कौंडिण्यपूर : महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. आधुनिक काळात त्यास तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पूर्वेस सु. ६४ किमी. वर वर्धा नदीच्या काठी ते वसले आहे. प्राचीन साहित्यात याची कुंडिनपूर, कुंडिनी, कुंडलपूर, कुंडीन, विदर्भ, विदर्भा वगैरे विविध नावे आढळतात. या स्थळाचा श्रीकृष्ण-रुक्मिणीकथेशी संबंध जोडण्यात येतो. रुक्मिणीचा पिता भीष्मक याची ही राजधानी होती, असा समज आहे. गावानजीकच्या अंबिका मंदिरात पूजेसाठी आलेल्या रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण केले, असे सांगतात. दत्त, लक्ष्मीनारायण, पंचमुखी महादेव, तसेच विठ्ठल-रुखुमाई यांची येथे मंदिरे असून स्थानिक आख्यायिकेप्रमाणे पंढरपूरचा विठोबा येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला अवतरतो. विठ्ठलाच्या गर्भगृहात श्री सदाराम महाराज, बैरागी महाराज वगैरे संतांच्या समाध्या आहेत.  

येथील नदीच्या काठी असलेल्या अनेक टेकाडांत १९६२-६३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यात इ. स. पू. तिसऱ्‍या-चौथ्या शतकांतील अवशेष उपलब्ध झाले आहेत. यापुढील विस्तृत उत्खननांत कदाचित याही पूर्वीचे अवशेष उपलब्ध होतील, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा कयास आहे. उत्खननात उपलब्ध झालेल्या वस्त्यांच्या अवशेषांवरून त्यांची कालमर्यादा ताम्रपाषाणयुगाच्या आसपास नेतात. अवशेषांतील सातवाहनकालीन मृत्पात्रे, मणी, नाणी, लोखंडी हत्यारे तसेच दगडी पाटे-वरवंटे या वस्तू तत्कालीन समाजजीवनाविषयी बरीच कल्पना देतात.

देव, शां. भा.