कोड : त्वचेतील रंजकद्रव्य नाहिसे झाल्यामुळे त्वचेवर लहानमोठे पांढरे फटफटीत डाग दिसतात, त्या विकाराला ‘कोड’, ‘श्वेतकुष्ठ’ किंवा ‘पांढरे कोड’ असे म्हणतात.

कोड आणि कुष्ठरोग किंवा यांमध्ये पूर्वी समजुतीचा बराच घोटाळा असे. दोन्ही रोग फार भयंकर मानले जात. कुष्ठरोग हा सांसर्गिक रोग आहे. कोड सांसर्गिक नसल्यामुळे ग्रस्त व्यक्तीशी संबंध आला तरी दुसऱ्या व्यक्तीला हा रोग होत नाही.

त्वचेचा रंग त्वचेतील ‘कृष्णरंजक’ (मेलॅनीन) या द्रव्यामुळे असतो. वंश, जाती, हवामान, उष्णता आणि सूर्यकिरणांशी प्रत्यक्ष संबंध यांवर त्वचेचा रंग अवलंबून असतो. टायरोसीन या ॲमिनो अम्लावर एंझाइमाची (जीवरासायनिक बदल घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगाची) विक्रिया झाल्यामुळे त्याचे डाय-ऑक्सिफिनिल-ॲलॅनीन (संक्षिप्त ‘डोपा’) यामध्ये रूपांतर होते. डोपावर आणखी एका एंझाइमाची तांब्यांच्या सान्निध्यात विक्रिया झाली म्हणजे त्याचे कृष्णरंजक द्रव्य होते.

टायरोसीन

एंझायम

→ डोपा

एंझायम + तांबे

→ कृष्णरंजक

(टायरोसिनेज)

(डोपाऑक्सिडेज)

ही विक्रिया त्वचेतील कृष्णरंजकजन-कोशिकांमध्ये (कृष्णरंजक-कण असलेल्या पेशींमध्ये) होऊन कृष्णरंजक द्रव्य शेवटी त्वचेच्या वरच्या थरांतील कृष्णरंजी-कोशिकांमध्ये साठविले जाते आणि त्याच्यामुळेच त्वचेला पिंगट, काळसर रंग येतो. आपण ज्या व्यक्तीला स्वच्छ गोरी असे म्हणतो अशा व्यक्तीच्या त्वचेतही या कृष्णरंजी-कोशिका थोड्या प्रमाणात असतातच. काळ्या रंगाच्या व्यक्तीमध्ये त्या कोशिका अधिक प्रमाणात असतात.

कोड या विकारात ग्रस्त झालेल्या भागांत हे कृष्णरंजक द्रव्य तयारच होत नाही. हे द्रव्य का तयार होत नाही याचे कारण अद्याप माहीत झालेले नाही.

कोडाची सुरुवात लहानपणापासून सु. ४० वर्षे वयापर्यंत होते. कोडाचे डाग शरीरावर कोठेही प्रथम दिसू लागतात. विशेषतः चेहरा, हाताची मनगटे, पाठ वगैरे ठिकाणी त्यांची सुरुवात होते. हे डाग हळूहळू पसरत जातात. मधून मधून यांची पसरण्याची क्रिया मंदावते. एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरुवात होते किंवा एका ठिकाणी सुरुवात होऊन कोड पसरत जाते. पसरत चाललेले डाग एकमेकांस मिळून त्वचेचा मोठा भाग पांढरा फटफटीत पडतो. त्वचेच्या सूक्ष्म रचनेत काहीही फरक दिसत नाही. फक्त कृष्णरंजक द्रव्याचा अभाव असतो. ग्रस्त भागावर खाज, सूज, लाली वगैरे लक्षणे नसतात. 

त्वचेवर डाग दिसू लागल्यामुळे विद्रूपता येऊन ग्रस्त व्यक्तीला मानसिक दृष्ट्या अवघड वाटू लागते आणि तिच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड उत्पन्न होतो.

धोतर, साडी वगैरे घट्ट नेसल्यामुळे कंबरेवर कित्येक वेळा कोड दिसते. कोड झालेल्या त्वचेवरील केसही पांढरे होतात. आहारात प्रथिन आणि तांबे कमी असणे, पचन तंत्र (पचन संस्थेचे) विकार, अशक्तपणा,मानसिक ताण आणि प्रवर्तकविकार (शरीरातील उत्तेजक अंतःस्रावांच्या म्हणजे हॉर्मोनांच्या कमतरतेमुळे होणारे विकार) अशी  कोडाची विविध कारणे सांगण्यात येतात परंतु त्यासंबंधी निश्चित असे काहीही सांगता येत नाही.

आनुवंशिक विवर्णता (त्वचेतील रंजकद्रव्याचा जन्मजात अभाव) ह्या विकाराचे सार्वदेहिक कोडापासून व्यवच्छेदक (फरक दाखविणारे) निदान करणे कित्येक वेळा कठीण होते. परंतु आनुवंशिक विवर्णतेमध्ये  जन्मापासूनच त्वचा पांढरी फटफटीत असते. तसेच त्या विकारात डोळ्यांतील कनीनिकेलाही (पारदर्शक स्वच्छ मंडलाच्या पाठीमागे असलेल्या रंजकद्रव्ययुक्त गोलाकार पटलालाही) रंग नसतो. आनुवंशिक विवर्णता ही एक आनुवंशिक सुप्त प्रवृत्ती आहे.

कोडाला खात्रीचा असा उपाय अजून सापडलेला नाही. खुंबी (हिंदी नाव लॅटिन- ॲम्मी माजूस) आणि बावची (सोरॅलिया कॉरिलिफोलिया) या वनस्पतींच्या फळाचे तेल पोटात देऊन आणि ग्रस्त भागावर लावून तो भाग उन्हात अथवा जंबुपार किरणांत (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरणांत) ठेवल्यास काही प्रमाणात गुण आल्याची उदाहरणे आहेत. तांब्यांची लवणे (उदा. कॉपर क्लोराइड) जीवनसत्त्वे, पौष्टिक आहार वगैरे गोष्टीही उपचारार्थ वापरतात.  

ढमढेरे, वा. रा.


आयुर्वेदीय चिकित्सा : कोडाला किलास किंवा श्वित्र असे आयुर्वेदात म्हणतात. हे त्वचेमध्येच होते आणि कधीही स्राव होत नाही. वातण, पित्तण व कफण असे याचे तीन प्रकार होतात. प्रथम दोषाला अनुसरून वामक, रेचक आणि बस्ती द्यावे. नंतर लकड्या उंबराच्या फळाचा रस गूळ घालून द्यावा व श्वित्रनाशक तेल लावून तीन दिवस उन्हात बसावे आणि तहान लागली असता पिण्यास पेज द्यावी. उन्हात बसल्यामुळे कोडाच्या चट्ट्यावर जे फोड येतात ते काट्याने फोडावे. त्याच्यातला स्राव वाहून जाऊ द्यावा. नंतर असाणा, गव्हला, बडीशेप ह्यांचा काढा किंवा पळसाचा क्षार काकवीबरोबर प्यावा. लकडी उंबराची साल, बेहड्याच्या झाडाची साल ह्यांच्या काढ्यात बावचीची चटणी घालून तो प्यावा आणि उन्हात बसावे. आले व ताकाबरोबर जेवण करावे, मीठ वर्ज्य करावे. गाईच्या मूत्रामध्ये चित्रक, सुंठ, मिरे, पिंपळी व मद्य हे घालून बरणी जमिनीत १५ दिवस पुरून ठेवावी व नंतर ते प्यावे. कुष्ठोपचारामध्ये सांगितल्याप्रमाणे पथ्य ठेवावे. वाघ किंवा हत्ती ह्यांचे कातडे जाळून तिळाच्या तेलातून लावावे. काळ्या सर्पाची मषीही बेहड्याच्या तेलातून लावावी किंवा मोराचे पित्त लावावे. श्वित्र नाहीसे झाले पण कातडीचा नेहमीचा रंग आला नाही तर बावची ४ भाग व हरताळ १ भाग गाईच्या मूत्रात वाटून लावावी. व्रणातील मांस वर उचलून आले तर हत्तीच्या मळाच्या क्षाराचे औषध सांगितल्याप्रमाणे करून लावावे. भल्लातकादी औषधांचा घनही लावावा. ह्या रोग्याने सातूचे अन्न नेहमी खावे. पाप क्षीण झाले असेल तर ह्या औषधांनी गुण येतो. रसमाणिक्य श्वित्रारीरस, खगेश्वर, हरतालभस्म, हिराकसभस्म, रोप्यभस्म व नागेश्वररस, ह्यांचा अवस्थाप्रमाणे व सांगितलेल्या अनुपानाबरोबर उपयोग करावा. 

जोशी, वेणीमाधवशास्त्री 

संदर्भ : Behl, P.N. Practice of Dermatology, Bombay, 1962.