एक्‌हार्ट : (१२६० ? – १३२८ ? ). जर्मन गूढवादी ईश्वरविद्यावेत्ता. माइस्टर एक्‌हार्ट ह्या नावाने हा ओळखला जातो. जन्म गोथाजवळील हॉख्‌हाइम येथे. पॅरिस, स्ट्रॅस्‌बर्ग आणि कोलोन येथील प्रमुख डोमिनिकन विद्यालयांत त्याने शिक्षण घेतले आणि तेथेच अध्यापनाचे कार्य केले. डोमिनिकन चर्चशी संबंधित असलेली अनेक अधिकारपदे त्याने भूषविली. परमेश्वर आणि मनुष्य यांचे निकटचे नाते त्याने आपल्या शिकवणुकीतून विविध प्रकारे सांगितले तसेच मानवातील परमेश्वरी अंश जाणून घेण्याचा उपदेश केला. धर्मावर त्याने विद्वत्तापूर्ण लेखन केले. तथापि पाखंडीपणाच्या आरोपावरून त्याला कोलोनच्या आर्चबिशपपुढे आणण्यात आले (१६२६). त्याच्या ग्रंथांची चिकित्सा करवून त्याला पाखंडी ठरविण्यात आले. त्यासंबंधात त्याने पोपला केलेले आवाहनही फेटाळण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या लेखनाचा काही भाग पाखंडी म्हणून जाहीर करण्यात आला. त्याच्या प्रभावाने जर्मनीत चौदाव्या शतकात टाऊलर आणि झूझो यांसारख्या गूढवाद्यांच्या नेतृत्वाखाली गूढवादी चळवळ सुरू झाली.

कुलकर्णी, अ. र.