क्रेको : पोलंडच्या क्रेको प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६,१०,००० (१९७२). व्हिश्चवलाच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे प्राचीन शहर वॉर्साच्या दक्षिण-नैर्ऋत्येस २४९ किमी. असून देशातील व बाहेरच्या महत्त्वाच्या शहरांस जोडणाऱ्या लोहमार्गांचे केंद्र आहे. १२ किमी. वर विमानतळही आहे. आगगाडीचे, शेतीचे व विजेचे सामान, कागद, रसायने, अन्न, तंबाखू व वाख यांवरील प्राक्रिया यांचे कारखाने, छापखाने यांशिवाय १९४९ नंतर जवळच नोवाहटा येथे लोखंड व पोलादाचा आणि धातुशुद्धीचा मोठा कारखाना निघाला आहे. मध्ययुगीन यूरोपच्या व्यापारी मार्गावर असलेल्या क्रेकोचे व्यापारी, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि विद्याविषयक महत्त्वही जुने व मोठे आहे. १३६४ मध्ये स्थापन झालेले येथील विद्यापीठ यूरोपात फार जुने असून कोपर्निकस तेथे विद्यार्थी होता. तेथील ग्रंथालय प्रचंड आहे. खनिकर्म, कला व वाणिज्य यांच्या आकादमीही आहेत. तेराव्या शतकापासूनची गॉथिक कॅथीड्रले, टेकडीवरील किल्ला व राजवाडा, जुन्या तटबंदीचे अवशेष, थडगी, जुन्या कलाकृती, इमारती इ. प्रेक्षणीय आहेत. १३२० ते १६०९ पर्यंत क्रेको पोलंडची राजधानी होती. १७९५ मध्ये क्रेको ऑस्ट्रियाकडे गेले. १८१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनंतर त्याचे स्वतंत्र राज्य झाले परंतु १८४६ मध्ये ते पुन्हा ऑस्ट्रियाच्या ताब्यात गेले. दोन्ही महायुद्धांत ते जर्मनांच्या हाती होते. १९४५ मध्ये सोव्हिएट सैन्याने ते मुक्त केले.

कुमठेकर, ज. ब.