क्रोमाइट : खनिज. स्फटिक घनीय परंतु क्वचित आढळतात. सामान्यतः कणमय किंवा घट्ट पुंजांच्या रूपात आढळते. भंजन (फुटणे) खडबडीत. कठिनता ५·५ वि. गु. ४·६–५·०९. जवळजवळ अपारदर्शक. चमक धातूसारखी, पुष्कळदा डांबरासारखी. रंग लोखंडासारखा काळा. कस गडद उदी. रा. सं. FeCr2O4. बहुधा लोहाच्या जागी अल्पसे मॅग्नेशियम व कधीकधी क्रोमियमाच्या जागी ॲल्युमिनियम व फेरिक लोह आलेले असते. सामान्यपणे पेरिडोटाइट व त्याच्यापासून निर्माण झालेले सर्पेंटिनाइट यांसारख्या अत्यल्पसिकत (सिलिका अतिशय कमी प्रमाणात असणाऱ्या) खडकांमध्ये गौण खनिज म्हणून क्रोमाइट आढळते. क्रोमाइटाचे निक्षेप (साठे) शिलारसापासून तयार झालेले असतात. थंड होणाऱ्या शिलारसामधून क्रोमाइट अगदी प्रथम बाहेर पडत असते. अशा प्रकारे शिलारसाच्या भिन्नीभवनाने (खनिजे वेगळी होत जाण्याने) क्रोमाइटाचे मोठे धातुक निक्षेप (कच्च्या धातूचे साठे) तयार होतात. क्रोमाइटाचे निक्षेप विभक्त पुंजांच्या, भिंगाकार पुंजक्यांच्या किंवा विखुरलेल्या कणांच्या रूपात असतात. काही ठिकाणी डबरी वाळूतही क्रोमाइट एकत्रित झालेले आढळते. ऑलिव्हीन, सर्पेंटाइन, कुरूविंद, स्पिनेल इ. खनिजांबरोबर हे आढळते. अशनींमध्येही (पृथ्वीवर पोहोचलेल्या उल्केच्या भागांतही) क्रोमाइट सापडले आहे. मुख्यतः तुर्कस्तान, द. आफ्रिका, रशिया, फिलिपीन्स, ऱ्होडेशिया, यूगोस्लांव्हिया, अल्बेनिया, इराण आणि क्यूबा या देशांमध्ये क्रोमाइट सापडते. सिंगभूम (बिहार) सेलम (तमिळनाडू) कृष्णा जिल्हा (आंध्र प्रदेश) केओंझार, कटक, सुखिंडा, धेनकानाल (ओरिसा) सिंधुवली (कर्नाटक) लडाखमधील ड्रास खोरे, बुर्झिल टेकड्या (काश्मीर) व मणिपूर टेकड्या या भागांत क्रोमाइट आढळते. रत्नागिरी जिल्ह्यात व पवनी (भंडारा) येथेही क्रोमाइट सापडले आहे. १९७० साली भारतात १,४४,१७,००० रु. किंमतीचे सु. २,७०,८७९ टन क्रोमाइट काढण्यात आले.
क्रोमियमाचे हे एकमेव धातुक असल्याने मुख्यतः त्याचा क्रोमियम धातू मिळविण्यासाठी उपयोग होतो. गंज, झीज व ⇨ ऑक्सिडीभवन यांना क्रोमियम विरोध करते. त्यामुळे निष्कलंक व विशिष्ट प्रकारचे पोलाद, नायक्रोम इ. मिश्रधातूंत क्रोमियम वापरतात. कोबाल्ट व क्रोमियम यांची मिश्रधातू कठीण व तापरोधी असल्याने ती कापण्याच्या हत्यारांसाठी वापरतात. क्रोमाइट अगलनीय (वितळण्यास कठीण) व रासायनिक दृष्ट्या उदासीन असल्यामुळे त्याचा उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणारे) द्रव्य म्हणून भट्ट्यांच्या विटा बनविण्यासाठी उपयोग होतो.रंगद्रव्य, रंगबंधके, आगकाड्या, चामडी कमाविणे, कापड, विद्युत् विलेपन (विद्युत् क्रियेने एका धातूचा पातळ थर दुसऱ्या धातूवर चढविणे), छायाचित्रण इ. उद्योगधंद्यांमध्ये क्रोमाइटापासून मिळणाऱ्या रसायनांचा उपयोग होतो. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये क्रोमाइट हे मोक्याचे खनिज होते. रंग अर्थाच्या क्रोम या ग्रीक शब्दावरून क्रोमाइट नाव पडले आहे.
पहा : क्रोमियम.
ठाकूर, अ. ना.