ख्रिस्ती धर्म : ख्रिस्ती धर्मास अथवा विश्वासास (फेथ) दोन हजार वर्षांची परंपरा आहे. येशू ख्रिस्ताचे कार्य जगात चालू ठेवण्याचे काम चर्च पार पाडते. सर्वांत झपाट्याने विकसित होणारी चर्चेस यूरोप-अमेरिकेत नसून, ती आशिया-आफ्रिकेत आहेत. ख्रिस्ती धर्मीयांची जगातील एकूण संख्या ९८,५३,६३,४०० (१९७१) असून भारतातील त्यांची संख्या १,४२,२३,३८२ व महाराष्ट्रातील ७,१४,१७४ (१९७१) आहे. ख्रिस्ती धर्माची माहिती ह्या लेखाचे पुढील सहा भाग करून दिली आहे : (१) येशू ख्रिस्ताची ओळख, (२) मिशनरी कार्य व इतिहास, (३) धर्मसिद्धांत, (४) कर्मकांड व संस्कार, (५) चर्चचे व्यवस्थापन आणि (६) ख्रिस्ती धर्माचा मानवी जीवनावर झालेला परिणाम.

येशू ख्रिस्ताची ओळख : ख्रिस्ती धर्म अथवा ख्रिस्ती विश्वास ह्यांचे थोडेतरी ज्ञान होण्यासाठी येशू ख्रिस्ताची माहिती असणे आवश्यक आहे. पॅलेस्टाइनमधील जेरूसलेमजवळील बेथलीएम नावाच्या लहानशा गावात एका यहुदी कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. वयाच्या २७–३० च्या दरम्यान त्याने लोकांना शिक्षण देणे व रोगमुक्त करणे अशा सेवाकार्याला प्रारंभ केला. त्याने भूतलावर फक्त तीन वर्षे आपले कार्य केले. परंतु तेवढ्या अवधीत परमेश्वराविषयीचे व मानवाविषयीचे खरे ज्ञान त्याने आपल्या सभोवतालच्या मानवांना करून दिले. त्याने बारा लोक निवडून घेतले व त्यांचे शिष्य बनले. त्यांपैकी एकाने शत्रूला फितूर होऊन येशूला धरून दिले व अशा रीतीने तो त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला.

कधीकधी येशू ख्रिस्ताचे वर्णन एक थोर सुधारक म्हणून करण्यात येते. आपल्या लोकांसाठी म्हणजे यहुद्यांसाठी, रोमन सत्ताधाऱ्यांना उलथून टाकण्याचा त्याने केव्हाच विचार केला नाही. त्या वेळची प्रचलित धर्मपद्धती ही फार कर्मठ बनली होती. लोकांना त्या धर्मपद्धतीपासून कसला आनंदही होत नव्हता व आशाही वाटत नव्हती. परंतु ही धर्मपद्धती नष्ट करून त्या जागी नवीन धर्म स्थापावा असाही त्याचा उद्देश नव्हता. परंतु परमेश्वराने दिलेल्या दहा आज्ञांचा नवा व समर्पक अर्थ त्याने सांगितला. तसेच परमेश्वरावर जिवंत श्रद्धा असणे, ही गोष्ट इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आवश्यक आहे, असेच त्याने शिकविले.

सर्वसामान्य जनता येशू ख्रिस्ताची प्रवचने आनंदाने ऐकत असे. कारण परूशी लोकांचे क्षुद्र कायदे धाब्यावर बसवून, सर्वसामान्य लोकांच्या मनावरचे धर्माचे दडपण त्याने कमी केले. परूशी हे यहुदी कायद्याचे अभ्यासक होते. ⇨ शब्बाथच्या दिवशी एखादा भुकेला माणूस शेतातून जात असता त्याने कणसे चोळून खाल्ली, तर ते सुद्धा त्यांना खपत नसे. कारण शब्बाथविषयक नियमांचे उल्लंघन होते, असे त्यांना वाटे. परंतु येशू म्हणाला, ‘शब्बाथ हा माणसासाठी आहे, माणूस शब्बाथसाठी नाही’. त्याने धर्म अधिक साधा व अर्थपूर्ण केला. परंतु त्याचा अर्थ तो आचरण्यास अगदीच सोपा होता असे नाही. कारण त्याने एक फार अवघड गोष्ट आचरणात आणण्यास सांगितली आहे. ती म्हणजे आपल्यावर झालेले अन्याय विसरणे. शत्रूवरदेखील प्रेम करण्यास त्याने सांगितले. त्याने पुष्कळ लोकांना रोगमुक्त केले. त्याच्या प्रवचनास मोठा जनसमुदाय जमत असे आणि तो अतिशय आनंदाने त्याचा उपदेश ऐके.

ख्रिस्ताने आपल्या सभोवती काही अनुयायी गोळा केले व त्यांना ‘माणसे धरणारे कोळी’ असे नाव दिले. ख्रिस्ती चर्चची ही सुरुवात होय. चर्चला ग्रीक शब्द ‘एक्लेशिया’ असा आहे. त्याचा अर्थ ‘ज्यांना पाचारण केले आहे’ असा होतो. ‘कायरियॉकन’ ह्या दुसऱ्या ग्रीक शब्दापासून ‘चर्च’ हा इंग्रजी शब्द आला आहे. त्याचा अर्थ ‘परमेश्वराचे म्हणजेच ख्रिस्ताचे पवित्र गृह’ असा होतो व तो ख्रिस्ताचे अनुयायी आणि ते ज्या वास्तूत उपासना करतात, त्याला उद्देशून वापरण्यात येतो.

येशू ख्रिस्तासारख्या चांगल्या व प्रेमळ व्यक्तीला अजिबात विरोधक नसतील असेच कोणालाही वाटेल. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. परूशांचे नियम त्याने मोडले, म्हणून परूशी लोकांना तो प्रथमपासूनच आवडत नव्हता. यहुद्यांवर म्हणजेच ज्यूंवर सत्ता गाजवणाऱ्या व त्यांना छळणाऱ्या रोमन साम्राज्याला उलथून टाकण्यासाठी त्याने आपली दैवी शक्ती वापरावी, असे सामान्य लोकांना वाटत होते. परंतु तो तसे करत नव्हता, म्हणून सामान्य जनताही त्याला साथ देत नव्हती. परमेश्वर यहुद्यांची सुटका करण्यासाठी मशिहाला वा ‘मसाय’ला (अभिषिक्त व्यक्तीला) पाठवणार आहे अशी यहुद्यांची श्रद्धा होती. येशू हाच मसाय असेल काय ? लोकांना एकत्र जमवून रोमन साम्राज्य उखडून टाकणे त्याला शक्य होणार नाही काय ? येशू हा परमेश्वराने पाठविलेला मसाय नव्हता. तो मानवाच्या हृदयात आपले राज्य स्थापन करण्यास आला होता. परंतु रोमन साम्राज्यविरुद्ध उठाव करण्यास हा आपले नेतृत्व करत नाही, हे सामान्य जनतेने पाहिल्यावर ते बिथरले व त्याच्यावर उलटले.

श्रीमंत लोक वेगळ्याच कारणामुळे त्याला भीत होते. शब्बाथचे नियम त्याने बदलले, परंतु त्यामुळे त्यांना त्याची एवढी फिकीर वाटली नाही. रोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध करावे अशीही त्यांची इच्छा नव्हती. कारण रोमन साम्राज्यात त्यांचे ठीक बस्तान बसले होते. परंतु जेरूसलेम येथील मंदिरात पडलेल्या एका अनिष्ट प्रथेचा येशूने निषेध केल्यामुळे ते चिडले होते. तेथे एका वेदीवर देवाला पशू वा पक्षी अर्पण करीत असत. जगातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या यहुद्यांना, हा अर्पण करावयाचा पशू वा पक्षी आपल्याबरोबर आणणे शक्य नव्हते. तेथल्या तेथेच तो त्यांना विकत घ्यावा लागे. ते स्वतःबरोबर जे द्रव्य आणत ते जेरूसलेममध्ये चालत नसे. सोबत आणलेले द्रव्य देऊन त्याच्या बदली त्यांना जेरूसलेमची नाणी घ्यावी लागत. ह्या व्यवहारात अर्पण करावयाच्या पशुपक्ष्यांचा विक्रय करणारे व नाणी बदलून देणारे व्यापारी अफाट नफा मिळवीत. प्रत्यक्ष मंदिरातच हा धंदा चालत असे. येशू ख्रिस्ताने मंदिरातून व्यापाऱ्यांना हुसकून दिले आणि पैशांची मेजे उपडी केली.

एकंदरीत तीन गट येशूचा द्वेष करत होते : (१) धार्मिक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करू पाहणारे सनातनी, (२) रोमन सत्तेविरुद्ध बंड करू इच्छिणारी सामान्य जनता व (३) श्रीमंत लोक. हे तिन्हीही गट त्याला पकडण्याच्या संधीची वाटच पहात होते. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, ह्याची पूर्ण कल्पना असतानाही येशूने आपल्या शिष्यांसमवेत शेवटचे भोजन केले. त्यानंतर त्याला पकडण्यात आले व खटला चालून त्याला क्रूसावर चढविण्यात यावे, अशी शिक्षा फर्मावण्यात आली. रोमन सुभेदार पिलातापुढे त्याला उभे करण्यात आले. त्याने रोमन सत्तेविरुद्ध बंडाचा उठाव केला, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. ही गोष्ट त्याने कधीच केली नाही. परंतु आपल्या सत्तेखाली असणाऱ्या लोकांच्या जीवनात खळबळ माजेल अशी कोणतीही गोष्ट रोमन सत्ताधाऱ्यांना नको होती आणि म्हणूनच येशूचे कार्य खरेच काय आहे, याची सखोल चौकशी त्यांनी केली नाही आणि येशूला क्रूसावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली. स्वतःला असह्य वेदना होत असतानाही येशूने आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली, की ‘हे परमेश्वरा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही’. येशूला एक कबरीत पुरण्यात आले. त्याचे शिष्य पळून गेले. आपला प्रभू आपल्याला परत पहायला मिळेल असे त्यांना वाटले नव्हते [→ येशू ख्रिस्त].


पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यगणांपैकी सेंट पीटर (पेत्रस, पहिले शतक) ह्या शिष्याला प्रथम दर्शन दिले. आपण येशूचे शिष्य आहोत, हे ह्याच पीटरने त्रिवार नाकारले होते. येशूच्या इतर शिष्यांनी व अनुयायांनीही येशूला पुनरुत्थानानंतर पाहिले होते. काहींनी येशूला प्रत्यक्ष पाहिले नाही तथापि त्यांनी त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला. कारण ज्यांनी येशूला प्रत्यक्ष पाहिले त्यांच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवावा, हे एक व दुसरे म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त हा लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून चर्चचे कार्य करत आहे, ह्याचा त्यांना प्रत्यय आला [→ पुनरुत्थान, ख्रिस्ताचे].

मिशनरी कार्य व इतिहास : येशू हा योग्य समयी आला असे पवित्र शास्त्रातील नव्या करारात म्हटले आहे. बुद्धिवंतांच्या मते ह्याचा अर्थ असा होतो, की येशूच्या आगमनाची सर्व सिद्धता झाली होती. त्याच्या आगमनासाठी तो अगदी योग्य समय होता. पॅलेस्टाइन देशाच्या बाहेर जेव्हा प्रथमतःच शुभवर्तमानाचा प्रसार होऊ लागला तेव्हाची रोमन साम्राज्यातील ऐतिहासिक परिस्थिती पाहता, एक दैवी शक्ती शुभवर्तमानासाठी योग्य असे वातावरण तयार करत होती व येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील दुःख सहन करण्यामुळे सर्व मानवजातीचे तारण होणार आहे, ही शुभवार्ता सर्व राष्ट्रांना सांगण्याची सर्व सिद्धता झाली होती हे लक्षात येते. शुभवर्तमानाचा प्रसार झपाट्याने होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत झाल्या :

(अ) रोमन साम्राज्यातील राजकीय ऐक्य व शांतता ह्यांमुळे तेथील व्यापार फार भरभराटलेला होता. साहजिकच त्यामुळे व्यापारी लोक रोमन साम्राज्यातील सर्व देशांत जात-येत होते आणि त्यांपैकी काहीजण आपल्याबरोबर ही शुभवार्ताही घेऊन जात होते.

(आ) इ. स. पू. ३३४–३२६ मध्ये अलेक्झांडरने संपादन केलेल्या विजयांमुळे ग्रीक भाषेचा फार दूरवर प्रसार झाला. त्यामुळे आध्यात्मिक आणि तात्त्विक विचार व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम उपलब्ध झालेले होते. अलेक्झांड्रियामध्ये इ. स. पू. २०० मध्ये जुन्या कराराचे ग्रीक भाषेत भाषांतर झाले. त्यामुळे पुष्कळशा यहुदेतर लोकांचा कल एकेश्वरवादाकडे झुकला.

(इ) साम्राज्यात अनेक वंशांचे व धर्मांचे लोक एकत्र नांदत होते. साम्राज्याच्या ह्या बहुधर्मीय स्वरूपामुळे पुष्कळांचा वेगवेगळ्या पंथांवरील विश्वास उडत चालला होता.

(ई) जगातील नैतिक स्थिती खेदजनक होती. त्या वेळच्या लिखाणातूनही हे प्रत्ययास येते. गुलामगिरीमुळे केवळ गुलामांच्याच नव्हे, तर त्यांच्या धन्यांच्या घरातही पराकाष्ठेची अधोगती झाली होती.

(उ) यहुदी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले होते. त्यामुळे ⇨ सिनेगॉग  किंवा एकत्र येण्याच्या इतर जागा स्थापन होऊ शकल्या.

चर्चचा व पर्यायाने ख्रिस्ती धर्माचा पहिला थोर मिशनरी म्हणजे ⇨ सेंट पॉल (सु. ३–सु.६७) हा होय. ख्रिस्ती धर्म हा यहुदी धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्याला सुरुवातीला वाटत होते, म्हणून त्याने सुरुवातीला ख्रिस्ती धर्माला फार विरोध केला. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करण्यासाठी तो दमास्कसला जात असता, त्याला आलेल्या एका विलक्षण अनुभवामुळे त्याचा हा दृष्टीकोन बदलला. त्याने तीनदा देशपर्यटन करून ख्रिस्ती धर्माचा जोरात प्रसार केला. ह्याच सुमारास येशूच्या पहिल्या बारा शिष्यांपैकी काही वेगवेगळ्या देशांत गेले. त्यांच्यापैकी एक भारतात आला. त्याचे नाव टॉमस (सु. पहिले शतक). ‘मार्थोमा’ नावाचे चर्च त्याने स्थापन केले [→ मार्थोमाइट पंथ].

अगदी सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांना ‘मार्गाचे वा पंथाचे अनुयायी’ म्हणत असत. यहुदी लोक आपला छळ करताहेत हे पाहून ते जेरूसलेम व पॅलेस्टाइन येथून पळून गेले परंतु नेमका ह्यामुळेच ख्रिस्ती धर्माचा इतरत्रही प्रसार झाला. साहजिकच रोम हे ख्रिस्ती धर्माच्या कार्याचे केंद्र बनले. परंतु लवकरच रोमन लोकही त्यांचा छळ करू लागले. ख्रिस्ती अनुयायांनी जर ख्रिस्ती धर्मावरील आपल्या विश्वासाचा त्याग केला व ते आपल्या पूर्वीच्या देवांच्या भजनी लागले, तरच त्यांना क्षमा करण्यात येई. काहींनी भीतीमुळे कदाचित आपल्या धर्मनिष्टेचा त्याग केलाही असेल परंतु बहुतांश लोकांची ख्रिस्ती धर्मावरील निष्ठा अढळ राहिली. मार्कस ऑरिलियसच्या (१२१–१८०) नेतृत्वाखाली हे छळण्याचे सत्र वर्षानुवर्षे चालले होते. २५० मध्ये डेशिअस (२०१–२५१) सम्राटाने जो छळवाद सुरू केला, तो पूर्वीच्या छळवादापेक्षाही महाभयानक होता. त्यामुळे चर्चच्या अनुयायांची संख्या बरीच रोडावली. त्यातूनच तावून सुलाखून निघालेल्या निधड्या छातीच्या आणि निष्ठावंत ख्रिस्ती लोकांनी, धर्मप्रसाराचे कार्य पुढे नेटाने चालविले.

अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागूनही ख्रिस्ती धर्माचा प्रसार होणे चालूच राहिले. शिवाय प्रत्येक वेळी सर्व ठिकाणचे सर्वच ख्रिस्ती लोक शोधून काढून त्यांचा नायनाट करणेही विरोधकांना शक्य नव्हते. गॉल (फ्रान्स) मध्ये जेव्हा छळवाद सुरू होई, तेव्हा आफ्रिका व ग्रीसमध्येही छळवाद सुरू असेच असे नाही. दुसऱ्या शतकात छळवादाची तलवार कधी एका भागात चालविली जाई, तर कधी दुसऱ्या भागात परंतु एकाच वेळी सर्व राष्ट्रांत ती चालवली जात नसे. तिसऱ्या शतकात सु. ५०-५० वर्षाचे दोन कालखंड ख्रिस्ती लोकांना जवळजवळ संपूर्ण शांततेचे लाभले. २०२ आणि २५० च्या सुमारास रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म नेस्तनाबूत करण्याचा जोराचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्मास तौलनिक दृष्ट्या जो शांततेचा काळ लाभला, त्या काळात ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्माची काही तत्त्वे निश्चित केली आणि चर्चच्या व्यवस्थापनेला निश्चित स्वरूप देण्यास प्रारंभ केला. ह्याच काळात नव्या करारातील पुस्तके निश्चित करण्यात आली. सुरुवातीला ‘सेंट पॉलची पत्रे’, ‘चार शुभवर्तमाने’ व ‘प्रेषितांची कृत्ये’ ह्या पुस्तकांचा नव्या करारात समावेश करण्यात आला. नव्या करारातील आज उपलब्ध असलेल्या इतर पुस्तकांचा नंतर हळूहळू त्यात समावेश करण्यात आला. ‘योहानचे शुभवर्तमान’ व ‘प्रकटीकरण’ ह्या पुस्तकांचासुद्धा नव्या करारात सहजासहजी प्रवेश झाला नाही. ‘इब्री (हिब्रू) लोकांस पत्र’, ‘पीटरचे दुसरे पत्र’, ‘यहुदाचे पत्र’, ‘याकोबचे पत्र’ व ‘योहानची शेवटची दोन पत्रे’ ही पुस्तकेसुद्धा, यथावकाश नव्या करारात स्वीकारली गेली. नव्या करारात स्वीकरावयाच्या पुस्तकांची यादी चौथ्या शतकात पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यात दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाचा समावेश केला गेला नाही [→ बायबल].

डायोक्लीशन (२४५–३१३) या रोमन सम्राटानंतरचा सम्राट कॉन्स्टंटीन (२८०–३३७) याने ख्रिस्ती लोकांचा छळवाद बंद केला परंतु त्यासाठी त्याला बराच काळ झगडावे लागले. तसेच तो सुरुवातीला ख्रिस्तीही नव्हता. डायोक्लीशन सम्राटाला आपल्या अवाढव्य साम्राज्याचा कारभार एकट्याने पाहणे फार अवघड वाटले. म्हणून त्याने आपल्या साम्राज्याचे विभाग केले व त्यांवर आपल्या कारभारात मदत करण्यासाठी साहाय्यक राजे नेमले. तो जेव्हा वृद्ध व सेवानिवृत्त झाला, तेव्हा हे राजे आपापसांत भांडू लागले. त्यांचे पुत्रही आपापसांत भांडू लागले. कॉन्स्टंटीन हा त्यांपैकी एका राजाचा मुलगा, तर मॅक्झेन्शिअस (मृ. ३१२) हा दुसऱ्या राजाचा मुलगा. कॉन्स्टंटीनची ब्रिटन व गॉल ह्या देशांवर सत्ता होती. कॉन्स्टंटीन रोमवर चालून गेला (३१२), तेव्हा सूर्यास्ताच्या सुमारास वरच्या बाजूस आकाशात त्याला प्रकाशमान क्रूस दिसल्याचे सांगतात. ह्या क्रुसावर ‘In Hoc Signo Vinces’ असे लिहिलेले त्याला दिसले. त्याचा अर्थ ‘ह्या खुणेनेच तुला जय मिळेल’ असा आहे. ते काहीही असले, तरी त्या काळात ख्रिस्ती चर्चचा एवढा प्रभाव होता, की ख्रिस्ती परमेश्वर हा सर्वाधिक शक्तिमान देव आहे, अशी कॉन्स्टंटीनची खात्री पटली. विजयासाठी ह्याच देवाची तो उपासना करीत होता. त्यामुळे अंतिम विजय आपलाच होणार, ह्याची त्याला खात्री होती. मॅक्झेन्शिअसचे सैन्य टायबर नदीवरचा ‘बोटींचा पूल’ फार घाईघाईने पार करू लागले परंतु तो पूल मध्येच तुटला. मॅक्झेन्शिअस स्वतः नदीत बुडून मरण पावला. ह्या युद्धाला ‘मिल्व्हियन पुलाचे युद्ध’ म्हणतात. ते ३१२ मध्ये झाले. कॉन्स्टंटीनने इटलीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव करण्यासाठी त्याला दहा वर्षे झगडावे लागले. त्यानंतर तो सम्राट झाला. जो जो प्रदेश तो जिंकत गेला, त्या त्या प्रदेशातील ख्रिस्ती लोकांचा छळवाद संपत गेला व शेवटी जेव्हा तो सम्राट झाला, तेव्हा सर्व साम्राज्यभर ख्रिस्ती धर्म हा सर्व धर्मांत लोकप्रिय झाला. ज्या नाझरेथकर येशूला रोमन सुभेदाराने क्रुसावर देण्याची शिक्षा फर्मावली, तोच येशू रोमन साम्राज्याचा तारक म्हणून त्यांचे आराध्यदैवत बनला.


ख्रिस्ती धर्माकरिता कॉन्स्टंटीनने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या बरीच मदत केली. ख्रिस्ती धर्मगुरूंना त्याने खास सवलती दिल्या. उद्ध्वस्त केलेली ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे परत उभारण्यात त्याने आर्थिक साहाय्य केले. तसेच त्याने स्वतः ही अनेक नवीन चर्चेस बांधली. कॉन्स्टँटिनोपलमधील सेंट सोफिया हे चर्चही त्यांपैकीच एक होय. त्याने केलेली ही प्रत्यक्ष मदत म्हणता येईल. अप्रत्यक्ष रीत्या त्याने केलेली मदत म्हणजे त्याने आपल्या साम्राज्याची राजधानी बदलली. रोमऐवजी कॉन्स्टँटिनोपल हे त्याने आपल्या राजधानीचे शहर केले. साम्राज्याचा कारभार चालविण्याच्या दृष्टीने हे शहर सर्वोत्कृष्ट होते. यूरोप व आशियाला जोडणारा खुष्कीचा मार्ग आणि काळा समुद्र व इजीअन समुद्र यांना जोडणारा जलमार्ग ह्यांच्या नाक्यावर हे शहर आहे. राजधानी बदलल्यामुळे रोममध्ये सम्राटाचे वास्तव्य होत नव्हते. काही अंशी रोमच्या पोपलाच सम्राटाचा वारसदार समजण्यात येऊ लागले आणि त्यामुळे या काळात साम्राज्यविस्ताराऐवजी चर्चचे महत्त्व विशेष वाढीस लागले.

कॉन्स्टंटीनला क्रुसाचे दर्शन झाले म्हणून केवळ त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असे नाही, तर भिन्न भिन्न प्रदेशांतील लोकांना एकत्र जोडेल अशा धर्माची त्याच्या साम्राज्यास फार गरज होती, म्हणून त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. थोड्याच काळात झपाट्याने प्रसारित झालेला आणि बलवान बनलेला ख्रिस्ती धर्मच रोमन साम्राज्य एकत्र सांधू शकेल असे त्याला वाटले. परंतु ह्या धर्मालाच तडे जाऊ लागले. परमेश्वर, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा (होली घोस्ट) ह्यांच्या परस्परसंबंधांबाबत ख्रिस्ती लोक आपापसांत वाद घालू लागले. हा वाद ॲलेक्झांड्रियामध्ये पराकोटीला पोहोचला. अरायस नामक एका वृद्ध धर्मगुरूने असे प्रतिपादिले की, ‘येशू हा मानवापेक्षा श्रेष्ठ होता, परंतु परमेश्वरापेक्षा तो थोडा कमी प्रतीचा होता’. त्याच चर्चमधील ॲथनेशिअस (सु. २९३–३७३) नामक डीकनला हे विधान मान्य झाले नाही. त्याच्या मते परमेश्वर एकच आहे परंतु त्या एका परमेश्वरात तिघांचे वास्तव्य आहे: (१) सर्व जगाचा प्रभू म्हणजे परमेश्वर (२) त्याचा पुत्र – जो आपल्यासाठी ह्या पृथ्वीवर आला, मरण पावला व पुनरुत्थित झाला वा परत उठला आणि (३) पवित्र आत्मा – जो आपल्या आत्म्यात चैतन्य ओततो व परमेश्वराच्या स्वरूपाची कल्पना देतो. एका परमेश्वरात ह्या तिघांचेही वास्तव्य आहे. त्याला ‘ट्रिनिटी’ म्हणजे त्रयदेव म्हणतात. पिता व येशू ख्रिस्त ह्यांच्या परस्परसंबंधांविषयी माजलेल्या वादात, ख्रिस्ताच्या प्रेमाचा बाकी विसर पडला. वादाचे रूपांतर दंग्यात झाले. ख्रिस्ती लोक आपापसांत भांडताहेत हे पाहून कॉन्स्टंटीनला धक्काच बसला. पुनरुत्थानचा सणसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा करण्यात आला. काहींनी यहुद्यांच्या वल्हांडण (पासओव्हर) सणाप्रमाणे वसंत ऋतूतील पौर्णिमेचा दिवस निवडला, तर काहींनी वसंत ऋतूचा पहिला दिवस त्यासाठी निवडला. आठवड्यातील पवित्र-दिवसाबाबतही मतभेद माजले. काहींनी पुनरुत्थानाचा दिवस म्हणजे रविवार हा पवित्र दिवस म्हणून निवडला. ह्या सर्व प्रश्नांचा विचार करण्यासाठी ३२५ मध्ये कॉन्स्टँटिनोपलजवळ नायसीआ शहरात कॉन्स्टंटीनने एक धर्मसभा भरवली. ह्या सभेला ‘नायसीयन धर्मसभा’ म्हणतात. सगळ्या चर्चमधील नेत्यांना एकत्रित आणणारे हे पहिलेच संमेलन होय. ह्या सभेमध्ये पुनरुत्थान पाळण्याचा दिवस व श्रद्धासिद्धांत वा मतांगीकार (क्रीड) निश्चित करण्यात आला.

ह्या मतांगीकाराला ‘नायसीयन मतांगीकार’ म्हणतात. प्रेषितांच्या मतांगीकाराबरोबर नायसीयन मतांगीकारही अनेक चर्चेसनी आपला विश्वासांगीकार म्हणून मान्य केला आहे परंतु ह्या दोन मतांगीकारांमुळे पाखंडी मताला पायबंद मात्र बसला नाही. ४३१ मध्ये एफेससच्या धार्मिक बैठकीत कॉन्स्टँटिनोपलचा बिशप नेस्टोरिअस (मृ. ४५१) याचा निषेध करण्यात येऊन त्याला अधिकारावरून दूर करण्यात आले. त्याने मोनोफिजाईट्स पंथाला एवढा प्रखर विरोध केला, की ख्रिस्त ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असे तो शिकवतो, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला. ह्या धर्मसभेत कुमारी मेरीचा गौरव करण्यासाठी तिला ‘देवाची माता’ हे अभिधान बहाल केले. नेस्टोरिअसने ह्या दृष्टिकोनाला कसून विरोध केला. त्याच्या मते मेरी ही येशू ख्रिस्त ह्या ‘मानवा’ची माता होती. त्याच्यातील ‘दैवी अंशा’ची माता नव्हती. धर्मसभेने त्याला हद्दपार करून थीबैद वाळवंटात हाकलून दिले. सिरिया व इराणमध्ये त्याचे अनुयायी होते. त्यांनी नेस्टोरिअस चर्चची स्थापना करून पौर्वात्य देशांकडे त्याचा फैलाव करण्यास सुरुवात केली आणि ६२५ च्या सुमारास मध्य आशियाद्वारा ते चीनमध्ये पोहोचले.

रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा उदय झाला असला, तरी या रोमन साम्राज्याची विभागणी होण्यास उत्तरेकडून येणाऱ्या बर्बरांच्या टोळ्यांचा शिरकाव कारणीभूत झाला. त्या जुन्या साम्राज्यात रोम शहर हे केंद्रस्थानी होते. परकीय आक्रमक रोमच्या पश्चिम व पूर्व साम्राज्यांच्या सीमारेषेवर आले. पूर्व भागाची भाषा लॅटिन नसून ग्रीक असूनही, तो भाग अद्यापही स्वतःला रोमन साम्राज्य असेच म्हणवून घेत होता. रोमन साम्राज्याची शकले झाल्यानंतरही काही काळ त्या सर्वांचे चर्च मात्र एकच होते. परंतु लवकरच त्याचेही पूर्व व पश्चिम चर्च असे दोन विभाग झाले. लॅटिन भाषीय (पश्चिम) चर्च स्वतःला ‘रोमन कॅथलिक’ म्हणवून घेऊ लागले व ग्रीक भाषीय (पूर्व) चर्च स्वतःला ‘ऑर्थोडॉक्स चर्च’ म्हणवून घेऊ लागले. नंतरच्या काळात रोम ही राजधानी नव्हती, तर कॉन्स्टँटिनोपल ही राजधानी होती. ग्रीक भाषा सर्वत्र वापरली जात होती परंतु सर्व साम्राज्याची ही एकमेव भाषा मात्र नव्हती. पूर्वेकडील साम्राज्यात ग्रीक लोकांशिवाय इतरही अनेक लोक होते. आर्मेनियन, सिरियन व इथिओपियन ह्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषा होत्या. ह्या लोकांना ग्रीकांचे वर्चस्व आवडत नव्हते, ग्रीकांचे साम्राज्यही आवडत नव्हते व त्यांचे चर्चही आवडत नव्हते म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र चर्चेस स्थापन केली. ग्रीक चर्चपासून ख्रिस्ती धर्माचा सर्ब, बल्गेरियन व रशियन ह्या स्लाव्हिक लोकांत प्रसार झाला. ९८० मध्ये पहिला व्हलॅडिमिर ह्याच्या नेतृत्वाखाली रशिया ख्रिस्ती धर्माखाली आला. तुर्कांनी जेव्हा पूर्व रोमन साम्राज्य जिंकले, तेव्हा सर्व चर्चेसचे मुख्य म्हणून कॉन्स्टँटिनोपल येथील चर्चला कार्य करता येईना. म्हणून रशियातील चर्चने ‘रशियन ऑर्थोडॉक्स चर्च’चे मुख्य पीठ मॉस्को येथे राहील व झार हा चर्चचा प्रमुख राहील, असे जाहीर केले.

पाचव्या शतकात बर्बर टोळ्यांनी पवित्र रोमन साम्राज्य जिंकले. ऐषारामाची आवड, खेड्यातील तुरळक वस्ती आणि इतर दुर्गुणांमुळे रोमन साम्राज्य खिळखिळे झाले होते. चर्चमधील भौतिक सुबत्ता व सुखासीन वातावरणामुळे लोकांत एक नवीनच प्रवृत्ती निर्माण झाली. त्यामुळे अनेक ख्रिस्ती लोकांनी आपापली शहरे सोडून निघून जाण्याचे व विजनवास स्वीकारण्याचे ठरवले. आश्रम, मठ व संन्यासी वृत्तीवर जास्त भर दिला जाऊ लागला. सहाव्या शतकाच्या शेवटी रोमचे महत्त्व कमी होऊ लागले होते व उत्तरेकडील प्रदेशाला, विशेषतः ब्रिटनला, जास्त महत्त्व येऊ लागले होते. मध्ययुगात विरागीवृत्ती व आश्रमवास ह्यांवर विशेष भर देण्यात येऊ लागला. ह्या काळात चर्च व राजसत्ता एकमेकांना मदत करीत असत. उत्तरेकडील प्रदेशांत (पाश्चिमात्य देशांत) ऐक्य निर्माण करण्यासाठी चर्चने मदत केली. त्यांना समान धार्मिक श्रद्धा व समान भाषा (लॅटिन) चर्चने दिली. राजसत्तेनेही पोप, मिशनरी व मठवासियांना मदत करून सहकार्य दिले. जुने रोमन साम्राज्य हे सर्व एकसंघ राज्य होते, तर बर्बर लोकांची लहान लहान राज्ये होती. त्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीत व आताच्या परिस्थितीत फार फरक होता. एका राजाने तर रोमन साम्राज्यावर परत हक्क प्रस्थापित केला परंतु इंग्लंडचा त्यात कधीच अंतर्भाव झाला नाही व फ्रान्सचा अंतर्भाव फारच थोड्या काळापुरता झाला.


लवकरच चर्च व राजसत्ता ह्यांच्यात झगडा सुरू झाला. त्याला कारणेही पुष्कळ होती. त्यापैंकी एक म्हणजे फ्रान्स व जर्मनीतील जवळजवळ अर्धा प्रदेश चर्चच्या मालकीचा होता. पोप व राजसत्ता यापैकी कोणाशी एकनिष्ठ रहावे, हा एक वादाचा मुद्दा होता तसेच न्यायालयांच्या नियंत्रणाबाबतही तक्रार होती.

मध्ययुगात क्रूसेड्सची चळवळ झाली. त्यावेळी जेरूसलेमची पवित्र भूमी ताब्यात घेण्यासाठी राजसत्ता व चर्च ह्यांनी हातमिळवणी केली. ह्या काळातसुद्धा चर्चला सेंट फ्रान्सिससारखा (११८२–१२२६) नेता लाभला होता. सेंट फ्रान्सिसनंतर मात्र मध्ययुगीन चर्चची स्थिती ढासळू लागली. आत्यंतिक हाव, सुखासीनता, क्रोध, खादाडपणा व अहंकार ह्या पाच महाभयंकर दुर्गुणांनी चर्चला घेरले होते. चर्चच्या ह्या दुर्गुणांवर टीका करणाऱ्या चळवळी चर्चमध्येच सुरू झाल्या, चर्चच्या बाहेर नाही हे विशेष होय. ह्या चळवळींच्या प्रमुख नेत्यांपैकी जॉन विक्लिफ (१३२०–६४) आणि जॉन हस (१३६०–१४१५) ह्यांची नावे सर्वश्रुत आहेत.

धर्मसुधारणेच्या चळवळीला धार्मिक चळवळीशिवाय ज्या इतर चळवळी कारणीभूत झाल्या, त्यांत प्रबोधनाची चळवळ सर्वांत महत्त्वाची होती. ह्या चळवळीने मानवी मन अधिक ज्ञानाभिमुख केले आणि धर्मसत्तेच्या वर्षानुवर्षे पडलेल्या बेड्या तोडून टाकल्या. ग्रीक व लॅटिन साहित्याचे पुनरुज्जीवन व विज्ञानाच्या नवीन पद्धतींची सुरुवात ह्या अर्थाने ‘प्रबोधन’ हा शब्द वापरण्यात आला. ह्या काळात ⇨ डेसिडीअरिअस इरॅस्मस (१४६६—१५३६) हा सर्वश्रेष्ठ मानवतावादी होऊन गेला.

ह्या काळातील मानवतावादी पुरुषांनी चर्चमधील सुधारणांसाठी पार्श्वभूमी तयार करून ठेवली प्रत्यक्ष सुधारणा केल्या नाहीत. ह्यासाठी प्रखर आत्मविश्वास व आस्था असलेल्या नेत्यांची आवश्यकता होती. ⇨ मार्टिन ल्यूथर (१४८३–१५४६) हा अशा तऱ्हेचा नेता होता. चर्चपासून फुटून वेगळे निघण्याचा मार्टीन ल्यूथरचा उद्देश नव्हता परंतु त्याला चर्चमध्ये सुधारणा घडवून आणायच्या होत्या. वादग्रस्त मुद्यांना तोंड फोडण्यासाठी तो आपले धर्मविषयक विचार लिहून काढू लागला आणि ही पत्रके जर्मनीतील बिटनबर्ग येथील चर्चच्या दरवाजावर चिकटवू लागला. ९५ थेसिस  ह्या नावाने प्रसिद्ध असलेले पत्रक ३१ ऑक्टोबर १५१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आले व ह्याच विधानामुळे धर्मविषयक सुधारणांची चळवळ सुरू झाली. ल्यूथरला आपली मते बदलण्यास सांगण्यात आले परंतु माझी मते चुकीची आहेत, हे मला बायबलच्या आधारे पटवून दिले, तरच मी आपली मते बदलेन, असे त्याने उत्तर दिले. परिणामी त्याला तेथून पळून जावे लागले. तथापि त्याच्या चळवळीने चांगलेच मूळ धरले होते व १५२९ मध्ये त्याच्या पंथाला ‘प्रॉटेस्टंट’ हे नावही देण्यात आले. त्यांनी आपल्या मतांचा प्रसार करू नये, अशी साम्राज्याच्या मुख्य कार्यकारी सभेने आज्ञा देऊनही त्या आज्ञेला त्यांनी ‘प्रोटेस्ट’ म्हणजे विरोध केला व आपले कार्य चालू ठेवले. म्हणून या चळवळीला ‘प्रॉटेस्टंट’ असे नाव दिले गेले. ल्यूथरनंतर ⇨ हुल्ड्राइख त्स्व्हिंग्ली  (१४८४–१५३१), ⇨ जॉन कॅल्व्हिन  (१५०९–६४) व जॉन नॉक्स (१५०५–७२) हे धर्मसुधारक होऊन गेले. त्यांची ⇨ अनाबॅप्टिस्ट  नावाची चळवळ चांगलीच फैलावली. इंग्लंडमधील धर्मसुधारणांनी वेगळेच रूप धारण केले. पोप आणि आठवा हेन्‍री (१४९१–१५४०) ह्यांपैकी कोणाचे अधिकार सर्वश्रेष्ठ ह्या प्रश्नाबाबतच मुख्यत्वे वाद माजला. नंतर रोमन कॅथलिक चर्चमध्ये ‘सुधारणाविरोधी’ (काउंटर–रिफर्मेशन) चळवळ सुरू झाली. परिणामी १५४५ मध्ये ट्रेंट येथे धर्मसभा भरली. धर्मसुधारणेच्या चळवळीत व्यक्त करण्यात आलेल्या दृष्टिकोनांना ह्या सभेत कसून विरोध करण्यात आला. इग्नेशिअस लॉयोलाने (१४९१–१५५६) ‘सोसायटी ऑफ जीझस’ १५३४ मध्ये स्थापन केली. ह्या पंथाचे अनुयायी स्वतःला धर्मश्रद्धेचे संरक्षक समजत. त्यानंतर इटली, स्पेन व पोर्तुगाल मध्ये प्रॉटेस्टंट पंथीयांचा छळवाद सुरू झाला [→ इन्क्विझिशन]. ⇨ जेझुइट  पंथ हा सुधारणा विरोधी चळवळीचा आत्माच बनला. ह्या चळवळीच्या संदर्भातच सेंट फ्रान्सिसचा व इतर रोमन कॅथलिक मिशनऱ्यांचा स्वार्थत्याग व स्वकार्याविषयीची कळकळ आपण लक्षात घ्यायला हवी. जेझुइट पंथीय आणि लॉयोलाचा मित्र ⇨ सेंट झेव्हिअर (१५०६–५२) ह्याने दहा वर्षांच्या कालखंडात गोवा, मलॅका, मोल्युकस व इतर ईस्ट इंडीज बेटे तसेच जपान ह्या ठिकाणच्या सु. ७,००,००० लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लंडमध्ये प्यूरिटन्स व पिल्ग्रिम्सचा उदय झालेला दिसतो [→ प्यूरिटन पंथ]. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ३० वर्षांच्या युद्धात (१६१८–४८) रोमन कॅथलिक पंथ व प्रॉटेस्टंट पंथ ह्यांतील हाडवैर कळसास पोहोचले. १६४८ मध्ये वेस्ट फेलियाच्या तहानुसार प्रॉटेस्टंट पंथाला मान्यता देण्यात आली. ह्यापूर्वी इंग्लंडमध्ये अशी मान्यता कधीच देण्यात आली नव्हती. ल्यूथरियन व कॅल्व्हिनिस्टिक अशा दोन्ही दृष्टिकोनांस समान मान्यता देण्यात आली [→ प्रॉटेस्टंट रोमन कॅथलिक पंथ].

अठराव्या शतकाचा काळ चर्चच्या दृष्टीने अधःपतनाचा आणि अगितकेचा होता. तरीसुद्धा जॉर्ज व्हिटफील्ड (१७१४–७०), जॉन वेस्ली (१७०३–९१) आणि चार्ल्स वेस्ली (१७०७–८८) ह्यांसारखे थोर नेते ह्या काळातही कार्यरत होते. ह्याच सुमारास आधुनिक मिशनरी कार्याची सुरुवात झालेली दिसते. बॉर्‌थॉलोमस झिगेनबाल्ग (१६८३–१७१९) आणि हाइन्रिक प्लुत्शा हे दोघे जर्मन ल्यूथेरियन पंथाचे अनुयायी होते. प्रॉटेस्टंट मिशनरी म्हणून १७०५ मध्ये डॅनिश-हॉल मिशनने त्यांना भारतात पाठविले. त्यांनी त्रांकेबार येथे लक्षणीय कार्यास प्रारंभ केला. संपूर्ण नव्या कराराचा तमिळ भाषेत त्यांनी अनुवाद केला. १७३२ च्या सुमारास मोरेव्हियन मिशनरी चर्चने २५ वर्षांत जगाच्या वेगवेगळ्या भागांत १८ मिशनरी पाठवले. ⇨ विल्यम कॅरी (१७६१–१८३४) आधुनिक मिशनरी चळवळीचा जनक समजला जातो. तो १७९३ मध्ये भारतात आला आणि बंगालमध्ये कलकत्त्यानजीकच्या सेरमपूर येथे त्याने आपल्या कार्यास प्रारंभ केला. विल्यम कॅरीबरोबरच आफ्रिकेत डॉ. लिव्हिंग्स्टन (१८१३–७३), ब्रह्मदेशात ॲडोनिरम जडसन (१७८८–१८५०) व विसाव्या शतकातील ⇨ आल्बेअर श्वाइत्सर (१८७५–१९६५) ह्यांची गणना श्रेष्ठ मिशनऱ्यांत करावी लागेल. चर्च हे ख्रिस्ताशी एकरूप आहे असे समजण्यात येते. ही एकता व अंतिम ध्येय साक्षात स्वरूपात असावी, अशी चर्चची फार दिवसांची इच्छा होती. अठराव्या शतकाच्या शेवटी अथवा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला केप ऑफ गुड होप येथे विल्यम कॅरीने वरील उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून एक धर्मसभा भरविली. नंतर ख्रिस्ती धर्मातील ऐक्य व्यक्त करणारी पहिली मोठी धर्मसभा १९१० मध्ये एडिंबरो येथे भरली. ह्या आणि ह्याच्यानंतर झालेल्या इतर धर्मसभांनी १९४८ मध्ये अम्स्टरडॅम येथे भरलेल्या परिषदेचा पाया घातला. अशा तऱ्हेने सर्वच ख्रिस्ती पंथोपपंथांतील ऐक्याची पूर्ती होण्याचा मार्ग १९२८ मध्ये जेरूसलेम येथे भरलेल्या व १९३८ मध्ये भारतातील तांबरम् येथे भरलेल्या मिशनरी परिषदांनी दाखविला. १९४७ मध्ये ‘चर्च ऑफ इंडिया’ या नावाने पूर्वेची सर्व चर्चेस व मिशनसंस्था एकत्र केल्या. तसेच नोव्हेंबर १९७० मध्ये उत्तरेची सहा व पूर्वेची सर्व चर्चेस एकत्र करून ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ स्थापून भारताने ह्या बाबतीत जगाचे नेतृत्व केले आहे. ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ स्थापन करण्याचा विधी नागपूर येथे पार पडला.


धर्मसिद्धांत : प्रेषितांच्या श्रद्धासिद्धांतात किंवा मतांगीकारात चर्चचे बहुतेक सर्वच धर्मसिद्धांत आले आहेत. प्रेषितांचा मतांगीकार (अपॉसल्स क्रीड) खालीलप्रमाणे आहे : ‘सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी ह्यांचा उत्पन्नकर्ता, याजवर मी विश्वास ठेवतो. एकच प्रभू, देवाचा एकुलता एक पुत्र, जो पापी जनांना तारावयास ह्या जगात आला, पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मेरीच्या उदरी जन्मास आला, पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला क्रूसी दिले, ज्याला पुरण्यात आले, जो मेलेल्यांमधून तिसऱ्या दिवशी परत उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याजवर मी विश्वास ठेवतो’.

‘पवित्र आत्म्याचा सहवास व सहभागीपण (फेलोशिप), पापांना क्षमा, देहाचे पुनरुत्थान, पवित्र सार्वत्रिक महामंडळ ह्यांच्यावर मी विश्वास ठेवतो’.

परमेश्वर मानवी देह धारण करून स्वतः मानव होऊन ह्या पृथ्वीवर आला, हा चर्चचा सर्वांत महत्त्वाचा धर्मसिद्धांत आहे. ह्या पृथ्वीवर मानवी देह धारण करून राहणारा येशू ख्रिस्त हा प्रत्यक्ष परमेश्वरच होता. परमेश्वर स्वतः देहधारी होऊन ह्या पृथ्वीवर आला, त्याला आपल्याला स्वतःचे स्वरूप दाखवायचे होते, मानवाशी सहकार करावयाची त्याची इच्छा होती आणि मानव एवढा दुर्गुणी असूनही, परमेश्वर मानवाला जवळ करण्यात कमीपणा मानत नाही तर तो आपल्यावर प्रेम करतो व आपल्याला गौरव प्राप्त करून देण्याची इच्छा बाळगतो, असा अर्थ ह्या धर्मसिद्धांतामागे आहे.

मूलपतन वा पाप : ह्या धर्मसिद्धांतानुसार आपल्या अहंकारी स्वभावामुळे मानव परमेश्वरापासून विभक्त होण्याची इच्छा बाळगतो. प्रत्येक माणूस स्वभावतःच पापी आहे म्हणजेच पाप करण्याकडे त्याचा नैसर्गिक कल आहे. सर्वांनी पाप केले आहे व देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत, असे बायबलमध्ये एक वचन आहे. आदमने सुरुवातीलाच जे आज्ञाभंगाचे पातक केले आहे, त्यात आपण सर्वच गोवले गेलो आहोत. कारण आदमला ईडन बागेतून हद्दपारीची जी शिक्षा दिली होती, तिचे आपण वारस आहोत आणि आपला स्वभाव म्हणजे आदमच्याच स्वभावाचे प्रतिबिंब आहे [→ आदम व ईव्ह]

पश्चाताप व प्रकटीकरण : पश्चाताप (रिपेन्टन्स) ह्या धर्मसिद्धांतानुसार पश्चाताप पावल्याने येशू ख्रिस्ताद्वारा प्रकट झालेल्या परमेश्वराच्या प्रीतीचा आपणाला प्रत्यक्ष अनुभव येतो. येशूच्या जीवनाशी आपण आपले जीवन ताडून पाहिले पाहिजे. त्यानंतर आपण आपली पापे कबूल करतो व क्षमेची याचना करतो. त्याचप्रमाणे देवाचा पुत्र म्हणून तसेच येशूसोबतच आपणासही देवाचा वारस म्हणून स्थान प्राप्त व्हावे अशीही परमेश्वराला विनंती करतो. पश्चाताप म्हणजे पूर्ण परिवर्तन आहे. पश्चाताप मानवाला संपूर्णतया बदलून टाकतो. स्वतःतील अहंकेंद्रित्व नष्ट करून आपणास ‘ईश्वरकेंद्रित’ करतो. प्रकटीकरण (रिव्हीलेशन) हा आणखी एक धर्मसिद्धांत आहे. परमेश्वराची कृती, त्याचे सामर्थ्य व त्याची कृपा ह्यांमुळे आपल्याला परमेश्वराची इच्छा समजते, असा हा धर्मसिद्धांत आहे. परमेश्वराच्या प्रकटीकरणाचा मुख्य उगम म्हणजे बायबल अथवा पवित्र शास्त्र होय. बायबल म्हणजे परमेश्वराचे ‘वचन’ असा आपला विश्वास आहे.

त्रयदेव (ट्रिनिटी) व देवाचे राज्य : हा धर्मसिद्धांत परमेश्वराचे त्रिविध स्वरूप समजावून सांगतो. पित्याच्या स्वरूपातील देव, पुत्राच्या स्वरूपातील देव आणि पवित्र आत्म्याच्या स्वरूपातील देव, असे हे परमेश्वराचे त्रिविध रूप आहे. देव एकच परंतु ही त्याची तीन अंगे आहेत. पित्याच्या स्वरूपातील देव हा आपला निर्माणकर्ता आहे, पुत्राच्या स्वरूपातील देव म्हणजेच येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता आहे व पवित्र आत्म्याच्या स्वरूपातील देव ही आपली शक्ती आहे, आधार आहे. सांप्रत पवित्र आत्माच कार्यरत असून, तो आपले तारण करतो. त्याच्या पुत्राविषयीच्या वचनांच्या रूपाने तो आपल्याकडे येतो. ‘देवाचे राज्य’ (किंग्डम ऑफ गॉड) म्हणजे जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांचे मिळून देवाचे राज्य बनले आहे. देवाचे राज्य म्हणजे चर्च. परंतु चर्चपेक्षाही अधिक असे काहीतरी त्यात आहे. ह्या राज्याचे वास्तव्य आपल्या अंतःकरणात आहे. त्या ठिकाणी येशू हा ‘सेवक-राजा’ आहे.

प्रेम : ‘लोगोस’ हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ ‘शब्द’. परमेश्वराने मानवजातीला या मानवजातीकरिता पाठविलेला जिवंत संदेश म्हणजे ‘येशू ख्रिस्त’, ह्या अर्थी हा शब्द वापरला जातो. ही ग्रीक तात्त्विक संज्ञा आहे. येशू ख्रिस्त म्हणजे ‘शब्दच देहधारी झाला’, येशू ख्रिस्ताचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. प्रेम अथवा ‘अगापे’ ही परमेश्वराच्या स्वरूपाविषयीची ख्रिस्ती कल्पना आहे. ‘देव प्रीती आहे’. बायबलमध्ये ‘करिंथकरास पहिले पत्र’ ह्याच्या तेराव्या अध्यायात ‘प्रेम’ म्हणजे काय ह्यावर बरेच विवरण केलेले आढळते. प्रेम हे आपण निवडून घेऊ शकत नाही किंवा त्याबाबत आपण निर्णय घेऊ शकत नाही तर प्रेम म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे. ह्या देणगीमुळे आपण आपल्या शत्रूवरही प्रेम करायला शिकतो. प्रेम हा एक मोठा चमत्कार आहे. ते आपला स्वभाव बदलते, आपला अहंकार नष्ट करते आणि समर्पणाची भावना उत्पन्न करते. कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःकरिता जगत नाही, तर इतरांकरिताही जगते, असा ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ आहे. ‘मी सेवा करून घेण्यास नव्हे, तर सेवा करण्यास आलो’, हे ख्रिस्तवचन मानवी इतिहासातील एक निर्णायक घटना आहे. येशू ख्रिस्ताने बहुतांच्या तारणाकरिता आपला प्राण दिला त्यांच्या पापांची क्षमा व्हावी, ह्याकरिता आपले रक्त सांडले. म्हणूनच ह्या जगात आपल्याला व सर्व जगाला ‘प्रेम’ म्हणजे काय ते समजले. यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही.

पूर्वनियती : ह्याचा अर्थ परमेश्वराच्या दृष्टीत माझी जी पात्रता आहे, ती मला परमेश्वर कृपेमुळेच मिळाली आहे, परमेश्वर आपल्यावर अनादिकालापासून प्रेम करत आहे आणि अनंतकालापर्यंत करील. अनादिकालापासून अनंतकालापर्यंत परमेश्वराने मानवाची निवड केली, हे मानवाला ठाऊक असते अशी व्यक्ती हेही जाणते, की ह्या दुष्ट जगापासून तसेच पाप आणि मरण ह्यांपासून निर्माण होणाऱ्या विकृतींपासून आपले तारण स्वतःच्या प्रयत्नाशिवाय झाले आहे आणि ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. त्याची दया, त्याचे असीम प्रेम, त्याचे निवडून घेणे हाच आपल्या तारणाचा पाया आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला निवडून घेतले जाते. ह्यालाच पूर्वनियती (प्रिडेस्टिनेशन) म्हणतात. परमेश्वराच्या दुहेरी कृपेवर पूर्वनियती अवलंबून असते. परमेश्वरकृपेच्या संबंधातील दोन मार्गांशी ती निगडीत आहे. परमेश्वराची कृपा कोणावरही होऊ शकते व एखाद्या व्यक्तीला ती स्वतःच्या विश्वासाने मिळवताही येते. प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र इच्छाशक्ती आहे. विश्वास ठेवण्याबाबत परमेश्वर कोणावरच सक्ती करत नाही. पूर्वनियतीत निवडून घेणे हे ईश्वरप्रेरित असते, अशी बायबलची शिकवण आहे परंतु पूर्वनियतीचा अव्हेर करणे, हे ईश्वरप्रेरित आहे असे मात्र बायबल  शिकवत नाही.

कर्मकांड व संस्कार : इतर धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही विशिष्ट कर्मकांडाचा, विधींचा व संस्कारांचा अंतर्भाव झालेला आहे.


उपासना : सामुदायिक उपासनेला ख्रिस्ती धर्माच्या कर्मकांडात कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सामुदायिक उपासना व प्रार्थना दर रविवारी सकाळी किंवा सोयीच्या वेळी चर्चमध्ये आचार्याच्या वा धर्मगुरूच्या मार्गदर्शनानुसार केली जाते. उपासनेचे वैयक्तिक व सामुदायिक असे दोन प्रकार असले, तरी येशू ख्रिस्ताने सामुदायिक उपासनेवरच विशेष भर दिलेला आहे. सुरुवातीस आवाहन म्हणून आचार्य पवित्र शास्त्रातील काही वाक्ये वाचून दाखवून व थोडक्यात प्रार्थना करून सामुदायिक उपासनेस आरंभ करतात. उपासनेच्या कार्यक्रमात सामुदायिक रीत्या गीत गाणे, आळीपाळीने पवित्र शास्त्रातील स्तोत्रे वाचणे, ‘प्रभूची प्रार्थना’ (लॉर्डस प्रेअर) म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना सामुदायिक रीत्या म्हणणे यांचा ठराविक क्रमाने समावेश होतो. जुना करार  व नवा करार  यातून नंतर ज्या विषयावर प्रवचन होणार आहे, त्यासंबंधात काही विशेष वाचन आचार्य किंवा इतर व्यक्ती करतात. धर्मदायासाठी दानपात्र फिरवून दान गोळा करण्यात येते व त्यावर विशेष आशीर्वाद मागून, आचार्य ते दान परमेश्वराला अर्पण केल्याचे दर्शवितात. साधारण २०–२५ मिनिटांचे प्रवचन केल्यावर शेवटचे सामुदायिक गीत होते आणि आचार्यांनी दिलेल्या आशिर्वादाने उपासनेचा शेवट होतो. गांभीर्य व शांततापूर्ण वातावरणात ही सामुदायिक उपासना साधारणतः एक ते सव्वा तासात पार पडते. काही चर्चमध्ये उपासनेसाठी छापलेल्या पुस्तिकांचाही उपयोग करतात.

बाप्तिस्मा : हा ख्रिस्ती धर्मातील महत्त्वाचा संस्कार असून तो झाल्यावरच खऱ्या अर्थाने व्यक्ती ख्रिस्ती धर्माची अनुयायी होते. ख्रिस्ती धर्मातील हा आवश्यक असा दीक्षाविधी म्हणता येईल. मूल जन्मल्यानंतर अमुकच दिवसात त्याचा बाप्तिस्मा करावा असा काही नियम नाही परंतु शक्य तितक्या लवकर बाप्तिस्मा करण्याचा प्रघात आहे. काही पंथांत तर प्रौढांचा बाप्तिस्मा करण्याची रीत आहे. बाप्तिस्मा करण्याचे दोन प्रकार आहेत : (१) पवित्र जलात बुडवून व (२) डोक्यावर पवित्र जल शिंपडून. येशूच्या पुनरुत्थानंतर स्वर्गारोहणापूर्वी त्याने आपल्या अनुयायांस आज्ञा दिली : ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या …’ या पायावर बाप्तिस्मा हा विधी आधारलेला आहे.

मुलांचा बाप्तिस्मा : येशूने स्पर्श करावा म्हणून काही लोकांनी बालकांनी त्याच्याकडे नेले परंतु येशूच्या शिष्यांनी त्यांना दटावले, ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला ‘बालकांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना मना करू नका, कारण देवाचे राज्य हे बालकासारख्यांचेच आहे. जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला’.

ह्या घटनेची आठवण करून देऊन, आचार्य बालकाच्या आईवडीलांस वा पालकांस सामुदायिक उपासनेच्या वेळी, वेदीजवळ उभे राहण्यास सांगतो. नंतर तो सर्व सभासदांस आदरपूर्वक उभे राहण्यास सांगून आईवडिलांस वा पालकांस खालील प्रश्न विचारतो :

‘प्रेषितांचा मतांगीकार हाच तुमचा विश्वास आहे काय? ईश्वराच्या कृपेवर अवलंबून राहून, प्रार्थनेने, तोंडी उपदेश करून, आपल्या आचरणाने त्याला आदर्श घालून देऊन, प्रभूच्या शिकवणुकीप्रमाणे व उपदेशाप्रमाणे तसेच देवाच्या मंडळीच्या रीतीप्रमाणे त्याला ख्रिस्ती धर्माची तत्त्वे व कर्तव्ये शिकविण्याचे तुम्ही वचन देता काय?’ आईवडील वा पालक यांनी होकारात्मक उत्तर दिल्यावर आचार्य त्या बालकाचे नाव घेऊन त्याच्यावर पाणी शिंपडतो. ‘… बाप, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने मी तुझा बाप्तिस्मा करतो. आमेन’, असे म्हणून त्या बालकास तो पुढील आशीर्वाद देतो : ‘बाप, पुत्र व पवित्र आत्मा जो सर्वसमर्थ ईश्वर त्याचा आशीर्वाद तुला लाभो व तुझ्या अंतःकरणात तो निरंतर राहो…आमेन’.

प्रौढांचा बाप्तिस्मा : आचार्य प्रौढाला, उपासकासमोर, खालील प्रश्न विचारतो :

‘येशू ख्रिस्त हा सर्व जगाचा व तुमचा तारणकर्ता असून, त्याच्याकडूनच पापाची क्षमा व सनातन जीवन प्राप्त होते, असा तुमचा विश्वास आहे काय? तुम्ही आपल्या पापांचा अंतःपूर्वक पश्चाताप करीत आहात काय? ऐहिक गोष्टी व त्यांतील मोहपाश यांचा तुम्ही त्याग करता काय? देवाच्या इच्छेप्रमाणे आचरण करून त्याच्या आज्ञा जन्मभर पाळण्याचे तुम्ही वचन देता काय?’ त्याने होकारात्मक उत्तरे दिल्यावर आचार्य त्याच्या मस्तकावर पाणी शिंपडून, त्याचे नाव घेऊन त्याच्या ‘पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने’ बाप्तिस्मा करतो आणि त्याला पुढील आशीर्वाद देतो :

‘शांतीचा देव तुम्हास पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखिली जावोत…आमेन’.

दृढीकरण : पूर्वी झालेल्या बाप्तिस्म्याचे दृढीकरण (कन्फर्मेशन) म्हणून हा संस्कार आहे. ख्रिस्ती धर्माची मूलतत्त्वे, चर्चचा इतिहास, उद्दिष्टे, व्यवस्थापन इत्यादींचे योग्य शिक्षण मिळाल्याची खात्री झाल्यावर चर्चचे कार्यकारी मंडळ (सेशन) त्या व्यक्तीला सामुदायिक उपासनेच्या वेळी, त्या चर्चचा पूर्ण सभासद व्हावा म्हणून इतर सभासदांपुढे उभे करते व त्याचा दाखला आचार्य वाचून दाखवितो. खालील प्रश्न विचारून होकारात्मक उत्तरे मिळाल्यास त्या व्यक्तीच्या बाप्तिस्म्याचे दृढीकरण झाल्याचे व त्या व्यक्तीला इतरांबरोबर प्रभुभोजन करू देण्यास मान्यता देण्यात आल्याचे तो जाहीर करतो :

‘प्रेषितांचा मतांगीकार हाच तुमचा विश्वास आहे काय? देवाच्या दयेचा आश्रय करून, प्रभूची सेवा करण्याचे व आयुष्यभर त्याच्या मार्गाने चालण्याचे तुम्ही वचन देता काय?  सद्‌गुण प्राप्त करून घेण्याची जी साधने आहेत, त्यांचा प्रामाणिकपणाने उपयोग करून घेण्याचे, चर्चच्या उपासनांत व विधिसंस्कारांत तत्परतेने भाग घेण्याचे, तसेच प्रभू तुम्हाला बरकत देईल त्या मानाने, त्याच्या राज्याचा प्रसार व्हावा म्हणून, जन्मभर तुमच्या उत्पन्नातून काही देण्याचे वचन देता काय?’

प्रभुभोजन : काही पंथांचे अनुयायी दर रविवारी सामुदायिक उपासनेच्या शेवटी, तर काही महिन्यातून एकदा ‘प्रभुभोजन’ (लॉर्ड्‌स सपर) हा पवित्र विधी पाळतात. हा फार महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. त्यावेळी खमीरविरहित भाकर व द्राक्षाचा रस (मद्य नव्हे. मनुका उकळून व त्यात साखर घालून हा द्राक्षरस करतात). यांचा उपयोग करतात. ज्यांचा बाप्तिस्मा व दृढीकरण हे दोन्हीही संस्कार झाले आहेत, अशांनाच ह्या विधीत भाग घेता येतो. आचार्य किंवा ज्या पदाधिकाऱ्याला हा पवित्र विधी पार पाडण्यासाठी दीक्षा देण्यात आली आहे, त्यालाच भाकर आणि द्राक्षरस ही पवित्र म्हणून स्पर्श करून ‘वेगळी’ करता येतात व नंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने भक्तगणास देण्यात येतात. काही चर्चमध्ये भक्त वेदीसमोर येऊन गुढघे टेकून उभे राहतात आणि आचार्य स्वतः भाकर व द्राक्षरस त्यांना वैयक्तिक रीत्या देतो. ह्या महत्त्वाच्या विधीत गेली दोन हजार वर्षे चालत आलेला विधीच आजही प्रचलित आहे. धर्मगुरू बायबलमधील (सेंट पॉलचे करिंथरांस पहिले पत्र ११ : २३–३२) उतारा वाचून, द्राक्षरस व भाकर ह्या पवित्र विधीसाठी वेगळी करून प्रत्येक उपासकास देतो व ‘हे येशूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करा व हे त्याच्या स्मरणार्थ करा’ ही वाक्ये उच्चारतो. शेवटी गायन, प्रार्थना व ‘प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा सर्वांवर असो’ असा आशीर्वाद देऊन ह्या विधीचा शेवट होतो.


विवाहपद्धती : ख्रिस्ती विवाह हा नोंदणी विवाह आहे. प्रचलित कायद्याप्रमाणे उपासनेच्या वेळी विवाहेच्छूंची नावे, पत्ता, चर्चचे सभासदत्व, लग्न लावणाऱ्या धर्मगुरूचे नाव व पत्ता, लग्नाची तारीख व वेळ, सूचनापत्राद्वारे वाचून दाखवितात. ही सूचना तीन वेगवेगळ्या सामुदायिक उपासनेच्या वेळी वाचून दाखविण्यात येते व एक प्रत चर्चच्या सूचना फलकावर लावण्यात येते. त्याला कोणाची हरकत असल्यास लग्नघटकेपर्यंत तशी हरकत सबळ कारणे दाखवून मांडण्यास मुभा आहे.

विवाहाच्या दिवशी व वेळी मंगळसूत्र, अंगठी व एकमेकांशी निष्ठेने राहण्याचे सर्व समाजापुढे अभिवचन देणे वगैरे उपक्रम झाल्यावर लग्न लावणारा धर्मगुरू ‘ज्या अर्थी तुम्ही देवासमोर, येथे जमलेल्या चर्च सभासदांसमोर व साक्षीदारांसमोर परस्परांशी करार करून पवित्र विवाहाने बद्ध झाला आहात, त्या अर्थी पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने मी असे जाहीर करतो, की तुम्ही पतिपत्नी झाला आहात–ज्यांना देवाने संयुक्त केले आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने वियुक्त करू नये’, अशी जाहीर आज्ञा करून हा विधी संपतो.

नंतर सरकारमान्य नमुनापत्रावर वधूवर, साक्षीदार आणि लग्न लावणारा धर्मगुरू यांच्या चर्चमध्येच सह्या घेण्यात येतात व एक प्रत विवाहनोंदणी कार्यालयाकडे पाठविण्यात येते. विवाहप्रसंगी मंगलाष्टके म्हणणे वा पुष्पांचा वर्षाव करणे हे उपलब्ध सोयींवर अवलंबून असते. कॅथलिक चर्च हा विधी धार्मिक विधी मानते. तथापि इतर पंथ तशी मान्यता देत नाहीत. म्हणून इतर पंथांत घटस्फोट घेणे फारसे अवघड जात नाही. धर्मगुरूला लग्न लावण्याचा परवाना शासनाकडून मिळवावा लागतो. परवानाधारक धर्मगुरूलाच लग्न लावण्याचा अधिकार असतो.

अंत्यविधी : मृताच्या घरी किंवा चर्चमध्ये आचार्य प्रसंगास अनुरूप असे गीत गावयास सांगतो व नंतर मानवाचे दुःख, परमेश्वर दुःखाचे सांत्वन कसा करतो, मृतांचे पुनरुत्थान वगैरे विषयीचा शास्त्रभाग वाचून प्रार्थना करतो. मृतांच्या विषयी दोन शब्द सांगून झाल्यावर प्रेत स्मशानभूमीवर पुरण्यासाठी शांतपणे नेण्यात येते. पुन्हा तेथे शास्त्रभाग वाचणे इ. झाल्यावर पेटीसह प्रेत कबरीत सोडण्यात येते. सर्वसाधारण खालील विश्वास प्रकट करून व आशीर्वाद देऊन हा विधी आटोपण्यात येतो :

‘ज्या अर्थी हा निवर्तलेला जीवात्मा ज्या परमेश्वराने दिला त्याच्याकडे परत गेला आहे, त्या अर्थी आम्ही त्याचे शरीर मातीला माती, राखेला राख, धुळीला धूळ म्हणून भूमातेला अर्पण करतो, येशू ख्रिस्त जेव्हा जगाचा न्याय करायला पुन्हा येईल, तेव्हा पृथ्वी व समुद्र आपले मेलेले लोक परत देतील व तो मृतांच्या विनाशी देहांना आपल्या गौरवशाली देहाचे स्वरूप प्राप्त करून देईल’.

मृतास पुरणे किंवा अग्नी देणे हे त्यांच्या कुटुंबियांनी ठरविल्याप्रमाणे किंवा त्या व्यक्तीने जिवंत असताना इच्छा दर्शविल्याप्रमाणे पार पाडले जाते.

चर्चचे व्यवस्थापन : प्रॉटेस्टंट चर्चच्या व्यवस्थापनेत सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या परंपरा आहेत परंतु त्या शासनाच्याच तत्त्वावर आधारित आहेत. एपिस्कोपल परंपरा बिशपांची सत्ता मानते. प्रेसबिटेरियन्स हे दीक्षित व अदीक्षित पुढाऱ्यांची सत्ता मानतात. प्रत्येक स्वतंत्र गट व चर्च स्वतःच्या इच्छेप्रमाणे व्यवस्थापन करतात. इतर परंपरांपैकी काही परंपरा पवित्र विधी व संस्कार (प्रभुभोजन व बाप्तिस्मा) यांच्या मानण्यात आलेल्या अर्थावर अवलंबून आहेत.

काहींना निश्चित असा मतांगीकार नाही. ह्याशिवायही आणखी काही गट आहेत. त्यांना पेंटिकॉस्टल पंथीय म्हणतात. पवित्र आत्म्याचे कार्य प्रत्यक्षपणे केले जाते यावर ह्या गटांचा फार विश्वास आहे.

रोमन कॅथलिक पंथात सर्व सत्ता पोपमध्ये उगम पावते, तर प्रॉटेस्टंट पंथात ती श्रद्धावंतांचे आचार्यपद (प्रीस्टहूड ऑफ बिलीव्हर्स) ह्या तत्त्वावर आधारित असून, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

ज्यांचा बाप्तिस्मा व दृढीकरण झाले आहे अशांना प्रभुभोजन करण्याची मुभा आहे, तसेच त्यांनी जर त्यांच्या स्थानिक चर्चची ठरविलेली वार्षिक वर्गणी नियमितपणे भरली असेल, तर त्यांना वार्षिक व इतर सभांत मतदानाचा हक्क प्राप्त होतो. स्थानिक चर्चच्या मुख्यास प्रीस्ट म्हणतात. स्थानिक चर्चमध्ये दीक्षित व अदीक्षित असे सभासद असतात. दीक्षित सभासद वार्षिक सभेत ठराविक मुदतीत कार्यकारी मंडळाची चिठ्ठ्या टाकून निवड करतात. कार्यकारी मंडळातील सभासदांची संख्या ठरविल्यानुसार मर्यादित असते. त्याला ‘सेशन’ म्हणतात. अंदाजपत्रक तयार करणे, नेमणुका करणे, चर्चचा दैनंदिन कारभार चालविणे ही कामे ह्यांच्याकडे सोपवून देण्यात येतात परंतु अंदाजपत्रक मात्र चर्चच्या वार्षिक सभेत पास व्हावे लागते. सेशनने केलेल्या ठरावावर चर्चच्या सभेत चर्चा होऊ शकते. ह्या चर्चचा प्रीस्ट सेशनचा अध्यक्ष असतो. प्रीस्टचा पगार, राहण्याची व्यवस्था, गरिबास मदत इ. बाबींकडे चर्चच्या उत्पन्नाचा विनियोग करण्यात येतो.

ठराविक भौगोलिक क्षेत्रातील सर्व स्थानिक चर्चेस ‘डायसेस’ म्हणून ओळखली जातात. मुख्य अशा केंद्रीय चर्चमध्ये अनेक डायसेस असू शकतात. उदा., भारतात चर्चसंघटना (युनियन) झाल्यामुळे ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’ व ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ असे दोन मुख्य विभाग आहेत. त्यांच्या अधिकारक्षेत्रांत अनेक डायसेस येतात व प्रत्येक डायसेसमध्ये परत अनेक स्थानिक चर्चेस असतात. रोमन कॅथलिक चर्चची मात्र स्वतंत्र व वेगळी घटना आणि व्यवस्थापन आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश प्रॉटेस्टंट चर्चेस ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ विभागात समाविष्ट आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, मिरज येथील चर्चेसचा ‘कोल्हापूर डायसेस’ आहे. डायसेसचा मुख्य बिशप आहे. त्याची निवड डायसेसमधील चर्चेस ठराविक पद्धतीने नेमलेल्या प्रतिनिधींकडून करतात. त्याची बदली मात्र सिनडमार्फतच करता येते. ‘सिनड’ ही केंद्रीय चर्चची कार्यकारिणी असून त्यावर सर्व डायसेसचे प्रतिनिधी असतात. सिनडच्या मुख्य बिशपला ‘मॉडरेटर’ म्हणतात. डेप्युटी मॉडरेटर हाही एक हुद्दा आहे. मॉडरेटर व डेप्युटी मॉडरेटर यांची निवड सर्व बिशप निवडणूक घेऊन करतात.


ख्रिस्ती धर्माचा मानवी जीवनावर झालेला परिणाम : ख्रिस्ती धर्माची प्रेरणा व ध्येय ‘देव प्रीती आहे’ तो सर्व मानवाचा पिता आहे सर्व मानव देवाच्या वैभवात सहभागी होऊ शकतात व हे घडून येण्यासाठी बंधुप्रेम, समता, वैयक्तिक विशेषगुण म्हणजे इतरांचे कल्याण व्हावे म्हणून, आपण एक विश्वस्त आहोत या भावनेने त्याचा वापर करावा धर्म व प्रत्यक्ष कृती यांची सांगड घालावी या सर्वांचा पाया प्रेमावर आधारित असावा अशी जाणीव सतत बाळगून ह्या प्रेरणेने व ध्येयाने कार्य करणे आणि त्याचे फळ परमेश्वर योग्य वेळी व योग्य प्रमाणात देईल असा विश्वास बाळगणे, हे होय.

ख्रिस्ती धर्मातील ह्या तत्त्वांचा परिणाम अज्ञानी माणसास ज्ञानी करण्यासाठी तसेच समाजातील सर्व थरांतील मुलामुलींसाठी व प्रौढांसाठी योग्य अशा शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणावर काढणे, शारीरिक आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून थेट गरिबांपर्यंत पोहोचेल अशी उपचारयोजना तत्परतेने करणे व हे सर्व करीत असता, आपण परमेश्वराचीच सेवा करत आहोत असे समाधान आणि आनंद मानणे त्याला लागणारी आर्थिक मदत ख्रिस्ती अनुयायांनी वैयक्तिक व सामुदायिक देणग्या नियमितपणे व विशेष प्रसंगी होता होईल तो गुप्तपणे देणे आणि ह्या देणग्यांचा व पुण्यसंचय याचा संबंध न जोडणे, हे विचार त्यामागे आहेत. वैयक्तिक निर्णय घेण्याची शक्ती हे देवाने व्यक्तीस दिलेले स्वातंत्र्य आहे व त्यातच मतस्वातंत्र्याचाही उगम आहे. धर्माधिकारी सेवक आहेत आणि परमेश्वर जसा त्यांच्याशी ‘बोलतो’ तसा तो अगदी अशिक्षित अनुयायांशीही बोलतो, ह्या विचारावर मानवातील समता आधारलेली आहे.

संदर्भ : 1. Barry, C. J. Readings in Church History, 2. Vols., West minster, 1960.

     2. Fannon, Patrick, The Changing face of Theology, Dublin, 1968.

     3. Ferm, R. L. Readings in the History of Christian Thought, New York, 1964.

     4. Hildebrand, D. V. Christian Ethics, London, 1953.

     5. Latourette, K. S. A History of Christianity, New York, 1953.

     6. Moracs, G. M. A History of Christianity in India, Bombay, 1964.

     7. Nichols, J. S. History of Christianity 1650 – 1950, New York, 1956.

     8. Niebuhr, H. R. Christ and Culture, New York, 1951.

     9. Slusser, G. H. A Christian Look at Secular Society, Philadelphia, 1969.

   10. Spinka, Matthew, Christian Thought From Erasmus to Berdiaev, Englewood Cliffs, 1962.

   11. Toynbee, Arnold, Christianity : Among the Religions of the World, London, 1958.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)