गाबरोनी : आफ्रिकेच्या दक्षिण भागातील बोट्‍स्वाना प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १८,४३६ (१९७१). मकरवृत्ताच्या दक्षिणेस, ९०० मी. हून उंच पठारी भागात वसलेल्या गाबरोनीचे हवामान उपोष्णकटिबंधीय परंतु देशाचा बराच भाग व्यापणाऱ्या कालाहारी वाळवंटाच्या मानाने सौम्य आहे. मॅफेकिंगपासून गाबरोनी सु. १४५ किमी. असून केपटाउन-बुलवायो लोहमार्गावरील स्थानक अाहे. शेती, पशुपालन व खाणकाम हे आजूबाजूच्या प्रदेशांतील व्यवसाय होत. लोक मुख्यत: बांटू जमातीचे असून इंग्रजी व त्स्वाना भाषांतून ध्वनिक्षेपण करणारे नभोवाणी केंद्र, तारायंत्र, दूरध्वनी, बिनतारी संदेशवहन, विमानतळ, शाळा, रुग्णालय, ग्रंथालय इ. सोयी गाबरोनीत आहेत.        

           

      कुमठेकर, ज. ब.