कुरूप : त्वचेच्या बाह्यस्तरांतील शृंगी (शिंगामध्ये असलेल्या त्वचेसारखी त्वचा असलेल्या) भागाची स्थानिक वाढ झाल्यामुळे तेथील त्वचा जाड आणि वेदनायुक्त होते, त्या विकाराला ‘कुरूप’ असे म्हणतात. त्वचेच्या विशिष्ट भागावर सतत दाब पडत राहिल्यास तेथील त्वचा जाड होते त्या प्रकाराला ‘घट्टे पडणे’ असे म्हणतात. घट्टे अधिक जाड झाल्यास त्याचा दाब त्वचेखालील संवेदना तंत्रिकाग्रांवर (संवेदना वाहून नेणाऱ्या मज्जातंतूच्या टोकांवर) पडून वेदना उत्पन्न होतात, त्या प्रकारालाच ‘कुरूप’ ही संज्ञा लावतात.
पादत्राणांच्या विशिष्ट भागाचा दाब पायाच्या बोटांच्या सांध्यांवर पडल्यामुळे तेथील त्वचा जाड होऊन बोटे वाकडी दिसतात, त्या प्रकाराला ‘कठीण कुरूप’ असे म्हणतात. कुरूपात जंतुसंसर्ग झाल्यास तेथे विद्रधी (पूयुक्त फोड) उत्पन्न होतो, त्वचा जाड असल्यामुळे विद्रधी लवकर फुटत नाही तीव्र वेदना होतात, कुरूपाचा आकार शंकूसारखा असून त्याचा मध्यभाग काळसर दिसतो.
कुरूप होऊ नये म्हणून पादत्राण पसंत करताना काळजी घ्यावी लागते. एकदा कुरूप झाल्यावर त्या ठिकाणची त्वचा सॅलिसिलिक अम्लाने मऊ करून कापून काढतात.
‘मृदू कुरूप’ बहुधा पायाच्या बोटांच्या बेचक्यात होते.
पहा : भोवरी.
ढमढेरे, वा. रा.