गाल्फिमिया ग्लॉका : (लॅ. थ्रियालिस ग्लॉका कुल-माल्पीघिएसी) सु. ०·७५–१·७५ मी. सरळ, उंच वाढणाऱ्या या झुडपाचे मूलस्थान मेक्सिको ते पनामा असून वेस्ट इंडीजमध्ये ते सुस्थित झाले आहे. भारतात (सु. ९०० मी. उंचीच्या खाली) बागांतून शोभेकरिता लावतात. त्याला खूप फांद्या येतात व लहान फांद्या भुरकट दिसतात. पाने साधी, समोरासमोर, अखंड, लांबट अंडाकृती, चकचकीत, वरून फिकट हिरवी व खालून अधिक फिकट असून देठाच्या तळाशी दोन प्रपिंड (ग्रंथी) असतात. याला ऑगस्ट ते फेब्रुवारीत फांद्यांच्या टोकास २० सेंमी. लांब, लहान मंजरीत पिवळी जर्द, सुंदर फुले येतात. केसरदले लालसर, पाकळ्या दंतूर, पसरट व सवृंतक असतात [→ फूल]. फळ त्रिखंडी बोंड असते. या झुडपाची वाढ जलद होते. बागेत बहुधा वाफ्याच्या कडेला कुंपणास लावतात किंवा वाफ्यात गटाने लावतात. छाटणी नियमित करावी लागते. नवीन लागवड बियांनी किंवा कलमांनी होते.
पहा : बोर, लाल.
जमदाडे, ज. वि.
“