पाश्चर, लूई (ल्बी) : (२७ डिसेंबर १८२२ – २८सप्टेंबर १८९५). फ्रेंच सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. विज्ञानाच्या प्रगतीत आपल्या विविध क्षेत्रांतील संशोधनाने त्यांनी मौल्यवान भर घातली. सूक्ष्मजंतू हे काही रोगांना तसेच कार्बनी (जैव) पदार्थांच्या ⇨ किण्वनाला (आंबण्याला वा कुजण्याला) कारणीभूत असतात, हे त्यांनी सिद्ध केले. ⇨ अलर्क रोग (पिसाळ रोग), सांसर्गिक काळपुळी [→ काळपुळी, संसर्गजन्य] आणि कोंबड्यांतील पटकी [कॉलरा→कुक्कुटपालन] या रोगांवरील प्रतिबंधक लस शोधून ती वापरणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत.
फ्रान्समधील व इतर देशांतील मद्यनिर्मिती व रेशीम उत्पादन या धंद्यांना पडत्या काळात आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून ऊर्जितावस्था आणण्यास ते कारणीभूत झाले. ⇨ त्रिमितीय रसायनशास्त्राचा पाया घालण्याच्या कार्यात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला होता. द्रव अन्न (उदा., दूध) आणि मादक पेये टिकाऊ बनविण्याकरिता तसेच त्यांमधील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याकरिता सौम्य उष्णता उपचाराची त्यांनी शोधून काढलेली पद्धत आजही त्यांच्या नावावरून ‘पाश्चरीकरण’ म्हणूनच संबोधिली जाते [→पाश्चरीकरण].
त्यांचा जन्म दोल येथे शालेय शिक्षण आर्ब्वा येथे झाले. उच्च शिक्षणाकरिता ते रॉयल कॉलेज, बझाँसाँ येथे दाखल झाले व १८४० मध्ये त्यांनी ‘बॅचलर ऑफ लेटर्स’ ही पदवी मिळविली. १८४२ मध्ये रसायनशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर १८४३ मध्ये पॅरिसमधील एकोल नॉर्मेल या उच्च शिक्षणसंस्थेत पुढील शिक्षणाकरिता त्यांची चौथ्या क्रमांकाने निवड झाली. सॉरबॉन विद्यापीठात जे.बी.ए. द्यूमा यांची व्याख्याने ऐकल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्राच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले. १८४७ मध्ये त्यांनी ‘डॉक्टर ऑफ सायन्सेस’ ही पदवी मिळविली. त्यानंतर एकोल नॉर्मेलमध्ये रसायनशास्त्राचे प्रयोगशिक्षक (१८४६-४८), लील येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक व विज्ञान शाखेचे मुख्याधिकारी (१८५४ – ५७), एकोल नॉर्मेल येथे विज्ञानाभ्यासाचे संचालक व प्रशासक (१८५७ -६७) अशा विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी सॉरबॉन येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१८६७-७४) आणि एकोल नॉर्मेलमध्ये शरीरक्रियावैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक (१८६७-८८) म्हणून कार्य केले. शेवटी १८८८ मध्ये त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात आलेल्या पाश्चर इन्स्टिट्यूटचे ते संचालक झाले व मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच काम केले.
पाश्चर यांचे सुरुवातीचे कार्य (१८४७-५७) स्फटिकविज्ञानासंबंधी होते. रॅसेमिक (ज्याचे तरंग एकाच प्रतलात कंप पावतात अशा म्हणजे प्रतल-ध्रुवित प्रकाशाचे प्रतल-डावीकडे वा उजवीकडे न वळविणाऱ्या म्हणजेच प्रकाशीय दृष्ट्या निष्क्रिय असलेल्या) अम्लाच्या स्फटिकांचा अभ्यास करून त्यांनी प्रकाशीय समघटकतेचा शोध लावला [→समघटकता त्रिमितीय रसायनशास्त्र]. या शोधाबद्दल त्यांना ‘सिव्लेलिअर ऑफ द इंपीरियल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा सन्मान आणि पॅरिस येथील औषधनिर्मात्यांच्या संघटनेतर्फे रॅसेमिक अम्ल संशोधनविषयक पारितोषिक मिळाले. त्यांच्या स्फटिकविज्ञानविषयक कार्याबद्दल त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने रम्फर्ड पदक दिले.
त्यांचे किण्वन व स्वयंजनन यांच्याविषयीचे कार्य, तसेच शिर्का (व्हिनेगर) व अल्कोहॉल यांचा अभ्यास १८५७-६५ या काळात झाला. लील येथे असताना त्यांचे लक्ष किण्वन क्रियेकडे गेले. यीस्ट वापरून साखरेपासून अल्कोहॉल तयार करणाऱ्या एका कारखानदाराने त्यांचा सल्ला विचारला. त्यामुळे या विषयाच्या अभ्यासास त्यांनी सुरुवात केली व किण्वन क्रियेकरिता सूक्ष्मजंतूंची गरज असते, हे त्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर किण्वन क्रियेविषयीचे काही सिद्धांत त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. त्याकरिता गाळून शुद्ध केलेली हवा, तसेच आल्प्स पर्वतावरील हवा यांचा किण्वन क्रियेवर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासला. किण्वन क्रियेस कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू हवेतच असतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यामुळे त्या काळी प्रचलित असलेला सूक्ष्मजंतूंबद्दलचा स्वयंजनन सिद्धांत पार कोलमडला. हवेतील सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व सिद्ध होताच इंग्लंडमध्ये ⇨ जोसेफ लिस्टर यांना शरीरावरील जखमा दूषित होण्याचे कारण सूक्ष्मजंतूच असावेत अशी कल्पना सुचली व त्यांनी निर्जंतुकीकरणाकरिता कारबॉलिक अम्ल वापरून पाहिले. त्यांचा प्रयोग यशस्वी ठरताच ‘निर्जंतुक शस्त्रक्रिये’चे तत्त्व अमलात आले.
पाश्चर यांनी १८६५-७० या काळात रेशमाच्या किड्यांच्या रोगाबद्दल संशोधन केले. त्या वेळी रोगामुळे रेशीम उत्पादनाचा धंदा धोक्यात आला होता. सरकारने नेमलेल्या समितीचे सभासद म्हणून दक्षिण फ्रान्समधील रेशीम उत्पादन करणाऱ्या विभागाची त्यांनी पाहणी केली. तीन वर्षानंतर रोगास कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू व रोगप्रतिबंधक उपाय त्यांनी शोधून काढले आणि अशा रीतीने या धंद्याचा बचाव होण्यास मदत झाली.
मध्यंतरी १८६८ मध्ये मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांना सौम्य पक्षाघात झाला परंतु त्या अवस्थेतही त्यांचे किण्वन क्रियेवरील संशोधन चालूच होते. १८७६ मध्ये त्यांचा या क्रियेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध प्रसिद्ध झाला व त्याचे इंग्रजी भाषांतर (स्टडीज इन फरमेंटेशन) १८७९ मध्ये प्रसिद्ध झाले.
फ्रान्समध्ये १८८० साली कोंबडीच्या पिलांत पटकीच्या रोगाची लागण होऊन १०% कोंबड्यांची पिले मरण पावली. या रोगास कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू पाश्चर यांनी शोधून काढले. क्षीण बनविलेल्या अशा सूक्ष्मजंतूंपासून प्रतिबंधक लस बनवून ती त्यांनी निरोगी कोंबड्यांना टोचली. त्यामुळे रोगाचा फैलाव थांबला. त्यानंतर दुभती जनावरे व शेळ्या-मेंढ्यांत होणाऱ्या सांसर्गिक काळपुळी या रोगाचे सूक्ष्मजंतू शोधून त्यांनी या रोगावरील प्रतिबंधक लस तयार केली. डुकरांच्या धावरे [→डुक्कर] या रोगावरही त्यांनी प्रतिबंधक लस १८८३ मध्ये शोधून काढली.
पाश्चर यांचा अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे अलर्क रोगावरील प्रतिबंधक लस शोधणे हा होय. या रोगावर खात्रीशीर इलाज अजूनपर्यंत सापडलेला नाही व हा रोग झाल्यास रोगी मरणार हे निश्चित असते. या रोगावरील प्रतिबंधक लस शोधण्याकरिता प्रथम त्यांनी रोगी प्राण्यांची लाळ वापरून पाहिली. पुढे या रोगाचे सूक्ष्मजंतू तंत्रिका तंत्रात (मज्जा संस्थेत) असावेत अशी त्यांची खात्री झाली. १८८५ मध्ये एका बालकास पिसाळलेले कुत्रे चावले व त्याच्या आईने पाश्चर यांना त्याच्यावर इलाज करण्यास विनंती केली. त्या बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याच्या तंत्रिका तंत्रापासून मिळविलेल्या व क्षीण बनविलेल्या सूक्ष्मजंतूंपासून तयार केलेली लस टोचण्याचा उपचार केला आणि बालकास अलर्क रोग झाला नाही, असे दिसून आले. तेव्हापासून अलर्क रोग प्रतिबंधक लस अंतःक्षेपणाने(इंजेक्शनाने) वापरण्याचा इलाज जगभर चालू आहे.
त्यांच्या या यशामुळे प्रभावित होऊन जनतेने २५ लक्ष फ्रँक वर्गणी गोळा केली व तीमधून पॅरिस येथे अलर्क रोगाच्या अभ्यासाकरिता व प्रतिबंधाकरिता ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’ नावची संस्था १८८८ मध्ये स्थापन केली. नंतर या संस्थेच्या फ्रान्समध्ये व इतर देशांतही शाखा काढण्यात आल्या.
त्यांना रम्फर्ड पारितोषिकाशिवाय माँत्याँ पारितोषिक, झेकर पारितोषिक, कॉप्ली पदक, झां रेनो पारितोषिक, सन्माननीय एम्.डी (बॉन विद्यापीठ), ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर इ. अनेक मानसन्मान मिळाले.
बॉन विद्यापीठाने दिलेली एम्.डी. पदवी त्यांनी १८७० – ७१ मधील फ्रान्स-प्रशिया युद्धातील जर्मनांच्या अमानुष वर्तनाच्या निषेधार्थ परत केली. त्यांनी विपुल शास्त्रीय लेखन केले आहे. त्यांच्या सर्व लेखांचा एकत्रित संग्रह (सात भाग) त्यांचे नातू जे.एल. पाश्चर व्हॅलेरी-रादोत यांनी १९२२ – ३९ या काळात प्रसिद्ध केला.
ते पॅरिसच्या सॅ-क्लोद या उपनगराजवळ मरण पावले.
संदर्भ : 1. Dubos, R.J. Pasteur, Free Lance of Science, London, 1951. 2. Vallery-Radot, J.L.P. Louis Pasteur, New York, 1958.
भालेराव, य.त्र्यं
“