कोंडापल्ली : आंध्र प्रदेश राज्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ, पर्वतीय दुर्गस्थानामुळे यास प्राचीन काळी महत्त्व प्राप्त झाले होते. विजयवाड्याच्या वायव्येस सु. २१ किमी.वर ते कृष्णा जिल्ह्यात वसले आहे. लाकडी खेळण्यांकरिता आधुनिक कोंडापल्ली प्रसिद्ध असून या प्रदेशावर क्रमाने चालुक्य, काकतीय, बहमनी आणि विजयानगर या राजांचा अंमल होता. बाराव्या शतकात कोंडविडू या दुर्गाच्या प्राप्त्यर्थ काकतीय आणि पश्चिम चालुक्य राजांमध्ये संघर्ष चालू होता. बहमनी सुलतानाच्या निजामुल्मुल्क बहरी नामक सेनापतीने १४७० मध्ये कोंडविडू आणि राजमहेंद्री हे प्रदेश हिंदू राजांकडून जिंकून त्या ठिकाणची मंदिरे उद्ध्वस्त केली व तेथे मशीद बांधली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा प्रदेश हैदराबादच्या अंमलाखाली गेला.

हैदराबाद पुरातत्त्व विभागाने येथे १९४१ साली उत्खनन केले. त्यात एक बौद्ध विहार व दोन चैत्यगृहे सापडली. याशिवाय सातकर्णी, पुळुमावी, यज्ञश्री सातकर्णी वगैरे सातवाहन राजांची आणि ऑगस्टस या रोमन सम्राटाची बरीच नाणी आढळली, याशिवाय शाडूच्या मूर्ती, विविध प्रकारचे मणी व ताईत, हस्तिदंती बांगड्या, रोमन नाण्यांच्या मातीच्या पुतळ्यासारख्या प्रतिकृती व लोखंडी हत्यारे उपलब्ध झाली. या अवशेषांवरून सातवाहनकाली हे नगर गजबजलेले व समृद्ध असावे. प्लिनीने ज्या तीस प्राकारयुक्त शहरांचा उल्लेख केला आहे, त्यांपैकीच कोंडापल्ली हे एक असावे, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा अंदाज आहे.

संदर्भ : Bhandarkar Oriental Research Institute, Annals of the Bhandarkar Oriental Research Institute, Vol. XXII – July – October1941, Poona, 1941.

देव, शां. भा.