पित्तरस : यकृतात [⟶ यकृत ] सतत तयार होणार्‍या पिवळसर निरिंगी रंगाच्या द्रव्याला ‘पित्तरस’ (किंवा ‘पित्त’) म्हणतात. पित्तरस यकृताच्या स्त्रावक व उत्सर्जक (निरूपयोगी द्रव्ये बाहेर टाकून देणे) या दोन्ही क्रियांपासून बनतो. म्हणजे त्याचे काही घटक स्त्रावजन्य आहेत, तर काही घटक उत्सर्जनापासून तयार होतात. पित्तरंजके, काही खनिजे व कार्बनी पदार्थ ही उत्सर्जीत द्रव्ये आहेत. प्रामुख्याने अन्नातील वसा (स्‍निग्ध) भागाच्या पचनाकरिता आवश्यक असणारे हे द्रव्य ⇨ पित्ताशयात साठवले जाते, सांद्रित केले जाते (तीव्रता वाढविण्यासाठी एकत्रित केले जाते) व जरूरीप्रमाणे ग्रहणीत (लहान आतड्याच्या सुरूवातीच्या भागात) समाईक पित्तनलिकेद्वारे आणले जाते. दररोज सर्वसाधारणपणे ८०० ते १,००० मिली. पित्तरस तयार होतो. मात्र पित्ताशयाची साठा करण्याची क्षमता केवळ ४० ते ७० मिली. असल्यामुळे पित्तरस जसजसा पित्ताशयात येतो तसतसे त्यामधील पाणी आणि सोडियम, क्लोराइड इ. विद्युत् विश्लेष्य घटक (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने विश्लेषण केले असता आयनरूपाने-विद्युत् भारित अणू वा अणुगटांच्या रूपाने-अलग होणारे घटक) पित्ताशयाच्या श्लेष्मकलास्तरातून (बुळबुळीत पातळ अस्तरातून) परत रक्तप्रवाहात अभिशोषिले जातात व उरलेले पदार्थ सांद्रित केले जातात. यकृतात प्रथम तयार झालेला व पित्ताशयात सांद्रित झालेला पित्तरस यांच्या घटकांमधील फरक पुढील कोष्टकात दर्शविला आहे. 

पित्ताम्‍ले व पित्तलवणे : वरील सर्व घटकांपैकी फक्त पित्तलवणेच पचनक्रियेत महत्वाचा भाग घेतात. यकृत-कोशिका (पेशी) दर चोवीस तासांत जवळजवळ ०.५ ग्रॅ. पित्तलवणे तयार करतात. या लवणांचा पूर्वगामी पदार्थ (ज्यापासून ही लवणे तयार होतात तो पदार्थ)⇨ कोलेस्टेरॉल असून ते सावन केलेल्या अन्नापासून किंवा संश्लेषणाने (घटक द्रव्यांचा संयोग करण्याच्या क्रियेने) तयार केले जाते. कोलेस्टेरॉलाचे रूपांतर कोलिक अम्‍ल किंवा चिनोडी-ऑक्सिकोलिक अम्‍ल यामध्ये सम प्रमाणात होते. ही अम्‍ले अधिक प्रमाणात ग्‍लायसीन आणि अल्प प्रमाणात टौरिन या ⇨ अमिनो अम्‍लांशी संयुग्मित होतात व त्यांपासून अनुक्रमे ग्‍लायको-कोलिक व टौरो-कोलिक अम्‍ले बनतात. ही अम्‍ले सोडियम व पोटॅशियम यांच्याशी संयुग्मित होतात आणि त्यापासून पित्तलवणे तयार होतात. वरील अम्‍लांखेरीज डी-ऑक्सिकोलिक व लिथोकोलिक ही पित्ताम्‍ले आहेत. पित्ताम्‍लांची रासायनिक संरचना निश्चित केल्याबद्दल १९२७ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक हाइन्‍रिख व्हीलांट यांना देण्यात आले.

  

यकृतातील व पित्ताशयातील पित्तरसांचे घटक व त्यांचे काही गुणधर्म

प्रमुख घटक वा गुणधर्म 

यकृत पित्तरस 

पित्तशय पित्तरस 

पाणी 

९७.५ %

९२.० %

पित्तारूण

०.०४ %

०.३ %

कोलेस्टेरॉल

०.१ %

०.३-०.९ %

वसाम्‍ले

०.१२ %

०.३-१.२ %

लेसिथीन

०.०४ %

०-३ %

विशिष्ट गुरुत्व

१,००८ 

१,०५० 

विक्रिया 

क्षारधर्मी, 

अम्‍लधर्मी, 

 

pH मूल्य ८-८.६

pH मूल्य ६-७

[ वरील प्रमुख घटकांशिवाय रक्तद्रवात असणारे सर्व विद्युत् विश्लेष्य पदार्थ उदा., सोडियम, पोटॅशियम वगैरे पित्तरसात अल्प प्रमाणात असतात Ph मूल्य याच्या स्पष्टीकरणार्थ ‘पीएच मूल्य’ ही नोंद पहावी.] 

पित्तलवणांचे आंत्र-यकृत अभिसरण : (1)यकृत (2) ग्रहणी (3) शेषांत्रपित्तलवणे दोन प्रकारची असतात. यकृतकोशिकांद्वारे तयार होऊन जी लवणे पित्तरसाचा घटक बनतात त्यांना ‘प्राथमिक’ पित्तलवणे म्हणतात. ही लवणे आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) आल्यानंतर त्यांच्यापासून सूक्ष्मजंतूंच्या प्रक्रियेमुळे जी लवणे बनतात त्यांना ‘दुय्यम’ पित्तलवणे म्हणतात.

शेषात्रांच्या (लहान आतड्याच्या शेवटच्या विभागाच्या) खालच्या भागात ही दोन्ही प्रकारची लवणे अभिशोषिली जातात व प्रवेशिका रक्तप्रवाहातून (आंत्रमार्गातील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेणार्‍या स्वतंत्र रक्तप्रवाहातून) यकृतात नेली जातात. तेथे ती पुन्हा पित्तरसात स्रवली जातात आणि पित्तरसातून पुन्हा लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) ग्रहणी भागात येतात. अशा प्रकारे स्त्रवण, अभिशोषण व पुनर्स्त्रवण होणार्‍या पित्तलवणांच्या या अभिसरणाला ‘आंत्र-यकृत’ म्हणतात. प्रत्येक पित्तलवण रेणू आंत्र ⟶ यकृत ⟶ आंत्र या चक्रातून १५ ते २० वेळा प्रवास केल्यानंतरच त्याचा उत्सर्जनातून नाश होतो. 

पित्तलवण कुंडातील पित्तलवणांचे प्रमाण नेहमी एकसारखे ठेवण्याचा सतत प्रयत्न चालू असतो. त्याकरिता संश्लेषण व उत्सर्जन यांचे संतुलन केले जाते. संश्लेषणावर शेषांत्रातून अभिशोषित झालेल्या पित्तलवणांचा परिणाम होतो. जवळजवळ ८० ते ९० % पित्तलवणे आंत्रातून परत अभिशोषिली जातात. पित्तलवणांचा प्रमुख उत्सर्जनमार्ग मलोत्सर्जन असतो. ५% पेक्षाही कमी पित्तलवणे मूत्रातून उत्सर्जित होतात.

कार्य : पित्तलवणे आंत्रमार्गात दोन महत्वाची कार्ये करतात. अन्नातील वसाकणांचा पृष्ठताण कमी करून त्यांच्यापासून आतड्याच्या हालचालीच्या मदतीने अतिसूक्ष्म वसाकण तयार करण्याचे कार्य पित्तलवणे करतात, या क्रियेला पायसीकरण म्हणतात. पित्तलवणांचे रेणू एका बाजूने ‘ जलस्‍नेही’ व दुसर्‍या बाजूने ‘जलद्वेषी’ असतात. या गुणधर्मामुळे पित्तलवणे अनेक वयायुक्त पदार्थांपासून टिकाऊ पायसे बनवू शकतात. या गुणधर्माला ‘जलानुवर्तीत्व’ म्हणतात [  ⟶ पचन तंत्र ]. 

वरील कार्यापेक्षा पित्तलवणांचे अधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे वसाम्‍ले, मोनोग्‍लिसराइडे, कोलेस्टेरॉल आणि इतर लिपिडे यांच्या अभिशोषणास मदत करणे हे होय. वसाम्‍ले आणि मोनोग्‍लिसराइडे यांच्या मिश्रणापासून पित्तलवणे ‘अतिसूक्ष्म संमिश्रे’ बनवितात. ही संमिश्रे अतिविद्राव्य (अतिशय विरघळणारी) असल्यामुळे आंत्राच्या श्लेष्मकलास्तराजवळ सहज वाहून नेली जातात व तेथून अभिशोषिली जातात. पित्तलवणांच्या अभावी जवळजवळ ४० % लिपिडे अभिशोषिली न जाता मलातून तशीच उत्सर्जित होतात. यामुळे पोषक पदार्थांच्या न्यूनतेमुळे होणारे चयापचयात्मक (शरीरात सतत चालणार्‍या भौतिक-रासायनिक घडामोडींमध्ये) दोष उत्पन्न होतात.


यांशिवाय जेव्हा वसा नीट अभिशोषिली जात नाही तेव्हा वसाविद्राव्य जीवनसत्वांचेही अभिशोषण नाट होत नाही. परिणामी अ, ई, के आणि ड ही जीवनसत्वे पुरेशी अभिशोषिली न जाऊन त्यांचे त्रुटिजन्य दुष्परिणाम उद्‌भवतात [ ⟶जीवनसत्वे ]. या जीवनसत्वांपैकी के जीवनसत्व शरीरात साठविले जात नसल्यामुळे पित्तलवणांच्या अभावी काही दिवसांतच रक्तकथ्‍थनविषयक (रक्त साखळण्यासंबंधीचे) दुष्परिणाम दिसू लागतात. 

पित्तलवणांमुळे अग्‍निपिंड रसातील [  ⟶ अग्‍निपिंड ] अमिलेज, ट्रिप्सीन आणि विशेषकरून लायपेज या एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थांची)क्रियाशीलता वाढते. याशिवाय पित्तलवणामुळेच कोलेस्टेरॉल विद्राव्य अवस्थेत राहते. 

कोलेस्टेरॉल : पित्तरसातील दुसरा महत्त्वाचा घटक कोलेस्टेरॉल असून त्यासंबंधीची माहिती स्वतंत्र नोंदीत दिली आहे [  ⟶ कोलेस्टेरॉल ]. 

पित्तरंजक : पित्तरसाचा रंग त्यामधील पित्तरंजकावर अवलंबून असतो. मानवी पित्तरसाचा रंग त्यात प्रामुख्याने असणार्‍या ] पित्तारूण (बिलीरूबीन) नावाच्या पित्तरंजकावर अवलंबून असतो. शाकाहारी प्राण्यांचा पित्तरस गडद हिरवा असतो व मांसाहारी प्राण्यांचा पित्तरस तांबूस पिवळा असतो. पित्तरंजके दोन आहेत : पित्तारूण व पित्तहरिती (बिलीव्हर्डीन). भेकांच्या (मोठ्या प्रकारच्या बेडकांच्या) पित्तरसात फक्त पित्तहरितीच असते. म्हणून इतर सस्तन प्राण्यांतील काविळीत त्वचा व ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे समूह) जशी पिवळी पडतात तशी या प्राण्यांच्या काविळीत पिवळी न होता ती फक्त हिरव्याच रंगाची होतात [  ⟶ कावीळ ]. 

पित्तरसाचे उत्पादन : सुरूवातीस सांगितल्याप्रमाणे पित्तरसाचे उत्पादन सतत चालू असते व ते तंत्रिका (मज्‍जा) नियंत्रणविरहित असते. तरीदेखील प्राणेशा तंत्रिकेच्या उद्दीपनामुळे स्त्रवण वाढते व याउलट अनुकंपी तंत्रिका उद्दीपनामुळे कमी होते [  ⟶ तंत्रिका तंत्र ]. उपवास आणि पैत्तिक नाडीव्रणामुळे [  ⟶ नाडीव्रण ] त्याचे उत्पादन कमी होते. काही पदार्थ तोंडाने सेवन केल्यास वा अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास यकृतातील पित्तस्त्रवण वाढते. अशा पदार्थांना ‘पित्तवर्धके’ म्हणतात. पित्ताम्‍ले व पित्तलवणे सर्वांत जास्त प्रभावी पित्तवर्धके आहेत. औषधी पदार्थांमध्ये ऑटोफान, इसेरीन आणि पायलोकार्पीन, तसेच अन्नपदार्थांतील वसा आणि वसाम्‍ले हे पदार्थही पित्तवर्धक आहेत. अधिक प्रथिनयुक्त आहारामुळे पित्तलवणांचे स्त्रवण वाढते, तर अधिक कार्बोहायड्रेटे असलेल्या आहारामुळे कमी होते. 

शरीरात शिरलेल्या अनेक वसाविद्राव्य पदार्थांचे पित्तरसामार्फत उत्सर्जन होते. या घटनेचा यकृत क्रिया परीक्षा, पित्तवाहिनीचित्रण व पित्ताशयचित्रण करण्यासाठी उपयोग करतात [  ⟶ पित्ताशय ]. 

संदर्भ : 1. Brobeck, J. R. Ed. Best and Taylors Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1973.

  2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1976.

  3. Keele, C. A. Neil, E., Ed. Samson Wright’s Applied Physiology, London, 1971.

भालेराव, य. त्र्यं.