टेक्सस : अमेरिकेच्या दक्षिण-मध्य विभागातील, अलास्काच्या खालोखाल दुसऱ्‍या क्रमाकांचे मोठे राज्य. क्षेत्रफळ ६,९२,४०२ चौ. किमी. पैकी ११,३१६ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या १,१७,९४,००० (१९७३). विस्तार २५° ५१’ उ. ते ३६° ३०’ उ. व ९३° ३१’ प. ते १०६° ३८’ प. यांदरम्यान. दक्षिणोत्तर कमाल अंतर सु. १,२८२ किमी. पूर्व-पश्चिम १,२३७ किमी. याच्या आग्नेयीस मेक्सिकोचे आखात व नैऋत्येस मेक्सिको, पश्चिमेस न्यू मेक्सिको, उत्तरेस ओक्लाहोमा, ईशान्येस आर्‌कॅन्सॉ आणि पूर्वेस लुइझिॲना ही राज्ये आहेत. १००° पश्चिम रेखावृत्ताच्या पूर्वेच्या सर्व उत्तर सीमेवर रेड नदी, लुइझिॲना सीमेचा सु. ६६% भाग सॅबीन नदी सर्व नैर्ऋत्य सीमेवर रीओ ग्रँड नदी व आग्नेयीस मेक्सिकोचे आखात याप्रमाणे राज्याची बरीचशी सीमा जलवेष्टितच आहे. ऑस्टिन ही राजधानी आहे.

भूवर्णन : सपाट जमिनी, वाळवंटे, टेकड्या, डोंगर, पर्वत, पठारे, दलदली असे विविध भूप्रकार असलेल्या या राज्याचा बहुतेक प्रदेश निरनिराळ्या उंचीवरील एक विस्तीर्ण गवताळ मैदान आहे. हा मुलूख आग्नेयीच्या मेक्सिको आखाताकडून पायरीपायरीने वायव्येकडे व पश्चिमेकडे चढत गेलेला आहे. आखातकाठाला ११५ मी.पर्यंत उंचीचे, ८० ते ४८० किमी. रुंदीचे सखल रेताड मैदान असून काही ठिकाणी खूप दलदली आहेत. त्याच्या ईशान्य भागात वनप्रदेश असून किनाऱ्‍याला समांतर साचलेल्या रेतीच्या ढिगांची लांब लांब बेटे आखातातील तुफानांपासून किनाऱ्‍याचे संरक्षण करतात. किनारी मैदानाच्या सीमेवर बाल्कोन्स विभंगरेषा आहे. राज्याचा उत्तरभाग कॅनडापर्यंत पोहोचणाऱ्‍या ‘ग्रेट प्लेन्स’ (महासपाटी) पैकी असून तृणाच्छादित, वृक्षहीन, मधूनमधून ठेंगण्या सपाट पठारांचा व कोठे कोठे नाले व घळींनी तोडलेला आहे. आग्नेयीस २१७ मी. पासून उत्तरेस व पश्चिमेस १,२४० मी. पर्यंत चढत गेलेल्या या भागात पाणी कमी असून वारा सतत असतो. मध्य टेक्ससची उत्तरमध्यसपाटी १८६ ते ६२० मी. उंचीची ऊर्मिल गवताळ भूमी सर्व राज्यात सुपीक असून हिचा पश्चिम भाग डोंगराळ, गुरचराईचा, पूर्व भाग कपाशीयोग्य काळ्या मातीचा आहे. दक्षिण बाजूस एडवर्ड्‌स पठार रीओ ग्रँड नदीपर्यत पोहोचलेले व पश्चिमेस ‘स्टेक्ड प्लेन्स’ (काठ्यांचे मैदान) हा उंच रूक्ष प्रदेश १,२४० मी.पर्यत चढत गेलेला आहे. नैर्ऋत्य राज्यभाग ‘ट्रान्स पेकस’–पेकस नदीपलीकडील मुलूख, हाही वैराण, उजाड, राज्यात सर्वाधिक उंचीचा असून त्यात ग्वादालूप, डेव्हिस व चीसस या तीन पर्वतराजी असून सर्वोच्च (२,७१३ मी.) शिखर ग्वादालूप, चीसस पर्वतात रीओ ग्रँड नदीची सांता एलेना ही ४६५ मी. खोल कॅन्यन आहे. टेक्ससमधील बहुतेक नद्या राज्यातच उगम पावून मेक्सिकोच्या आखाताला मिळतात. त्यात महत्त्वाच्या सॅबीन, नेचिस, ट्रिनिटी, ब्रॅझस, कोलोरॅडो, ग्वादातूप व न्युएसिस या होत. अगदी उत्तरेत कॅनेडियन नदी पश्चिमेच्या न्यू मेक्सिकोतून येऊन पूर्वेच्या ओक्लाहोमात आर्‌कॅन्सॉला मिळते. उ. सीमेची रेड नदी लुइझिॲनात मिसिसिपीला आणि नैर्ऋत्य सीमेची रीओ ग्रँड मेक्सिकोच्या आखाताला मिळते. पूरनियंणासाठी व वीज उत्पादनासाठी नद्या अडवून राज्यात लहानमोठे १४ जलाशय निर्माण झाले आहेत. मेक्सिकोच्या आखातावरचा समुद्रकिनारा सु. ९६२ किमी. आहे.

हवामान : राज्याच्या दक्षिणोत्तर व उंचसखल भूपृष्ठामुळे स्थानपरत्वे अनेक प्रकारांचे हवामान आढळते. उ. भागात महाद्वीपीय : अल्पकाल गरम उन्हाळे, दीर्घकाल कडक थंडी किनारी प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय हवामान : प्रदीर्घ दमट उन्हाळे व सौम्य हिवाळे. प. भागात पाऊस सु. २५ सेंमी., पू. भागात सु. १२५ सेंमी., असून राज्याचे साधारण तपमान किमान ९·४° से., कमाल ३०·६° से. व सरासरी १८·९° से. असते. वार्षिक पर्जन्य ८२·२ सेंमी. असून सु. २२% भूमी वनाच्छादित आहे.

वनस्पती व प्राणी : प्रमुख वनस्पती प्रेअरी गवत ही होय. त्यावर महत्त्वाचा पशुपालन व्यवसाय अवलंबून आहे. पाइन, पीकॉन वगैरे काही झाडे व चारशेहून अधिक जातींची वन्यफुले आहेत. अनेक प्रकारची हरिणे, खारी, ससे, कायोट, लांडगा, कूगर, रानमेंढ्या, आर्माडिल्लो व अनेक फरधारी प्राणी आहेत. पक्षी आणि मासे शेकडो जातींचे आहेत. विषारी साप, सरडे, बेडूक इ. आहेत.

इतिहास व राजव्यवस्था : हा प्रदेश कॅडो, कॉमांशे इ. रेड इंडियन आदिवासी जमातींचा. याचे पहिले दर्शन १५१९ मध्ये स्पॅनिश शोधक पिनेदा या गोऱ्‍या माणसास झाले. १६८२ मध्ये स्पॅनिअर्डांनी आजच्या एल् पॅसोजवळ यरलेता येथे पहिले कायम ठाणे वसविले. १६८५ मध्ये ला सालने मॅटगॉर्ड येथे आपल्या लुइझिॲना वसाहतीचे एक मेटे ठेवले तेवढेच फ्रेंचांचे या बाजूने दर्शन. ते मेटे टिकले नाही पण फ्रेंचांचा शिरकाव होईल या भयाने स्पॅनिअर्डांनी नंतरच्या वर्षात इकडे अनेक धर्मकेंद्रे काढली व किल्ले उभारले. अमेरिकेने १८०१ मध्ये ‘लुइझिॲना खरेदीचा’ एक भाग म्हणून टेक्ससवर हक्क सांगितला. तो स्पेनने नाकबूल केला. १८२१ मध्ये मेक्सिको स्वतंत्र झाल्यावर हजारो अँग्लोअमेरिकन शेतकरी टेक्ससमध्ये लोटू लागले. पण स्थलांतरांची संख्या वाढू लागली तेव्हा मेक्सिकन सरकारने अनेक जाचक बंधने घातली. त्यामुळे टेक्ससच्या लोकांनी स्वातंत्र्य पुकारले. मेक्सिकन सैन्याने प्रथम बंडाचा मोड केला. परंतु टेक्ससच्या लोकांनी जिद्दीने दीड महिन्यातच ह्यूस्टनच्या नेतृत्वाने मेक्सिकन सैन्याचा धुव्वा उडविला (१८३६). युद्ध संपले व नव्या टेक्सस प्रजासत्ताकाचा सॅम ह्यूस्टन पहिला अध्यक्ष झाला. तथापि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत प्रवेश मिळविण्याची टेक्ससची खटपट होती. अखेर १८४५ साली टेक्ससला संयुक्त संस्थानांत प्रवेश मिळाला. मेक्सिकोने टेक्ससचे स्वातंत्र्य मान्य केले नव्हते, १८४६ मध्ये मेक्सिकोशी युद्ध जुंपले व १८४८ साली मेक्सिकोचा पराभव झाला. मेक्सिकोकडून मिळालेल्या मुलुखाची विल्हेवाट करण्याच्या वादात काही भूभाग राज्याने २ कोटी डॉलर भरपाई घेऊन सोडून दिले. पहिल्यापासून गुलामी पद्धतीच्या पक्षपाती टेक्ससने १८६१ मध्ये दक्षिणेच्या बंडखोर संघटनेत प्रवेश केला. यादवी युद्धानंतर गुलामी पद्धतीचे उच्चाटण झाल्याने आणि ‘पुनर्रचना’ कारभार आल्याने टेक्ससचे खूप नुकसान झाले. संयुक्त संस्थानांत पुन्हा प्रवेश मिळण्यास १८७० पर्यंत थांबावे लागले. त्यानंतर मात्र राज्याचा विकास झपाट्याने झाला. राज्याचा कारभार दोन वर्षांसाठी नियोजित राज्यपाल व त्याचे कार्यकारी मंडळ पाहतात. राज्याच्या सिनेटवर ३१ व प्रतिनिधिगृहावर १५० निर्वाचित सदस्य असतात. सिनेटर चार वर्षांसाठी व प्रतिनिधी दोन वर्षांसाठी निवडलेले असतात. सर्वोच्च न्यायालयापासून अगदी खालच्या न्यायालयापर्यंत न्यायदानाची व्यवस्था आहे. कारभारासाठी राज्याचे २५४ परगणे असून निर्वाचित प्रतिनिधींद्वारा कारभार चालतो. टेक्ससचे अमेरिकेच्या काँग्रेसवर २ सिनेटर व २४ प्रतिनिधी आहेत. २१२ वेळा दुरुस्त झालेल्या १८७६ च्या संविधानाप्रमाणे टेक्ससचा कारभार चालतो.

आर्थिक व सामाजिक स्थिती : सुरुवातीस मैदानचराईवर गुरांची पैदास स्वस्त पण बाजारापर्यंत वाहतूक बिकट होती. १८६०–७० दरम्यान कॅनझसपर्यंत लोहमार्ग आल्यावर उत्तरेकडे गुरांची प्रचंड खिल्लारे हाकून नेण्याच्या विक्रमाचे नवे पर्व टेक्ससमध्ये सुरू झाले व त्यामुळे कॅनझसमध्ये डॉज सिटी व ॲबिलीनसारखी नवी ‘ढोरगावे’ वसली. १९०१ मध्ये बोमाँटजवळ स्पिंडलटॉप येथे खनिज तेलाचा पहिला ल्यूकस फवारा निघाला, तेव्हापासून तेलक्षेत्राचा विस्तार वेगाने होऊन आणखी एक नवे पर्व चालू झाले. पहिल्या महायुद्धात १,९२,००० आणि दुसऱ्‍यात ८,२७,९५२ लोकांखेरीज अपरिमित खनिज तेल व पशुमांस पुरवून टेक्ससने विजय मिळविण्यास बहुमोल मदत दिली शिवाय चार छावण्यांत हजारो सैनिकांच्या प्रशिक्षणाचीही सोय करून दिली. युद्धोत्तर कालात राज्याच्या उद्योगधंद्यांत व व्यापारात फारच मोठी वाढ झाली.

कृषी उद्योगात १६% लोक असून या राज्यात देशातील पहिल्या क्रमांकाचे कापूस व सरकी उत्पादन होते. शिवाय महत्त्वाची पिके पीकॉन, जोंधळे, गहू, मका, ओट, बार्ली, तांदूळ व भुईमूग, मुसुंबी, चकोतरा, सप्ताळू, बटाटे, रताळी असून गुरे व मेंढरे यांची पैदासही इतर राज्यांहून अधिक आहे. १९७१ अखेर १२८ लक्ष गुरे, ३५ लक्ष मेंढ्या, १४ लक्ष डुकरे होती. जगातील मोहेरच्या ६०% व देशांतील ९५% मोहेर टेक्ससमधील अंगोरा बकऱ्‍यांपासून मिळते. कारखानदारीत १४% लोक असून मुख्य उत्पादन रासायनिक द्रव्ये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, तेलशुद्धीकरण, तेलखाणयंत्रसामग्री, विमाने व सुटे भाग, धातुशुद्धीकरण, दगड-शाडू-काचेचा माल, छपाई, प्रकाशन व आकार दिलेले धातुभाग यांचे आहे. व्यापारात २१% लोक आहेत. खाणींतून देशातील सर्वाधिक खनिज तेल, ज्वलनवायू, वायूद्रव व गंधक मिळतो. कापीव लाकडाचे बरेच उत्पादन होते. लोहमार्ग ३१,५७३ किमी. असून रस्ते ३,६५,०४६ किमी. पैकी ६०% पक्के आहेत. राज्यात व राज्याबाहेर तेलवाहक नळ ७५,२०० किमी., वायुवाहक ७३,६०० किमी. असून किनाऱ्‍याच्या आतला जलमार्ग ६७४ किमी. आहे. तो मिसिसिपीला जोडल्यामुळे थेट ओहायओ नदीबंदरापर्यंत स्वस्त मालवाहतूक होते. ह्यूस्टन बंदरापासून समुद्रापर्यंत ८० किमी. लांबीचा कालवा असून किनाऱ्‍याला ६ मोठी व ८ लहान बंदरे आहेत. ६८१ विमानतळ, २६० नभोवाणी व ५१ दूरचित्रवाणी केंद्रे, २५ लाख दूरध्वनियंत्रे, सर्व प्रमुख शहरी दैनिके व राज्यभर अनेक नियतकालिके आहेत. लोकवस्ती १९७० मध्ये ७९·७% शहरी, निग्रोंचे प्रमाण १३% व चिकॅनो १५% होते. शाळांत १९७१ मध्ये २८,००,५०० विद्यार्थी होते. १२७ उच्च शिक्षण संस्थापैकी १४ विद्यापीठे, ९ शासकीय उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी ४, ७५,९५० (१९७१). ७ ते १७ वयापर्यंत शाळा हजेरी सक्तीची असून १९६५–६६ पासून गोरे व काळे यांच्या वेगळ्या शाळा कमी होऊ लागल्या आहेत. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला व क्रीडांच्या बाबतीत टेक्ससचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिणेकडच्या राज्यांशी साम्य आहे.

प्रमुख शहरे : सर्वांत मोठे कारखानदारी शहर व बंदर ह्यूस्टन असून येथे अमेरिकेच्या अंतरिक्ष यानप्रकल्पाचे महत्त्वाचे केंद्र आहे. व्यापारी केंद्रे डॅलस तसेच फोर्टवर्थ, एल पॅसो, कॉपर्स क्रिस्ती, गॅल्व्हस्टन, जुनी राजधानी सॅम अँटोनिओ, सध्याची राजधानी ऑस्टिन ही आहेत.

ओक, शा. नि.