पावेसे, चेझारे : (९ सप्टेंबर १९०८ – २७ ऑगस्ट १९५०). इटालियन कादंबरीकार. इटलीमधील सांतॉ स्तेफानॉ बेल्बॉ ह्या छोट्या शहरी त्याचा जन्म झाला. विख्यात अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन ह्याच्या कवितेवर प्रबंध लिहून तूरिन विद्यापीठातून तो पदवीधर झाला. त्यानंतर La Cultura नावाचे एक फॅसिस्टविरोधी नियतकालिक त्याने चालविले. १९३५ मध्ये इटालियन सरकारने त्याला अटक करून तीन वर्षांच्या बंदीवासासाठी त्याची दक्षिण इटलीत रवानगी केली. १९३६ मध्ये त्याला माफी देण्यात आली आणि तो तूरिनला परतला.
अमेरिकन साहित्य आणि साहित्यिक ह्यांच्याविषयी पावेसेला नेहमीच प्रेम वाटत आलेले होते आणि पदवीधर झाल्यानंतर विविध अमेरिकन साहित्यकृतींच्या इटालियन अनुवादाचे काम त्याने हाती घेतले होते. १९३६ नंतरच्या काळात ते त्याने अधिक जोमाने सुरू केले. पावेसेने ज्यांचे साहित्य अनुवादिले अशा अमेरिकन लेखक-लेखिकांत अर्नेस्ट हेमिंग्वे, गर्ट्रड स्टाइन, विल्यम फॉकनर, जॉन स्टांइनबेक, जॉन डॉस पॅसॉस आदींचा समावेश होतो. हर्मन मेलव्हिल ह्या अमेरिकन कादंबरीकाराचा पावेसेवर मोठा प्रभाव होता त्याची मोबीडिक ही विख्यात कादंबरी पावेसेने इटालियनमध्ये आणली. फॅसिस्टराजवटीच्या काळातील नियंत्रणांमुळे गुदमरलेले इटालियन साहित्यिक आणि बुद्धिमंत मानवी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून अमेरिकेकडे पाहत होते. पावेसेला अमेरिकेबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामागे हा एक महत्त्वाचा संदर्भ होता. अमेरिकन साहित्यावर पावेसेने एक समीक्षा-ग्रंथही लिहिला (१९५१, इं.भा. अमेरिकन लिटरेचर, एसेज अँड ओपिनयन्स, १९७०). आपल्या अनुवादांनी आणि लेखांनी अमेरिकन साहित्याबद्दल इटलीत आस्था निर्माण करण्याचे कार्य पावेसेने केले.
पावेसेच्या स्वतंत्र कथा-कादंबऱ्या मुख्यतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात प्रकाशित झालेल्या आहेत. आधुनिक जीवनात व्यक्तीच्या वाट्याला येणारे दूरत्व आणि एकाकीपण (एलिअनेशन) हा त्याच्या कथाकादंबऱ्यांतून हाताळतला गेलेला एक महत्त्वाचा विषय. अनेकदा माणसाच्या अस्तित्वविषयक प्रश्नांना खोलवर जाऊन त्याने स्पर्श केलेला आहे. मिथ्यकथा, प्रतीके आणि मूलाकार (आर्किटाइप्स) ह्यांच्या वाङ्मयीन महत्त्वाची तीव्र जाणीवही त्याला होती. एक प्रकारच्या अस्वस्थ ओढीने भूतकाळात डोकावून पाहण्याची प्रवृत्तीही पावेसेमध्ये आढळते. गद्याला कवितेची उत्कट अभिव्यक्तिक्षमता प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. La luna e i falo (१९५०, इं.भा. द मून अँड द बॉनफायर्स, १९५२) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. वाया गेलेल्या भूतकाळाची शोकात्म जाणीव ह्या कादंबरीतून उत्कटपणे व्यक्त झालेली आहे. निवेदक आणि त्याचा मित्र ह्यांच्या स्मरणांतून ही कादंबरी आकार घेते भावोत्कट काव्यात्मतेचा एक स्रोत तीतून वाहत राहिलेला आहे. ह्या कादंबरीचा उपर्युक्त इंग्रजी अनुवाद अमेरिकेन कादंबरीकार सिंक्लेअर ल्यूइस ह्याने केलेला आहे. पावेसेच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्यांत Paesi tuoi (१९४१, इं.भा. द हार्व्हेस्टर्स, १९६१), La spiaggia (१९४२, इं.शी. द बीच), It compagno (१९४७, इं.भा. द. कॉम्रेड, १९५९), Prima che il gallo canti (१९४९, इं. शी. बिफोर द कॉक क्रोज) आदींचा अंतर्भाव होतो. Dialoghi con Leuco (१९४७, इं.भा. डाय् लॉग्ज विथ ल्यूको, १९६५) हे पावेसेने लिहिलेले एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक. त्यात मिथ्यकथांच्या जगातील व्यक्तींचे संभाषण दाखविले असून त्याच्या द्वारा मानवाच्या स्थिति-नियतीविषयीचे विचार व्यक्त केले आहेत.
पावेसेने आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ कवी म्हणूनच केला होता. त्याच्या उत्कृष्ट भावकविता ‘डेथ विल स्टेअर ॲट मी आउट ऑफ यूअर आइज’ (१९५१) अशी इंग्रजी शीर्षकार्थाच्या संग्रहात अंतर्भूत आहेत. त्याच्या काही कवितांचे इंग्रजी अनुवाद अ मॅनिआ फॉर सॉलिटयूड, सिलेक्टेड पोएम्स १९३०-१९५० ह्या नावाने संगृहीत आहेत (१९६९). तूरिन येथे त्याने आत्महत्या केली.
कुलकर्णी, अ.र.