बेनिन प्रजासत्ताक : पूर्वीचे दाहोमी. प. आफ्रिकेमधील एक अतिशय लहान स्वतंत्र राष्ट्र. विस्तार ६० ४०’ उ. ते १२० ४०’ उ. अक्षांश आणि ०० ४०’ पू. ते ३० ४०’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. लोकसंख्या ३५,२०,००० १९८१ अंदाजेद्ध. १,१२,६०० चौ. किमी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाचा आकार आइसक्रीमच्या शंकूप्रमाणे असून तो उत्तरेकडील नायजर नदीपासून दक्षिणेकडे अटलांटिक महासागरापर्यंत ६७५.९२ किमी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. बेनिनच्या पश्चिमेस टोगो, वायव्येस अपर व्होल्टा, ईशान्येस नायजर, पूर्वेस नायजेरिया आणि दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. पोर्तोनोव्हो ही राजधानी (लोकसंख्या १,३२,००० १९७९ अंदाज), तर कोटोनू ही व्यापारी राजधानी (लोकसंख्या ३,२७,६०० १९७९ अंदाज) आहे.

भूवर्णन : देशाचे दक्षिणोत्तर (१) किनारी विभाग, (२) टेरे द बारे विभाग, (३) दाहोमियन पठारी प्रदेश, (४) आटाकोरा पर्वत प्रदेश व नायजर मैदान, असे पाच भौगोलिक विभाग पडतात. (१) किनाऱ्याचा प्रदेश सखल, सपाट व वालुकामय असून खारकच्छयुक्त आहे. हा प्रदेश म्हणजे लांबच्या लांब वालुकाभित्ती असून तीवर नारळीच्या मोठाल्या बागा वाढविण्यात आल्या आहेत. खारकच्छ हे पश्चिमेकडे अरुंद, तर पूर्वेकडील भागात रुंदावत गेले आहेत. पश्चिमेकडील टोगोमध्ये ग्रँड-पोपो खारकच्छ शिरले आहे, तर पूर्वेकडील नायजेरियाच्या लागोस बंदराला पोर्तोनोव्हो खारकच्छामुळे नैसर्गिक जलमार्ग लाभला आहे. या विभागात मासेमारी व नारळीच्या बागा हे प्रमुख व्यवसाय चालतात. (२) किनारी प्रदेशाच्या उत्तरेला ‘बारे प्रदेश’ (टेरे द बारे) आहे. (मूळच्या ‘बारो’, अर्थ-माती, या पोर्तुगीज शब्दाचा ‘बारे’ हा अपभ्रष्ट फ्रेंच शब्द). हा विभाग अत्यंत सुपीक मृदेचा पठारी प्रदेश असून त्यामध्येच ‘लामा डिप्रेशन’ (लामा गर्तिका) हा आलादा ते ॲबोमेपर्यंत पसरलेला विस्तीर्ण दलदलीचा प्रदेश आहे. पूर्वी या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वर्षावन पसरलेले होते, सांप्रत त्याचे अल्पस्वरूप अवशिष्ट असून बहुतेक भाग तेलमाडांच्या विपुल बागांनी लागवडीखाली आणण्यात आला आहे. सामान्यतः हा सपाट प्रदेश असला, तरी काही ठिकाणी सु. ३९६ मी. पर्यंत उंचीचे डोंगर आढळतात. बारे प्रदेश हा ओऊमी व कूफो नद्यांनी विभागलेला आहे. किनारी विभाग व बारे प्रदेश मिळून ‘लोअर बेनिन’ हा भाग बनतो. (३) दाहोमिलन पठारी प्रदेशामध्ये चार पठारे असून ती ॲबोमे, केटू, ॲप्लहाउए व झान्यांदो या चार जिल्हयात आहेत. या पठारांमधील माती स्फटिकमय आढळते. ॲबोमे, ॲप्लाहाउए व झान्यांदो पठारांमध्ये सु. ९१.४ मी. ते २२८.६ मी. पर्यंत, तर केटू पठारामध्ये १५२.४ मी. पर्यंत उंची आढळते. (४) देशाच्या वायव्य भागातील आटाकोरा पर्वतश्रेणी म्हणजे टोगो पर्वतश्रेणीचीच विस्तार पावलेली पर्वतरांग होय. ती नैर्ॠत्य-ईशान्य अशी पसरलेली असून तिच्यामध्ये ३४९.३ मी. सर्वात उंचीचे शिखर आहे. या पर्वतश्रेणीमध्ये कार्टझाइट खडकांचे पठार आढळते. (५) ईशान्य बेनिनमधील नायजर मैदान हा बेनिनचा पाचवा भौगोलिक विभाग होय. हे मैदान नायजर नदीखोऱ्याकडे पसरत गेले आहे. या प्रदेशामध्ये मृण्मय वालुकाश्म आढळतात.

नायजर नदी व तिच्या मेक्राऊ, ॲलिबोरी व सोटा या उपनद्या ईशान्य बेनिनमधून वाहतात तथापि मोनो, कूफो व ओऊमे या देशातील प्रमुख नद्या होत. मोनो नदी टोगोमध्ये उगम पावून टोगो व बेनिन या देशांमधील किनारी भागाजवळ सरहद्द आहे. कूफो नदी दाहोमियन पठारातून उगम पावून ॲहेमेजवळील किनारी खाच्छाला येऊन मिळते. ॲबोमे कूफोवरच वसले आहे. ओऊमे नदी आटाकोरा पर्वतश्रेणीस अगम पावून दक्षिणेकडे ५००.५ किमी. वाहत जाते तिच्या मुखाशी तिचे दोन प्रवाह बनतात एक पोर्तोनोव्हो खारकच्छास, तर दुसरा नोक्के सरोवरास जाऊन मिळतो. आटाकोरा पर्वतश्रेणी म्हणजे व्होल्टा व नायजर नदीखोऱ्यांची जलविभाजकच बनली आहे.

हवामान : देशात दक्षिणेकडील व उत्तरेकडील असे हवामानाचे दोन विभाग पडतात. दक्षिणेकडील विभागामध्ये विषुववृत्तीय हवामान असून त्या विभागात दोन आर्द्र व दोन कोरडे ऋतू आढळतात. पहिला प्रमुख पर्जन्यऋतू मार्च ते जुलै असा असून त्यानंतर कोरडा ऋतू येतो परंतु त्याचा अवधी सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंतच राहतो. नंतर येणारा अल्पकालीन पर्जन्यऋतू नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत टिकतो मात्र दुसरा प्रमुख कोरडा ऋतू माचपर्यंत टिकून राहतो. पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ग्रँड-पोपो येथे वर्षांतून सु. ८० सेंमी. पाऊस पडतो, तर कोटोनू व पोर्तोनोव्हो येथे प्रत्येकी सु. १२५ सेंमी. पावसाची नोंद केली जाते. साधारणतः तपमान २२ से. ते ३४ से. यांदरम्यान कायम राहते. उत्तरेकडील विभागात एक कोरडा व एक पावसाळी असे दोनच ऋतू आढळतात. पर्जन्यऋतू मे ते सप्टेंबर असा असून कमाल पाऊस ऑगस्टमध्ये पडतो. आटाकोरा पर्वतश्रेणी तसेच मध्य बेनिन या भागांत वर्षाकाठी सु. १३२.५ सेंमी. पाऊस पडतो, तर उत्तरेकडे त्याचे प्रमाण ९५ सेंमी.पर्यंत कमीकमी होत जाते. कोरड्या ऋतूमध्ये ईशान्येकडून हर्मॅटन हे कोरडे, उष्ण वारे डिसेंबर ते मार्च यांदरम्यान वाहतात. सरासरी तपमान २७ से. एवढे असले, तरी दिवसापासून रात्रीपर्यंतच्या तपमानामध्ये चढउतार आढळतो. जानेवारी हा कडक उन्हाळ्याचा महिना असून दिवसाचे तपमान ४३ से. पर्यंत जाते.

वनस्पती व प्राणी : पूर्वीच्या वर्षावनाच्या जागी मोठ्या प्रमाणावर तेलमाड व रोनियर माडांची लागवड करण्यात आली असून यांशिवाय सॅव्हाना प्रकारच्या वृक्षांचीही लागवड झालेली आढळते. वृक्षप्रकारांत नारळ, तेलमाड, रोनियर माड, वनी, शिआनट, शाल्मरी, फ्रॉमॅगर, सेनेगल, मॅहॉगनी इत्यादींचा समावेश होतो. प्राणिसंपदा विपुल व विविध प्रकारची असून तीत हत्ती, सिंह, बिबळ्या, हरिण माकडे, रानडुकरे, सुसरी, अनेक प्रकारचे सर्प (अजगर, पफॲडर इ.) वगैरेंचा अंतर्भाव होतो. गिनी फाउल, रानबदक, तितर तसेच बरेचसे उष्णकटिबंधीय पक्षी आढळतात. त्से त्से माशी, तसेच अनेक रोगवाहक कीटक यांचेही येथे वैपुल्य आहे.

इतिहास : भौगोलिक वा ऐतिहासिक दृष्ट्या बेनिनला एकसंधता नाही इंग्रज-फ्रेंच यांच्यातील स्पर्धेमुळे एकोणिसाव्या शतकात घडून आलेल्या आफ्रिकेच्या फाळणीमधून बेनिनच्या सरहद्दी उदयास आल्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


पश्चिम आफ्रिकेतील राष्ट्रांशी उत्तर बेनिनची जवळीक व बांधिलकी दक्षिण बेनिनपेक्षा अधिक आहे. दक्षिण बेनिनमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या तेथे पूर्वी असलेल्या निनिराळ्या छोट्याछोट्या राज्यांमुळे ऐक्य असल्याचे दिसून येते. पारंपरिक दृष्ट्या आलादाच्या राजाच्या दोन भावांनी आलादा, ॲबोमे, पोर्तोनोव्हो ही राज्ये निर्माण केली. याच सुमारास (सु. सोळाव्या शतकात) अद्जा राजपुत्राने ज्यूडा हे चौथे राज्य निर्माण केले यांशिवाय पोपो आणि मीना ही इतर अशीच छोटीछोटी राज्ये याच सुमारास स्थापन झाली होती. सतराव्या शतकाच्या आरंभीच्या काळात आलादा व ज्यूडा या दोन्ही राज्यांवर ॲबोमे राज्याने आक्रमण करून त्यांना आपले मांडलिक बनविले पुढे ॲबोमेवर आलादाचे मित्र राज्य यॉरूवा याने हल्ला केला. यावेळी ॲबोमेने आपल्या सैन्यात स्त्रियांचाही भरणा केला होता.

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी प्रथम पोर्तोनोव्हो हे व्यापारी ठाणे उभारले. हाच सांप्रतचा बेनिनचा दाहोमियन किनारा होय. त्यांच्यानंतर इंग्रज, डच, स्पॅनिश व फ्रेंच व्यापारी येथे आले. याच सुमारास गुलामांच्या व्यापारात वाढ झाली होती. सतराव्या शतकाच्या मध्यास फ्रेंचांनी ज्यूडा राज्यातील वीडा व सान्हे येथे व्यापारी ठाणी उभारली. अठराव्या शतकारंभी इंग्रज व पोर्तुगीजयांनी जवळपासच किल्ले बांधले. वीडा येथील पोर्तुगीजाचा किल्ला १७२७ मध्ये बांधलेला होते. फ्रेंच, इंग्रज व पोर्तुगीज यांचा किनारी व्यापार चालूच होता. यॉरूबा सत्ता जसजशी ढासळू लागली, तसतसे ॲबोमेचे यॉरूबावरील हल्ले व आक्रमणेही वाढत गेली. या स्वाऱ्यांमधून पकडलेल्या कैद्यांची एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत निर्यात केली जाई. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास या परिस्थितीत फरक पडून, गुलामांच्या व्यापाराऐवजी ताड तेलाचा व्यापार सुरू झाला. १८५१ मध्ये फ्रेंचांनी ॲबोमेच्या राजाशी एक करार करून त्याअन्वये कोटोनू येथे व्यापारी ठाणे उभारावयाची परवानगी मिळविली. याच सुमारास ब्रिटिशांनी लागोस येथे आपले ठाणे उभारले व पुढे १८६० मध्ये त्यांनी लागोस हस्तगत केले. १८५७ मध्ये फ्रेंचांनी ग्रँडपोपो येथे आपले ठाणे उभारले. फ्रेंचांचे पोर्तोनोव्हो येथे रक्षित राज्य स्थापन झाल्यावरच इंग्रज व फ्रेंच यांच्यामधील स्पर्धा समाप्त झाली. तथापि ॲबोमे राज्य मात्र फ्रेंचांच्या नियंत्रणाबाहेर राहिले. यूरोपीय व्यापाऱ्यांवर ॲबोमे राज्याकडून लादल्या जाणाऱ्या जकाती अतिशय व्यापाऱ्यांवर ॲबोमे राज्याकडून लादल्या जाणाऱ्या जकाती अतिशय जाचक असत. १८८९ मध्ये ॲबोमे व पोर्तोनाव्हो या दोन राज्यांमध्ये युद्ध जुंपले. ॲबोमेचा राजा बेहानन्झिन याच्या सैन्याने फ्रेंचांच्या व्यापारी ठाण्यांवरही हल्ले चढविले. त्याच्या सैन्यात सु. २,००० ॲमेझॉन स्त्रिया होत्या. पुढे १८९१ मध्ये बेहान्झिनने पोर्तोनोव्हो, ग्रँडपोपो राज्यांवरही हल्ले चढविले. पुढच्याच वर्षी कर्नल डॉड्स याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्याने ॲबोमेवर स्वारी करून ते जिंकले व तेथे रक्षित राज्य स्थापन केले. १८९४ मध्ये बेहान्झिन फ्रेंचांच्या स्वाधीन झाल्यावर पुन्हा दोहोंमध्ये युद्ध जुंपले. बेहान्झिनचा भाऊ ॲगाली ॲगबो यास त्याच्या गैरकारभारबद्दल १९०० मध्ये हद्दपार करण्यात येऊन ॲबामे राज्याचा कायमचा शेवट करण्यात आला.

फ्रेंचांनी १८९२ ते १९०० या काळात बेनिनच्या उत्तर भागातही आपल्या नियंत्रणाचा विस्तार केल्यानंतर या भागाचा विकास होण्यास मदत झाली. १९०० मध्येच उत्तर केल्यानंतर लोहमार्गाचे बांधकाम हाती घेण्यात आले. १९०२ मध्ये दाहोमी ही फ्रेंच पश्चिम आफ्रिका या महासंघाची एक घटक वसाहत झाली. १९४६ मध्ये नव्या फ्रेंच संविधानानुसार दाहोमीला फ्रेंच संसदेमध्ये एक प्रतिनिधी व दोन सीनेटर पाठविण्याची, त्याचप्रमाणे अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात नियंत्रणात्मक अधिकार असलेली निर्वाचित प्रादेशिक विधानसभा स्थापण्याची तरतूद करण्यात आली. १९५६-५७ च्या सुधारणांन्वये, प्रादेशिक विधानसभेचे अधिकार आणखी वाढविण्यात येऊन विधानसभेने निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाकडे बहुतेक सर्व प्रादेशिक बाबींसंबंधी कार्यवाहक नियंत्रणाधिकार सुपूर्द करण्यात आले. त्याचवेळी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आणि एक-निर्वाचक क्षेत्र अस्तित्वात आले. सप्टेंबर १९५८ मध्ये जनरल द गॉल शासनाने अंमलात आणलेले फ्रेंच संविधान दाहोमीने मान्य केले आणि संविधानाने सुचविलेल्या फेंरच संविधान दाहोमीने मान्य केले आणि संविधानाने सुचविलेल्या फेंरच समुदायातील स्वायत्त प्रजासत्ताक या दर्जाचा स्वीकार केला. ४ डिसेंबर १९५८ रोजी प्रादेशिक विधानसभा ही राष्ट्रीय घटक विधानसभा बनविण्यात येऊन दाहोमी प्रजासत्ताक हे फ्रेंच समुदायाचा एक सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. १४ फेब्रुवारी १९५९ रोजी, दाहोमीसाठी एक संविधान तयार करण्यात आले. त्याच वर्षीच्या ३ एप्रिल रोजी नव्या विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. १८ मे १९५९ रोजी दाहोमियन डेमॉक्रॅटिक रॅली (आरडीडी) या पक्षाचा अध्यक्ष हयूबर्ट मॅगा याला पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. १ ऑगस्ट १९६० रोजी दाहोमीने आपण पूर्ण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. समर्थ एकात्म राज्याची पूर्तता करण्यासाठी २५ नोव्हेंबर १९६० रोजी नवे संविधान तयार करण्यात आले.

ऑगस्ट १९६० मध्ये दाहोमी प्रजासत्ताक म्हणून स्वतंत्रतेची घोषणा केल्यापासून बेनिनला सहा वेळा रक्तशून्य अवचित सत्तांतरे अनुभवावी लागली. अर्थसंकल्पाचे संतुलन करण्यामध्ये येणाऱ्या कायमच्या अडचणींमुळे ही परिस्थिती एकसारखी येत राहिली. बेनिनमध्ये प्रगत शैक्षणिक पद्धती विकसित करण्यात आली होती आणि वसाहतकालीन राजवटीमध्ये बेनिनने संबंध पश्चिम आफ्रिकेमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ पाठविले होते. बेनिनच्या स्वातंत्र्यानंतर अनेक फ्रेंच भाषिक देशांनी परदेशी आफ्रिकनांना आपल्या देशांत राहण्यास प्रतिबंध केला व त्यामुळे बेनिनमध्ये अतिशय उच्य अर्हताप्राप्त लोकांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाले. देशातील प्रगत शिक्षणपद्धतीमुळे कुशल तंत्रज्ञ व कारागीर निर्माण होत गेले. परिणामी देशात बेकारी व प्रच्छन्न बेकारी उद्भवली आणि देशाच्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या मानाने अधिक प्रमाणात कुशल श्रमबल निर्माण झाले.

बेनिनच्या स्वातंत्र्यसमयी हयूबर्ट मॅगा हा सोरोऊ मिगान ॲपिथीच्या सहकार्याने प्रशासकीय कारभार सांभाळत होता. या दोघांची कारकीर्द कामगार संघटना व विद्यार्थ्यांचे दंगे यांमुळे १९६३ मध्ये संपुष्टात आली. नंतर लष्कराने विरोधी पक्षनेता जस्टिन ॲहोमॅदेग्बे यास ॲपिथीच्या सहकार्याने नवे मंत्रिमंडळ बनविण्यास सांगितले. हे मंत्रिमंडळ अस्थिर वातावरणात नोव्हेंबर १९६५ पर्यंत टिकले. पुढच्याच महिन्यात लष्कराने पुन्हा हस्तक्षेप केला व जनरल क्रिस्तोफे सोग्लो यास सैनिक व तंत्रज्ञ यांचे संमिश्र सरकार 


बनविण्यास सांगितले. हे सरकारही डिसेंबर १९६७ मध्ये एका तरूण लष्करी गटाच्या कारवाईमुळे उलथविण्यात आले या गटाने लेफटनंट कर्नल आल्फोन्से ॲली याला देशाचा कारभार चालविण्यास सांगितले. मार्च १९६८ मध्ये जनमतपृच्छेच्या आधारे समर्थ अध्यक्षीय संविधानाला मान्यता देण्यात आली व मे महिन्यात अध्यक्षीय निवडणुका घेण्यात आल्या परंतु त्या रद्द करण्यात आल्या. जुलैमध्ये डॉ. एमिल झिन्सू यास अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली परंतु डिसेंबर १९६९ मध्ये त्याची  राजवट लष्करी अधिकराऱ्यांकरवी उलथून पाडण्यात आली आणि लेफटनंट कर्नल पॉलएमिल दी सूझा याला लष्करी संचालनालयाचा अध्यक्ष म्हणून देशाचा कारभार पहावयास सांगण्यात आले. १९७० च्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी मॅगा, ॲहोमॅदेग्बे व ॲपिथी हे तिघेही उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि याच निवडणुकांमुळे उत्तर व दक्षिण भागांमध्ये संघर्ष निवडणुकांनंतर वरील तीन उमेदवारांचा अंतर्भाव असलेला एक अध्यक्षीय आयोग स्थापन करण्यात आला. मे १९७० मध्ये या आयोगाचे रूपांतर अध्यक्षीय परिषदेत करण्यात येऊन प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी दोन वर्षांची अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, असे ठरविण्यात आले. अर्थात यायोगे देशाच्या मूलभूत आर्थिक समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही.

ऑक्टोबर १९७२ मध्ये लष्करी अवचित सत्तांतर हाऊन मेजर (नंतर कर्नल) मॅथ्यू केरेकू अधिकारावर आला. राज्यातील पोलीसदल हे त्याचे खरे बलकेंद्र होते. या सत्तांतराला अर्थातच फार थोडा विरोध झाला. अध्यक्षीय परिषदेच्या तीनही नेत्यांना अटक करण्यात आली  अनेक राजकारणी लोक पराक्रम सोडून पळून गेले. कोटोनू, पोर्तोनोव्हो व उत्तर बेनिन या तीन प्रमुख विभागांतून प्रत्येकी चार याप्रमाणे वारा अधिकाऱ्यांना प्रत्येकी चार याप्रमाणे बारा अधिकाऱ्यांना निवडण्यात येऊन केरेकूने त्यांचे एक लष्करी प्रशासन बनविले.

फेब्रुवारी १९७३ मध्ये आल्फोन्से ॲली या माजी अध्यक्षास अनेक कनिष्ठ व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना शासन-विरोधी कटाबद्दल कैद करण्यात आले. तसेच १९७३ व १९७४ या दोन वर्षांच्या अवधीत केरेकू राजवटीने आपली सत्ता अधिक दृढ व अंतर्गत सुरक्षा अधिक कडक केली. याच काळात फ्रान्सशी असलेले बेनिनचे संबंध बिघडले आणि स्थानिक व्यापारी व उद्योजकांवर भांडवलाच्या बहिगर्र्मनामुळे टीका करण्यात आली. स्थानिक व्यापाऱ्यांना मूळचे परदेशी-उदा., भारतीय, लेबानो-सिरियन इ. मोठ्या प्रमाणावरील चोरट्या व्यापारामुळे दोषी ठरविण्यात येऊन हद्दपारीचीही धमकी देण्यात आली.

नोव्हेंबर १९७४ मध्ये मार्क्सवाद-लेनिनवाद ही शासनाची अधिकृत राष्ट्रीय विचारप्रणाली म्हणून घोषित करण्यात आली. राष्ट्रीयीकरणाचे अनेक आपराक्रम शासनाने कार्यवाहीत आणले. अनेक व्यवसायी लोक पराक्रम सोडून गेले. खाजगी उद्योगाबाबत मात्र शासनाचे सहानुभूतिपर धोरण होते. केरेकू राजवटीने राष्ट्रीय आर्थिक स्वयंपूर्णतेचे धोरण अवलंबिण्याचे ठरविले होते. यासाठी कृषि-उत्पादनात अधिकाधिक वाढ करणे आवश्यक होते. १९७२-७८ या काळात तांदूळ उत्पादनात तिपटीने वाढ साध्य करण्यात आली तथापि खनिज संपत्तीचा अभाव व कृषिक्षेत्रात उद्भवणारा आवर्ती दुष्काळ यांमुळै अर्थव्यवस्थेची गती कुंठितच राहिल्याचे आढळते. १९७५ च्या प्रारंभी कॅप्टन जॅनव्हीर ॲसोब्बा या माजी मंष्याने केरेकू राजवटीविरुद्ध एक अयशस्वी उठाव केला माजी अध्यक्ष झिन्सू याला त्याच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. जूनमध्ये सुरक्षादलाच्या सैनिकांनी कॅप्टन मायकेल आइक्पे या लोकप्रिय मंष्याला मारून टाकले.  याचा निषेध म्हणून पराक्रमभर संप व निदर्शने चालू राहिली. त्यांच्यावर नियंत्रण करणे केरेकू प्रशासनाला अतिशय अवघड गेले. यानंतर केरेकूने लष्कराची पुनर्रचना केली. पोलीस व सैनिक यांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रयत्नात त्याने राष्ट्रीय संरक्षण दल स्थापन केले आणि आपले स्थान अधिकच बळकट करण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबरमध्ये झिन्सूप्रणीत आणखी एका कटाचा बीमोड करण्यात आला. डिसेंबरमध्ये केरेकूने ‘द बेनिन पीपल्स रेव्हलूशनरी पार्टी’ पीआर्पीबी असा मार्क्सवादी पक्ष स्थापन केला आणि देशाचे वसाहत काळापासून चालत आलेले ‘दाहोमी’ हे नाव बदलून ‘बेनिन प्रजासत्ताक’ असे नाव घोषित केले. १९७६ पासून बेनिनला फ्रान्सची मदत मिळणे बंद झाले आहे तथापि केरेकू प्रशासन अल्प लष्करी सामर्थ्यावर कारभार करीत आहे.

राज्यव्यवस्था : १९७२ मध्ये सत्तेवर आल्यापासून १९७३ च्या सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष केरेकूने ‘मिलिटरी कौन्सिल ऑफ द रेव्हलूशन’ या परिषदेच्या साहय्याने कारभार पाहिला. १९७३ ते ऑगस्ट १९७७ पर्यंतच्या कालावधीत देशाचा कारभार ‘राष्ट्रीय क्रांतिकारी परिषदे’ मार्फत चालू होता. या परिषदेवर ‘नॅशनल पॉलिटिकल ब्यूरो’चे नियंत्रण होते. ऑगस्ट १९७७ मध्ये राष्ट्रीय क्रांतिकारी विधानसभा स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. लोकायुक्त प्रतिनिधींनी युक्त अशा या एकसदनी विधानसभेची प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात येईल व ही विधानसभा राष्ट्राध्यक्षची निवड करील, असे ठरविण्यात आले. या विधानसभेत ३३६ लोकायुक्त प्रतिनिधी पीपल्स कमिशनर असतील व त्यांची गुप्तमतदानाने सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येईल, असेही एप्रिल १९७८ मध्ये ठरविण्यात आले. लोकायुक्त प्रतिनिधींची निवड भौगोलिक मतदार संघांऐवजी सामाजिक, व्यावसायिक वर्गांमधून करण्याचे ठरविण्यात आले. अर्थात अद्याप अशा सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत. ‘पीआरपीबी’ हाच मार्क्सवादी-लेनिनवादी सत्तारूढ पक्ष असून एक बेकायदेशीर विराधी पक्ष अस्तित्वात आहे. सोळाजणांचे मंत्रिमंडळ (कार्यकारी परिषद) असून त्याचा मुख्य हा देशाचा अध्यक्ष असतो. प्रशासकीय कारभारासाठी देशाचे सहा विभाग पाडण्यात आले असून त्या प्रत्येकाचा कारभार एकेका परिषदेकडून पाहिला जातो. सहा नगरपालिकाही आहेत. बेनिन हा संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकी ऐक्य संघटना यांचा सदस्य तर ‘इइसी’चा सहसदस्य आहे.

संरक्षण : भूसेनेमध्ये दोन इन्फन्ट्री वटालियन व साहाय्यकारी तुकड्या असून तिची एकूण संख्या २,१०० सैनिक एवढी आहे. पॅरामिलिटरी पोलीसदलात १,००७ सैनिक आहेत. वायुदलात १५० अधिकारी व सैनिक आहेत.


न्याय : कोटोनू येथे सर्वोच्य न्यायालय असून त्याच्या कामकाजाचे सांविधिक, प्रशासकीय, न्यायिक व लेखापालविषयक विभाग आहेत. ३१ उपविभागांमध्ये सब प्रिफक्चर ३१ समेट उपविभागांमध्ये (सब प्रिफेक्चर) ३१ न्यायाधिकरणे आहेत. पोर्तानोव्हो, कोटोनू, वीडा ॲबोमे, पाराकऊ, नाटीटिंग्गू व कांडी या शहरी दंडाधिकारी न्यायालये असून कोटोनू येथे अपील न्यायालय आहे मे १९७७ पासून कार्यवाहक मंत्रिपरिषद ही प्रांत व जिल्हे येथील न्यायाधीशांची तसेच खेडेगावांमधून ‘लोकन्यायाधीश’ यांची नियुक्ती करू लागली.

आर्थिक स्थिती : राजकीय दृष्ट्या प. आफ्रिकेचे अनेक लहान लहान तुकडे वा विभाग झाल्यामुळे सर्वाधिक नुकसान बेनिन या राष्ट्राचे झाल्याचे दिसून येते.

कृषी : बेनिनची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. १९७७ मध्ये ८ लक्ष हेक्टरांवर क्षेत्र लागवडीखाली आणण्यात आले, १९७६ च्या मानाने ही ४: वाढ झाली. यांपैकी ३,२२,६०० हे. क्षेत्र मका ८३,२०० हे. कसावा ९८,००० हे. ज्वारी ५९,५०० हे. गोराडू ६६,७०० हे. घेवडा व २५,००० हे. तृणधान्ये या पिकांसाठी निर्धारित करण्यात आले. त्याच वर्षी पुढीलप्रमाणे उत्पादन झाले : (आकडे लक्ष मे. टनांत) मका २.३५ कसावा ६.१० गोराडू ५.६४ घेवडा ०.७६ तृणधान्ये ०.१० तथापि तृणधान्यांचे उत्पादन अंतर्गत मागणीच्या मानाने कमी पडते. मासेमारी व पशुधन ह्या व्यवसायांकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. १९७६ मध्ये शेती सुधारणा कार्यक्रम जारी करण्यात आला. त्यानुसार सबंध देशात माजवादी तत्त्वावर सहकारी शेतीचे जाळे पसरविण्यावर भर देण्यात यावयाचा होता. उत्तर बेनिनमध्ये अशा प्रकारची सहकारी शेती प्रथम मार्यान्ति करण्यात आली. १९७९ पर्यंत बेनिनच्या सहाही प्रांतांत प्रत्येकी एक अशी सहकारी शेतीसंस्था उभारली जाण्याची योजना होती. जमिनीची सामुदायिक मालकी व प्रत्येक माणसाच्या कसणुकीप्रमाणे त्याला देण्यात यावयाचा मेहनताना हे अंतिम उद्दिष्ट होते. अर्थातच काही अधिक गरजांसाठी प्रत्येकाला थोडीबहुत जमीन अधिक प्रमाणात द्यावयाची, हेही यामध्ये अंतर्भूत होते. चिनी कम्यून पद्धतीचा या देशात अवलंब करावयाचा होते.

देशातील नगदी पिकांमध्ये ताडाचा प्रथम क्रम लागतो. सु. ४ लक्ष हे. क्षेत्रामध्ये ताडाची लागवड करण्यात आली असून १७,००० हे. क्षेत्रामध्ये औद्योगिक दृष्ट्या त्याची सधन लागवड करण्यात येते. या प्रकल्पाला यूरोपीय विकास निधी व फ्रान्स अशा दोहोंकडून साहाय्य करण्यात येते. १९७६ मध्ये खोबऱ्याचे उत्पादन सु. ७०,००० मे. टन, तर ताड तेलाचे उत्पादन १९७६ मधील १३,००० टनांवरून १९७७ मध्ये १२.४६७ टनांपर्यंत घसरले. खोबरेल तेलाचे उत्पादन मात्र २२,००० टन एवढे होते. अतिशय जलद प्रमाणात विकास पावणारे दुसरे नगदी पीक म्हणजे कापूस हे होय. १९६६-६७ मधील ९,००० टनांवरून त्याचे उत्पादन १९७२-७३ मध्ये ५०,००० टनांवर वाढले. उत्तर बेनिनमध्येही जागतिक बँकेच्य अर्थसाहाय्याने कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. १९७६-७७ मध्ये मात्र कापूस उत्पादन १७,४९७ टनांपर्यंत घसरले. विपणन संघटनपद्धतींचा अभाव, कापसाचा चोरटा व्यापार व एका फ्रेंच कापूस कंपनीचे देशातून निघून जाणे, ही कारण्यो यामागे होती. इतर नगदी पिकांमध्ये भुईमूग (उत्पादन ६,००० टन) व कॉफी (२,२८० टन) यांचा समावेश होता. १९७७ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : गाईगुरे ८.३३ मेंढ्या ८.८६ बकऱ्या ८.५८ डुकरे ३.७८ कोंबड्या ४०.६८. त्यामानाने घोडे व गाढवे यांची संख्या थोडी म्हणजे ६,००० व १,००० होती. गाईगुरांची जोपासना मुख्यतः उत्तर भागात, तर कोंबड्यांची दक्षिण भागात केली जाते. पश्चिम आफ्रिकेतील इतर देशांप्रमाणे बेनिनमध्येही बुळकांड्या रोगापासून प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येते. यासाठी कोटोनू व पाराकाऊ येथे दोन मोठी केंद्रे व इतर बारा ठिकाणी उपकेंद्रे उघडण्यात आली आहेत. प्रायोगिक स्वरूपात मेंढी-संगोपन केंद्र व मांस-उत्पादन केंद्रे स्थापण्यात आली आहेत. कोटोनू व इतर किनारी शहरांमध्ये सागरी मच्छीमारीचे महत्त्व वाढत आहे. सेनेगल शासनाच्या सहकार्याने बेनिनच्या कोळयांना खोल समुद्रातील मासेमारीचे प्रशिक्षण दिले जाते. खारकच्छ व नद्या यांमधील मासेमारीही महत्त्वाची आहे. १९७६ मध्ये अंतर्गत जलाशय (नद्या, खारकच्छ इ.) व अटलांटिक महासागर यांमधून अनुक्रमे २०,६०० व ५,००० मे. टन (एकूण २५,६०० मे. टन) एवढे मत्स्योत्पादन झाले. १९७६ मध्ये जंगलांखाली २१.४४ लक्ष हे. क्षेत्र असून इंधन, कोळसा आणि इमारती लाकूड ही प्रमुख जंगत उत्पादने होत. १९७६ मध्ये इंधनासाठी २३.७० लक्ष घ. मी., औद्योगिक उपयोगासाठी १.५५ लक्ष घ. मी. आणि इमारती, रेल्वेस्लीपर वगैरेंसाठी ०.२४ लक्ष घ. मी. लाकडाचे उत्पादन झाले. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाखाली देशात एक लाकूडसंशोधन संस्था उभारण्यात आली आहे.

उद्योग : स्थानिक शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग देशात जास्त आहेत. प्रक्रियेत पदार्थांची निर्यात केली जाते. औद्योगिक क्षेत्राचा (खाणकाम, निर्मितिउद्योग व लोकोपयोगी सेवा उद्योग) स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा १९६५-६६ मधील ६: वरून १९७६ मध्ये २०: पर्यंत वाढल्याचे दिसून येते. पाराकाऊ येथे देशातील सर्वात महत्त्वाचा कापडनिर्मिती प्रकल्प (५२० कोटी फ्रँक सीएफ्ए खर्चाचा) आहे. त्याची वार्षिक उत्पादनक्षमता ३,००० टन असून १९७७ मध्ये १,६०० टन उत्पादन झाले. याशिवाय आणखी दोन कापडनिर्मिती प्रकल्प पोर्तोनोव्हो येथे वार्षिक २०,००० टन उत्पादनक्षमतेचा सिमेंट कारखाना, १२ कोटी डॉलर खर्चाचा एक साखर कारखाना व खनिज तेलशुद्ध कारखाना या उद्योगांची उभारणी चालू आहे. केरेकू राजवटीपासून (१९७२) औद्योगिक क्षेत्रात वाढता शासकीय सहभाग असल्याचे दिसून येते. अनेक खाजगी उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले असून बहुतेक मोठ्या उद्योगांवर (कापड गिरण्या वगळून) शासनाचे नियंत्रण आहे. ताडतेल गिरण्या, कापूस वटन गिरण्या, कापोक सडण्याच्या गिरण्या, बांधकाम सामान कारखाने सिट्रोएन मोटार कारखाना, एक बीर कारखाना, एक फर्निचर कारखाना, ॲल्युमिनियम धातूच्या पत्र्यांचा कारखाना, तागपिशव्यांचा कारखाना हे उद्योग देशात आहेत. देशातील एकूण लोकसंख्येपैकी कृषिक्षेत्रात ६.५५ लक्ष, उद्योगधंद्यांत १.५६ लक्ष, तर सेवाउद्योगांत ५.०६ लक्ष लोक गुंतलेले होते (१९७०). १९७५ मधील एकूण श्रमबल १४.४५ लक्ष (पुरूष ७.७७ लक्ष, तर स्त्रिया ६.६८ लक्ष) एवढे होते. शेतमाल, खनिज पदार्थ, भांडवली वस्तू, आयात माल यांकरिता विपणन मंडळे स्थापन करण्यात आली असून एक वाणिज्य मंडळही आहे.


देशात एक कामगार संघटना आहे. वीजनिर्मिती औष्णिक प्रकाराने होत असून १९६७ मध्ये टोगो व घाना या राष्ट्रांबरोबर झालेल्या एका करारान्वये घानामधील व्होल्टा नदीवर उभारलेल्या आकोसोंबो धरणाद्वारे कमी खर्चात बेनिनला वीजपुरवठा केला जातो. सुयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारा मोनो नदीवर उभारण्यात यावयाच्या धरणांकरिता अर्थसाहाय्य केले जात असून त्यांपासून निर्माण होणारी वीज टोगो व बेनिन या देशांच्या दक्षिण भागांना पुरविली जाणार आहे. खाण उद्योगावर शासनाचे नियंत्रण आहे. लोह व क्रोम खनिजसाठे उत्तर बेनिनमध्ये, तर फॉस्फेट व लिग्नाइट दक्षिण बेनिनमध्ये आढळले आहेत. किनारी भागात कॅलिफोर्नियाची ‘युनियन ऑइल कंपनी’ तेल संशोधन व उत्पादन क्षेत्रात साहाय्य करीत आहे.

व्यापार व अर्थकारण : बेनिनच्या विदेश व्यापारात तैलधर्मी पदार्थांचा-खोबरे, ताडतेल, खोबरेल, भुईमूग-तसेच कॉफी, तंबाखू व कापूस या वस्तूंचा अधिक भरणा आहे. निर्यात पिकांमधील विविधता व विस्तार या १९६५ पासून अंगिकारलेल्या धोरणामुळे देशाचे निर्यात व्यापारी उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढून १९६७ मधील ३८० कोटी फ्रँक सीएफ्एवरून ते १९७१ मध्ये १,१६४.८ कोटी फ्रँक सीएफ्ए एवढे झाले. तथापि त्याच वर्षीचा आयात व्यापाराचा बोजा २,१२०.२ कोटी फ्रँक सीएफ्ए एवढा झाला. आयात व्यापारात निम्म्याहून अधिक वस्तू उपभोक्ता उद्योगांच्या असतात. आयात व्यापारामधील वस्तूंमध्ये सुती वस्त्रे, वाहतूक सामग्री, खनिज तेलपदार्थ, बांधकाम साहित्य, तांदूळ, तंबाखूचे पदार्थ, लोखंड व पोलाद वस्तू इत्यादींचा विशेषेकरून भरणा असतो. निर्यात व्यापारात चीन, फ्रान्स, प. जर्मनी, जपान, नेदर्लंड्स, नायजर, नायजेरिया या देशांचा क्रम असतो तर आयात व्यापारात चीन, फ्रान्स, प. जर्मनी, आव्हरी कोस्ट, नेदर्लंड्स, ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त सुस्थाने हे पराक्रम सहभागी होतात. १९७७ मधील एकूण आयात व निर्यात अनुक्रमे ६,०३५,.४० कोटी व ७६४.२० कोटी फ्रँक सीएफ्ए एवढी होती. याचाच अर्थ आयात-निर्यात व्यापारात अनुक्रमे २५% व ६% वाढ झाली. बेनिनला १९७४-७७ या काळात पश्चिमी पराक्रम आणि प्रातिनिधिक संस्था यांकडून दरवर्षी सरासरी ५.०७ कोटी अमेरिकी डॉ. एवढे विकास साहाय्य मिळत गेले. बेनि हा पश्चिम आफ्रिकी द्रव्य संघाचा सदस्य असून इइसी देशांनी लॉमे-कराराने तो बांधलेला आहे. यामुळे त्याला अनेक प्राथमिक वस्तूंची सीमाशुल्क खरेदी करणे शक्य होते तसेच ‘स्टॅबेक्य’ या निर्यात स्थैर्य योजनेमुळे त्याला ताडतेल, खोबरे, भुईमूग, कापूस, कॉफी व कोको या पदार्थांच्या निर्यात किंमतींबाबत संरक्षण मिळू शकते.

फ्रँक सीएफ्ए हे बेनिनचे अधिकृत चलन असून त्याचे १०० सेंटिम होतात. १, २, ५, १०, २५, ५० व १०० फ्रँक सीएफ्एची नाणी, तर ५०, १००, ५००, १,००० व ५,००० च्या कागदी नोटा प्रचारात आहेत. एप्रिल १९७९ मधील १ फ्रँक सीएफ्ए = २ फ्रेंच सेंटिम असे प्रमाण असून १ पौंड स्टर्लिंग = ४५२.५२ फ्रँक सीएफ्ए व १ अमेरिकी डॉलर = २१८.६५ फ्रँक सीएफ्ए आणि १,००० फ्रँक सीएफ्ए = २.२१ पौंड = ४.५७ डॉलर असा विनिमय अद होते. देशात एक मध्यवर्ती बँक असून विकास व्यापार, शेती, पतपुरवठा, सहकार यांसाठी प्रत्येकी एक बँक कार्यवाहीत आहे. गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्पीय खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. १९६९ मधील ७३३.६० कोटी फ्रँक सीएफ्एरून १९७८ मध्ये २,३०० कोटी फ्रँक सीएफ्ए एवढा खर्च झाला. १९७६ पासून खर्चावर कडक नियंत्रण आले असून, परदेशी मदतीचे देशातील विकास कार्यक्रमांच्या संदर्भात मोठे महत्त्व मानले जाते. १९७८ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न व खर्चाची आकडेवारी सारखीच म्हणजे २,३२१ कोटी फ्रँक सीएफ्ए होती. १९६६-७० ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण विकास, सेपराक्रमवहन व शक्तिसाधनांचा विकास, उद्योग व व्यापार वृद्धी, सामाजिक व प्रशासकीय विकास इ. बाबींतर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. १९७१-७२ मधील अंतिम योजना मागील प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात आली. १९७७-८८ ही त्रिवर्षीय योजना राष्ट्रीय क्रांतिकारी पषिदेने ऑगस्ट १९७७ मध्ये संमत केली.

वाहतूक व संदेशवहन : बेनिनची वाहतूक व्यवस्था तौलनिक दृष्ट्या चांगली आहे. रेल्वेच्या बाबतीत बेनिन (६३:) व नायजर (३७:) या दोन राष्ट्रांची संयुक्त संघटना आहे. प्रमुख लोहमार्ग कोटोनू ते पाराकाऊ असा ४३८ किमी. लांबीचा असून लोहमार्गाची एक शाखा वीडा ते सेग्बोराउए अशी ३४ किमी. पश्चिमेकडे गेलेली आहे. तसेच कोटोनू-पोबे (नायजेरियन सरहद्दीजवळील शहर) द्वारा पोर्तोनोव्हो असा १०७ किमी. लांबीचा एक लोहमार्ग गेलेला आहे. देशातील एकूण लोहमार्गाची लांबी ५७९ किमी. असून प्रमुख लोहमार्ग पाराकाऊपासून पुढे नायजरमधील डोसा शहरापर्यंत ५२० किमी. वाढविण्याची योजना आहे. रस्तावाहतूक चांगली विकसित झाली आहे. देशात एकूण ६,९३७ किमी. लांबीचे प्रतवारी केलेले रस्ते असून कोरड्या ऋतूमध्ये मोटार वाहतुकीला उपयुक्त व सोयीस्कर असे आणखी १,००० किमी. लांबीचे रस्ते आहेत. किनाऱ्याने गेलेले व कोटोनू ते बोहीकॉन तसेच पाराकाईऊ ते मालांव्हिल या शहरांना जोडणारे रस्ते सु. ७०० किमी. लांबीचे असून डांबरी आहेत. नायजेरिया व आंतरराष्ट्रीय विकास संस्था यांच्या सहकार्याने देशातील १,८०० किमी. वर रस्त्यांचे डांबरीकरण व सुधारणा योजना १९७७ मध्ये मार्यान्वित झाली. देशात १९७४ मध्ये एकूण १४,००० मोटारी तसेच ८,६०० बसगाड्या व ट्रक (मालवाहू गाड्या) होते. किनाऱ्याला समांतर असणाऱ्या खाररकच्छांमधून लहान-लहान होड्या वाहतूक करतात. ओऊमे, कूफो व मोनो या नद्या अनुक्रमे सु. २०१ किमी., १२८ किमी. आणि ९६.५ किमी. पर्यंत नौवहनसुलभ आहेत. साधारणतः ६०० जहाजे प्रतिवर्षी देशातील प्रमुख कोटोनू बंदरात येतात. १९७६ मध्ये मात्र या बंदरात १,०८९ जहाजे थांबली होती. त्याच वर्षी या बंदराने १०,४०,००० मे. टन मालाची उलाढाल केली. कोटोनू बंदराची क्षमता आंतरराष्ट्रीय कर्ज व द्रव्यसाहाय्य यांद्वारा १९८० पर्यंत दुप्पट करावयाची योजना हाती घेण्यात आली. कोटोनू येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तेथील धावपट्टी २.४ किमी. लांबीची आहे. पाराकाऊ, नाटीटिंग्गू, बीम्बेरेके, कांडी व ॲबोमे येथे दुय्यम प्रतीचे विमानतळ आहे. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या ‘एअर आफ्रिक’ या बहुदेशीय आफ्रिकी राष्ट्रांच्या विमान कंपनीमध्ये बेनिनचे ७%  भागभांडवल आहे.


कोटोनूला कॅमेरून एअर लाइन्स, पॅनॅ (अमेरिका) व यूटीए (फ्रान्स) या विमान कंपन्या आपली हवाई वाहतूक सेवा उपलब्ध करतात. १९७५ मध्ये देशात ९,६२४ दूरध्वनी असून टोगो, नायजर व सेनेगल या देशांशी कोटोनू दूरध्वनीने जोडण्यात आले आहे. दूरध्वनी सेवा सार्वजनिक मालकीची आहे. १९७२ मध्ये १,५०,००० रेडिओ व १०० दूरचित्रवाणी संच होते. प्रतिदिनी २,००० खपाची दैनिके निघतात (१९७८).

गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : बेनिन प्रजासत्ताकाची १९८१ ची एकूण लोकसंख्या ३५,२०,०००असून तीतील तीन-चतुर्थांश लोकसंख्या देशाच्या दक्षिण भागात एकवटलेली आढळते. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी. स २९.१ असून दक्षिण भागात ती सर्वाधिक (दर चौ. किमी. स १२० पेक्षा जास्त) आहे. प. आफ्रिकतील सर्वाधिक घनता याच भागात आढळते. देशात वांशिक व भाषिक भिन्नता बरीच आढळते. सांस्कृतिक दृष्ट्या इतर आफ्रिकन देशांपेक्षा जो वेगळेपणा येथे आहे तो त्यांच्या संगीत, नृत्य, दंतकथा, शिल्पकला यांमधून जाणवतो. त्या दृष्टीने देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग आढळतात. १९५९ च्या अंदाजानुसार देशांतील वेगवेगळ्या वांशिक गटांतील लोकांचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे होते : फॉन किंवा दाहोमियन ४७, अदजा १२.२, बारीबा ९.७, यॉरूबा व माली ८.८, आयझो ५.१, सोंबा ५.०, फुलानी ३.८, कोटो-कोली २.५ देंडी १.७ आणि इतर (फ्रेंच, पोर्तुगीज इ.) ४.४, येथील दाहोमियन लोकांच्या आधिक्यामुळेच या देशाचे पूर्वी ‘दाहोमी’ असे नाव होते. बेनिनमधील लोक परंपरावादी, धार्मिक, जडप्राणवादी, मूर्तिपूजक आणि जादूटोणा, भूतपिशाच इ. मानणारे आहेत. निसर्गातील प्रत्येक वस्तूत दैवी अंश आहे असे ते मानतात. वीडा हे धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

एकोणिसाव्या शतकात येथे ख्रिश्चन मिशन ह्या संस्थांची स्थापना झाली असून त्यांचा प्रामुख्याने शिक्षणक्षेत्रात बराच प्रभाव आढळतो. देशाच्या दक्षिण भागात ख्रिश्चन, तर उत्तर भागात इस्लाम धर्मीयांचे आधिक्य आहे. एकूण लोकसंख्येपैकी १७% ख्रिश्चन (पैकी १२%  कॅथलिक व ३%  प्रॉटेस्टंड) व १३%  मुस्लिम असून ६५%  जडप्राणवादी आहेत. बऱ्याच लोकांचा व्यवसाय शेती आहे. फुलानी व पेरूल लोक भटके गुगखी आहेत, तर यॉरूबा लोक छोट्या-छोट्या व्यापारउदिमांत गुंतलेले आहेत. येथील यॉरूबा लोक नायजेरियातून आलेले असून बेनिनच्या पूर्व सरहद्दीदरम्यान त्यांचे आधिक्य आहे.  येथून प्रामुख्याने नायजेरिया व घानामध्ये कामगारांचे स्थलांतर होत असते. यूनोच्या अंदाजाप्रमाणे १९७०-७५ मधील वार्षिक सरासरी जन्मप्रमाण दरहजारी ४९.९ आणि मृत्युप्रमाण दरहजारी २३ होते. देशातील ८८%  लोक ग्रामीण भागात राहतात.

 उत्तर बेनिनच्या ग्रामीण भागातील घरे मातीची, गोलाकार व शंक्वाकृती छपराची, तर द. भागातील घरे आयताकृती व ताड किंवा गवताने शाकारलेली, उतरत्या छपराची असतात. किनाऱ्यावरील खारकच्छ भागात पाण्याचा त्रास टाळण्यासाठी जमिनीपासून उंच अशा डांबावर बांबूच्या व गवती छपराच्या झोपड्या तयार केलेल्या आढळतात. बेनिनमधील स्त्रियांचे कपडे भडक रंगाचे असतात. सामान्यपणे ‘अगबाडे’- कुडता, पायजमा, झगा-हा येथील लोकांचा पोशाख आढळतो. बरेच लोक (विशेषतः द. भागातील) मात्र अमेरिका, कॅनडामधील लोकांसारखे कपडे वापरतात. फ्रेंच ही येथील अधिकृत भाषा असून अनेक आफ्रिकन भाषाही बोलल्या जातात. ४७%  लोक फॉन, १२%  अदजा, १०%  बारिबा व ९%  लोक यॉरूबा भाषिक आहे. यांशिवाय मीना, देंडी या भाषाही बोलल्या जातात. दक्षिण बेनिनमध्ये फॉन व यॉरूबा भाषा महत्त्वाच्या आहेत. पोर्तोनोव्हो येथे ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. येथूनच एक विद्वत्तापूर्ण असे नियतकालिक प्रसिद्ध होते. च मर्यादित आहे. अजूनही नियतकालिके छपाईपूर्वी मंत्रालय व पोलीस विभागांकडे पाठवावी लागतात.

देशात शैक्षणिक व आरोग्य सेवा पुरेशा उपलब्ध नाहीत. १९७८ मध्ये प्राथमिक शाळांत ६,०४८ शिक्षक व ३,३८,९४९ विद्यार्थी माध्यमिक शाळांमध्ये १,२१५ शिक्षक व ५५,६५४ विद्यार्थी होते. कोटोनू येथे बेनिन विद्यापीठ आहे. यांशिवाय ७ तांत्रिक विद्यालयांत २,००० विद्यार्थी व ४ शिक्षक प्रशिक्षण संस्थांत २,५५३ विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९७१-७२). शाळेत जाऊ शकणाऱ्या वयोगटातील केवळ ३०%  मुलेच शाळेत जातात. १९७६ मध्ये देशात एकूण ३६१ दवाखाने व रुग्णालये ४,३९४ खाटा, ९३ डॉक्टर, १० दंतवैद्यक, ३४ औषधनिर्माते व २४३ प्रसाविका होत्या. अनेक साथीच्या रोगांवर अलीकडे मात करण्यात आलेली आहे. देवीनिवारण मात्र अजून पूर्णतः सफल झालेले नाही.

प्रेक्षणीय स्थळे : पोर्तोनोव्हो (लोकसंख्या १,३२,०००-१९७९ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. कोटोनू (३,२७,६००) हे देशातील सर्वात मोठे शहर, प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात येथेच राजधानी आणण्याचा विचार होता परंतु अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. पोर्तोनोव्हो हे आफ्रिकी लोकांनी वसविलेले जुने शहर, तर कोटोनू हे यूरोपीयांनी उभारलेले आधुनिक शहर आहे. यांशिवाय पूर्वीच्या राजाची राजधानी असलेले ॲबोमे (४१,०००-१९७५), पूर्वीचे गुलामांच्या व्यापाराचे बंदर वीडा देशाच्या मध्य भागातील प्रमुख लोहमार्ग प्रस्थानक व बाजारपेठेचे केंद्र पाराकाऊ इ. देशातील प्रमुख शहरे आहेत.

 चौधरी, वसंत