क्रूझेन्श्टेर्न, अडाम योहान इव्हान बॅरन फॉन : (१९ नोव्हेंबर १७७०–२४ ऑगस्ट १८४६). पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला रशियन प्रवासी. एस्टोनियामधील हॅगड गावी याचा जन्म झाला. १७९३–९९ पर्यंत हा इंग्लिश नौदलामध्ये नोकरीस होता. त्याच्या तेथील अनुभवामुळे रशियाच्या झारने त्याला उत्तर पॅसिफिकमध्ये समन्वेषणामुळे निघालेल्या तुकडीचे नेतृत्व करण्याकरिता बोलावले. फर धंदा आणि चीन-जपानशी व्यापार ह्यांबाबत माहिती गोळा करण्याचे काम ह्याच्याकडे दिले. १८०३ मध्ये हा या कामावर निघाला. त्याने वरील माहिती गोळा केली, पॅसिफिक किनाऱ्याचे सर्वेक्षण केले, ऑर्लाव्ह बेटे शोधून काढली, वॉशिंग्टन, सॅकालीन व कूरील बेटांचे समन्वेषण केले आणि १८०६ अखेर पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. त्याने आपल्या समन्वेषणाचे इतिवृत्त तीन खंडांत (१८०९–१३) प्रसिद्ध केले. १८२७ ते ४२ पर्यंत त्याने नौदल अकादमीचा प्रमुख म्हणून काम केले.
शाह, र. रू.