कोलंबस, क्रिस्तोफर : (सु. १४५१–२४ फेब्रुवारी १५०६). अमेरिका खंडाचा शोधक. इटलीतील जेनोआ शहरी एका विणकर कुटुंबात याचा जन्म झाला. याच्या बालपणाविषयी खात्रीशीर अशी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. लहानपणी हा वडिलांना धंद्यात  मदत करीत असे. परंतु लवकरच त्याला दर्याची गोडी लागली. भूमध्य समुद्रात त्याने कित्येक सफरी केल्या. एकदा तर त्याने इंग्लंड व पुढे आइसलँडपर्यंतही चक्कर मारली. आइसलँडशी असणाऱ्या इंग्लंडच्या व्यापाराची त्याने माहिती दिली आहे. आपल्या चुलत्याच्या जहाजावर चाचेगिरी करीत असताना त्याचे जहाज फुटले. क्रिस्तोफर पोहत पोर्तुगालच्या किनाऱ्यावर आला व तेथून लिस्बनला पोहोचला. येथे त्याचा धाकटा भाऊ बार्थोलोम्यू ह्याचा नकाशे बनविण्याचा व विकण्याचा धंदा होता. क्रिस्तोफर त्याला मदत करू लागला. येथेच त्याला एका नकाशावर अटलांटिकच्या पश्चिमेकडील भागावर अज्ञात प्रदेश असल्याचे दिसले. लिस्बन हे त्या वेळेस दर्यावर्दी लोकांचे आकर्षण होते. विविध देशांतील खलाशी तेथे येत. त्यांच्या गप्पांमधून क्रिस्तोफरला अटलांटिकच्या पश्चिमेस रानटी टोळ्या असलेला प्रदेश असल्याचे कळले.

क्रिस्तोफर कोलंबस

पृथ्वी गोल आहे ही फार जुनी कल्पना या वेळेस पुन्हा जोर धरू लागली होती. तसेच मार्को पोलोने वर्णन केलेल्या सोन्याचा धूर निघणाऱ्या पूर्वेकडील हिंदुस्थान, चीन, जपान इ. देशांचे आकर्षणही मोठे होते. खुष्कीचा मार्ग मुसलमानांनी बंद केल्यामुळे तिकडे जाण्याचा मार्ग शोधून काढण्याकरिता अनेक प्रयत्न चालले होते. त्यातच काहींनी पृथ्वीच्या गोलाकाराची कल्पना गृहीत धरून यूरोपहून पश्चिमेकडे गेल्यास हिंदुस्थान लागेल, अशी कल्पना मांडली होती. या कल्पनेने कोलंबसला वेडे केले. त्याने याबाबत खूप अभ्यास केला. लिस्बनहून तो थोड्या दिवसांकरिता जेनोआस गेला. तेथून परतल्यावर बहुधा १४७९ च्या सुमारास त्याने डोना फिलिपा पेरेस्ट्रेलो एमोनीझ या युवतीशी लग्न केले. ही युवती सरदार घराण्यातील होती. परंतु क्रिस्तोफरचे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व व नौचालनातील त्याने मिळविलेला अधिकार यांमुळे त्याला ह्या युवतीचा लाभ झाला. लग्नामुळे त्याला पोर्तुगालमधील उच्च समाजात चंचुप्रवेश मिळाला व ह्या आधारावर त्याने पोर्तुगालचा राजा जॉन ह्याच्यापुढे हिंदुस्थानला पश्चिमेकडून जाण्याबाबतची कल्पना मांडली. सरदारकी द्यावी, नफ्यात दहा टक्के हिस्सा मिळावा आणि नवीन मुलखाचा व्हाइसरॉय करावे या अटींवर, तो हे धाडस करण्यास सिद्ध होता. राजाने आपल्या सल्लागारांपुढे ही कल्पना मांडली. सर्वांनी क्रिस्तोफरची कल्पना मूर्खपणाची ठरविली म्हणून मग राजाने क्रिस्तोफरला नकार दिला. या कालावधीत त्याची बायको मरण पावली होती व मुलगा पाच वर्षांचा झाला होता. त्यालाघेऊन तो स्पेनला आला व तेथील एका मठात आश्रयास राहिला. तेथील मठाधिपती हा त्याचा पुढे कायमचा मित्र बनला. कोलंबसच्या मुलाला त्याने आपल्याकडे ठेवून त्याच्या शिक्षणाची तरतूद केली व कोलंबसला एका सरदाराकडे ओळखपत्र दिले. त्या सरदाराने दुसऱ्या एका सरदाराकडे पत्र दिले. जवळजवळ पाच वर्षे कोलंबसची ह्याकडून त्याच्याकडे अशीच गेली व स्पेनच्या राजाच्या कानावर त्याची कल्पना मांडण्याइतपत प्रगती झाली. त्याने इंग्लंडच्या सातव्या हेन्रीलाही पत्र पाठविलेले होते, परंतु त्याच्याकडून उत्तर आले नाही. दरम्यान बीआट्रिझ एन्रीकेथ हिच्याशी त्याचे प्रेम जमले होते. तिच्यापासून द्योगो नावाचा मुलगाही त्याला झाला. तिचा भाऊ पिंथॉन याची मात्र पुढे त्याला खूपच मदत झाली. १४९० मध्ये निराश होऊन तो पॅलोस बंदरी गेला. तेथून त्याचा इंग्लंडला जाण्याचा विचार होता. मध्यंतरीच्या काळात स्पेनच्या राजाने कमिशन नेमून कोलंबसच्या कल्पनेवर अभिप्राय मागितला होता. कमिशनने कोलंबसला पाठविण्यास नकार दिला परंतु राणी इझाबेला हिने कोलंबसच्या धाडसास सक्रिय पाठिंबा देऊन त्यास पाठविण्याचा आग्रह धरला. म्हणून कोलंबसला परत बोलविण्यात आले व त्याच्या अटी मान्य करून त्याला प्रवासास जाण्याचा हुकूम देण्यात आला. पिंता, नीना व सांता मारीआ ही तीन गलबते, सत्याऐंशी माणसे व शिधासामान घेऊन ३ ऑगस्ट १४९२ रोजी कोलंबसने पॅलोस बंदर सोडले. पिंथॉन बंधूंनी दोन गलबतांचे व नीनाचे स्वतः कोलंबसने कप्तानपद घेतले होते. एका गलबताचे सुकाणू मोडल्यामुळे मादीरा बेटावर त्यांना थोडा मुक्काम करावा लागला. पुढे त्यांना अनुकूल वारा असल्याने ते भराभर पश्चिमेकडे जाऊ लागले. परंतु गलबतांवरील लोकांनी घाबरून बंडाची भाषा सुरू केली. कोलंबसने खोटी अंतरे दाखवून लोकांची कशीबशी समजूत केली. शेवटी ११ ऑक्टोबर १४९२ रोजी त्यांच्या बोटी बहामा बेटांवर पोहोचल्या, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. परंतु तेथील लोक व परिस्थिती पाहिल्यावर हा प्रदेश हिंदुस्थान नसल्याचे त्यांना पटले. पूर्वेकडे पसरलेले भूप्रदेश समृद्ध असल्याचे त्याला रानटी लोकांनी खुणांनी सांगितले म्हणून त्या प्रदेशास कोलंबसने वेस्ट इंडीज हे नाव दिले. थोडेसे लोक आणि एक गलबत तेथे ठेवून कोलंबस परतला. येताना वादळामुळे त्यांची गलबते एकमेकांपासून फुटली, तरीही ते सुखरूप स्पेनला पोहोचले. तेथे त्यांचा मोठा सत्कार झाला. त्यानंतर कोलंबसने वेस्ट इंडीजला तीन सफरी मारल्या. व्हाइसरॉय म्हणून त्याला काम जमेना, म्हणून त्याला त्या हुद्यावरून दुसऱ्या खेपेनंतरच काढण्यात आले. त्याच्या म्हणण्याला कोणीही किंमत देईना. शेवटी दारिद्र्य, हालअपेष्टा यांतच त्याचा १५०६ मध्ये अंत झाला.

शाह, र. रू.