क्रांतिवृत्त : (अयनवृत्त). सूर्याभोवतील पृथ्वीची परिभ्रमण कक्षा एकाच प्रतलात (पातळीत) असते. हे प्रतल वाढविले असता खगोलास ज्या वर्तुळात छेदेल त्यास क्रांतिवृत्त म्हणतात. परंतु आपण पृथ्वीवर असल्याने सूर्यच या वृत्तावरून भ्रमण केल्यासारखा दिसतो म्हणजेच ज्या वर्तुळावर सूर्य नक्षत्रमंडळात भ्रमण केल्यासारखा भासतो त्या खगोलीय वर्तुळास क्रांतिवृत्त म्हणता येईल. क्रांतिवृत्ताची कल्पना पुढील प्रमाणे आणखीही स्पष्ट करता येईल. दररोज सूर्य मध्यमंडलावर आला असता त्याच्या बिंबाचा मध्यबिंदू ज्या ठिकाणी असेल ते स्थान खगोलावर खूण करून काल्पनिक रीत्या नोंदविले, तर वर्षाच्या अशा एकूण ३६५ खुणा होतील. या ३६५ खुणा एकाच प्रतलात असतील. त्या जोडल्या असता खगोलावर जे वर्तुळ निघेल तेच क्रांतिवृत्त होय. ते खगोलीय विषुववृत्तास विरुद्ध बाजूंस असलेल्या दोन बिंदूंत छेदेल. हेच संपात बिंदू होत.
इंग्रजीत क्रांतिवृत्ताला इक्लिप्टिक म्हणतात. हा शब्द इक्लिप्स (म्हणजे ग्रहण) या शब्दापासून आला. क्रांतिवृत्त आणि ग्रहण यांतील संबंधाचे विवरण पुढील प्रमाणे आहे : दिवसा तारे दिसत नाहीत त्यामुळे सूर्य कोणकोणत्या ताऱ्यांजवळून गेला हे पाहता येत नाही. परंतु प्रत्येक पौर्णिमेला सूर्याच्या अगदी समोर चंद्र असतो. चंद्राच्या आसपासचे तारे दिसू शकतात. अनेक ग्रहणांचे निरीक्षण केल्यावर एक खगोलीय वर्तुळावर असणाऱ्या काही विशिष्ट ताऱ्यांच्या जवळच ग्रहणे लागतात असे आढळले. असे तारे ज्या वर्तुळावर अगर ज्याच्या आसपास आहेत, त्या वर्तुळास इक्लिप्टिक (ग्रहणमार्ग) असे पाश्चात्य ज्योतिर्विदांनी उचित नाव दिले. ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या अगदी बरोबर विरुद्ध बाजूस सूर्य असल्याने सूर्याचाही हाच दृश्य भ्रमणमार्ग होतो. या वृत्ताची मूळ कल्पना ग्रहणाच्या निरीक्षणावरूनच पाश्चात्यांना आली असावी, असे म्हणता येईल.
एकाच ठिकाणावरून याम्योत्तरवृत्तावरील (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाच्या बरोबर डोक्यावरील, खगोलावरील बिंदू यांतून जाणाऱ्या वर्तुळावरील) अगर क्षितिजावरील सूर्याचे दैनंदिन स्थान बदलते. सूर्य कधी विषुववृत्ताच्या उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. अशा निरीक्षणावरून या वृत्ताची कल्पना भारतीय ज्योतिर्विदांना आली. ज्या वृत्तावर सूर्य आढळतो ते वृत्त खगोलीय विषुववृत्तास दोन वेळा ओलांडून जाते, म्हणून त्यास म्हणजे सूर्याच्या दृश्य भ्रमणमार्गास क्रांतिवृत्त हे नाव देण्यात आले. सूर्याचे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणे घडते म्हणून या वृत्ताला अयनवृत्त वा आयनिकवृत्त असेही म्हणतात.
व आणि श या दोन बिंदूंत क्रांतिवृत्त खगोलीय विषुववृत्तास छेदते, त्यांना संपात बिंदू म्हणतात (आ. १). २२ मार्च या दिवशी सूर्य व येथे असतो आणि तेथून तो विषुववृत्ताच्या उत्तरेस जाण्यास निघतो, म्हणून या बिंदूला वसंतसंपात किंवा मेष-संपात म्हणतात. २२ सप्टेंबर या दिवशी सूर्य श येथे असतो आणि तेथून तो विषुववृत्ताच्या दक्षिणेस जाण्यास निघतो, म्हणून या बिंदूला शरत् संपात किंवा तूळ-संपात म्हणतात. या दोन्ही दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र समसमान असतात, म्हणून या दोन्ही दिवसांना संपातदिन म्हणतात. २१ जूनला सूर्याचे उत्तरेकडे सरकणे संपते म्हणून या दिवसाला उत्तरायणान्त दिन व त्या उ या बिंदूला उत्तर संस्तंभ किंवा विष्टंभ म्हणतात. तसेच २२ डिसेंबरला सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे संपते म्हणून या दिवसाला दक्षिणायनान्त दिन व त्या द या बिंदूला दक्षिण संस्तंभ किंवा अवष्टंभ म्हणतात. संस्तंभ बिंदूंच्या आसपास काही दिवस सूर्य सरकल्यासारखा दिसत नाही.
व (आणि श) हा संपात बिंदू क्रांतिवृत्तावर विलोम (उलट) गतीने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वर्षाला सु. ५०″ इतक्या सूक्ष्म गतीने सरकतो. त्याची क्रांतिवृत्तावरील प्रदक्षिणा सु. २५,८०० वर्षांत पूर्ण होते. संपात बिंदूच्या या चलनामुळे नक्षत्रचक्रास आरंभ या चल संपातापासून करावा की क्रांतिवृत्तावरील एखाद्या स्थिर ताऱ्यापासून करावा याबद्दल वाद आहेत. स्थिर ताऱ्यापासून आरंभ केल्यास ती निरयन पद्धती व चल संपातापासून केल्यास ती सायन पद्धती होय.
खगोलीय विषुववृत्त आणि क्रांतिवृत्त यांमध्ये सु. २३° ३०′ इतका कोन आहे. या कोनास क्रांतिवृत्ताची तिर्यक्ता म्हणतात. या कोनात एका शतकात ४८″ इतका फरक होतो, परंतु तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच कमीजास्त होतो. इ. स. पू. २००० मध्ये तो जास्तीत जास्त २३° ५३′ होता. तेव्हापासून तो कमीतकमी होत आला आहे. ६६०० साली तो कमीतकमी म्हणजे २२° ५४′ होईल. सध्या तो कोन २३० ५६′ ४५″ आहे. हा फरक सूर्यकुलातील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतो.
ज्याप्रमाणे खगोलीय विषुवृत्ताला ध्रुव आहेत त्याप्रमाणे क्रांतिवृत्ताला उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदू आहेत. त्यांना कदंबाग्र आणि ते जोडणाऱ्या अक्षाला कदंब म्हणतात. कदंबाभोवती पृथ्वीचा भ्रमण-अक्ष भोवऱ्यासारखा फिरत असतो. त्यामुळे उत्तर ध्रुव हा खगोलीय लघुवृत्तावरून फिरतो. या लघुवृत्ताचा मध्य उत्तर कदंबाग्र असतो. तसेच दक्षिण ध्रुवसुद्धा अशाच एका लघुवृत्तावर असतो आणि त्याचा मध्य दक्षिण कदंबाग्र असतो. ही ध्रुवाची प्रदक्षिणा संपात बिंदूप्रमाणेच सु. २५,८०० वर्षांत पूर्ण होते. म्हणजे सध्या ज्याला आपण ध्रुवतारा म्हणतो हाच कायम राहत नाही. आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे लघुवर्तुळावरचे किंवा अगदी जवळचे तारे क्रमाक्रमाने उत्तर ध्रुव होतील. जेव्हा कोणताच तारा पृथ्वीच्या वाढविलेल्या अक्षावर नसेल तेव्हा ध्रुवतारा म्हणून कोणताही तारा दाखविता येणार नाही.
आकाशात क्रांतिवृत्ताचे ३०/३० स्थान पुढील ताऱ्यांच्या मदतीने अजमावता येते कारण हे तारे क्रांतिवृत्ताच्या आसपास आहेत : मघामधील रीगलस किंवा आल्फा लिओनिस, विशाखामधील आल्फा, लिब्री, अनुराधामधील बीटा स्कॉर्पी, शततारकामधील लॅम्डा ॲक्वॅरी आणि रेवतीमधील झीटा पीशियम. याखेरीज मंगळाची कक्षा क्रांतिवृत्ताशी फक्त १·८° इतका लहान कोन करीत असल्याने मंगळाचे निरीक्षण करून सुद्धा क्रांतिवृत्त अंदाजे जाणता येईल.
वसंतसंपातापासून क्रांतिवृत्ताचे ३०/३० अंशांचे बारा विभाग कल्पिले, तर त्या सायन राशी होत. चंद्राला खगोलात नक्षत्रसापेक्ष प्रदक्षिणा करण्यास २७ दिवस लागतात असे आढळल्यामुळे क्रांतिवृत्ताचे प्राचीन भारतीय ज्योतिर्विदांनी २७ भाग पाडले होते, हीच नक्षत्रे होत.
क्रांतिवृत्ताच्या दोन्ही बाजूंस ८° म्हणजे एकूण १६° रुंदीच्या कल्पित पट्ट्यातून ग्रह फिरतात म्हणून या पट्ट्याला ग्रहपथ म्हणतात.
ताऱ्यांचे स्थान दाखविण्यासाठी एका सहनिर्देशक पद्धतीमध्ये क्रांतिवृत्त हे संदर्भवर्तुळ घेण्यात येते [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति].
कोळेकर, वा. मो.
“