पुस्तकातील किडा : हे नाव विविध किटकांना देतात. या किटकांचा समावेश सॉकॉप्टेरा गणात करतात. कोणत्याही एका विशिष्ट जातीला हे नाव देत नाहीत. त्यांच्या अळ्या व प्रौढ पुस्तकबांधणीत वापरलेली खळ खाऊन आणि पानांना बारीक छिद्रे पाडून पुस्तकांचे नुकसान करतात. ते ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये इ. ठिकाणी सर्रास आढळतात.
हे किडे आकारमानाने लहान, बिनपंखाचे किंवा सपक्ष असून त्यांच्या तोंडाच्या अवयवांचे चघळण्यासाठी परिवर्तन झालेले असते. त्यांच्या जंभिकांत (जबड्यांत) एक कुतुहलजनक दांडा असतो. त्यांचे डोके मोठे असते. शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) आखूड किंवा लांब, सूत्रवत (तंतूसारख्या) असतात. संयुक्त नेत्र [→डोळा] सामान्यतः मोठे व एकमेकांपासून दूर असतात. अग्र वक्ष (छातीचा पुढचा भाग) लहान व मानेसारखा असतो. पंखांच्या दोन जोड्या असतात आणि त्यांतील पुढच्या जोडीपेक्षा मागची जोडी बरीच लहान असते. पंखांवरील शिरांची मांडणी साधी असते. पाय सडपातळ असून कधीकधी मांडीचे हाड मोठे झालेले असते. घोटे दोन किंवा तीन खंडांचे (भागांचे ) बनलेले असतात. पुच्छिका नसते.
या किड्यांची अंडी लंबगोलाकृती, गुळगुळीत किंवा त्यांवर अस्पष्ट शिल्पांकन (नक्षीकाम ) असते. ती फिकट किंवा गर्द रंगाची किंवा चित्रविचित्र रंगांची असतात. ती एकएकटी किंवा गटागटाने घातलेली आढळतात. एक मादी २०–१३० अंडी घालते. नराशी संयोग न होताही मादी अंडी घालते. पिले बरीचशी प्रौढासारखी दिसतात व ती सामान्यतः आईवडिलांबरोबर असतात.
या किड्यांच्या नियंत्रणासाठी डीडीटी, बीएचसी इत्यादींचा वापर करतात.
पहा : कसर ग्रंथसंरक्षण.
जमदाडे, ज. वि.
“