उरिमिदी : (तेलुगू- उरिमेदी, अस्कियामेन इं. रेड कॅसिया, रेड इंडियन लॅबर्नम लॅ. कॅसिया मार्जिनॅटा कुल- लेग्युमिनोजी, उपकुल- सीसॅल्पिनिऑइडी). सु. चार ते सहा मीटर उंचीचा हा सुदंर वृक्ष मूळचा श्रीलंकेतील असून तो प्रथम १८०२ मध्ये भारतात आणून कलकत्ता येथील रॉयल बोटॅनिक गार्डन्समध्ये लावला गेला. आता तो ब्रम्हदेशात व द. भारतात लागवडीत आढळतो. इतरत्र शोभेकरिता अनेक उद्यानांत व रस्त्यांच्या दुर्तर्फा लावलेला आढळतो. ह्याची साल तपकिरी व त्यावर खोलगट भेगा असून फांद्या पसरट व काहीशा लोंबत्या असतात. सामान्य शारीरिक लक्षणे  लेग्युमिनोजी  कुलात (उपकुल- सीसॅल्पिनिऑइडी) वर्णिल्याप्रमाणे.  कासूद, कासोदा, ब्रह्यी कासूद,  बाहवा इत्यादीच्या वंशात याचा समावेश आहे. सोपपर्ण (उपपर्ण असलेली) पाने संयुक्त व पिसासारखी दले जाडसर १०–२० जोड्या लहान, लालसर व नाजूक फुलांच्या मंजऱ्या पानांच्या बगलेत पावसाळ्यात येतात संवर्त व पुष्पमुकुट तांबूस पण छदे हिरवी पाकळ्यांवर हिरव्या शिरा केसरदले एकूण नऊ त्यांची उंची सारखी नसून त्यांवरच्या परागकोशांचे रंगही भिन्न असतात [→ फूल]. शिंबा (शेंग) गोलसर, २०–३० सेंमी. लांब व आडव्या पडद्यांनी विभागलेली असते. ह्या वृक्षांची नवीन लागवड बियांपासून करतात. याचे लाकूड फिकट तपकिरी, फार कठीण, बळकट व टिकाऊ असून त्याचा उपयोग हत्यारांचे दांडे, कातीवकाम, गाड्यांच्या चाकांचे तुंबे इत्यादींकरिता करतात.

परांडेकर, शं. आ.