गात्रोपघात : शरीरातील एखादाच स्नायू, स्नायुसमूह अथवा शरीरातील एखाद्याच अवयवाची अथवा शरीरभागाची चलनशक्ती अंशत: वा संपूर्णपणे नष्ट झाल्यास त्या प्रकाराला ‘गात्रोपघात’असे म्हणतात. केव्हा केव्हा चर्वणक्रियेस आवश्यक असलेल्या जबड्याच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंपैकी एकाच बाजूचे स्नायू निष्क्रिय झाल्याचे आढळते. बाल पक्षाघातातही (पोलिओतही) काही विशिष्ट स्नायुसमूहांचा गात्रोपघात होतो.

सहा महिने ते अडीच वर्षे वयाच्या मुलांना परिमस्तिष्कशोथ (मेंदूवरील आवरणाची दाहयुक्त सूज) झाल्यास त्या रोगाचा उपद्रव म्हणून, तसेच घटसर्पानंतर अशा तऱ्हेचा गात्रोपघात आढळतो. मूळ रोगाचा उपशम झाल्यानंतर हा उपद्रवही हळूहळू कमी  होत जातो. 

तंत्रिकोन्मादामध्ये (हिस्टेरियामध्ये) रोग्याच्या अवयवांत विशेषतः पायांतील स्नायूंची शक्ती नष्ट होऊन उभे राहणे अशक्य होते.

पहा : पक्षाघात पोलिओ.                                             

आपटे, ना. रा.