पारवा : कोलंबिडी या पक्षिकुलात पारव्याचा समावेश केला जातो. याचे शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया हे आहे. भूमध्य समुद्राच्या भोवतालचे देश, ग्रेट ब्रिटन, आफ्रिका, पॅनेस्टाइन, तुर्कस्तान, भारत, श्रीलंका आणि ब्रम्हदेशात हा आढळतो. भारतात तो सगळीकडे आणि हिमालयात ३,९६० मी. उंचीपर्यंत आढळतो. रानटी पारवे खडकाळ डोंगर आणि कडे असणार्या. उघड्या प्रदेशात राहतात. अर्धवट माणसाळलेले पारवे पडक्या इमारती, विहिरी, देवळे, जुनेपुराणे किल्ले वगैरे ठिकाणी राहतात.
हा पक्षी साध्या कावळ्यापेक्षा लहान असतो. शरीर डौलदार व सुटसुटीत असते. सगळ्या शरीराचा रंग करडा निळा किंवा पारवा असतो मान आणि छातीच्या वरच्या भागावर हिरव्या, अंजिरी, किरमिजी इ. रंगांची चमक दिसून येते पंखांवर दोन आणि शेपटीच्या टोकाजवळ एक असे आडवे काळे पट्टे डोळ्यांचा रंग नारिंगी चोच काळी पाय तांबडे. नर आणि मादी यांचे स्वरूप सारखेच असते. यांचे लहानमोठे थवे असतात.
रानात राहणारा हा पक्षी⇨कावळा व⇨चिमणी यांच्याप्रमाणेच मनुष्याच्या आसऱ्याला येऊन राहिलेला आहे
पण वरील दोन्ही पक्ष्यांप्रमाणे तो त्रासदायक नसतो. तो गरीब आहे. कोणत्याही गावात अथवा खेड्यात पारवे कमी-जास्त प्रमाणात असतातच. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर त्यांची माणसांप्रमाणेच गर्दी झालेली दिसते. मनुष्यवस्तीची गजबज अंगवळणी पडल्यामुळे हे धीट बनतात व माणसे अगदी जवळ आली, तरी उडून जात नाहीत.
पारवे सर्व प्रकारचे धान्य खातात. रानात राहणारे पारवे नियमाने जवळपासच्या शेतात जाऊन धान्याचे दाणे टिपतात. चोच विशेष मजबूत नसल्यामुळे ते संबंध दाणे गिळतात. गावात राहणारे पारवे मिळेल तेथून धान्य टिपीत असतात. हे पक्षी ‘गुटुर-गूं, गुटुर-गूं’ असा आवाज काढतात.
नर व मादी नेहमी एकमेकांच्या जवळ असतात. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम असते. पुष्कळदा नर मान फुगवून, शेपटी पसरून घूं घूं असा आवाज काढीत मादीभोवती नाचतो. दोघेही चोचीने एकमेकांची पिसे साफसूफ करताना पुष्कळदा दिसतात. सबंध वर्षभर या पक्ष्याची वीण चालू असते ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच त्यात काहीसा खंड पडतो. खडकांच्या किंवा पहाडांच्या कपारीत किंवा ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून सुरक्षित अशा एखाद्या ठिकाणी थोड्या काटक्या, चिंध्या, पिसे वगैरे पसरून थोडेसे खोलगट घरटे तयार केलेले असते. गावातले पारवे भिंतीतील भोके, कोनाडे, घरांच्या वळचणी इ. ठिकाणी घरटी बांधतात. मादी दर खेपेस दोन पांढरी स्वच्छ अंडी घालते. अंडी फुटून पिल्ले बाहेर पडायला १५-१६ दिवस लागतात.
कर्वे, ज. नी.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..