एकदेवतावाद : सर्वसमर्थ व सर्वज्ञ असा एकच देव आहे, असा मूलभूत सिद्धांत मानून विश्वाची व जीवनाची सांगितलेली उपपत्ती म्हणजे एकदेवतावाद होय. ðअनेकदेवतावाद व ðचराचरेश्वरवाद यांच्याहून एकदेवतावादात फरक आहे. अनेकदेवतावादाप्रमाणे या विश्वाची उत्पच्ची व विश्वाचे नियमन करणार्‍या विविध देवता समानतेने विश्वनियमन करतात किंवा त्यांच्यामध्ये एक कोणतातरी प्रमुख असून त्याच्या स्वामित्वाखाली विश्वाचे व्यवहार चालवतात. एकमेकांवाचून विश्वव्यवहार चालूच शकत नाही, असे अनेकदेवतावादाचे प्रतिपादन आहे. चराचरेश्वरवादाप्रमाणे चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. एकेश्वरवाद या दोन्ही वादांहून निराळा विचार सांगतो. सर्वसत्ताधीश व सर्वज्ञ असा एकच देव असून तो चराचरसृष्टीची उत्पत्ती व नियंत्रण करतो. चराचरसृष्टी त्याचा आविष्कार अथवा देह नव्हे. जीवात्मा व चराचरसृष्टी ही त्याने निर्माण केली आहेत व तो निर्माता त्याच्या निर्मित कार्याच्या पलीकडे व स्वतंत्र असा आहे. इतर अतिभौतिक किंवा अलौकिक तथाकथित दिव्य शक्ती किंवा अन्य देवता ह्यादेखील त्याच्याच नियंत्रणाखाली असतात. तो सर्वतंत्र, स्वतंत्र आहे. यहुदी (ज्यू), खिस्ती, इस्लाम हे धर्म वरील अर्थी  व हिंदूंतील द्वैतवादी भक्तिसंप्रदाय हे किंचित फरकाने एकदेवतावादी होत. माध्व तसेच काही शैव इ. भक्तिसंप्रदाय किंवा पातंजल ð योगदर्शन हे एकेश्वरवादी होत [→ ईश्वरवाद].

जोशी, लक्ष्मणशास्त्री