार असून एकमेकांलगत असणाऱ्या कणांचा सांधा बऱ्याच वेळा सरळ असतो व ते कण एकमेकांस घट्ट चिकटलेले असतात किंवा कणांचा सांधा दंतुर असतो व लगतच्या कणांच्या कडांचे दाते एकमेकांत अडकलेले असतात. खडक कठीण व चमकदार आणि बहुधा रंगहीन किंवा पांढरा असतो. कधीकधी त्याच्यात कमीअधिक अशुद्धी असतात व त्यामुळे त्याला तांबूस, पिवळ्या किंवा इतर रंगांची छटा असते.

वालुकाश्मातून मुरत जाणाऱ्या पाण्यात विरघळलेली सिलिका वाळूच्या कणांमधील जागेत साचविली जाऊन कण एकमेकांस चिकटविले जाण्याच्या क्रियेमुळेही वर वर्णन केलेल्या क्वॉर्ट्‌झाइटांसारखे व तशाच संरचना असणारे दुसऱ्या प्रकारचे खडक तयार होतात. या प्रकारात मूळच्या खडकातील वाळूच्या कणांवर सिलिकामय लुकणाचा क्वॉर्ट्‌झाच्या स्वरूपातच लेप चढविला जातो. तो मूळच्या क्वॉर्ट्‌झासारखाच दिसतो आणि नविन क्वॉर्ट्झमय सिलिका मूळच्या वाळूच्या कणांशी प्रकाशीय दृष्ट्या सलग असते.

पहा : गाळाचे खडक रूपांतरित कडक.

ठाकूर, अ. ना.