गहू : (हिं. गेहूँ गु. घहूं क. गोधी सं. गोधुम इं. व्हीट लॅ. ट्रिटिकम कुल-ग्रॅमिनी). गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. दुस ऱ्या महायुद्धापूर्वी जगातील भाताचे उत्पादन गव्हापेक्षा जास्त होते. परंतु त्यानंतर गव्हाखालील क्षेत्र व उत्पादन वाढले आणि १९४८–७० या काळात जगातील गव्हाखालील क्षेत्र आणि उत्पादन भातापेक्षा जास्त होते. जगातील निम्म्या लोकांच्या पोषणात गव्हाला प्रमुख स्थान आहे. त्यापासून चपाती, पाव व तत्सम पदार्थ, रवा व मैदा हे पदार्थ तयार करतात. गहू विशेषतः उत्तर आणि दक्षिण समशीतोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत पिकतो. उत्पादनामध्ये रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चीन, भारत, फ्रान्स, तुर्कस्तान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत. रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चीन व भारत या चार देशांत जगातील एकूण उत्पादनाच्या निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन होते.

भारतात गव्हाची लागवड दक्षिणेकडील काही राज्ये सोडल्यास इतर राज्यांत आढळते. भारतात १९७२ साली गव्हाखाली एकूण क्षेत्र १·९८८ कोटी हेक्टर होते व उत्पादन २·४९२ कोटी टन झाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार ही भारतातील गव्हाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी ९४ टक्के आणि एकूण उत्पादनापैकी  ९६ टक्के उत्पादन वरील आठ राज्यांत होते. दर हेक्टरी गव्हाचे अधिक उत्पादन पंजाब व हरियाणा राज्यांत आहे.

भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ३० टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे.

महाराष्ट्रात १९७२ साली या पिकाखाली ६,९०,६०० हेक्टर जमीन होती व उत्पादन २,४८,५०० टन झाले. कोकण वगळल्यास महाराष्ट्राच्या इतर सर्व भागांत गव्हाची लागवड होते. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अहमदनगर, सोलापूर आणि पुणे हे गव्हाच्या लागवडीचे प्रमुख जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील दर हेक्टरी उत्पादन मात्र इतर राज्यांच्या मानाने फार कमी आढळते.

इतिहास : हे पीक फार प्राचीन काळापासून लागवडीखाली आहे. गव्हाचे मूलस्थान शोधून काढण्याकरिता जपानी शास्त्रज्ञांनी बरेच परिश्रम घेऊन ते आशिया मायनर असावे असा अंदाज वर्तवला. इ. स. पू. १५,००० ते १०,००० वर्षे कालापासून त्या भागात गहू पेरला जात असावा. ईजिप्त व इराण येथील उत्खननामध्ये गव्हाचे अवशेष आढळून आले आहेत. आशिया मायनरमधून पुढे आफ्रिकेत व यूरोपात गव्हाचा प्रसार झाला. इ. स. पू. सु. ७,००० ते ६,००० वर्षांपासून काही ठिकाणी तो लागवडीखाली असावा, असा अंदाज आहे. भारतात गहू सर्वसाधारणपणे इ. स. पू. ३,००० वर्षांपूर्वीपासून लागवडीखाली आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात ट्रिटिकम काँपॅक्टमट्रि.स्फिरोकॉकम या दोन जातींचा गहू आढळून आला.

 

जाती व प्रकार : गहू हा ⇨ग्रॅमिनी  कुलातील ट्रिटिकम  या वंशात मोडतो. या वंशात अनेक जाती आहेत. या सर्व जातींची केव्हा, कोठे आणि कशाप्रकारे उत्पत्ती झाली या प्रश्नांचे बिनचूक उत्तर देणे शक्य नाही परंतु या गुंतागुंतीच्या विषयावर निरनिराळ्या क्षेत्रांतील संशोधनातून पुष्कळच माहिती मिळाली आहे. निसर्गात ग्रॅमिनी कुलातील दोन भिन्न वंशांमध्ये अगर जातींमध्ये संकर होऊन अथवा संकरित जातीमध्ये उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी होणारा बदल) होऊन हल्ली लागवडीत असलेल्या जातींची उत्पत्ती झाली असे मानण्यात येते.

ट्रिटिकम वंशातील निरनिराळ्या जातींची द्विगुणित (प्रजोत्पादक पेशींत नेहमी आढळते त्याच्या दुप्पट) रंगसूत्रांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या) संख्येवर आधारित अशा तीन समूहांत विभागणी केली जाते.

(१)१४ रंगसूत्रांचा समूह :

       (अ)  ट्रि. बिओटिकम (रानटी लहान स्मेल्ट)

                             (आ) ट्रि. मोनोकॉकम (आइनकॉर्न अथवा लहान स्मेल्ट)

आइनकॉर्न गव्हाची लागवड यूगोस्लाव्हिया, आशिया मायनर, ट्रान्सकॉकेशस आणि उत्तर आफ्रिका या भागांतील डोंगराळ प्रदेशांत जनावरांचे आणि मनुष्याचे खाद्य म्हणून फार थोड्या प्रमाणावर होते.हलक्या जमिनीत व कडाक्याच्या थंडीत ही जास्त वाढू शकते. प्रत्येक कणिशकात सर्वसाधारणपणे एकच दाणा असतो. दाणा दोन्ही टोकांकडे अणकुचीदार, चपटा आणि आखूड असतो. इतिहासपूर्व काळात या जातीला फार महत्त्व होते.

(२) २८ रंगसूत्रांचा समूह : 

(अ) ट्रि. डायकॉकॉहड

(आ) ट्रि. तिमोफिवी }     रानटी

(इ) ट्रि. ड्युरम               बक्षी/बन्सी प्रकारचा गहू

(ई) ट्रि. टर्जिडम             पाउलर्ड किंवा रिव्हेट गहू

(उ) ट्रि. थोलोनिकम        पोलिश गहू

(ऊ) ट्रि. कार्थलिकम        पर्शियन गहू

(ए)  ट्रि. डायकॉकम         खपली प्रकारचा गहू

(ऐ)  ट्रि. ओरिएंटेल           खोरसान गहू


आ. १. ट्रि. ड्युरम : (१) ओंबी, (२) दाण्याचे उत्तर (वरचे) दृश्य, (३) दाण्याचे अधर (खालचे) दृश्य.

वरील आठ जातींपैकी ट्रि. ड्युरम (उदा., बक्षी/बन्सी) ही जात जास्त महत्त्वाची आहे. ही जात रुक्षताविरोधक असल्यामुळे गरम व काहीशा रुक्ष हवामानातील प्रदेशात ह्या जातीचे विशेष महत्त्व आहे. या जातीची लागवड रशिया, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, चीन, कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, अर्जेंटिना, यूरग्वाय व चिली या देशांत होते. भारतात या जातीची लागवड मुख्यतः महाराष्ट्रात आणि त्या खालोखाल मध्य प्रदेशाचे काही जिल्हे (विशेषतः माळवा भाग), उत्तर प्रदेशाचे दक्षिणेकडील जिल्हे, गुजरात, राजस्थान व पश्चिम बंगालमधील काही जिल्हे आणि कर्नाटक येथे होते. भारतात एकूण गव्हाच्या क्षेत्रापैकी सु. १० टक्के आणि महाराष्ट्रात ८० टक्के क्षेत्रावर या जातीचे प्रकार लागवडीत आहेत. या गव्हाचा रवा चांगल्या प्रतीचा असतो व चपाती, शेवयाही चांगल्या होतात. पाव, बिस्किटे, केक यांसारख्या पदार्थांच्या निर्मितीसाठी ह्या गव्हाचा वापर करतात. परदेशांत ‘स्पागेटी’ आणि ‘मॅकरोनी’ (शेवयांसारखे पदार्थ) करण्यासाठी या गव्हाचा उपयोग करतात. मॅकरोनीसाठी या जातीचा गहू इतर सर्व जातींपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा असतो. प्रत्येक कणिशकात २–४ दाणे असतात. दाण्याचा रंग पांढरा, लाल अगर तेलकट स्फटिकी असतो. दाणा लांब, अरुंद, टणक आणि दोन्ही टोकांकडे थोडाफार टोकदार असतो. दाण्याचा आडवा छेद थोडाफार त्रिकोणी असतो.

आ. २. ट्रि. डायकॉकम : (१) ओंबी, (२) दाण्याचे उत्तर दृश्य, (३) दाण्याचे अधर दृश्य.

ट्रि. डायकॉकम  (उदा., खपली) या जातीचा गहू यूगोस्लाव्हिया, ट्रान्सकॉकेशस, इराण, पाकिस्तान, भारत आणि अमेरिका येथे फार थोड्या प्रमाणावर लागवडीखाली आहे. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व महाराष्ट्र या राज्यांतील काही थोड्या भागात हा गहू पिकवितात. या गव्हामध्ये ग्‍लुटेनाचाअंश थोडा जास्त असतो. ह्या गव्हाचा रवा काढून त्यापासून खीर, उप्पीट इ. खाद्यपदार्थ करण्याकडे त्याचा उपयोग होतो. या जातीचा दाणा लांबट, अरुंद व दोन्ही टोकांच्या बाजूला अणकुचीदार असतो.

(३) ४२ रंगसूत्रांचा समूह : 

(अ) ट्रि. स्पेल्टा

(आ) ट्रि. माचा

(इ) ट्रि. व्हॅव्हिलोव्ही

(ई) ट्रि. एस्टिव्हम            पावाचा गहू

(उ) ट्रि. काँपॅक्टम            क्लब गहू

(ऊ) ट्रि. स्फिरोकॉकम      बुटका गहू

आ. ३. ट्रि. एस्टिव्हम : (१) ओंबी, (२) दाण्याचे उत्तर दृश्य, (३) दाण्याचे अधर दृश्य.

वरील जातींपैकी ट्रि. एस्टिव्हम  (उदा., सरबती  गहू) या जातीची लागवड जगातील बहुतेक देशांत आढळते.

भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत फार मोठ्या क्षेत्रावर या जातीची लागवड होते. या जातीचे अनेक प्रकार लागवडीखाली आहेत. प्रकाराप्रमाणे दाण्याच्या आकारात फरक आढळतात. सर्वसाधारणपणे दाणा फुगीर (टपोरा) असून वरील टोकाच्या बाजूला निमुळता नसतो. रंग पांढरा, लाल अथवा तेलकट स्फटिकी असतो. काही प्रकारांत दाणा कठीण असतो व काही प्रकारांत पिठूळ असतो. तेलकट स्फटिकी रंग असलेल्या कठीण प्रकारच्या सरबती गव्हाला बाजारात विशेष मागणी असते.

वनस्पतिवर्णन : ही वनस्पती वर्षायू (एक वर्ष जगणारी) आहे. हिची मुळे दोन प्रकारची असतात. (१) आदिमूळ (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) आणि त्याच्या वरच्या बाजूला फुटून आलेली मुळे. ही मुळे ३, ४ अथवा ५ असून बारीक असतात. ही जमिनीत १·३ ते २ मी. खोल जातात, गव्हाचा दाणा भरण्याच्या वेळेपर्यंत ह्या मुळांचे कार्य चालू असते. (२) दुसऱ्या प्रकारची मुळे ही आगंतुक मुळे असतात. ही प्रथम खोडावर जमिनीत २ सेंमी. पर्यंतच्या खोलीवर येतात. पहिल्या आणि दुसऱ्या पेऱ्यांवर प्रत्येकी दोन आगंतुक मुळे येतात. त्यांवरील जमिनीलगतच्या पेऱ्यांवर ४-६ आगंतुक मुळे येतात. ही मुळे पहिल्या प्रकारच्या मुळांपेक्षा जाड आणि जास्त मजबूत असतात. या मुळांमुळे गव्हाच्या वनस्पतीला आधार मिळतो. गव्हाच्या मुख्य रोपाला फुटवे येतात. प्रत्येक फुटव्याच्या मुळ्या निरनिराळ्या असतात व गव्हाची मुळे जमिनीत किती खोल जाऊ शकतील, हे जमिनीची सुपीकता व तिच्यातून होणारा पाण्याचा निचरा यांवर अवलंबून असते. कसदार जमिनीत ती १-२ मी. पर्यंत खोल जाऊ शकतात. पोषक द्रव्ये भरपूर असतील, तर मुळ्या बळकट बनून त्यांचा विस्तार सर्व बाजूंनी होतो. दलदलीच्या जमिनीत मुळ्या पसरण्याचा प्रकार व खोली या बाबी गव्हाच्या जातीवर देखील अवलंबून असतात. ज्या जातीत हे गुणधर्म प्रकर्षाने असतात ती काटक व रुक्षताविरोधक मानली जाते. 

खोड : हे ०·७ ते १·६ मी. पर्यंत उंच वाढते. त्याला ५ ते ६ (सर्वसाधारणपणे ६) पेरी असतात. प्रत्येक पेरे भरीव आणि आकुंचित असते. दोन पेऱ्यांमधील खोडाला कांडे अशी संज्ञा आहे. बऱ्याच प्रकारांत कांडी पोकळ असतात. गव्हाच्या खोडाचा जवळजवळ दोन तृतीयांश भाग पानांच्या आवरकांनी (वेढणाऱ्या देठांनी) झाकलेला असतो. गव्हाच्या रोपाची काही पाने फुटून आल्यावर जमिनीलगतच्या अगर जमिनीखालच्या २·५ सेंमी. खोलीपर्यंतच्या खोडावरील अंकुरांपासून फुटवे येतात. फुटव्यांची संख्या १ ते ९ पर्यंत असते. दोन झाडांमधील अंतर जास्त असल्यास आणि जमीन कसदार असल्यास शंभर अथवा कधीकधी त्याहून जास्त फुटवे येतात. इटलीमध्ये एका गव्हाच्या रोपाला ३४२ फुटवे आले होते व त्यांपासून ७,००० दाणे मिळाल्याचा अधिकृत उल्लेख आहे. कठीण गव्हाच्या रोपांच्या बुंध्यातील दृढ कोशिका (पेशी) चांगल्या वाढलेल्या असतात. या फुटव्यांच्या बुंध्याभोवताली विशिष्ट कोशिकांचे जाळे असते. गव्हाचे रोपटे पावसाच्या पाण्याच्या भाराने दबले, तरी ते या जाळ्यामुळे पुन्हा ताठ उभे राहू शकते.


वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने गव्हाच्या झाडाला निरनिराळ्या प्रकारची पाने असतात. परंतु सर्वसाधारणपणे ओळखल्या जाणाऱ्या पानाचे दोन भाग असतात. त्यांपैकी एका भागाला आवरक असे म्हणतात. आणि दुसऱ्याला पाते असे म्हणतात. आवरक हा भाग पेऱ्यापासून सुरू होतो व कांड्याभोवती नळीप्रमाणे वेढलेला असतो. एक पेऱ्यापासून त्याच्या वरच्या पेऱ्याच्याही वर काही भागापर्यंत आवरकाची लांबी असते (सर्वांत वरच्या पानाचा या नियमाला अपवाद आहे). पानाचे पाते लांब, अरुंद असून शिरा समांतर असतात. आवरक आणि पाते यांच्या जोडावर पापुद्र्यासारखा पुढे आलेला भाग असतो त्याला जिव्हिका असे म्हणतात. पाने खोडावर समोरासमोर असतात.

आ. ४. गव्हाचे खोड व पान : (१) खोडाची कांडी, (२) पेरे, (३) पाते, (४) आवरक, (५) जिव्हिका.

फुलोरा : गव्हाचा फुलोरा कणिश (ओंबी) या प्रकारचा असतो. कणिशाच्या मध्यावरील नागमोडी अक्षावर दोन रांगांत एकाआड एक अवृंत (देठ नसलेली) कणिशके असतात आणि अक्षाच्या टोकाला एकच कणिशक असते. प्रत्येक कणिशकात २–९ पुष्पके (लहान फुले) असतात. कणिशकाच्या खालील बाजूस दोन बाह्यतुषे असतात. कणिशकातील सर्व पुष्पकांना या बाह्यतुषांचे संरक्षण असते. प्रत्येक पुष्पकात एक परितुष, एक अंतस्तुष, दोन लघुतुषे, तीन केसरदले आणि एक किंजमंडल असतात. किंजमंडलात एक किंजपुट असून त्यावर दोन किंजले आणि प्रत्येक किंजलावर एक पिसासारखा किंजल्क असतो. किंजपुटाच्या तळाशी पापुद्र्याप्रमाणे असणारी लघुतुषे असतात. केसरदले आणि किंजमंडल ही परितुष आणि अंतस्तुष यांच्यामध्ये असतात [→ फूल]. परागकोश पक्क झाल्यावर त्यांच्या तंतूंची वाढ होऊन परागकोश पुष्पकाच्या बाहेर ढकलले जातात. तंतूंची वाढ होताना परागकोश फुटतात व काही पराग पुष्पकातच पडतात आणि बाकीचे (परागकोश बाहेर पडल्यावर) हवेत पसरतात. पुष्पकात पडलेल्या परागांचे काही कण किंजल्कावर पडून फलधारणा होते. फळ (बी) हे सस्यफल (शुल्क, आपोआप न फुटणारे व फलावरणाशी बीजावरण एकरूप झालेले एकच बी असलेले फळ) असते व ते तयार झाल्यावर अंतस्तुष आणि परितुष यांनी वेढलेले असते किंवा मोकळे असते. पुष्पकाच्या परितुषांवर केसासारखी, लांब आणि जाड प्रशुके (कुसळे) असतात. कधी ती आखूड असतात अगर कधी नसतातही.

आ. ५. गव्हाचा फुलोरा, फूल व त्याचे भाग : (१) फुलोरा, (२) बाह्यतुष, (३) परितुष, (४) अंतस्तुष, (५) लघुतुष, (६) केसरदले, (७) किंजपुट, (८) किंजल्क, (९) दाण्याचा उभा छेद.

गव्हाचे पीक फुलोऱ्यावर आल्यावर बी तयार होण्यासाठी ३० ते ४० दिवस लागतात (सर्द आणि थंड हवामानात ४०–६० दिवस लागतात). सर्वसाधारणपणे गव्हाच्या पिकात स्वपरागण आढळून येते. क्वचित प्रसंगी परपरागणही आढळून येते [→परागण].

हवामान आणि हंगाम: गहू हे थंड हवेत वाढणारे पीक आहे. या पिकाची वाढ ३ ते ४से. च्या खाली आणि ३० ते ३२सें. च्या वरील तापमानात होत नाही. ७ ते २१से. या तापमानात पिकाची वाढ चांगली होते. फुटवे येण्यासाठी थंड हवामानाची जरूरी असते. सकाळी पडणारे दव पिकाच्या वाढीला पोषक असते. ३० ते ६० उत्तर आणि २५ ते ४० दक्षिण अक्षांशांच्या समशीतोष्ण हवेच्या पट्ट्यांत गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. उष्ण हवेच्या प्रदेशात ते डोंगरमाथ्यावर अथवा हिवाळ्याच्या हंगामात घेतात. भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांत गव्हाची लागवड हिवाळी हंगामात करतात. उष्ण कटिबंधात १५ उत्तर अक्षांशावर भारतातील दक्षिण पठारावर, त्याचप्रमाणे विषुववृत्तावरील केन्यामध्ये उंच प्रदेशात गव्हाची लागवड करतात. एका टोकाला समुद्राच्या पातळीपेक्षा कमी पातळीवर (मृत समुद्राच्या आसपास आणि कॅलिफोर्नियातील इंपीरिअल व्हॅलीचा प्रदेश), तर दुसऱ्या टोकाला तिबेटमध्ये ४,५०० ते ५,००० मी. उंचीवरील प्रदेशात गव्हाची लागवड होते. उष्ण व आर्द्र हवेमध्ये गव्हाचे पीक यशस्वी होत नाही कारण त्यावर पुष्कळ प्रकारचे रोग पडतात.

पश्चिमेकडील राष्ट्रांत गव्हाच्या पिकाचे दोन हंगाम असतात. दीर्घ मुदतीचा हिवाळी गहू सप्‍टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरून पुढील जून मध्ये अगर जुलैमध्ये कापणी करतात अथवा वसंत ऋतूचा (कमी मुदतीचा) गहू (स्प्रिंग व्हीट) एप्रिल-मेमध्ये पेरून ऑगस्ट अगर सप्टेंबरमध्ये कापणी करतात. परंतु भारतात (दक्षिण भारतातील काही टेकड्या वगळता) गहू फक्त रबी हंगामात घेतात कारण गव्हाला थंड व कोरडी हवा मानवते. दक्षिण भारतातील काही टेकड्यांवर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अशा दोन हंगामांत गहू पिकवितात, परंतु अशा प्रकारचे क्षेत्र फार थोडे आहे.


पेरणीपासून कापणीपर्यंतचा हंगाम भारतातील वेगवेगळ्या भागांत कमीजास्त असतो. उत्तर भारतातील टेकड्यांत तो सर्वांत जास्त मुदतीचा म्हणजे १८० दिवस असतो. या भागात गव्हाची पेरणी ऑक्टोबरमध्ये व कापणी जून-जुलैमध्ये करतात. देशाच्या सपाट प्रदेशात तो वायव्य भागात सर्वांत दीर्घ मुदतीचा (१६० दिवस) असतो व ईशान्य भागाकडे आणि दक्षिणेकडे कमी होत जातो. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात तो १२०–१४० दिवस आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात तो १०० दिवसांचाच असतो.

गव्हाला फार पाऊस मानवत नाही. वार्षिक २५ सेंमी. पासून १७५ सेंमी. पर्जन्यमानात गव्हाची लागवड होते. परंतु जगातील गव्हाच्या क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र ३७·५ ते ८७·५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या प्रदेशांत आहे. एकूण वार्षिक पर्जन्यमानापेक्षा कोणत्या महिन्यात किती पाऊस पडतो याला जास्त महत्त्व आहे. पर्जन्यमानाबरोबरच तापमानही महत्त्वाचे असते.

जमीन : भारतामध्ये गहू बऱ्याच प्रकारच्या जमिनींमध्ये पिकविला जातो. गव्हाचे पीक कोरडवाहू व बागायती ह्या दोन्ही पद्धतींनी घेतले जाते. कोरडवाहू पिकाला काळी व गाळपेराची जमीन असल्यास उत्तम. हलक्या जमिनीत ओलावा टिकून राहत नसल्याने पीक चांगले येत नाही.

बागायती पिकास साधारण हलकी, मध्यम काळी व पाण्याचा निचरा व्यवस्थित असणारी जमीन चांगली. जमीन थोडी लवणयुक्त असली तरीही गहू वाढू शकतो.

मशागत : गव्हाचे पीक जमिनीच्या चांगल्या मशागतीवर अवलंबून असते. मशागतीची पद्धत कोरडवाहू व बागायती पिकांच्या बाबतीत बहुतेक सारखीच असते. जमीन चांगली नरम होईल अशा प्रकारे मशागत करावी लागते. त्यामुळे तिची पाणी शोषून घेण्याची शक्ती वाढते. अशा जमिनीत मुळांची वाढ चांगली होते व पीक चांगले येते.

ज्या जमिनींत गव्हाचे कोरडवाहू पीक घेतात, त्या खरीप हंगामात पड ठेवतात कारण खरिपात साठलेल्या ओलाव्यावरच पुढील पीक घेता येते. जमीन ३-४ वेळा नांगरतात व प्रत्येक पावसानंतर वाफसा आल्यानंतर कुळवाची पाळी देतात व तण काढून टाकतात. शेवटची वखर पाळी पेरणीच्या अगोदर देऊन जमीन अत्यंत चांगल्या प्रकारे तयार ठेवतात.

गव्हासाठी तागाचा बेवड करावयाचा असल्यास दर हेक्टरी ७५ ते १०० किग्रॅ. बी पहिल्या पावसानंतर पेरून पीक फुलावर येण्याच्या सुमारास जमिनीत गाडतात.

खरिपात भुईमूग, कापूस असे पीक घेऊन रबीत बागायती गहू करावयाचा असल्यास खरिपातील पीक काढल्यानंतर जमीन नांगरून, ढेकळे फोडून, कुळवून नरम करतात व मग पाणी देऊन वाफसा आल्यावर पेरणी करतात.

पिकांची फेरपालट : कोरडवाहू पिकाच्या बाबतीत जेथे पाऊस चांगला पडतो आणि सप्‍टेंबर-ऑक्टोबरमध्ये हमखास पाऊस पडण्याची शक्यता असते, तेथे खरीप हंगामात तयार होणारे द्विदल वर्गातील पीक घेण्याचा प्रघात महाराष्ट्रातील धुळे, जळगाव इ. जिल्ह्यांतील काही भागांत प्रचलित आहे. इतरत्र गव्हासाठी राखून ठेवलेल्या जमिनीत खरिपात कोणतेही पीक घेत नाहीत. ती जमीन तशीच ठेवून तिची मशागत पावसाचे पाणी चांगले मुरवून घेण्यासाठी करतात. कुळवाच्या पाळ्या देऊन मशागत करतात.

बागायती गव्हाच्या बाबतीत कपाशी व भुईमूग ही पिके फेरपालट म्हणून घेतात. 

खते व वरखते : कोरडवाहू पिकाला वरखत म्हणून शेणखत अगर कंपोस्ट खत हेक्टरी ६ ते ८ टनांपर्यंत देतात. बागायती पिकाला हे प्रमाण १२ टनांपर्यंत असते. काही ठिकाणी हिरवळीच्या खताचाही उपयोग केला जातो, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून घेतात. निरनिराळ्या पेंडींचाही खत म्हणून वापर करता येतो. याकरिता करडीची अगर एरंडीची पेंड वापरतात.

नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये गव्हाच्या पिकाला रासायनिक वरखतांच्या रूपाने देतात. कोरडवाहू पिकास हेक्टरी १७ ते २२ किग्रॅ. नायट्रोजन आणि बागायती पिकास ४५ ते ६८ किग्रॅ. नायट्रोजन अमोनियम सल्फेटाच्या रूपात देतात. बागायती पिकाला नायट्रोजन एकूण दोन हप्त्यांत देतात. पहिला हप्ता पेरणीपूर्वी आणि दुसरा हप्ता उगवणीनंतर एका महिन्याने देतात.

फॉस्फरस हे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डबल सुपर फॉस्फेटाच्या रूपाने देतात. बागायती पिकास हेक्टरी २२ ते ४५ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्‍ल मिळेल या प्रमाणात देतात. सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी जमिनीत मिसळतात.

सर्वसाधारणपणे गव्हाकरिता पोटॅशयुक्त खते वापरण्याची प्रथा नाही कारण हे द्रव्य जमिनीत पुरेसे आढळते.

पेरणी : महाराष्ट्रात निरनिराळ्या विभागांत पेरणीची वेळ तेथील हवामानावर अवलंबून असते. पेरणीच्यावेळी तापमान जास्त असले, तर मूळकूज नावाच्या रोगाने रोपे वाळतात आणि फार नुकसान होते.

औरंगाबाद विभाग: ऑक्टोबर पहिला व दुसरा आठवडा.

पुणे व मुंबई विभाग: ऑक्टोबर दुसरा व तिसरा आठवडा.

नागपूर विभाग: ऑक्टोबर तिसरा व चौथा आठवडा.

गव्हाच्या दोन ओळींतील अंतर किती असावे याबाबत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांत केलेल्या प्रयोगांवरून असे आढळते की, हे अंतर बागायती गव्हासाठी २२·५ सेंमी. असावे. कारण त्यामुळे आंतर मशागत करणे व जमिनीचा पोत सुधारून पिकाला भर देणे सोईस्कर होते. कोरडवाहू पिकासाठी हे अंतर ३० सेंमी. असावे असे प्रयोगान्ती आढळून आले. पेरणी मात्र एकाच दिशेने करतात. उभे आडवे पेरत नाहीत कारण त्यामुळे आंतर मशागत करता येत नाही. महाराष्ट्रात गव्हाची पेरणी पाभरीने करतात.

पेरणीपूर्वी जमिनीमध्ये ओल असणे महत्त्वाचे आहे. ओल नसेल तर पाणी देऊन जमीन भिजवतात व वाफसा आल्यावर वखरणी करून पेरणी करतात.

मेक्सिकन प्रकारांचे बी २·५ ते ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पेरणे योग्य नसते कारण खोल पेरणी केल्यास बी चांगले उगवत नाही. पण निफाड प्रकाराचे बी ६ ते ७·५ सेंमी. खोल पेरल्यास चालते. कोरडवाहू पिकासाठी जमिनीत ओल किती खोलवर आहे यावर बी किती खोल पेरावे हे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ८–१० सेंमी. खोलीवर बी पेरतात.

मेक्सिकन प्रकारांचे बी हेक्टरी १०० किग्रॅ. पर्यंत पेरतात व निफाड प्रकारासाठी हेक्टरी ६० ते ७० किग्रॅ. बी वापरतात. विदर्भात ह्याच जातीचे बी ७५ किग्रॅ. पर्यंत वापरण्याची प्रथा आहे.

पेरणीनंतर बी झाकतात. याकरिता हलका कुळव उलटा करून चालवतात म्हणजे दिंडाच्या वजनाने बी दबून सर्व बाजूंनी त्याला ओल मिळते व चांगली उगवण होण्यास मदत होते. पेरणीपूर्वी बियांस पारायुक्त कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा म्हणजे कवकांचा नाश करणारे द्रव्य) लावतात.

मिश्रपिके : सामान्यतः गव्हात मिश्रपिके नसतात परंतु काही ठिकाणी हरभरा, बार्ली, वाटाणा, मसूर, जवस व करडई ही पिके मिश्रपिके म्हणून घेतात. गहू-हरभरा मिश्रपिकात गव्हाच्या १२ ओळींनंतर ८ ओळी हरभ ऱ्याच्या असतात, तर गहू-करडई मिश्रपिकात दर ८ ते १२ गव्हाच्या ओळीनंतर एक ओळ करडईची असते. बहुतेक पिकांत मोहरीचा उतवडा टाकतात. पिकाच्या कडेने जवस व करडई पेरतात त्यामुळे गव्हाला गुरांचा त्रास होत नाही. 


पाणी : बी झाकल्यानंतर ७·५ × ३ मी. वाफे बांधतात. पिकाच्या वाढीच्या कोणत्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे हे खाली दर्शविले आहे. पहिले पाणी पेरणीनंतर २१ दिवसांनी देतात व पाणी सम पातळीत व सारखे दिले जाईल याची काळजी घेतात.

पीक वाढीची अवस्था

पेरणीनंतर किती दिवसांनी  पाणी द्यावे

मुळे फुटण्याची वेळ

२१ ते २५

कांडी धरण्याची वेळ

४० ते ४२

पीक ओंबीवर येण्याची वेळ

६५ ते ७०

दाण्यात चीक भरण्याची वेळ

९० ते ९५

जर पाणीपुरवठा अपुरा असेल तर, खालीलप्रमाणे पाण्याच्या पाळ्या देतात.

पाण्याच्या पाळ्या

पाणी देण्याची वेळ (पेरणीनंतर दिवस)

फक्त एक

४२

दोन (शक्य असल्यास)

२१, ६५

तीन ( “ “ )

२१, ४२, ६५

चार ( “ “ )

२१, ४२, ६५, ९५

आंतरमशागत : सर्वसाधारणपणे गव्हाच्या पिकाला आंतर मशागतीची आवश्यकता नसते, परंतु बागायत पिकाला आंतर मशागतीचा पुष्कळ वेळा फायदा होतो. तण नष्ट करणे, पाणी दिल्यावर घट्ट होणारी जमीन मोकळी करणे आणि पिकाच्या बुंध्यापाशी मातीचा आधार देऊन पीक लोळण्यापासून वाचविणे, हा गव्हातील आंतर मशागतीचा उद्देश असतो. पिकाची वाढ ४५ दिवसांची होईपर्यंत आवश्यकतेप्रमाणे एक ते तीन कोळपण्या देण्याची पद्धत आहे. पहिली कोळपणी पीक १८ ते २० दिवसांचे असताना करतात व दुसरी पीक २८ ते ३० दिवसांचे झाल्यावर दात्याच्या कोळप्याने करतात. शेवटची कोळपणी लहान नांगराचा फाळ असलेल्या कोळप्याने करून उसाला जशी भर देतात त्याप्रमाणे पीक ३८ ते ४० दिवसांचे असताना करतात.

कापणी : पीक तयार होण्यास ४ ते ५ महिन्यांचा काळ लागतो. पीक तयार होताच वेळेवर कापणी करणे आवश्यक आहे. एस– ३०८ (सोनालिका) व निफाड ७४७–१९ या प्रकारांचे दाणे गळतात. त्यासाठी कापणी पीक पूर्ण पक्क होण्याआधी १-२ दिवस करतात. महाराष्ट्रात कापणी फेब्रुवारी-मार्चमध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे कापणी विळ्याने करण्यात येते. बैलांच्या साहाय्याने चालणाऱ्या कापणी यंत्रांचा वापर मुख्यत्वे सरकारी पीकक्षेत्रापुरता मर्यादित आहे. परंतु कापणीच्या हंगामातील मजुरांच्या टंचाईमुळे खाजगी क्षेत्रांतही अशा यंत्रांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे.

मळणी : कापलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधून थोडे दिवस शेतात वाळू देऊन खळ्यावर नेतात. तेथे पेंढ्या सोडून ताटे गोलाकार दाट थरात खळ्यात पसरतात व त्यांवर बैलांची पात धरतात किंवा बैलांच्या साहाय्याने चालणाऱ्या ओल्पाड मळणी यंत्राने मळणी करतात आणि   उफणून साफ करून पोत्यात भरतात. गव्हाच्या मळणीसाठी व उफणणीसाठी विद्युत् वा यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर सुरू झाला असून महाराष्ट्रात अशा प्रकारची यंत्रसामग्री तयार होते. शेतकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या एंजिनाच्या शक्तीवर चालणाऱ्या मळणी यंत्राची निर्मिती लुधियाना व जालंदर येथे होते. मोठ्या क्षेत्रावर ट्रॅक्टरच्या एंजिनवर चालणाऱ्या तबकडी कुळवाच्या साहाय्यानेही गव्हाची मळणी करतात.

उत्पादन : १९७० मध्ये गव्हाचे जागतिक क्षेत्र २१,०२,९१,००० हेक्टर उत्पादन ३१,१६,१५,००० टन व दर हेक्टरी उत्पादन १,४८० किग्रॅ. होते. १९७२ साली भारताचे हेक्टरी उत्पादन १,२५० किग्रॅ. होते. पंजाब राज्यातील दर हेक्टरी उत्पादन सर्वांत अधिक (२,२३० किग्रॅ.) होते. त्याखालोखाल हरियाणा, प. बंगाल आणि ओरिसामध्ये होते. महाराष्ट्राचे त्या वर्षीचे हेक्टरी उत्पादन ३६० किग्रॅ. म्हणजे फारच कमी होते. १९७१ साली ते ५०० किग्रॅ. होते. राज्यातील दुष्काळामुळे १९७२ मध्ये गव्हाखालील एकूण क्षेत्र आणि उत्पादन कमी झाले. जगातील गहू पिकविणाऱ्या काही देशांतील १९७० च्या उत्पादनाचे आकडे कोष्टक क्र. १ मध्ये दिले असून कोष्टक क्र. २ मध्ये भारताच्या निरनिराळ्या राज्यांतील १९७२ सालच्या उत्पादनाचे आकडे दिले आहेत.

कोष्टक क्र. १ जगातील गहू पिकविणाऱ्या प्रमुख देशांतील गव्हाचे क्षेत्र व उत्पादन (१९७०).

देश

क्षेत्र

१,००० हेक्टर

उत्पादन

१,००० टन

दर हेक्टरी उत्पादन

१०० किग्रे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

१७,९६०

३७,५१६

२०·९

अर्जेंटिना

३,३८४

४,२६०

१२·५

अल्जीरिया

२,१५०

१,२००

५·६

ऑस्ट्रेलिया

७,००१

८,०२८

११·५

इटली

४,१३८

९,६३०

२३·३

इराक

२,०३३

१,०५९

५·२

इराण

४,७००

४,०००

८·५

कॅनडा

५,०५२

९,०२६

१७·९

ग्रीस

१,१००

२,०००

१८·२

ग्रेट ब्रिटन

१,०१०

४,१७२

४१·३

चिली

७४०

१,२५०

१६·९

चीन

३०,०००

जपान

२२९

४७४

२०·७

झेकोस्लोव्हाकिया

१,०८१

३,०५०

२८·२

ट्युनिशिया

१,०००

५८०

५·६

तुर्कस्तान

५,८००

१०,१०५

११·९

द. आफ्रिका

१,३००

१,३००

१०·०

प. जर्मनी

१,४९३

५,६६२

३७·९

पोर्तुगाल

६,२१९

७,३२९

११·८

पाकिस्तान

५७५

२.०१२

३५·०

पू. जर्मनी

५७५

५१६

९·०

पोलंड

२,०००

४,६००

२३·०

फ्रान्स

३,७६०

१२,९२२

३४·४

बल्गेरिया

९४०

२,८४०

३०·०

ब्राझील

१,७९०

१,८००

१०·१

भारत

१६,६२६

२०,०९६

१२·१

मेक्सिको

७४०

२,१००

२८·४

मोरोक्को

१,९४०

१,७००

८·८

युगोस्लाव्हिया

१,५३३

३,७९५

२०·७

रशिया

६५,५००

९५,०००

१४·४

रूमानिया

२,३००

४,११७

१७·९

संयुक्त अरब रिपब्लिक

५४८

१,५१६

२७·७

स्पेन

३,६९५

३,९८५

१०·८

हंगेरी

१,२७३

२,७३६

२१·५

एकूण जागतिक

२,१०,२९१

३,११,३१५

१४·८

कोष्टक क्र. १ भारतातील राज्यवार गव्हाचे क्षेत्र व उत्पादन (१९७२).

राज्य

क्षेत्र

१,००० हेक्टर

उत्पादन

१,००० टन

दर हेक्टरी उत्पादन

१०० किग्रे.

आंध्र प्रदेश

१६·६

६·३

३·१

आसाम

११२·९

१६०·४

१४·३

ओरिसा

४३·२

८४·२

१९·४

उ. प्रदेश

६,३६२·०

७,६३३·३

१२·०

कर्नाटक

२९८·६

१०९·२

३·६

गुजरात

३७१अ३

५४७·६

१४·४

जम्मू व कश्मीर

१७९·७

१६८·०

९·४

तमिळनाडू

२·२

०·८

३·६

त्रिपुरा

०·४

०·९

२·०

दिल्ली

५१·१

८७·६

१७·१

पंजाब

२,४०१·०

५,३६१·०

२२·३

पं. बंगाल

३६९·९

६५२·७

१७·६

बिहार

२,५०९·१

३,१३६·४

१२·१

मणिपूर

२·७

४·२

१·५

मध्य प्रदेश

३,५२९·०

२,४४७·०

६·९

महाराष्ट्र

६९०·६

२४८·५

३·६

मेघालय

०·३

०·२

६·६

राजस्थान

१,३९५·१

१,७४९·३

१२·५

हरियाणा

१,२३१·०

२,१६०·०

१७·६

हिमाचल प्रदेश

३१४·६

३६५·०

११·३

एकूण

१९,८८१·२

२४,९२२·६

१२·५

कोष्टक क्र. १ वरून असे दिसून येईल की, एकूण उत्पादनात भारताचा जगातील ३४ देशांत चौथा क्रमांक आहे. परंतु हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत तो एकविसावा आहे. याकरिता उत्तम मशागत, खताचा व पाण्याचा पुरेशा प्रमाणात वापर, अधिक उत्पन्न देणारे व रोगप्रतिकारक गव्हाचे प्रकार वापरून हेक्टरी उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार: गेल्या काही वर्षांत गव्हाच्या एकूण उत्पादनापैकी / भाग त्या त्या उत्पादक देशातच वापरला जात असून उरलेला / निर्यात केला जात आहे. निर्यात करणारे देश थोडेच असून आयात करणाऱ्या देशांची संख्या जास्त आहे. काही देश आपापल्या गव्हाची निर्यात करून त्यांना जरूर असलेल्या परंतु त्या देशात उत्पादन होऊ न शकणाऱ्या निराळ्या प्रकारच्या गव्हाची आयात करतात.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स आणि ईजिप्त या देशांना भारतातून गव्हाची निर्यात होत असे. सर्वांत जास्त ग्रेट ब्रिटनला निर्यात होत असे. १९३५ सालानंतर भारतातून गव्हाची निर्यात बंद झाली. देशातील गव्हाच्या वाढत्या किंमती आणि गहू निर्यात करणाऱ्या इतर देशांची स्पर्धा ही याची प्रमुख कारणे आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर गव्हाची निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया व (काही वर्षे) फ्रान्स यांची गणना होते. आयात करणाऱ्या देशांत प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, चीन, पूर्व व पश्चिम जर्मनी, नेदर्लंड्स, जपान, भारत, पाकिस्तान व रशिया यांचा समावेश होतो. भारताच्या दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या काळात अमेरिकेकडून ⇨पब्‍लिक लॉ ४८० द्वारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात करण्यात आली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस व त्यानंतरही सु. ४० वर्षे गव्हाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मुख्यत्वे खाजगी रीत्या खुल्या बाजारपेठांतून होत असे. आयात करणाऱ्या देशांतील अशा बाजारपेठांपैकी इंग्‍लंडमधील लिव्हरपूल येथील बाजारपेठ व निर्यात करणाऱ्या देशांतील बाजारपेठांपैकी अमेरिकेतील शिकागो व कॅनडातील विनिपेग येथील बाजारपेठा मोठ्या होत्या. आयात करणाऱ्या बहुतेक देशांतील गव्हाचा अंतर्गत व परदेशी व्यापार तेथील शासनांच्या नियंत्रणाखाली आहे.

संयुक्त राष्ट्रांची अन्न व शेती संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय चलन निधी यांच्यामार्फत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार व जकात विषयक सर्वसामान्य करार (गॅट) आणि आंतरराष्ट्रीय गहू करार यांच्याद्वारे गव्हाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर व त्याच्या किंमतीवर नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करण्यात आलेले आहेत.

गव्हाचे सुधारलेले प्रकार : भारतामध्ये शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून सुधारित गहू प्रकार तयार करण्याचे काम १९०६ सालापासून पुसा (बिहार) येथे सुरू झाले. त्यापूर्वी १८८० सालापासून निवड पद्धतीनुसार गहू प्रकार तयार करण्याचे काम पुणे, नागपूर, कानपूर इ. ठिकाणी सुरू होते. कालांतराने प्रत्येक राज्यात गहू संशोधन केंद्रे अस्तित्वात येऊन नवीन नवीन प्रकार तयार केले गेले.

महाराष्ट्रातील प्रचलित प्रकार : महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड (जि. नाशिक) येथे असून उपकेंद्रे वाशिम (जि. अकोला) व बदनापूर (जि. औरंगाबाद) येथे आहेत. हल्ली प्रचलित असलेल्या प्रकारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

(१) निफाड–५९ : हा प्रकार बक्षी गव्हाच्या जातीचा असून कोरडवाहू पिकाकरिता योग्य आहे.

(२) निफाड–१४६ : हा प्रकारसुद्धा बक्षी गव्हाच्या जातीचा असून बागायती पिकासाठी उपयुक्त आहे.

(३) निफाड–७४७–१९ : हा प्रकार सरबती गव्हाच्या जातीचा असून आर. एफ. पी. एम.–१९६ व मोंढ्या ३-२ या दोन प्रकारांच्या संकरापासून तयार केला आहे. मध्यम उंचीचा हा प्रकार उत्पन्नाला चांगला आहे. पीक तयार झाल्यावर दाणे गळतात त्यामुळे पीक तयार होताच कापणी करावी लागते.

(४) निफाड–९१७ : हा प्रकार सरबती गव्हाच्या जातीचा असून पंजाबचा सी–५९१ व इएक्स–६१ या दोन प्रकारांच्या संकरापासून तयार केला आहे. पीक थोडे उंच वाढते व उशीरा (१४० दिवस) तयार होत असल्याने पाण्याच्या एक-दोन पाळ्या जास्त लागतात. हा प्रकार उत्पन्नाला चांगला असून दाण्याचा रंग व तजेला चांगला असतो. 

(५) एच. वाय.–६५ : मध्य प्रदेशात तयार केलेला हा प्रकार सरबती गव्हाच्या जातीचा असून विदर्भात बराच लोकप्रिय आहे.


वरील सर्व गहू प्रकार काळ्या तांबे ऱ्याला संपूर्णपणे प्रतिकारक नाहीत. तांबेऱ्याच्या काही प्रजातींना ते बळी पडतात, पण स्थानिक प्रकारांपेक्षा त्यांच्यात बरीच अधिक प्रतिकारक्षमता आहे.

मेक्सिकन जाती : (१) लर्मा रोजो : हा मेक्सिकन गव्हाचा प्रकार १९६५ साली भारतात प्रथम लागवडीसाठी दिला गेला. ह्या प्रकाराचा गहू मध्यम कठीण व तांबूस रंगाचा असतो. हा प्रकार काळ्या तांबे ऱ्याला प्रतिकारक आहे, पण काजळी रोगास बळी पडतो.

(२) सोनोरा–६४ : हा मेक्सिकोमध्ये तयार केलेला प्रकार १९६५ साली भारतात आला. हा प्रकार लवकर तयार होत असल्याने नेहमीच्या वेळी वा थोडा उशीरा पेरला तरी चालतो. काळ्या व नारिंगी तांबे ऱ्याला सौम्य प्रतिकारक असून पिवळ्या तांबे ऱ्याला बळी पडतो.

(३) कल्याण सोनो : एस. २२७ हा प्रकार उत्पन्नाला चांगला असून उत्तर भारतात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहे. तांबे ऱ्याला सौम्य प्रतिकारक असून काजळी रोगास पूर्ण प्रतिकारक आहे. मेक्सिकोहून आणलेल्या संकरित वाणातून कल्याण– २२७, सोना–२२७, एस. २२७ असे वाण निवड करून काढले आहेत.

(४) सोनालिका एस. ३०८ : हा प्रकार मेक्सिकोहून आलेल्या संकरित वाणातून निवड करून काढला आहे. याचा गहू पिवळा व टपोरा असतो. तांबे ऱ्याला सौम्य प्रतिकारक. पीक तयार झाल्यावर दाणे गळतात त्यामुळे कापणी वेळीच करावी लागते.

(५) सफेद लर्मा व छोटी लर्मा : हे दोन्ही प्रकार निवड पद्धतीने निर्माण केले असून काळ्या तांबे ऱ्याला अत्यंत प्रतिकारक आहेत व लर्मा रोजोपेक्षा दाण्याचा रंग चांगला असतो.

(६) सरबती सोनोरा : सोनोरा–६४ या प्रकारापासून तयार केलेल्या या प्रकाराचा दाणा पिवळा असून तो लवकर तयार होतो, पण काजळी रोगास बळी पडतो. तांबे ऱ्यास सौम्य प्रतिकारक आहे.

(७) शेरा : हा प्रकार ‘टू जीन ड् वार्फ’ प्रकारचा असून लवकर तयार होणारा व न लोळणारा आहे. दाणे सरबती चमकदार रंगाचे असून प्रथिनांचे प्रमाण १४·४% असते. कल्याण सोनापेक्षा हेक्टरी ४-५ क्विंटल उत्पन्न जास्त येते. दक्षिण उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांत हा प्रकार बागायतीसाठी चांगला व उशिरा पेरणीस उपयुक्त असतो.

(८) मोती : हा प्रकार ‘थ्री जीन ड् वार्फ’ प्रकारचा असून लवकर तयार होतो. जास्त खत दिल्यास योग्य प्रतिसाद मिळतो. दाणे सरबती आणि चमकदार. काळ्या व तपकिरी तांबे ऱ्यास प्रतिकारक्षम. कल्याण सोनापेक्षा या प्रकाराचे हेक्टरी उत्पन्न ५-६ क्विंटल जास्त येते. पश्चिम उत्तर प्रदेश आणि जेथे पिवळा तांबेरा येत नाही त्या विभागासाठी हा उत्तम आहे.

संगवे, र. आ. चौगले, द. सी.

रोग : गव्हावर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. तांबेरा, काजळी, करपा, मूळकूज इ. रोगांचा विशेष त्रास होतो.

तांबेरा : गव्हावरील तांबेऱ्याचे तीन प्रकार आहेत : (१) खोडावरील काळा तांबेरा, (२) पानावरील नारिंगी तांबेरा व (३) पिवळा तांबेरा. भारतात तांबे ऱ्याचे हे तिन्ही प्रकार आढळतात. त्यांमुळे गव्हाचे बरेच नुकसान होते [→ तांबेरा].

(१) खोडावरील काळा तांबेरा : हा तांबेरा पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसाय  या कवकामुळे होतो. ह्या तांबेऱ्याचा प्रसार जगात जेथे जेथे गहू पिकवला जातो तेथे तेथे आढळतो. भारतातही तो प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इ. राज्यांत आढळतो. या रोगामुळे पानावर व विशेषतः खोडावर विटकरी रंगाच्या लांबट पुटकुळ्या आढळतात. त्या एकमेकींत मिसळून जाड चट्टे तयार होतात. या पुटकुळ्यांमध्ये या रोगाची असंख्य बीजे असतात. ती वाऱ्याने उडून निरोगी पिकावर पडली असता रोगाची लागण होते. दमट व उबदार हवामान असेल, तर रोगाची लागण झपाट्याने होते. विटकरी रंगाच्या पुटकुळ्या किंवा ठिपक्यांचा रंग पीक काढणीच्या वेळी काळा असतो. त्यामुळे याला खोडावरचा काळा तांबेरा म्हणतात. झाडामधील अन्नरस कवकाच्या वाढीकरिता उपयोगात येत असल्याने तसेच कवकाच्या प्रादुर्भावाने खोडावरील त्वचा फाटून बाष्पीभवन जलद होत असल्याने दाणे पोचट राहतात व उत्पादनात फार घट येते. या तांबे ऱ्यामध्ये १९ प्रजाती असून त्यांतील १५ क आणि १२२ ह्या प्रजाती अत्यंत तीव्र आहेत.

या रोगावर उपाय म्हणजे प्रतिकारक्षम प्रकारांची लागवड करणे हाच होय. प्रचलित निफाड प्रकार काळ्या तांबे ऱ्याच्या ११, १५ क, २१ अ आणि ४२ ब या प्रजातींना बळी पडतात. छोटी लर्मा हा प्रकार मात्र काळ्या तांबेऱ्याला संपूर्णपणे प्रतिकारक आहे. बागायती पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता असल्यास झायनेब या कवकनाशकाचे फवारे दिले असता रोग आटोक्यात येतो.

(२) पानावरील नारिंगी तांबेरा : हा पक्सिनिया रिकाँडिटा या कवकामुळे होतो. ह्या तांबे ऱ्याचा प्रादुर्भाव फक्त गव्हाच्या पानांवरच आढळतो. पानांवर नारिंगी रंगाचे बारीक वाटोळे ठिपके आढळतात. रोगाची तीव्रता असल्यास पाने पिवळी पडतात व दाणे पोचट बनतात व नुकसान होते. यावर उपाय म्हणजे प्रतिकारक प्रकारांची लागवड अथवा बागायती पिकावर झायनेब फवारणे हा होय. या तांबेऱ्यामध्ये सुद्धा १५ प्रजाती आहेत. महाराष्ट्रात या तांबेऱ्याचा प्रादुर्भाव साधारणपणे १९६५ सालापासून जास्त आढळत आहे. हा तांबेरा भारतात सर्वत्र आढळतो.

(३) पिवळा तांबेरा : हा पक्सिनिया स्ट्रायफार्मिस  या कवकामुळे होतो. यामुळे पानांवर पिवळ्या रंगाचे बारीक ठिपके आढळतात. हा प्रामुख्याने उत्तर भारतातच आढळतो. कारण याच्या वाढीकरिता अत्यंत थंड हवामान लागते. महाराष्ट्रात  त्याचा प्रादुर्भाव आढळत नाही. यावर उपाय म्हणजे प्रतिकारक जातींची लागवड हाच होय.

काणी : (काजळी). हा रोग युस्टिलागो ट्रिटिसाय  या कवकामुळे होतो. रोगग्रस्त रोपांच्या ओंबीमध्ये दाणे न भरता काळी भुकटी आढळते. ही काळी भुकटी म्हणजेच या रोगाची बीजे होत. निरोगी पीक फुलोऱ्यावर असताना रोगाची बीजे फुलावर पडल्यास नवीन होणारे बी रोगट बनते व असे बी पेरणीसाठी वापरल्यास त्यात काणी आढळते. यावर उपाय म्हणजे शेतातील काणी रोग पडलेली रोपे उपटून नष्ट करून टाकणे व बियांवर उष्णतेची प्रक्रिया करणे हे होत. उन्हाळ्यात सकाळी बी चार तास भिजवून दुपारी पत्र्यावर उन्हात सहा तास वाळवतात व मग पेरणीकरिता वापरतात.

पानांवरील ठिपके: हा रोग आल्टर्नेरिया आणि हेल्मिंथोस्पोरियम  वंशांतील कवकांमुळे होतो. पानांवर पिवळट राखी रंगाचे ठिपके आढळतात. त्यांमुळे पाने सुकतात व दाणे नीट पोसले जात नाहीत. यावर उपाय म्हणजे प्रतिकारक जातींची लागवड करणे व झायनेब कवकनाशकाचे फवारे देणे हे होत.

मूळकूज: हा रोग फ्युजेरियम, हेल्मिंथोस्पोरियम  इ. वंशांतील कवकांपासून होतो.  रोगोत्पादक कवक जमिनीत असते. पोषक हवामान मिळाल्यास रोग वाढून रोपे मरतात. उगवण झाल्यानंतर रोपे मरताना आढळतात. रोगामुळे जमिनीलगतचा खोडाचा भाग सुकतो आणि झाड मरते. यावर उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक चोळून लावतात.

कीड: गव्हावर कीटकाचा फारसा प्रादुर्भाव आढळत नसला तरी खोडकिडा, वाळवी व मावा ह्या किडींचा बंदोबस्त करणे जरूरीचे असते.


(१) खोडकिडा : याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. ही कीड खरिपात भात, ज्वारी, ऊस या पिकांवर असते व रबीमध्ये गव्हाला उपद्रवकारक असते. मादी पानाच्या देठाजवळ अंडी घालते. अंडी उबून बाहेर पडलेल्या अळ्या खोडांना भोके पाडून खोडात शिरून गाभा खातात त्यामुळे मधला पोंगा मरून जातो व ओंबी पांढरी पडते. त्यामुळे उत्पन्नात घट येते. यावर उपाय म्हणून कीड लागलेली झाडे उपटून नष्ट करतात व पिकाची कापणी झाल्यावर सर्व धसकटे उपटून जाळून टाकतात [→ खोडकिडा].

(२)वाळवी : ही एक गव्हावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवी पिकाच्या मुळांचा नाश करते व त्यामुळे रोपे मरतात. यासाठी वारुळे खणून राणीचा नाश करतात. वारुळात सायनो गॅस मारतात आणि पाणी देताना क्रूड ऑइल पाण्यात टाकतात अथवा पेरणीपूर्वी क्लोरडान भुकटी जमिनीत मिसळतात [→ वाळवी].

(३) मावा : मावा कीटक पानांतील रस शोषून घेतात व त्यामुळे झाडे फिकट दिसून झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. याकरिता निकोटीन सल्फेट पाण्यात मिसळून पिकावर फवारतात अथवा १० टक्के बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात [→ मावा].

कुलकर्णी, य. स. धांडे, गो. वा.

गव्हातील घटक  द्रव्ये: गव्हामध्ये कार्बोहायड्रेटे ७०%, प्रथिने १२·३%, जलांश १२%, वसा (स्‍निग्ध पदार्थ) २%, खनिज पदार्थ१·७% व सेल्युलोज २% असते. ह्यांशिवाय त्यामध्ये ब गटातील जीवनसत्त्वे अल्प प्रमाणात आढळतात. गव्हाच्या अंकुरातील तेलामध्ये ई जीवनसत्त्व आढळते. गव्हाच्या प्रकारानुसार वरील घटकांचे प्रमाण बदलते.

गव्हापासून मिळणारे पदार्थ : जगातील गव्हाच्या एकूण उत्पादनापैकी सु. ७४% गहू मानव खाण्यासाठी वापरतो, तर १५% पशुखाद्यासाठी तसेच औद्योगिक उत्पादनात वापरला जातो. उरलेला ११% गहू बियाण्यासाठी वापरला जातो.

गव्हापासून सर्वसाधारणतः सोजी, रवा, मैदा, आटा व भुस्सा हे पदार्थ मिळतात. ह्यांपैकी सोजी व रवा भरड कणीदार असून मैदा व आटा हे चूर्णरूपी (पीठ) असतात, तर भुस्सा म्हणजे गव्हावरील आवरणाचे चूर्ण होय. ह्यांशिवाय गव्हापासून खाद्य तेलही काढण्यात येते. जगात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पिठांपैकी जवळजवळ ९०% पीठ गव्हाचेच वापरले जाते.

स्वच्छ केलेला गहू यंत्रांत दळल्यास व वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्यांतून चाळल्यास वरील पदार्थ मिळतात. अतिशय बारीक जाळीच्या वेगवेगळ्या चाळण्यांनी चाळल्यास आटा व मैदा वेगळे होतात व शेषभाग त्याहून थोड्या मोठ्या जाळीच्या चाळणीतून चाळून सोजी, रवा व भुस्सा वेगवेगळे करतात [→ पिठाची गिरणी].

गव्हाच्या पिठाचे दोन प्रकार आहेत : (१) शुभ्र पीठ (२) संपूर्ण गव्हाचे पीठ. ही पिठे गव्हाच्या निरनिराळ्या भागांपासून करतात. संरचनेच्या दृष्टीने गव्हाचे तीन भाग होतात. बाह्यभाग हा अनेक स्तरांचा असून त्याला टरफल (भुस्सा) म्हणतात. हा भाग एकूण वजनाच्या १४% असतो. ह्या भागाच्या आत एक लहान भाग असतो त्याला अंकुर म्हणतात. हा भाग ३% असतो. उरलेला ८३% भाग पुष्काचा (बीजातील गर्भाच्या बाहेरील अन्नांशाचा) असतो. हा भाग पचनाला सुलभ असतो व ह्याच्यापासूनच शुभ्र पीठ करतात. गव्हाच्या दाण्यात असणारे सर्व भाग आ. ६ मध्ये दाखविले आहेत.

संपूर्ण गव्हाचे पीठ : गव्हाचे सर्व भाग वापरून ह्या प्रकाराचे पीठ तयार करतात. या पिठापासून पाव (ब्रेड) व इतर भाजलेले पदार्थ तयार केले, तर ते जड व भरडे असतात. अंकुरातील तेलामुळे हे पीठ तेलकट दिसते. चपाती (पोळ्या), पुऱ्या इ. या पिठाच्याच करतात.

शुभ्र पीठ : शुभ्र पिठाचे बरेच प्रकार असून ते विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. पीठ भिजविल्यास त्यामध्ये तयार होणा ऱ्याग्‍लुटेनावर ते पीठ कशासाठी वापरावयाचे हे ठरविले जाते.

बहुतेक सर्व गव्हामधील पुष्कात स्टार्चयुक्त कोशिका असतात. त्यामधील ग्‍लायडीन व ग्‍लुटेनीन ह्या दोन प्रथिनांमुळे पीठात पाणी मिसळल्यावर ग्‍लुटेन तयार होते. जर कणिक तिंबली किंवा मळली, तर ग्‍लुटेनाचे जाळे तयार होते. त्यामुळे तयार होणारा वायू बाहेर जाण्यास अडथळा होतो. भाजताना ह्या ग्‍लुटेन जाळ्यामुळे आणि स्टार्चाच्या जिलेटिनीकरणामुळे पदार्थाला आकार येतो.

आ. ६. गव्हाचा दाणा : (अ) उभा छेद : (१) रोमगुच्छ, (२) पुष्क, (३) स्टार्च कण व प्रथिनयुक्त कोशिका, (४) कोशिकांचे सेल्युलोज आवरण, (५) आपांडुर स्तर, (६) प्रदेही ऊतक, (७) बीजावरण, (८) नलिकाकोशिका, (९) तिर्यक् कोशिका, (१०) अभित्वचा, (११) अपित्वचा, (१२) पुष्कादनी, (१३) प्ररोहावरक, (१४) आदिकोरक, (१५) आदिमूल, (१६) मूलावरक, (१७) मूलत्राण. (आ) आडवा छेद : (१) दुमड, (२) पुष्क, (३) रंग पट्ट, (४) फलावरण, (५) अंकुर.

[रोमगुच्छ म्हणजे राठ केसांचा झुपका आपांडुर स्तर म्हणजे प्रथिन कणांचा थर प्रदेही ऊतक म्हणजे बीजकातील कोशिकांचा (पेशींचा) समूह अभित्वचा म्हणजे अपित्वचेच्या लगेच खाली असणारा व तिला बळकटी आणणारा मजबूत कोशिकांचा थर अपित्वचा म्हणजे सर्वात बाहेरील आवरण पुष्कादनी म्हणजे अन्न व गर्भ यांना अलग ठेवणारा पडद्यासारखा भाग प्ररोहावरक म्हणजे कोंबास वेढणारा भाग आदिकोरक म्हणजे आद्य कळी आदिमूल म्हणजे आद्य मूळ मूलावरक म्हणजे मुळास वेढणारा भाग मूलत्राण म्हणजे मुळाच्या टोकावरील संरक्षक आवरण].

ग्‍लुटेन तयार होणे हे गव्हामधील प्रथिनांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कठीण गव्हातील प्रथिनांच्या जास्त प्रमाणामुळे पीठ भिजविल्यावर जास्त ग्‍लुटेन तयार होते. असे पीठ पावासाठी आणि इतर बेकरी पदार्थांसाठी वापरतात. बेकरीमध्ये वापरण्यात येणारे पीठ घरी वापरत नाहीत.

ड्युरम गव्हापासून तयार केलेले पीठ उच्च प्रथिनयुक्त असते. ह्याच्यापासून सोजी, रवा व आटा बनवितात. ह्यापासून मॅकरोनी, लाडू, शिरा, शेवया, सांजा, कुरड्या, चपात्या इ. पदार्थ बनवितात. मऊ गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ग्‍लुटेन कमी प्रमाणात तयार होते. ह्याचा उपयोग केक, खुसखुशीत भाजलेले पदार्थ, पेस्ट्रीज, बिस्किटे व इतर बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी होतो. हे पदार्थ कठीण गव्हाच्या पिठापासून केल्यास फारच कठीण होतात. घरगुती वापरासाठी सर्वकामी पीठ तयार केले जाते [→ बेकरी तंत्र].


गव्हाच्या पिठात पुढीलप्रमाणे घटक असतात: स्टार्च ६५–७०%, प्रथिने ९–१४%, सेल्युलोज व वसा १%, शर्करा २·५%, खनिज पदार्थ ०·५%, जलांश १३–१५%. 

पाश्चात्त्य देशांत पिठात आवश्यकतेनुसार इतर पदार्थ मिसळतात. माल्टयुक्त गहू किंवा माल्टयुक्त गव्हाचे पीठ किंवा माल्टयुक्त बार्लीचे पीठ स्वतंत्र रीत्या किंवा एकत्र रीत्या गव्हाच्या पिठात मिसळतात. ह्यामुळे एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांची) त्रुटी कमी होते. हे पदार्थ अंबर ड्युरम व रेड ड्युरम गव्हाच्या शुभ्र पिठात मिसळतात. अंबर ड्युरम गव्हाच्या अशा पिठापासून मॅकरोनी, शेवया व इतर तत्सम पदार्थ करतात. पाव, बिस्किट व तत्सम पदार्थ मात्र यापासून होत नाहीत. काही देशांत रेड ड्युरमचे पीठ प्राणिखाद्यासाठी वापरतात. काही वेळा पिठात जीवनसत्त्वे मिसळतात. काही वेळा पोटॅशियम ब्रोमेट पिठाच्या १० लाख भागात ५० भाग एवढे मिसळतात.  अशा पिठापासून पाव करतात. पाव, बिस्किटे इ. पदार्थांसाठी लागणा ऱ्यापिठात काही वेळा १०० भागांत ४-५ एवढे बेकिंग चूर्ण मिसळतात.

भुस्सा पशुखाद्यात वापरतात. गव्हापासून काढलेल्या तेलाचा उपयोग ई जीवनसत्त्व व काही अतृप्त [काही संयुजा मुक्त असलेल्या, → संयुजा] वसाम्‍लांच्या (फॅटी ॲसिडांच्या) त्रुटीमध्ये पोषक आहार म्हणून केला जातो. गव्हाचे पोहे, मुरमुरे, कीस इ. पदार्थ करतात. मध्य पूर्वेकडील देशांत ‘बलगर’ नावाचा अन्नपदार्थ गहू उकडून, वाळवून व फोडून फुटाण्याप्रमाणे करतात.

मिठारी, भू. चिं.

गव्हासंबंधी भारतातील संशोधन : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या २०–२५ वर्षांत भारतात निवड पद्धतीने गव्हाचे सुधारित प्रकार निर्माण करण्याचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू होते, परंतु या कार्याला खरी चालना पुसा (बिहार) येथे कृषी संशोधन संस्था स्थापन झाल्यावर मिळाली. सर अल्बर्ट हॉवर्ड, त्यांच्या पत्‍नी गॅब्रिएल आणि त्यांचे सहकारी यांनी १९०६ मध्ये या कामाला सुरुवात करून नेत्रदीपक यश मिळविले. त्या काळात देशाच्या बऱ्याच मोठ्या भागातील शेतकऱ्यांचे शेतातील गव्हाचे पीक हे वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने निरनिराळ्या प्रकारांचे मिश्रण असे. बाजारात गव्हाची प्रतवारी दाण्याचा रंग आणि दाणा कठीण अथवा मऊ आहे यांवरून केली जात असे. उदा., सरबती, सफेद पिसी, लाल पिसी, लाल कनक वगैरे. वनस्पतिवैज्ञानिक दृष्ट्या शुद्ध जातीची कल्पना त्याकाळी रूढ नव्हती. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताच्या गहू हलक्या प्रतीचा असतो या  सबबीवर त्याला कमी भाव मिळत असे. हॉवर्ड पतिपत्‍नींनी निवड पद्धतीने पुसा-४, पुसा-६ आणि पुसा-१२ हे देशी गव्हाचे सुधारित प्रकार उपलब्ध करून दिले. तसेच भारताच्या काही भागांत उत्तम प्रतीचा गहू पिकतो हेही सिद्ध केले. त्यांनी उपलब्ध केलेले प्रकार भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील काही देशांत (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, ऱ्होडेशिया आणि हंगेरी) लोकप्रिय झाले. त्यातल्या त्यात पुसा-४ हा प्रकार जास्त लोकप्रिय झाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये या प्रकाराशी संकर करून स्थानिक हवामानात वाढणारे गव्हाचे प्रकार निर्माण करण्यात आले. १९१६–२० या काळात पुसा-४ गव्हाला सतत चार वर्षे आंतरराष्ट्रीय धान्यप्रदर्शनात पहिले बक्षिस मिळाले. ऑस्ट्रेलियात १९३९ पर्यंत हा गहू ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीत होता, तसेच भारतातही निरनिराळ्या हवामानांत पुसा-४ प्रकाराची लागवड होते असे आढळून आले. काश्मीर आणि जम्मूच्या टेकड्यांचा भाग, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व दक्षिण भारताच्या काही भागात हा प्रकार लोकप्रिय झाला. या प्रकाराचा दाणा तेजदार असून तो लवकर तयार होत असल्यामुळे तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्यापूर्वीच या प्रकाराचे पीक कापणीवर येते. त्यामुळे तांबेऱ्यापासून या प्रकाराचे सहसा नुकसान होत नाही. पुसा-६ या प्रकाराचा पंजाब-९-डी या प्रकाराशी संकर करून एन. पी. ५२ हा प्रकार निर्माण करण्यात आला. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात हा प्रकार चांगले उत्पन्न देतो असे आढळून आले आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत बिहार राज्यातील सु. ८५ टक्के क्षेत्र या प्रकाराखाली होते. १९२४ नंतर परदेशी गव्हाचे प्रकार आणि देशी प्रकार यांमध्ये संकर करून नवीन प्रकार निर्माण करण्यात आले (उदा., एन. पी. ७१० ७१५ ७१८ वगैरे). सु. १९३५ पर्यंत निर्माण केलेले प्रकार उत्पन्न, दाण्याची गुणवत्ता आणि निरनिराळ्या हवामानांत चांगले उत्पन्न देण्याचे क्षमता या बाबतींत समाधानकारक होते, परंतु ते तांबेरा रोगाला कमीजास्त प्रमाणात बळी पडत असल्यामुळे तांबेरा रोगप्रतिकारक गव्हाचे प्रकार निर्माण करण्याचे काम १९३५ नंतर, सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात पुसा येथील संशोधन संस्था दिल्ली येथे हलविण्यात आली. तसेच तांबे ऱ्यासंबंधी कवकविज्ञानविषयक संशोधन १९३० नंतर सिमला आणि आग्रा येथे क. चं. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आणि अमेरिकेच्या हवामानात तांबेरा रोगाच्या कवकविषयी काढण्यात आलेले निष्कर्ष भारतातील हवामानात जसेच्या तसे लागू होत नाहीत, हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा घेऊन दिल्ली येथील कृषी संशोधन संस्थेने तांबेरा रोगप्रतिकारक गव्हाचे प्रकार निर्माण केले व ते काम अद्यापही सुरू आहे. यासाठी परदेशांतून अनेक गव्हाचे प्रकार मागवून दिल्ली येथील संशोधन संस्थेत जतन करण्यात आले आहेत (१९६५ च्या सुमारास अशा प्रकारांची संख्या सु. ४,५०० होती). संकर पद्धतीने भारतात लागवडीसाठी नवीन प्रकार निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात येतो. तसेच गव्हाच्या निरनिराळ्या आनुवंशिक लक्षणांचे अनुहरण (एका पिढीतील लक्षणे दुस ऱ्यापिढीत नेण्याचे कार्य) कशा प्रकारे होते याचा दीर्घ आणि सखोल अभ्यास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आनुवंशिकीविज्ञ बी. पी. पाल आणि त्यांचे सहकारी यांनी केला आहे.

भारतातील गव्हावरील संशोधनाला जगातील इतर देशांत झालेल्या संशोधनाची फार मदत झाली आहे. इंग्‍लंड, फ्रान्स, स्वीडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांत निवड पद्धतीने आणि संकर पद्धतीने गव्हाचे सुधारित प्रकार निर्माण करण्याचे काम एकोणिसाव्या शतकात सुरू होते. प्रथम गव्हाच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये आणि मागाहून ट्रिटिकम वंशाच्या निरनिराळ्या जातींमध्ये संकर करण्यात आले. त्यानंतर विसाव्या शतकात ट्रिटिसिनी जमातीतील निरनिराळ्या वंशांमध्येही संकर करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. गव्हाच्या तांबेरा रोगासंबंधी एरिकसन यांनी स्वीडनमध्ये १८९४ मध्ये व स्टॅकमन आणि त्यांचे सहकारी यांनी अमेरिकेत १९१४–२० या काळात पुष्कळ संशोधन करून तांबेरा रोगप्रतिकारक गव्हाचे प्रकार निर्माण करण्यासंबंधी शास्त्रीय व पायाभूत माहिती उपलब्ध करून दिली. तसेच जागतिक अन्न आणि शेती संघटनेने निरनिराळ्या देशांतील गव्हाच्या जाती आणि प्रकारांची राष्ट्राराष्ट्रांत देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संकर पद्धतीने गव्हाचे नवीन प्रकार निर्माण करण्याच्या कामाला मोठी मदत झाली.


खतामुळे गव्हाचे उत्पन्न वाढते हे खरे असले, तरी खताचे जसजसे प्रमाण वाढवावे तसतसे जास्त उत्पन्न देण्याची क्षमता गव्हाच्या प्रकारामध्ये असावी लागते. तसेच जास्त खत दिल्यामुळे गव्हाच्या झाडाची उंची वाढते आणि त्यामुळे पीक शेतात लोळते. यासाठी जास्त खत घालून जास्त उत्पन्न देण्या ऱ्याप्रकाराची उंची फार असता कामा नये. यासाठी नोरीन नावाच्या जपानी प्रकारातील बुटकेपणाच्या (खुजेपणाच्या) जनुकाचा (रंगसूत्रावरील आनुवंशिक लक्षण निर्देशित करणा ऱ्या घटकाचा, जीनचा) फायदा घेऊन नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन बोर्‌लॉग यांनी अशा प्रकारचे गव्हाचे प्रकार संकर पद्धतीने मेक्सिकोत निर्माण केले. भारतीय हवामानात योग्य असे बुटके आणि जास्त उत्पन्न देणारे प्रकार तयार करण्याच्या दृष्टीने रॉकफेलर फाउंडेशन व मेक्सिकन प्रशासन यांच्या सहकार्याने दिल्ली येथील कृषी संशोधन संस्थेने बोर्‌लॉग यांनी संकरजन्य प्रजेतून केलेल्या अनेक निवडी आणि चार बुटक्या प्रकारांचे मोठ्या प्रमाणावर बी आणविले. बुटक्या प्रकारांची देशाच्या निरनिराळ्या भागांत लागवड करून परीक्षा केल्यावर त्यांतील दोन प्रकार (लर्मा रोजो ६४ ए व सोनोरा ६४) भारतात लागवडीसाठी निवडण्यात आले. या प्रकारांना खताची मात्रा जास्त प्रमाणात दिल्याने उत्पन्न जास्त येते आणि पीक लोळत नाही. दोन्ही प्रकारांचा दाणा लाल आहे. लर्मा हा उशीरा तयार होणारा आणि सोनोरा ६४ हा लवकर तयार होणारा प्रकार आहे. उत्तर प्रदेशाचा पूर्वभाग, बिहार, प. बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व ओरिसा राज्यांत या प्रकारांची शिफारस करण्यात आली. मेक्सिकोतून आणलेल्या इतर निवडीतून एस. २२७ आणि एस. ३०८ या निवडी भारतात लागवडीयोग्य ठरल्याने त्यातून फेरनिवड करून सोनालिका आणि कल्याण सोना लर्मा रोजो व सोनोरा यांतून सफेद लर्मा, छोटी लर्मा, पुसा लर्मा व सरबती सोना हे प्रकार लागवडीसाठी देण्यात आले आहेत. यांतील सोनालिका, सरबती सोना व कल्याण सोना हे प्रकार ११०–११५ दिवसांत तयार होणारे असून सफेद लर्मा आणि छोटी लर्मा हे प्रकार तयार होण्यासाठी १४० दिवस लागतात. मेक्सिकन बुटक्या गव्हाचे प्रकार उत्तर भारतातील गाळाच्या जमिनीमध्ये लावल्यावर हे प्रकारदेखील जमिनीवर लोळतात असे आढळून आले. वारंवार नांगरटीमुळे होणारी मातीची सदोष संरचना, मार्च महिन्यातील पाऊस आणि वादळी वारे यांमुळे हे सहसा न लोळणारे प्रकारही लोळतात असे संशोधनान्ती दिसून आले. यासाठी ‘ट्रिपल ड्‌वार्फ’ अथवा ‘थ्री जीन ड्‌वार्फ’ ह्या नावाने ओळखले जाणारे अधिकच बुटक्या गव्हाचे प्रकार निर्माण करण्यात आले आहेत.

ज्या पद्धतीने संकरित ज्वारीचे प्रकार निर्माण करण्यात आले त्या पद्धतीने संकरित गव्हाचे जास्त उत्पन्न देणारे प्रकार निर्माण करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीला निवड पद्धतीने बन्सी या प्रकारामधून मोतिया आणि गुलाब हे सुधारित प्रकार लागवडीसाठी देण्यात आले. पुढे संकर पद्धतीने जय, विजय, निफाड-४ हे नवीन प्रकार अस्तित्वात आले. विजय प्रकाराचा दाणा मोठा व तेजदार असल्यामुळे अद्यापही या प्रकाराला बाजारात जास्त भाव मिळतो. निफाड-४ हा प्रकार चपातीकरिता फार चांगला आहे, असे ल्यालपूर (आता पाकिस्तानमध्ये) येथे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. परंतु हे सर्व प्रकार तांबेरा रोगाला बळी पडतात. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासाठी गव्हाच्या प्रकारांची व संकरित प्रजेची तांबेरा-प्रतिकारकता तपासून पाहण्यासाठी महाबळेश्वर येथे १९४१ मध्ये केंद्र सुरू झाले. काळ्या (खोडावरील) तांबे ऱ्याच्या भारतातील प्रजातीमध्ये उपप्रजाती असतात, हे या केंद्रानेच प्रथम सिद्ध केले. निफाड व महाबळेश्वर येथील केंद्रांच्या सहकार्याने केनफाड २५ २८ निफाड ५९ ९१७ ७४७–४९ वगैरे अनेक तांबेरा-प्रतिकारक प्रकार निर्माण करण्यात आले. यांतील काही प्रकारांवर आल्टर्नेरिया  कवकामुळे होणारा रोग पडतो.

मध्य प्रदेशांत ए. ओ. १३ ४९ ९०, ए. ११५ हे सुरुवातीचे निवड पद्धतीने अथवा संकर पद्धतीने तयार केलेले प्रकार उत्पन्नासाठी चांगले आहेत, परंतु ते तांबेरा रोगाला बळी पडतात. त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या तांबेरा-प्रतिकारक प्रकारांपैकी हायब्रीड -६५ हा प्रकार फार लोकप्रिय ठरला आहे. कोरडवाहू आणि बागाईत अशा दोन्ही पद्धतींनी त्याची लागवड करता येते. दाणा तजेदार असून उत्पन्नही चांगले येते.

देशाच्या फार मोठ्या भागात कोरडवाहू गव्हाची लागवड करण्यात येते. यासाठी गव्हाच्या रुक्षतारोधक जाती उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या निरनिराळ्या राज्यांतील गहू संशोधन केंद्रांमार्फत कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे मशागतीच्या पद्धती, खतांची मात्रा, पाणी देण्याच्या वेळा व पद्धती या आणि इतर अनेक बाबींवर संशोधन सुरू आहे.

गोखले, वा. पु.

संदर्भ: 1. Leonard, W. H. Martin, T. N. Cereal Crops, New York, 1963.

   2. Pal, B. P. Wheat, New Delhi, 1966.

   3. Peterson, R. F. Wheat, London, 1965.

   4. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khupse, V. S. Crop Production and Field  

       Experiments, Poona, 1972.