क्रॉम्प्टन, सॅम्युएल: (३ डिसेंबर १७५३–२६ जून १८२७). इंग्लिश संशोधक व यांत्रिक चरख्याचे जनक. इंग्लंडमधील लँकाशर परगण्यातील फिरवूड येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणीच ते सूत गिरणीत काम करू लागले. जेम्स हार्ग्रीव्ह्ज यांनी शोधलेल्या व त्यावेळेस वापरात असलेल्या सूत काढण्याच्या यंत्राने सूत काढताना ते वारंवार तुटते, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी तो दोष घालविण्यासंबंधी पाच वर्षे संशोधन केले व १७७९ मध्ये एक यांत्रिक चरखा तयार केला. हा चरखा हार्ग्रीव्ह्ज व आर्कराइट यांच्या यंत्रांचा समन्वय साधणारा होता. या चरख्यामुळे विविध प्रकारचे सूत जलद गतीने व सफाईने तयार होऊ लागले. आर्थिक परिस्थितीने त्यांना या चरख्याचे एकस्व (पेटंट) घेणे शक्य झाले नाही. गिरणीवाल्यांनी त्यांना या चरख्याबद्दल फक्त ६० पौंड एवढीच रक्कम दिली. त्यानंतर त्यांनी ओल्डॅम येथे स्वतःचा सूत काढण्याचा धंदा सुरू केला, पण त्यात ते अयशस्वी झाले. १८०० च्या सुमारास काही स्थानिक गिरणीवाल्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना ५०० पौंड मदत दिली व १८१२ मध्ये सरकारने त्यांना ५,००० पौंड मदत दिली. ह्या रकमेच्या साहाय्याने त्यांनी प्रथम विरंजनाचा (कापडाचा अनिष्ट रंग काढून टाकण्याच्या) आणि नंतर कापसाचे व सुताचे व्यापारी म्हणून व्यवसाय केला, पण त्यात ते अयशस्वी झाले. आयुष्याचे अखेरचे दिवस त्यांना मित्रांच्या मदतीवर काढावे लागले. ते बोल्टन येथे मरण पावले.
वैद्य, श्री. द.