कोळसुंदा : (तालिमखाना, विखरा गु. एखारो गोख्रण हिं. गोक्षुर, ताल-मखाना क. कळवंक बीज, कोलवलिके सं. काक-कोकिलाक्ष, इक्षुरा, वज्रकंटक लॅ. हायग्रोफिला स्पायनोजा, ॲस्टरकँथा लाँगिफोलिया कुल ॲकँथेसी). दलदलीच्या ठिकाणी वाढणारी ही बळकट काटेरी ⇨ओषधी भारतात सर्वत्र, श्रीलंकेत आणि आफ्रिकेच्या उष्णभागात आढळते. खोड झुपकेदार, काहीसे चौकोनी, उभे, ०·६–१·५ मी. उंच,फुगीर, पर्वयुक्त (पेरी असलेले) व केसाळ असते. पाने देठविहीन, प्रत्येक पेऱ्यावरच्या सहापैकी बाहेरची दोन मोठी, १८ X ३ सेंमी. व आतील चार लहान (३·८ सेंमी. लांब) असून प्रत्येकाच्या बगलेत एक तीक्ष्ण लांब पिवळा काटा असतो. प्रत्येक पेऱ्यावर आठ फुलांच्या चार जोड्या जून-जानेवारीत येतात. छदे पानासारखी व केसाळ पुष्पमुकुट द्व्योष्ठक, निळा व टोकास एकदम पसरट [→फूल] बोंड लांबट, टोकदार व बिया ४–८ इतर लक्षणे ⇨ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
मुळांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) पाने व बिया शामक व मूत्रल असून कावीळ, संधिवात, शोफ (सूज) व जनन-मूत्रमार्गाचे दोष यांवर देतात. राख मूत्रल व जलोदरावर उपयुक्त. बिया परम्यावर व स्वप्नावस्थेवर दूधसाखरेबरोबर देतात. बी तोंडात धरल्यास ते बुळबुळीत व स्वादयुक्त होते.
जमदाडे, ज. वि.