गाणपत्य संप्रदाय : गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या हिंदूंच्या एका संप्रदायास ही संज्ञा असून ह्या संप्रदायाच्या अनुयायांना ‘गाणपत्य’ म्हणतात. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत ह्या संप्रदायाचा अंतर्भाव होतो. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हा तरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. ह्याच कालखंडात रचलेल्या भवभूतीच्या मालतीमाधव नाटकात गणपतीचे स्तवन आहे. सु. चौथ्या शतकातील याज्ञवल्क्यस्मृतीतही महागणपतीची पूजा करण्यास सांगितले आहे. आठव्या व नवव्या शतकांतील काही कोरीव लेखांतही गणपती व गाणपत्यांचे उल्लेख आढळतात. सर्वसाधारणत: याच काळात गाणपत्यांच्या सांप्रदायिक ग्रंथांचीही रचना झाली असावी. त्यांत गणेशपुराण, ब्रह्मवैवर्तपुराणातील ‘गणेशखंड’, मुद्गलपुराण, गणपत्युपनिषद, गणेशसंहिता, गणेशगीता, गणेशकल्प, गणपतिरहस्य, गणेशसहस्रनाम, गणेशमाहात्म्य इत्यादींचा अंतर्भाव होतो.
गाणपत्य संप्रदायातील सहा भेद किंवा उपसंप्रदाय आनंदगिरीने अापल्या शंकरदिग्विजयामध्ये तसेच धनपतीने माधवाचार्यांच्या शंकरदिग्विजयावरील भाष्यात नमूद केले आहेत. ते असे : (१) महागणपती, (२) हरिद्रागणपती, (३) उच्छिष्टगणपती, (४) नवनीतगणपती, (५) स्वर्णगणपती आणि (६) संतानगणपती आनंदगिरीने शेवटच्या तीन भेदांची नवनीत, स्वर्ण आणि संतानगणपती अशी जी नावे दिली आहेत, त्यांचे अनुक्रमे ऊर्ध्व, पिंगल आणि लक्ष्मीगणपती असेही प्राचीन पर्याय आहेत तथापि आनंदगिरीने दिलेली नावेच विशेष रूढ आहेत. ह्यांतील काही गणपतिनामांचा संबंघ ज्या द्रव्यांपासून गणपतीची मूर्ती बनवीत असत, त्या द्रव्यांशी असावा असे दिसते. उदा., हळद-हरिद्रा, लोणी-नवनीत, सुवर्ण-स्वर्ण.
गाणपत्य संप्रदायात गुप्त व प्रगट अशा दोन्हीही प्रकारे उपासना होत असे. संप्रदायात गणपती हा शिवाचा प्रतिस्पर्धी आणि इतर सर्व देवांहून श्रेष्ठ मानला जातो. संकटसमयी इतर देवही त्याचे साहाय्य घेऊ लागल्याच्या कथा सांप्रदायिक ग्रंथांत आहेत. सर्वश्रेष्ठ देवता म्हणून गणपतीच्या उपासनेची ही नवी लाट निर्माण होताच संप्रदायातील सहा भेदांचे पुनरुज्जीवन झाले. टी.ए. गोपीनाथ राव आणि एच्. डी. भट्टाचार्य यांनी आपल्या हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल (खंड चौथा) या ग्रंथात पुढील पाच उपसंप्रदायांचा अंतर्भाव ‘शक्तिगणपती’ ह्या वर्गात केला असून त्यांचे मूर्तिविशेषही प्रमाणभूत प्रतिमाविद्याविषयक ग्रंथांच्या आधारे तपशिलांसह दिले आहेत: (१) उच्छिष्टगणपती: लालवर्ण, चतुर्भुज. (२) महागणपती : रक्तवर्ण, दशभुज. (३) ऊर्ध्वगणपती : सुवर्णपीतवर्ण, षड्भुज. (४) पिंगलगणपती : पिंगटवर्ण, षड्भुज. (५) लक्ष्मीगणपती : शुभ्रवर्ण, चतुर्भुज वा अष्टभुज. प्रतिमाविद्याविषयक विविध ग्रंथांत ह्या पाचही मूर्तींच्या तपशिलांबाबत थोडीफार तफावत आढळते. तथापि ह्या मूर्ती शक्तिदेवीसमवेत असल्याबाबत मात्र सर्वांतच एकवाक्यता आढळते. यांव्यतिरिक्त हरिद्रागणपती नावाने ओळखला जाणारा (पीतवर्ण, चतुर्भुज) सहावा भेद असून त्यात गणपती हा सर्वश्रेष्ठ देव म्हणून उपास्य होता. या उपसंप्रदायाचे अनुयायी गणपतीचे मुख वएक दंत आपल्या दोन्ही दंडांवर गोंदवून घेत.
शिवापासून गूढ स्वरूपात गणपतीची उत्पत्ती झाली, असे दाखविण्याचे प्रयत्न देवोत्पत्तिशास्त्राच्या (थिऑगॉनी) सैद्धांतिक पातळीवर झाले तर तंत्रमार्गात गणपतीची उत्पत्ती विविध फलप्राप्तीच्या यंत्रापासून आणि मंत्रापासून झाल्याचे म्हटले आहे. गणपतीच्या शक्तीची मूर्ती ‘श्री-अंगिनी’ ह्या नावाने संबोधिली जाते. त्याच्या उभ्या, बसलेल्या, नृत्यावस्थेतील तसेच एकमुखी ते पंचमुखी, द्विभुज ते दशभुज, द्विनेत्र वा त्रिनेत्र व शक्तिसमवेत आणि गणपरिवारासमवेत अशा विविध प्रकारच्या मूर्ती भारतात सापडल्या आहेत. जैन व बौद्ध धर्मांत तसेच भारताबाहेरही पूर्वेकडील देशांत त्याची उपासना होत होती व तेथेही त्याच्या मूर्ती सापडल्या आहेत. रामपाल (डाक्का) येथील अवशेषांत सापडलेल्या एका मूर्तीच्या वरच्या बाजूस ज्या सहा गणपतींच्या लहान लहान मूर्ती कोरलेल्या आहेत, त्या गाणपत्यातील वरील सहा उपसंप्रदायांच्या असाव्यात, असे मानले जाते.
गाणपत्यातील सहाही भेदांत उपास्य देवतेचे रूप, नाम, उपासनेचे शब्द व मंत्र तसेच अनुयायांना द्यावयाचा उपदेश यांबाबत भिन्नता आढळते. तथापि गणपती हाच सर्व देवांचे आणि सृष्टीचे आदिकारण आहे, शिव नव्हे तसेच तो अनादि-अनंत असून त्याच्या मायेनेच ब्रह्मादी सर्व देव व हे विश्व निर्माण झाले आहे, याबाबत मात्र ह्या सर्वांचेच एकमत आहे. डब्ल्यू. वॉर्ड यांच्या मते बंगालमधील ज्या हिंदूंनी गणपतीची ‘विघ्नकर्ता’ अशा रूपाऐवजी ‘विघ्नहर्ता’ अशा रूपात उपासना केली, तेच गाणपत्य म्हणून स्वतंत्र संप्रदायाने ओळखले जाऊ लागले.
उच्छिष्टगणपती ह्या संप्रदायभेदाचा विशेष म्हणजे त्यात वाममार्गी उपासनापद्धतीचा अवलंब केला जातो आणि देवी ही शिवाऐवजी गणेशाची शक्ती मानली जाते. ह्या भेदातील उपास्य गणपतीचे नाव हेरंब आहे. सर्वच कर्मकांड, जातिभेद आणि विवाहाची बंधने ह्या उपसंप्रदायास मान्य नाहीत. त्यांच्या मते स्त्री-पुरुषातील मुक्त व स्वैरसंभोग हाच उपासनेचा सर्वोत्तम प्रकार असून पुरुष उपासक हे हेरंबरूपच होत. एच्.टी. कोलब्रुकच्या मते ह्या संप्रदायाचे उपTसक आपल्या कपाळावर शेंदराचा लाल टिळा लावतात तसेच तोंडात तोबरा भरून उष्ट्या तोंडाने अपल्या उपास्य देवतेची प्रार्थना करतात. यावरूनच ह्या भेदास ‘उच्छिष्टगणपती’ असे नाव पडले असावे.
आज गाणपत्य संप्रदाय इतर काही वैष्णव व शैव पंथांप्रमाणेच फारसा प्रचारात असल्याचे दिसत नाही. सांप्रदायिक स्वरूपात नसली, तरी वैयक्तिक देवतास्वरूपात मात्र गणपतीची उपासना सर्व हिंदूंमध्ये भारतभर आजही प्रचलित आहे. विशेषत: दक्षिण भारतात व महाराष्ट्रात गणपतीची उपासना विशेष प्रमाणात केली जाते. गणपती हा मूळचा अनार्य द्रविड लोकांचा देव असावा व नंतर आर्यांनी त्याला आपल्या दैवतसमूहात समाविष्ट करून घेतले असावे, असे काही विद्वान मानतात. मनुस्मृतीत गणपती हे शूद्रांचे दैवत असल्याबाबतचा उल्लेख आहे तथापि तो प्रक्षिप्त असावा असे काहींचे मत आहे. एवढे मात्र खरे, की सांप्रदायिक दीक्षा घेतलेल्या गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते. वैदिक विधींत त्यांना ब्राह्मणांसमवेत बसवू नये, अशी प्रवृत्ती होती. केरळमध्ये गणपतीची अनेक स्थाने व मंदिरे असून त्यांना ‘होमपुरे’ म्हणतात आणि तेथे गणपतीला नित्य होमही होतो. महाराष्ट्रातील ⇨ अष्टविनायकांची स्थाने प्रख्यात आहेत तसेच इतर अनेक ठिकाणीही गणेशमंदिरे आहेत. पुण्याजवळील चिंचवड येथील गणेशस्थानही ⇨ मोरया गोसावी ह्या गणेशोपासकामुळे विशेष प्रसिद्ध आहे. सांप्रदायिक ग्रंथांतून ऋग्वेदातींल सूक्ताचा एकद्रष्टा ऋषी गृत्समद हा आद्य गाणपत्य मानला जातो. तसेच मुद्गल, भृशुंडी, वरेण्य, गणेशयोगी हे महागाणपत्य मानले जातात. (चित्रपत्र ४१ ).
पहा : गणपति.
संदर्भ : 1. Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems, Varanasi, 1965.
2. Rao, T. A. Gopinath, Elements of Hindu Iconography, Vol. I, Part 1, Delhi, 1968.
३.गाडगीळ, अमरेंद्र, संपा. श्रीगणेशकोश, मुंबई, १९६८.
सुर्वे, भा. ग.
“