कोरिना : ग्रीक कवयित्री. जन्म प्राचीन ग्रीसमधील बिओशिया जिल्ह्यातील टॅनग्रा ह्या गावी. बिओशिअन बोलभाषेत तिने आपल्या कविता रचिल्या. बिओशिअन मिथ्यकथांना तिने काव्यरूप दिले. तिची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. तिने वापरलेली भाषा आणि वृत्ते साधी व सोपी आहेत. ती पिंडरची समकालीन असून त्याच्याबरोबर झालेल्या काव्यस्पर्धेत तिने पाच वेळा विजय संपादन केला, असे स्यूइडॅस (इ.स.सु. दहावे शतक) हा ग्रीक कोशकार सांगतो. पिंडरची ती गुरू होती, असे परंपरा मानते. ती पिंडरची समकालीन होती, असे मानल्यास तिचा काल इ.स.पू. सहावे शतक असा ठरतो.

मेहता, कुमुद