कूरे : जपानचा मोठा नाविक तळ व व्यापारी बंदर. लोकसंख्या २,३९,००० (१९७३). होन्शू बेटावर नैर्ऋत्येस, .हिरोशीमापासून २० किमी.वरील डोंगरांनी वेढलेल्या व डोंगराळ बेटांच्या आडोशास असलेल्या या उत्कृष्ट नैसर्गिक बंदरात ‘यामाटो’ हे प्रचंड लढाऊ जहाज बांधले गेले. येथे १,००,००० टनांपर्यंतची व्यापारी व तेलवाहू जहाजे बांधली जातात. साकेमद्य, कपडे, झरण्या इत्यादींचे येथे उत्पादन होते, तर साके, सूत, झरण्या, यंत्रे, तांदूळ यांची निर्यात होते. दुसऱ्या महायुद्धात दोस्तांनी शहरावर प्रचंड बाँबफेक केली होती.
कुमठेकर, ज. ब.