पाराना : अर्जेंटिनाच्या एंत्रे रीओस प्रांताची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या १,२७,८३६ (१९७० अंदाज). ब्वेनस एअरीझच्या वायव्येस सु. ३८७ किमी. पाराना नदीकाठी हे शहर वसले असून अर्जेंटिनामधील अत्यंत सुंदर नगरांत त्याची गणना होते. पारानाच्या अासमंतातील शेतमाल, तसेच गुरे, मेंढ्या यांची निर्यात येथूनच होते. पाराना शहर लोहमार्ग व रस्ते यांनी बंदराशी जोडलेले असून येथे एक विमानतळही आहे. सांता फे येथून आलेल्या वसाहतकऱ्यांनी १७३० मध्ये पारानाची ‘बाजादा द सांता फे’ या नावाने स्थापना केली. १८५३-६२ पर्यंत ही अर्जेंटिना महासंघराज्याची राजधानी होती. अन्नपदार्थ, सिमेंट, कातडी वस्तू यांचे निर्मितिउद्योग येथे आहेत. शहराच्या मध्यभागातील सान मार्तीन प्लाझा, कारंजी व स्वातंत्र्ययोद्धाचा पुतळा, प्लाझाच्या पूर्वेकडील कॅथीड्रल, बिशपचा राजवाडा आणि ललित कला संग्रहालय, ऊरकीसा उद्यान, अर्जेंटिनाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जोस द ऊरकीसा याचे निवासस्थान इ. प्रेक्षणीय आहेत.