गाठोणा : (ढोर दवणा हिं. दोणा, नाग दोणा क. मंजिपत्री सं. सुगंधा, नागदमणी इं. इंडियन वर्मवुड, मुगवर्ट लॅ. आर्टेमिसिया निलगिरिका कुल-कंपॉझिटी ). पश्चिम हिमालय, आसाम, पश्चिम व दक्षिण भारत या प्रदेशांत वाढणारी एक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), सुवासिक, ०·५–२·५ मी. उंच व केसाळ वनस्पती. खोड व फांद्या लालसर व रेषांकित वरची पाने त्रिखंडित किंवा अखंड पण खालच्यापेक्षा लहान खालची ५–१० सेंमी. लांब, अंडाकृती व खोलवर विभागलेली, केसाळ व खालची बाजू पांढुरकी फुलांची स्तबके [ → कंपॉझिटी ] लंबगोल, लहान, लालसर पिवळी अथवा पांढरट, लोंबत्या केसाळ व शाखायुक्त कणिशावर चिकटलेली असून, प्रत्येक स्तबकात बाहेरची पुष्पके स्त्रीलिंगी आणि आतील द्विलिंगी व जननक्षम असतात [→ फूल]. कृत्स्नफल (शुष्क, आपोआप न फुटणारे व एकबीजी फळ) बारीक व लंबगोल असते. पानांचे चूर्ण कातडीच्या रोगावर व शिजविलेल्या पानांचे पोटीस डोकेदुखीवर लावतात. मुलांना कांजिण्यांवर त्यांचा सौम्य काढा व जंतावर तीव्र काढा देतात आचके थांबविण्यास या वनस्पतीचा रस डोक्यास लावतात. शिवाय ती कफोत्सारक, दीपक (भूक वाढविणारी), पौष्टिक, रेचक, ज्वरनाशक, आर्तवमोचक (मासिक पाळी बंद करणारी) आणि प्रसूतीस साहाय्यक आहे. कीटकांपासून कपड्यांचे संरक्षण करण्यास हिची पाने व फुले वापरतात.
आफळे, पुष्पलता द.