मानवशास्त्र : मानवप्राणी व त्याच्या कार्याचा सांगोपांग व सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. मानवशास्त्राव्यतिरिक्त इतर शास्त्रांतही मानवविषयक अध्ययन होते परंतु ते एकांगी असते. जीवविज्ञाने उदा., प्राणिविज्ञान, आनुवंशिकी, भ्रूणविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान इत्यादींत मानवप्राण्याचा जीवविषयक अभ्यास केला जातो. तसेच सामाजिक विज्ञानांत उदा., अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींत मानवी स्वभावविषयक व कार्यविषयक चर्चा केली जाते. मानवशास्त्रात जीवविज्ञानांतील व सामाजिक विज्ञानांतील सर्व शाखांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्याअर्थी मानवशास्त्राची व्याप्ती मोठी आहे.

मानवशास्त्रात मानवाचा प्राणी−जगतातील एक घटक–जीव (सभासद)–या अर्थी अभ्यास होतो. तसेच मानव–समाजाचा एक सभासद म्हणून त्याच्या आचरणाचे वा वागणुकीचे परीक्षण केले जाते. मानवशास्त्रात, अमक्या–तमक्या प्रकारच्या मानवसमूहांचे अध्ययन करावे किंवा इतिहासातील एका विशिष्ट कालखंडाची मर्यादा घालावी, असेही नाही. मानवशास्त्रज्ञ पुरातन काळातील मानव व त्याची संस्कृती यांबाबत जितका उत्सुक असतो, तितकाच तो वर्तमानकाळातील (आधुनिक) मानव व त्याच्या कार्याबद्दलही जिज्ञासू वृत्ती बाळगतो. मानवशास्त्रात अतिप्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या व होत असलेल्या मानवप्राण्याच्या व त्याच्या संस्कृतीच्या विकासाचा अभ्यास केला जातो. तसेच मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक पैलूंच्या परस्परावलंबनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

 मानवप्राणी आनुवंशिकता व परिस्थिती यांच्या प्रक्रियेतून निर्माण झाला आहे. मानवप्राणी, त्याची विचारसरणी आणि वर्तन यांपैकी किती भाग आनुवंशिक असतो व किती भाग परिस्थिती ठरवते, हा विवाद्य व अभ्यासनीय विषय आहे.

प्राणिशास्त्रदृष्ट्या मानव एकजातीय प्राणी आहे. मानवप्राणी व प्राणिजगतातील इतर प्राण्यांत काय साम्य किंवा फरक आहेत, मानवप्राण्याचे वैशिष्ट्य काय, त्याचे तुलनात्मक अध्ययन मानवशास्त्र करते. मानवसमाज, मानवसंस्कृती एक आहे परंतु त्यात कितीतरी भिन्न प्रकार सापडतात. एकाच मानवजातीच्या देशभेदाने व कालभेदाने आचारविचारांत भिन्न कुटुंबसंस्था, भिन्न कुले, भिन्न जमाती, भिन्न प्रदेश, शासने, राज्ये, धर्म यांच्यात भिन्नता का? याचा विचार करावयाचा असतो. भाषा, खाणेपिणे, खेळ, शिष्टाचार, विवाह पद्धती, जयंती–मयंती–समारंभ, धार्मिक विधी, मूल्ये इ. संस्कृतीच्या सर्व अंगप्रत्यंगांत फरक आढळतात. त्याचे कारण काय? भारतीय संस्कृती आपण एक मानतो. तरी तीत महाराष्ट्रीय, बंगाली, पंजाबी, तमिळ, गुजराती इ. प्रादेशिक भेद आहेतच. तसेच महाराष्ट्रातही आचारविचारांत अनेक भेद आहेत. या साम्य−भिन्नतेचा ऊहापोह मानवशास्त्रात केला जातो.

तत्त्वज्ञानात आत्मज्ञानास बरेच प्राधान्य आहे. मानवशास्त्रात वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करून मानवाबद्दचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. पोशाख न घालणारे लोक व तऱ्हेतऱ्हेचेपोशाख घालणारे लोक अग्नी निर्माण न करू शकणारे लोक तसेच अणु−इंधन निर्माण करून चंद्रावर भराऱ्या मारणारे लोक बहुपत्नी विवाही लोक तसेच सासूशी विवाहबद्ध होणारे लोक गायीचे दूध निषिद्ध मानणारे व त्याउलट पवित्र समजणारे लोक नद्या–पर्वत–झाडांची पूजा करणारे किंवा निरीश्वरवादी तसेच कला, संगीत, साहित्य यांचे वेगवेगळे व परस्परविरोधी, भिन्न भिन्न आविष्कार दाखविणारे लोक, या सर्वांचा अभ्यास मानवशास्त्रात केला जातो.

प्राणी–जगतात मानवाचे स्थान अद्वितीय आहे. मानवाचे इतर प्राण्यांशी बरेच साम्य असले, तरी काही अंशी तो इतरांपेक्षा अगदी भिन्न आहे. मानव दोन पायांवर नैसर्गिक रीत्या उभा राहणारा एकमेव प्राणी आहे. मानवाचा मेंदू जटिल असतो. हातांची, पायांची व पाठीच्या कण्याची रचना इतर प्राण्यांपेक्षा अगदी वेगळी असते. हाताचा उपयोग चालण्यास मदत करण्यात केला जात नाही.


मानवाचे खरे वैशिष्ट्य त्याच्या आचारविचारांत जाणवते. संस्कृतीविहीन मानव असत नाही. मानवाजवळ काही भौतिक वस्तुरूप उपकरणे असतात. तसेच अन्न मिळविण्याची सोपी व जटिल तंत्रे, श्रमविभाजन, सामाजिक व राजकीय संघटना, धर्मव्यवस्था आणि एकमेकांशी बोलण्याकरिता भाषा अशी सांस्कृतिक सामग्रीही असते. मानवेतर प्राण्यांत ही सांस्कृतिक वैशिष्ट्ये सापडत नाहीत. याउलट, विशिष्ट शरीररचनेमुळे काही प्राणी रात्री अंधारात पाहू शकतात. कुत्र्याची श्रवणशक्ती माणसाच्या श्रवणशक्तीपेक्षा तीव्र असते परंतु कुत्रा माणसाप्रमाणे दगड उचलून फेकू शकत नाही किंवा गणितातील जटिल प्रश्न सोडवू शकत नाही. मानवाच्या वर्तनाचा उगम व शारीरिक रचनेचा उगम, त्याची इतर प्राण्यांशी तुलना करून कदाचित समजू शकेल.

 इतर प्राणी एका विशिष्ट नैसर्गिक (परिस्थिती) वातावरणातच जिवंत राहू शकतात. परंतु मानव कुठल्याही वातावरणात राहू शकतो कारण आवश्यकतेनुसार त्याला कपडेलत्ते, घर, वातानुकूलता निर्माण करता येते. मानवाच्या संस्कृतीमुळे कोठल्याही पर्यावरणात राहणे मानवास जमते. संस्कृतीची निर्मिती भाषेशिवाय शक्य झाली नसती. एका समाजातील लोकांना भाषेमुळे एकमेकांशी सुरळीतपणे व्यवहार करता येतात. तसेच मानवाला आपले अनुभव व ज्ञान संचित करता येते.

मानवाच्या वेगवेगळ्या वातावरणात राहण्यामुळे त्याच्या शरीररचनेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भिन्न भिन्न शरीररचना असणारे मानव आपणास पहावयास मिळतात. तसेच मानवी संस्कृती आणि भाषांमध्येही अनेकविध वैचित्र्य आढळते.

 मानवाचा उगम साधारणतः चौदा ते पंधरा दशलक्ष वर्षांपूर्वी झाला, असे सिद्ध झाले आहे. त्याचे मूळ वसतिस्थान आफ्रिकेत असावे. तेथून मानवाचा संचार हळूहळू सर्व जगभर झाला असावा. आज आपणास भिन्न वंशीय मानवी समाज आढळतो. तसेच आचारविचारांतही भिन्नता आढळते.

या विवेचनावरून, मानवशास्त्रातील मूलगामी तत्त्वांची व समस्यांची कल्पना येते. मानवशास्त्रात, मुख्यतः मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक विकासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो मानवशास्त्रज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सतत चालू असतो : (१) मानवप्राण्याचे मूळ उगमस्थान जर एकच आहे, तर मानवात भिन्न वंश का व कसे ? (२) मानवाची संस्कृती व भाषा जर मानवनिर्मित आहे, शिकून मिळणारी आहे, आनुवंशिक नाही, तर त्यात एवढी भिन्नता का ? (३) संस्कृतीचे स्वरूप काय व ती कशी बदलते ? (४) संस्कृती व व्यक्तिमत्त्व यांचे परस्परसंबंध काय आहेत ? या प्रश्नांचा विचार करण्यासाठी जगातील मानवांचा व त्यांच्या संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास मानवशास्त्रात केला जातो. त्याद्वारे मानवांतील वंश व संस्कृती यांच्यातील साम्य व भेद समजण्याचा प्रयत्न केला जातो. तुलनात्मक अभ्यासपद्धती मानवशास्त्रातील मूलभूत अभ्यासपद्धती समजली जाते. मानवविषयक अध्ययनाची व्याप्ती मोठी आहे. ती एका शास्त्रास झेपणारी नाही. मानवविषयक वेगवेगळ्या पैलूंचे अध्ययन करण्यासाठी मानवशास्त्राची विभागणी वेगवेगळ्या शाखांमध्ये झाली आहे. यांपैकी काही शाखा स्वतंत्र शास्त्र म्हणून प्रचलित झाल्या. तरीसुद्धा मानवशास्त्र हे एक पूर्ण व स्वतंत्र शास्त्र म्हणून आजयगायत टिकून आहे. जरी मानवशास्त्र हाताळण्यात येणारे संशोधन व इतर शास्त्रांतील संशोधन परस्परव्यापी असले, तरी मानवशास्त्रीय दृष्टिकोण व शोध घेण्याच्या पद्धती स्वतंत्र असतात. त्यांच्या मानवशास्त्रीय सिद्धांताशी निकटचा संबंध असतो.

 मानवशास्त्राचे दोन मुख्य विभाग : भौतिक (शारीरिक) मानवशास्त्र व सांस्कृतिक मानवशास्त्र. या दोहोंचे अनेक उपविभाग आहेत. शारीरिक मानवशास्त्र : या मानवशास्त्रात मानवप्राणी आणि त्याचे विविध प्रकार, यांच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो. यात वंश (प्राचीन), मानव (फॉसिलमॅन), मानवेतर नरवानर गण (प्राणी) इत्यादींविषयक अध्ययन अंतर्भूत आहे. मानवाचे प्राणिजगतातील स्थान निश्चित करणे, हा शारीरिक मानवशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. मानवाच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी जीव−प्रकारांचे स्वरूप तसेच प्राणिजीवनाचा विकास समजणे आवश्यक असते. शारीरिक मानवशास्त्रज्ञ मानवाच्या शारीरिक वैशिष्ट्यांच्या विकासावर भर देतो. अतिप्राचीन मानवाचे अवशेष (जीवाश्मे) त्याकरिता फार उपयोगी असतात. अतिप्राचीन मानवाची आपापसांत तुलना करून व वर्तमान मानवांशी तुलना करून मानवाच्या शरीररचनेच्या विकासावर प्रकाश पडतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो : (१) सर्वप्रथम मानव कोठे व केव्हा उगम पावला ? (२) ते मानव कसे दिसत होते व त्यांचे आपापसांत काय संबंध होते ? (३) या काळात आजपर्यंत मानवाचे शारीरिक गुण कसकसे बदलत गेले ? (४) त्यांची संस्कृती कोणत्या प्रकारची होती ?


शारीरिक मानवशास्त्रज्ञ, अतिप्राचीन मानवांचे प्रकार, मानवसदृश कपी व माकड यांचा तुलनात्मक अभ्यास करतो व त्यातून मानवी विकासाची दिशा ठरवतो. मानवसदृश कपींच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवाच्या आचारविचारांच्या उगमाबद्दल काही अदमास करता येतात.

 चार्ल्स डार्विनने १८५९ मध्ये द ऑरिजिन ऑफ स्पीशीज नामक पुस्तक लिहिले व १८७१ मध्ये द डीसेंट ऑफ मॅन लिहिले. त्यांत मानवाचा विकास खालच्या प्राणिजीवांपासून झाला, असा सिद्धांत मांडला आहे. तो सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे. या विकासाचा सर्वांगीण अभ्यास शारीरिक मानवशास्त्रात होतो.

 मानव नैसर्गिक व स्वनिर्मित परिस्थितीत वावरत असतो. या परिस्थितीचा मानवाच्या शरीररचनेवर परिणाम होतो. काही मानवी समूहांत जवळच्या नातेवाईकांशी विवाह करण्याची रीत असते, तर इतरांत तसा विवाह निषिद्ध समजला जातो. या सामाजिक नियमांचा शतकानुशतके वापर झाल्याने शरीररचनेवर परिणाम होतो. शारीरिक मानवशास्त्रात मानव व परिस्थिती यांच्या परस्परसंबंधाची चर्चा केली जाते.

 मानवशास्त्राच्या या विभागात मानवाच्या वंशाचाही अभ्यास केला जातो. केसांचे प्रकार, डोळ्यांचे रंग, नाक व मस्तकाचे प्रकार, उंची इ. घटकांचा तुलनात्मक अभ्यास करून मानवसमाजाचे शरीररचनेनुसार वर्गीकरण करण्यात येते. या गटास वंश म्हणतात. हे वंश कसे निर्माण झाले ? वंशाचा मानवाच्या संस्कृतीशी, बुद्धिमत्तेशी संबंध असतो का ? काही विशिष्ट वंशीय लोकांत विशिष्ट रोगाचे प्रमाण कमी–जास्त असते का ? हे प्रश्न अभ्यासनीय आहेत. मानवसमूहांची शरीरविषयक तुलना करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे माप घेत असत, त्यास मानवमिती म्हणतात. आता आनुवंशिकताशास्त्राचा विकास झाल्याने आनुवंशिकतेचा अभ्यास जास्त परिणामकारक रीत्या करता येतो. मानवामानवांत आनुवंशिक साम्य आणि फरक काय असतात ? त्यांचा उगम अथवा लोप कसा होतो ? दोन मानवसमूहांतील साम्य वा फरक आनुवंशिकतेच्या तत्त्वाने समजण्यासारखा आहे का ? आनुवंशिकता, रोग व मानवसमूह यांचे संबंध काय असतात ? असल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शारीरिक मानवशास्त्रज्ञ आनुवंशिकतेचा अभ्यास करतात. रक्तगटाच्या अभ्यासावर भरदेण्यात येतो. रक्तगट जरी व्यक्तीत बदलत असले, तरी त्यांच्या एका पिढीतून दुसऱ्यापिढीतल्या संचारणात सुसूत्रता आढळून येते.

वंश शरीररचनेवर आधारलेला एक वर्गीकृत समूह आहे. त्याचा बुद्धिमत्तेशी किंवा प्रगत, अप्रगत आचारविचारांशी काहीही संबंध नाही, हा विचार शारीरिक मानवशास्त्राने प्रस्थापित केला. तसेच वेगवेगळ्या देशांतील मानवांच्या शरीररचनेला सोयीस्कर असे कपडे, पादत्राणे, यंत्रे व त्यांना चालविण्याकरिता बसावयाच्या जागा, रोगांचा व मानवसमूहांचा संबंध इ. अनेक बाबतींत शारीरिक मानवशास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणाकरिता केला.

 सामान्यतः शारीरिक मानवशास्त्रात खालील विषयांचा अंतर्भाव होतो : (१) नरवानर जीवाश्म–विज्ञान : लुप्त झालेल्या मानवप्रकाराचे व त्यांना सादृश असलेल्या प्राण्यांचे वर्णन. (२) मानवविकास : मानवेतर प्राण्यांपासून मानवाच्या विकासाची क्रिया. (३) मानवमिती : मानवाची मोजमापे घेण्याची तंत्रे. (४) देहविज्ञान : वर्तमानात असणाऱ्या मानव प्रकारांचे लिंगभेदानुसार वर्णन व्यक्ती–व्यक्तीतील शारीरिक विभिन्नतेचे वर्णन. (५) वांशिक मानवशास्त्र : मानवांत वंशांत वर्गीकरण, वंशाचा इतिहास व वंशमिश्रण. (६) शारीरिक रचनाशास्त्र व वाढीचे मानवशास्त्र : शरीर वाढीचे नियम वेगवेगळ्या शरीरप्रकारांचे रोगांशी संबंध, तसेच आचारविचारांशी संबंध – जसे शरीरप्रकारांचे गुन्हेगारी वृत्तीशी संबंध असतात, असा एक विचार आहे. (७) अनुप्रयुक्त शारीरिक मानवशास्त्र : शारीरिक मानवशास्त्रातील तत्त्वांचा मानवी कल्याणाकरिता उपयोग.

 शारीरिक मानवशास्त्राच्या व्याप्तीची कल्पना संशोधनाच्या विषयावरून करता येते.

(१) मानवप्राणी व पर्यावरण : नैसर्गिक आणि मानवी, यांच्या परस्परसंबंधांतून जैवविज्ञान व सामाजिक विज्ञानांतील दुवा जुळवता येतो. मुख्यतः, लोकसंख्येतील बदल जैविक, सामाजिक व आर्थिक कारणांमुळे घडून येतात. कोणत्या जैविक व सामाजिक कारणांमुळे लोकसंख्येत बदल होत नाहीत, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. रोग वगैरे झाल्यास त्याची झळ छोट्या मानवसमूहास लवकर लागते. मोठ्या समूहात परिवर्तनाची शक्यता त्या मानाने कमी असते. [⟶ पर्यावरण परिस्थितिविज्ञान].


(२) मानवप्राण्याच्या विकासाबाबत बरेच संशोधन चालू आहे. यात बराचसा भाग जीवाश्मांबाबत असतो. अलीकडेच, एकरेषा–विकासाची कल्पना अमान्य ठरविण्यात आली आहे. निअँडरथलच्या खाली असलेल्या मानवास निअँडरथलच्या वरचे स्थान देण्यात आले आहे. तसेच इतर प्राणिजीवांच्या विकासाबाबतही झाले आहे. आफ्रिका, आशिया व यूरोपात बऱ्याच जागी अतिप्राचीन मानवांचे जीवाश्म सापडले आहेत. जगात बहुतेक सर्व ठिकाणी अस्थींचे अवशेष मिळाले आहेत आणि ह्याबाबत संशोधन चालू आहे [⟶ मानवप्राणि].

(३) माकडांच्या अवयवांत व स्नायूंच्या रचनेत झाडांवर व जमिनीवर राहण्यामुळे बरेच बदल झाले आहेत. झाडांच्या फांद्यांवर लटकण्यामुळे, एका फांदीवरून दुसऱ्याफांदीवर हाताच्या साहाय्याने उड्या मारल्याने व झोके घेतल्याने मानवसदृश कपींचे हात लांब झाले, अंगठ्याचा आकार रोडावला व त्या अनुषंगाने शरीररचनेत विविध बदल झाले. नरवानरात मानवाप्रमाणे संस्कृती (आचारविचारांची देवाण घेवाण) नसते. प्रत्येक मानवसमूहाची स्वतंत्र संस्कृती असते व तिचा त्याच्या शरीररचनेवर परिणाम होण्याची शक्यता असते. तशी शक्यता नरवानरांत नसल्याने त्यांचा अभ्यास प्रायोगिक अभ्यास म्हणून उपयुक्त ठरतो. [⟶ नरवानर गण].

(४) आनुवंशिकी हा संशोधनाचा नवीन विषय आहे. कोणते शारीरिक, मानसिक वा भावनिक गुणदोष आनुवंशिक असतात ? वेगवेगळ्या मानव−समूहांत जनुकांचा संचार कसा असतो ? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास मानवामानवांतील शारीरिक विविधतेवर प्रकाश पडेल. मुले हुबेहूब मातापित्यांसारखी दिसत नाहीत. तसेच बहीण−भावंडेही हुबेहूब सारखी नसतात. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. या संशोधनात रक्त प्रकारांवर जरी भर दिला तरी इतर गुणविशेषांबाबतही संशोधन चालू आहे. जनुकांबाबत संशोधनामुळे वंशांच्या निर्मितीवर प्रकाश पडण्याचा संभव आहे. कोणत्या वंशात नेमके कोणते जनुक जास्त किंवा कमी आहेत हे कळल्यास वंश मिश्रणाची क्रिया समजू शकते.

(५) मानव व नरवानरांचे शरीर–वाढविषयक संशोधन शारीरिक मानवशास्त्रज्ञ वैद्यकीय महाविद्यालयात करतात. एका समाजात स्त्री व पुरुषांच्या शरीरवाढीचे वय वेगवेगळे असते. ते वय वेगवेगळ्या समाजात भिन्न भिन्न असते. तसेच शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे वाढीचे वयही ठरलेले असते. अंतःस्त्रावी–घटक, आहार–घटक व जनुकांचा शरीरवाढीशी जवळचा संबंध असतो, तसेच आर्थिक, सामाजिक व एकंदरीत सांस्कृतिक घटकांचाही शरीरवाढीशी संबंध असतो. दातांच्या वाढीचा सर्वांत जास्त अभ्यास झालेला आहे. कारण दातांच्या वाढीचा शरीरवाढीशी निकटचा संबंध असतो. या संशोधनाचाही वंशविषयक संशोधनात उपयोग होतो. जसे, शरीर–वाढ व वंश–भेद याचा संबंध आहे की काय ? याचा विचार करता येतो.

(६) मानवशास्त्रीय संशोधनात मानवमितीचा उपयोग गेल्या काही वर्षांत केला जात आहे. सांख्यिकीच्या विकासाबरोबर मानवमितीतही बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. मानवशरीराची कोणती मापे–डोक्याची, चेहऱ्याची, नाकाची व इतर अवयवांची घ्यावीत हे नव्याने ठरविण्यात येत आहे. शरीरवाढीचा अभ्यास माप घेतल्याशिवाय होऊ शकत नाही.

(७) शारीरिक मानवशास्त्राचा उपयोग मानवशरीराची मापे घेण्यामुळे व त्याबाबत सिद्धांत मांडल्यामुळे जास्त प्रमाणात व्हावयास लागला. तयार कपड्यांचे कारखाने, पादत्राणांचे कारखाने, सैन्यातील कपडे, इ. म्हणजेच, जेथे जास्त प्रमाणात कपडेलत्ते हवे असतात, तेथे शारीरिक मानवशास्त्रातील मापे उपयोगी पडतात. एका भौगोलिक प्रदेशात, एका जातीत, वंशात शरीररचनेचे सर्वसाधारण प्रमाण ठराविक असते. काही लोक उंच अथवा ठेंगणे, हात लांब, मोठी छाती, रुंद–अरुंद खांदे इ. शारीरिक फरक जाती–प्रदेशानुसार आढळतात. त्या अनुषंगाने कपडेलत्ते शिवल्यास अपव्यय होत नाही.

वर दिलेले संशोधनाचे प्रकार एकमेकांपासून स्वतंत्र नाहीत. त्यांचा सर्वांचा एकमेकांशी परस्परसंबंध आहे. शारीरिक मानवशास्त्रातील मानवप्राण्यांचा उगम व विकास या मूळ विषयाला हे संशोधन उपयुक्त आहे.


सांस्कृतिक मानवशास्त्र : सांस्कृतिक मानवशास्त्रात मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. संस्कृतीचा उगम, विकास, रचना व तिचे कार्य हे प्रामुख्याने अभ्यासिले जाते. यात कालखंडाचे व विशिष्ट मानवसमाजाच्या संस्कृतीचे अध्ययन करावयाचे असे बंधन असत नाही. लुप्त पावलेल्या संस्कृतीचे अध्ययन जसे सांस्कृतिक मानवशास्त्रात करता येते, तसेच आधुनिक समाजातील आदिवासी संस्कृती किंवा नागर संस्कृतीचेही अध्ययन करता येते.

  संस्कृतीच्या व्याख्येत सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती साठवलेली आहे. संस्कृती म्हणजे मानवसमाजाची जीवन जगण्याची तऱ्हा . यात सर्व उपकरणे, आचारविचार, नीतिमूल्ये, धार्मिक निष्ठा, अंधश्रद्धा इत्यादींचा अंतर्भाव होतो. समाजाचे घटक म्हणून राहण्याकरिता जे जे मानव शिकतो ती संस्कृती. आपण जे जीवन जगतो, त्यातील अधिकांश भौतिक वस्तुरूप उपकरणे व आचारविचार आपणास जनक पिढीने दिलेले असतात. ही क्रिया अनादिकाळापासून चालू आहे. प्रत्येक पिढीबरोबर, संस्कृतीत थोडा बदल होत असतो. या सर्व क्रियांचा विचार सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो.

संस्कृती मानवप्राण्याचे वैशिष्ट्य आहे. केवळ मानवालाच भाषा असते. मानव सतत उपकरणांचा उपयोग करीत असतो व आपल्या सोबत्यांना आणि दुसऱ्या पिढीस संचित ज्ञान व अनुभवाचा संचार करीत असतो. मानवाच्या विशिष्ट प्रकारच्या शरीरविकासामुळेच संस्कृतीचा उगम होऊ शकला, हे आता सर्वमान्य झाले आहे.

मानवसंस्कृतीचा आविष्कार प्रत्यक्षात वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतींत पहावयास मिळतो. भिन्न मानवसमाजांची संस्कृती वेगवेगळी असते. आचार, विचार, भावना, मूल्ये, कल्पना, भाषा इ. सर्व स्वतंत्र असते. इतकेच नव्हे तर प्रत्येक समाजात, या घटकांचे परस्परसंबंधही वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्मक, स्वतंत्र व पूर्ण असते.

मानवसमाजातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील साम्य व फरकांचा तौलनिक अभ्यास करून त्या अनुषंगाने मानवाच्या स्वभावविषयक सिद्धांताची मांडणी करणे, सांस्कृतिक मानवशास्त्राचे मुख्य ध्येय असते. भिन्न संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणे, त्यांच्या स्थिरतेचा, विकासाचा व परिवर्तनाचा आढावा घेणे, हे सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे कार्यक्षेत्र. मानवाच्या प्राणिभूत गरजांची पूर्ती, तसेच इतर मानवी गरजांची (धर्म, मनोरंजन, कला, संगीत, साहित्य इ.) पूर्ती भिन्न समाजांत भिन्न प्रकारे केली जाते. थोडक्यात, खालीलप्रमाणे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो : (१) मानवाचे आचारविचार जसे आपणास दिसतात, तसे ते का असतात ? (२) आपल्या समूहाच्या–समाजाच्या चालीरीतींचा उगम व विकास कसा झाला ? (३) इतर समाजांपेक्षा आपण नेमके कोणत्या बाबतीत वेगळे आहोत व का ? त्यांच्या व आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणांत किंवा प्रत्येक रीतिरिवाजात फरक का ? (४) मानव स्वभाव म्हणजे काय ? तशी काही संकल्पना असते का ? (५) मानवी जीवन हे नियंत्रित करता येऊ शकते का ? की ते नशिबानेच ठरत असते ? या प्रश्नांची शास्त्रीय मांडणी अशा रीतीने करता येईल : १. मानव संस्कृतीचा विकास कसा झाला व तिच्यात कशी भिन्नता आढळते ? २. आचारविचारांच्या भिन्नतेत कोणते घटक स्थिर अथवा सर्वव्यापी असतात ? ३. सांस्कृतिक व्यवस्थेचे स्वरूप कसे असते ? ४. सांस्कृतिक क्रियांचे नियंत्रण अथवा त्यांबाबत भाकित वर्तविता येते का ? 

सांस्कृतिक मानवशास्त्रात मानवप्राण्याच्या उगमापासून आजपर्यंतच्या मानवाच्या सर्व सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. आदिवासी लोकांची संस्कृती, तसेच आधुनिक, प्रगत समजल्या जाणाऱ्याजटिल राष्ट्र–संस्कृतीचाही अभ्यास मानवशास्त्रात अंतर्भूत आहे. मानवाच्या विवेकयुक्त, अविवेकी व विवेकातील वर्तनाचा विचारही सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो. यात डोळ्यांना दिसणारी उपकरणे (भौतिक संस्कृती), धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा इ. समावेश होतो. संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा अभ्यास यात केला जातो. त्यानुसार निसर्गापासून संपत्ती उत्पन्न करण्याची तंत्रे व उपकरणे, अर्थव्यवस्था, मानवांचे परस्पर सामाजिक संबंध, धर्म, भाषा, कला इ. विषयक विचार अभिप्रेत आहेत. या वेगवेगळ्या उपांगांच्या कार्याची जशी चर्चा होते, तद्वतच या अंगाच्या परपस्पसंबंधांबत चर्चाही महत्त्वाची असते कारण संस्कृतीच्या विविध उपांगांचे संबंध परस्परावलंबित्वाचे असतात. धर्माचा आर्थिक व्यवहाराशी, सामाजिक गटांशी तसेच कलेशी संबंध असू शकतो. भारतीय जातिसंस्थेचा हिंदू धर्मकल्पनांशी निकटचा संबंध आहे व त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होतो. तसेच भारतातील कला व संगीताचाही धर्माशी व देवदेवतांशी संबंध आहे. मानवशास्त्रज्ञास अध्ययनासाठी जितके शास्त्रीय शोध महत्त्वाचे वाटतात, तितकेच खेड्यातील रोजचे जीवनही वाटते. सांस्कृतिक मानवशास्त्राच्या कक्षेत उच्चभ्रू नेते बसतात, तसेच खेड्यातील सामान्य शेतकरीही असतात. सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती सर्वांगीण आहे.


संस्कृतीच्या एका उपांगाचे अध्ययन करण्यासाठी इतर उपांगांचाही विचार करावा लागतो. संस्कृती पूर्ण व एकात्मिक असते. तिचे वेगवेगळे भाग एकमेकांशी निगडित असतात. एकाचा विचार करताना दुसऱ्याभागाचा विचार करावा लागतो. भारतातील शेती व्यवस्थेचा अभ्यास करण्यास धार्मिक बाबीही लक्षात घ्यावयास हव्यात. शेतीतील वेगवेगळ्या अवस्थेत, जसे पेरणी, कापणी इ. धर्मसंस्कार केले जातात. जमिनीची पूजा, शेतीच्या औजारांची पूजा, गाई−बैलांची पूजा, नवरात्रात देवीची शेतीवरील घटात प्रस्थापना इ. गोष्टी धर्म व आर्थिक व्यवहारांची जवळीक दाखवितात. या पद्धतीनुसार, संस्कृतीच्या कोठल्याही एका उपांगाचे अध्यायन करावयाचे झाल्यास संस्कृतीची एकात्मता दृष्टिआड करून चालणार नाही. सांस्कृतिक मानवशास्त्रातील या अभ्यासपद्धतीमुळे प्राचीन व अर्वाचीन संस्कृतींचे संशोधन सुकर व शास्त्रीय झाले आहे.

मानवशास्त्रज्ञ आपल्या समाजात कित्येक आठवडे वा महिने राहतो. त्या लोकांच्या जीवनात सहभागी होतो व त्याबरोबरच निरीक्षणही करत असतो. या पद्धतीस सहभारी–निरीक्षण म्हणतात. मानवशास्त्रज्ञ त्या लोकांची भाषा शिकतो. जमल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनात सहभागी होतो. त्यांच्याबरोबर स्नान, जेवण, खेळ, नृत्य, शिकार इ. करतो आणि त्यांची प्रत्यक्ष माहिती गोळा करतो. एकदा लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या अनौपचारिक मुलाखतीतून बरीच माहिती कळते.

 या क्षेत्र अभ्यासपद्धतीमुळे शास्त्रज्ञास संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते. मानवाचे नैसर्गिक वर्तन, आचारविचार पहावयास मिळतात. आधारसामग्री सत्यस्थितीतून गोळा करता येते. त्रयस्थ माणसाला संस्कृतीबद्दल काय वाटेल व त्या समाजाच्या घटकांना काय वाटते, हे दोन्ही दृष्टिकोण शास्त्रज्ञास विचारात घेताना आपले पूर्वग्रह वा कल बाजूस ठेवावे लागतात.

 या अभ्यासपद्धतीत इतर अनेक पद्धतींचा समावेश असतो. समाजशास्त्रीय, शिरगणती, वंशवृक्ष, नकाशे, छायाचित्रे, जीवन–वृत्तांत अभिलेख इ. सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग वाढला आहे. प्रश्नावली पद्धत, नमुना प्रतिदर्श पद्धत हे त्यातलेच काही प्रकार होत परंतु या पद्धतींमुळे आधारसामग्री गोळा झाली, तरी त्यांतला गुणात्मक अंश नष्ट होण्याची भीती असते. मानवशास्त्रातील शारीर व प्राबंधिक अभिबोधन कसोट्यांचाही उपयोग अलीकडे करण्यात येऊ लागला आहे. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास उत्खननात मिळालेल्या अवशेषांद्वारे करता येतो.

 तौलनिक संशोधन पद्धती : तौलनिक संशोधन पद्धती सांस्कृतिक मानवशास्त्राचे एक वैशिष्ट्य मानले जाते. संशोधनाच्या व विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यागणिक तौलनिक पद्धतीचा अवलंबकरण्यात येतो. उदा., भारतीय खेड्याच्या सामाजिक संघटनेचा अभ्यास करताना शास्त्रज्ञवेगवेगळ्या जातींच्या संघटनांची तुलना करत असतो. त्यांच्यातील साम्यतेचा व फरकांचा आढावा घेण्यात येतो. काही बाबतीतसगळ्या जातींत साम्यता आढळून येते तर इतर बाबतीत बरेच भेद आढळतात. यापुढे जाऊन, एका खेड्याच्या संघटनेची तुलना शेजारच्या दुसऱ्या खेड्याच्या संघटनेशी करता येते. त्यावरून, साम्यतेच्या फरकांचा तौलनिक अभ्यास करून काही सैद्धांतिक मुद्दे मांडता येतात व त्यायोगे गावकऱ्यांची आचारविचारविषयक भाकिते करणे शक्य असते. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांतील ग्राम−संघटनांचा तौलनिक अभ्यास केल्याने भारतीय संस्कृतीबद्दल काही सिद्धात मांडणे शक्य होते. त्यानंतर भारतीय खेड्यांतील जातीय स्तररचनेची तुलना इतर देशांतील सामाजिक स्तररचनेशी करता येते. अशा रीतीने वेगवेगळ्या संस्कृतींमधील घटकांची तुलना एकंदर मानव संस्कृतिविषयक सिद्धांत मांडण्यास उपयुक्त ठरते. मानवसमाज व संस्कृतीत स्तरीकरणविषयक सिद्धांत असल्या प्रकारचे तौलनिक संशोधन करून मांडलेले आहेत.

तौलनिक संशोधनाची महती त्यावरून पटते. प्राचीन संस्कृती समान परिस्थिती व तंत्रांमुळे निर्माण झाली का ? या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी बऱ्याच प्राचीन संस्कृतींची तुलना करून त्यांतल्या समान तत्त्वांची पाहणी करणे आवश्यक ठरते. तसेच अविकसित अर्थव्यवस्थेचा आधुनिक, प्रगत, औद्योगिक अर्थव्यवस्थेत झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी अनेक विकसनशील राष्ट्रांतील सामाजिक, धार्मिक व आर्थिक परिवर्तनांचा तौलनिक अभ्यास महत्त्वपूर्ण असतो.

 संकल्पनांचा विकास : सांस्कृतिक मानवशास्त्रातील तत्त्वांच्या विकासास एक विशेष स्वरूप आहे. उत्खननांत मिळालेल्या भौतिक उपकरणांवरून प्राचीन संस्कृतीबाबत काही निकष काढतात. लोकांचे जीवन जवळून बघून सांस्कृतिक तत्त्वे मांडली जातात. इतर शास्त्रांप्रमाणेच, सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांनीही क्षेत्रकार्यात कोणते प्रश्न विचारावयाचे, नेमके कशाचे निरीक्षण करावयाचे व कशाचे करू नये, कोणती आधारसामग्री गोळा करावयाची, याबाबत काही मार्गदर्शक संकेत असतात. परंतु इतर सामाजिक विज्ञानांप्रमाणे, मानवशास्त्रात सिद्धांतकल्प मांडून त्यास सिद्ध करण्याकरिता अथवा चुकीचे ठरविण्याकरिता क्षेत्रकार्य–संशोधन तितकेसे हिरीरीने करत नाहीत. मानवशास्त्रज्ञ सर्वसाधारणतः लहान समाजांचे अध्ययन करतात. लहान समाजात संस्कृतीची भिन्न भिन्न अंगे जास्त परस्परावलंबी असतात व संस्कृतीत जास्त एकसूत्री तत्त्व असते. त्याकरिता मानवशास्त्रज्ञ त्या संस्कृतीतील शक्य तेवढी उपलब्ध आधारसामग्री गोळा करतो व नंतर सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे मानवशास्त्रातील या वर्णनात्मक प्रबंधांवर टीका व्हावयास लागली आहे. त्या अनुषंगाने संशोधनाची योजना आखावी, असा अट्टाहास तरुण संशोधन करावयास लागले आहेत व त्यास पाठिंबा मिळत आहे.


तसेच विश्लेषणाकरिता जे विषय निवडले जातात, ते त्यावेळच्या परिस्थित्यनुसार वा अभ्यासिलेल्या समाजाच्या समस्यांवरून ठरविले जातात. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ संकल्पनेवर प्रकाश टाकण्याकरिता आधारसामग्री गोळा करत नाही, तर लोकांचे जीवन समजण्याकरिता संकल्पनांची जुळवाजुळव करतो, त्यांची आखणी करतो, त्यांचा उपयोग करतो. जुनी संकल्पना स्पष्ट नसेल, तर नवीन संकल्पनांची मांडणी केली जाते.

 सांस्कृतिक मानवशास्त्रात, मानवतावादी दृष्टिकोण अभिप्रेत असतो. शास्त्रज्ञ सहजीवी निरीक्षक असल्यामुळे त्यास लोकांच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होतो. तसेच शास्त्रीय अलिप्ततेमुळे त्यास तिऱ्हाइताच्या भूमिकेतूनही संस्कृतीचे निरीक्षण करता येते. त्यामुळे मानवशास्त्रज्ञाच्या समाजविषयक लेखनात मानवतावादी व शास्त्रीय दृष्टिकोणांचा मिलाफ झालेला आढळतो. वस्तुनिष्ठता व समरसता यांत समतोल राखावयास हवा. लोकांशी जास्त समरस झाल्यास अध्ययन शास्त्रीय न होतो एकांगी होते. जास्त वस्तुनिष्ठ राहिल्यास समाजाचे अंतरंग समजण्यास अडचण होते व सत्य कळत नाही.

 वर चर्चिलेल्या अभ्यासपद्धतींत काही ढोबळ दोष आढळतात. साकल्यपद्धतीमुळे आधारसामग्री गोळा करण्यास मर्यादा घालण्यात येत नाहीत. त्यामुळे एखाद्या समस्येचा जरी सर्वांगीण अभ्यास होत असला. तरी संशोधनास एक विशिष्ट दिशा मिळत नाही. तसेच संशोधन वर्णनात्मक होते, विश्लेषणात्मक होत नाही. वर्णनात्मक संशोधनात कधीकधी आंतरिक प्रवृत्तींचा समावेश होत नाही. एक वर्ष लोकांमध्ये राहून संस्कृतीच्या भिन्न उपांगांचे वर्णन करण्याच्या भरात कोठल्याही एका उपांगाचा नीट रीतीने अभ्यास होत नाही. तसा एकांगी वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास इतर सामाजिक विज्ञानांत करण्यात येतो. मानवशास्त्रज्ञ संस्कृतीच्या सर्व विभागांचा अभ्यास साकल्याने करीत असल्यामुळे त्याची स्थिती एक ना धड भाराभरचिंध्या अशी होते. एका संस्कृतीच्या सर्व उपांगांचा अभ्यास होतो पण त्यामुळे विश्लेषणास खोली असत नाही. तसेच निरीक्षणाच्या आधारे जमविलेली आधारसामग्री गुणात्मक असली, तरी तिच्यातही काही दोष राहतात. एका छोट्या समूहाच्या संस्कृतीच्या अध्ययनाच्या आधारे मोठे सैद्धांतिक निष्कर्ष काढण्याचा मोह मानवशास्त्रज्ञांना आवरता येत नाही, असा एक रास्त आक्षेप त्यांच्यावर घेण्यात येतो. त्यामुळे मानवशास्त्रज्ञांना सामाजिक विज्ञानांतील ज्योतिषज्ञ म्हटले जाते.

 प्रत्येक अभ्यासपद्धतीत काही गुणदोष असतात आणि प्रत्येक विज्ञानाच्या मर्यादा गुणदोषांमुळे बांधलेल्या असतात. मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धतींमुळे मानवांच्या आचारविचारांविषयी जी माहिती मिळते, ती इतर सामाजिक विज्ञानांच्या अभ्यासपद्धतींमुळे मिळू शकत नाही.

 संशोधन : सांस्कृतिक मानवशास्त्रात दोन प्रकारचे संशोधन प्रामुख्याने आढळते : (१) संस्कृतींना संस्था समजून त्या अनुषंगाने संशोधन करणे. यात लोक व त्यांचे दैनंदिन जीवन, आशा, आकांक्षा, यांचे परस्परसंबंध आणि त्याबाबतची संघटना यांचा समावेश होतो.

(२) संस्कृतीच्या वाढीविषयक−विकासाविषयक संशोधन–यात संस्कृती, परिवर्तन, सांस्कृतिक विकास व बदलत्या परिस्थितीत संस्कृतीस कार्यक्षम बनविणे संस्कृतीचे परिस्थितीशी जुळवून घेणे इ. विषयांचा समावेश होतो.

संशोधनाचे विषय थोडक्यात खालीलप्रमाणे देता येतील :

(१) मानव व नैसर्गिक सांस्कृतिक परिस्थिती यांचे परस्परसंबंध, संस्कृती व समाज एका बाजूस आणि मानव व निसर्ग दुसऱ्या बाजूस या दोहोबाजूंचे परस्परसंबंध.

(२) संस्कृतीच्या काही उपांगांचा भिन्न भिन्न संस्कृतींत आढावा घेऊन त्यांची तुलना करणे. अशा प्रकारे संशोधन आतापर्यंत धर्म व तंत्र−उपकरणांच्या क्षेत्रात झालेले आढळते. आता मूल्यांचाही तौलनिक अभ्यास व्हावयास लागला आहे.

(३) मानवशास्त्रीय मानवशास्त्रात संस्कृती व व्यक्तिमत्त्व यांचे परस्परसंबंध समजण्यासाठी संशोधन करण्यात येते. शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा जवळचा संबंध असल्याने, शिक्षणविषयक संशोधनही यांत अंतर्भूत आहे.


संस्कृतीचे परिवर्तन घडविण्यात व्यक्तींचा मोठा वाटा असतो. तसेच परिवर्तनामुळे समाजातील व्यक्तींच्या आशा–आकांक्षात, आचारविचारात आमूलाग्र फरक घडून येतात. म्हणजे व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होतो.

 (४) संस्कृतिवृद्धीच्या संशोधनात विकरणास बरेच महत्त्व लाभले आहे. विशिष्ट संस्कृतीचा उगम पाहण्याचा प्रयत्न केल्यास असे आढळून येते, की एका संस्कृतीच्या निर्मितीत इतर अनेक संस्कृतींतून घेतलेले घटक दिसतात. विकरणाची क्रिया मानवी इतिहासात अनादिकालापासून आढळून येते. विकरणास मदत करण्यात किंवा अडथळा आणण्यात कोणते सांस्कृतिक गुण प्रामुख्याने असतात हे अभ्यसनीय आहे. संस्कृती परिवर्तनात विकरण, शोध यांना महत्त्व असते व त्यांचा स्वीकार आणि जोपासना विशिष्ट सांस्कृतिक वातावरणात होते.

(५) संस्कृतीच्या परिवर्तनाबाबतचे संशोधन अलीकडे विकसनशील राष्ट्रांत प्रामुख्याने आढळते. परिवर्तनाच्या संदर्भात विकास हा घटक आहे. संस्कृतीच्या कोणकोणत्या उपांगांत परिवर्तनाचा दर कसा कमीजास्त असतो, याविषयक संशोधन चालू आहे. संस्कृतीच्या काही भागांत परिवर्तनाचा दर जास्त राहिलेला आहे, हे पुरातत्त्वज्ञ सांगतात.

(६) मानवप्राणी विद्यमान अवस्थेला पोहोचण्यापूर्वी सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया चालू होती. त्या काळातील पूर्वगामी मानवाने विकसित संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. नवाश्मयुगात अनेक शोध लागले, त्यानंतरच्या शास्त्रीय शोधांमुळे मानवाची आंतरिक शक्ती वाढत गेली व नवीन प्रकारची संस्कृती अस्तित्वात आली. एकाच वेळी सर्व समाजांनी संस्कृतीतील फेरबदल आत्मसात केले असे नाही परंतु काही संस्कृतींनी तसे केल्यामुळे इतर संस्कृतींची परिवर्तने स्वीकारण्याची संभाव्य शक्ती वाढली. आज विकसनशील राष्ट्रे इतर प्रगत राष्ट्रांच्या आर्थिक विकासाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे संस्कृती विकासाचे आदर्श उदाहरण आहे.

(७) एकोणिसाव्या शतकात संस्कृतीचा विकास एकमार्गी झाला असे प्रतिपादले जाते. त्याबाबतीत नंतर बरेच सिद्धांत मांडले गेले. अलीकडे विकासाचा तांत्रिक प्रगतीशी संबंध जोडला जातो. त्याबाबत संशोधन चालू आहे. तसेच विकरणाबाबतही बरेच सिद्धांत मांडले गेले आहेत. विकरणवाद्यांनी बहुतांशी आदिवासी संस्कृतींचा विकास समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकार्यवादींनी विकासविषयक अनुमानिक संशोधनाची टीका केली आहे. त्यांच्या मते संस्कृतीतील आचारविचारांचा अभ्यास व्हावयास हवा. संस्कृतीची विभिन्न अंगे एकमेकांशी कार्यद्वारे निगडित असतात. परंतु या भूमिकेवरही आता टीका होत आहे. आदिवासी समाजाची सरल संस्कृती कार्यिक असू शकते परंतु प्रगत, जटिल संस्कृतीचे भिन्न भिन्न भाग एकमेकांशी आपापल्या कार्यांमुळे परस्परावलंबी बनतात. हे तितकेसे पटत नाही. हे सर्व विचारप्रवाह जरी विवाद्य असले, तरी त्यांनी त्या त्या काळी मानवशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे, हे नाकबूल करून चालणार नाही.

 सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती विशाल आहे. त्यात संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा विचार करण्यात येतो. सर्वसाधारणतः सांस्कृतिक मानवशास्त्राची तीन पोटभागांत विभागणी करतात : भाषाशास्त्र, पुरातत्त्वविद्या व मानवजातिविज्ञान. यांपैकी भाषाशास्त्र व पुरातत्त्वविद्या यांचा स्वतंत्र शास्त्रे म्हणून विकास झाला आहे. मानवशास्त्राच्या कक्षेत सामाजिक मानवशास्त्राचाही स्वतंत्र विकास झाला आहे. काही शास्त्रज्ञ सामाजिक मानवशास्त्रास मानवजातिविज्ञानाचा उपविभाग मानतात.

(१) भाषाशास्त्र : संस्कृतीची निर्मिती आणि जतन भाषेमुळेच शक्य होते. एक पिढी भाषेशिवाय सांस्कृतिक ठेवा दुसऱ्या पिढीस देऊ शकत नाही. कोठल्याही विचारांची देवाण–घेवाण भाषेशिवाय अशक्यच आहे व संपर्काशिवाय संस्कृतीचा विकास वा प्रगती होऊ शकत नाही. भाषाशास्त्रज्ञ प्राचीन व अर्वाचीन, लिखित व अलिखित भाषांचा अभ्यास करतात. भाषाशास्त्रात भाषांचा उगम, विकास, रचना, शब्दार्थ, ध्वनिविचार आणि शब्दकोश इत्यादिकांचा अभ्यास करण्यात येतो. सांस्कृतिक मानवशास्त्राचा शब्दार्थशास्त्राशी (भाषाशास्त्रातील एक विभाग) फार जवळचा संबंध येतो. कोठल्याही भाषेतील शब्दांच्या अर्थांना, म्हणींना सांस्कृतिक अर्थ असतो. समाजातील वेगवेगळ्या थरांतील लोक एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावतात किंवा वेगवेगळ्या बोलीभाषा वापरतात.

(२) पुरातत्त्वविद्या : भौतिक वस्तूंच्या अवशेषांवरून प्राचीन संस्कृतिविषयक अंदाज पुरातत्त्वज्ञ करतात. तसेच वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींचे परस्परसंबंध लक्षात घेण्याचे प्रयत्नही केले जातात. लुप्त संस्कृतीचे मानवशास्त्र म्हणजे पुरातत्त्वविद्या. पुरातत्त्ववेत्ता वस्तुरूप उपकरणांच्या अवशेषांवरून कौटुंबिक जीवन, राज्यसंघटना, धार्मिक श्रद्धा इत्यादिविषयक अंदाज वर्तवितो तसेच संस्कृतिविषयक कालखंडही ठरवितो. शेतीनिष्ठ अर्थव्यवस्था, लाकडी घरे व चकचकीत दगडांची औजारे असलेली संस्कृती ही अन्न–संकलन करणारी अर्थव्यवस्था, गुंफा निवास व दगडाची ढलपी काढून तयार केलेली औजारे असलेल्या संस्कृतीनंतर झाली, इतके अंदाज पुरातत्त्वविद्येत केले जातात.


पुरातत्त्ववेत्ता सांस्कृतिक इतिहास व विकासाची दिशा दर्शवितो. हाडांच्या अवशेषांवरून मानवप्राण्याच्या उगम–विकासाबाबत पुरातत्त्ववेत्ता शारीरिक मानवशास्त्रास बहुमोल मदत करतो. तसेच संस्कृतीची निर्मिती कोठे झाली, तिचा विकास कसा झाला, तिचे प्रकार व स्वरूप कोणते होते,शेतीची तंत्रे कशी बदलत गेली, लोखंड आणि ब्राँझचा वापर केव्हापासून प्रचारात आला इ. अनेक समस्यांवर पुरातत्त्ववेत्ता तौलनिक संशोधन करून प्रकाश टाकतो. त्यावरून सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञास संस्कृतीचा विकास जगाच्या सर्व भागांत सारखा झाला नाही, तसेच संस्कृती परिवर्तनाचा वेग सर्व ठिकाणी सारखा नव्हता हे ज्ञात झाले. ईजिप्त, भारत, चीन, मेसोपोटेमिया व यूरोपातील संस्कृती यांचा परिवर्तनाचा वेग आणि ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका व आफ्रिका यांतील आदिवासी संस्कृतीच्या परिवर्तनाच्या वेगापेक्षा जास्त होता. यावरून पुरातत्त्वविद्येत केवळ प्राचीन संस्कृतीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जातो असेच नव्हे, तर संस्कृती परिवर्तनाबाबतही विचार मांडले जातात. याचा सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञास फार उपयोग होतो.

 मानवजातिविज्ञान : हे सर्वसाधारणतः मानवशास्त्र या नावाने ओळखले जाते. इंग्रजीत एथ्‌नॉलॉजीची फोड एथ्‌नॉस म्हणजे वंश व लोगोस म्हणजे शास्त्र. यावरून मानववंशशास्त्र ही संज्ञा रूढ झाली असावी. मानवजातिविज्ञानात व्यक्तिविषयक बरेच मतभेद आहेत. एकोणिसाव्या शतकात मानवजातिविज्ञानाची व मानवशास्त्राची व्याप्ती सर्वसाधारणतः सारखीच होती.

 मानवजातिविज्ञानात लोकांचा सांस्कृतिक, वांशिक व भाषिक दृष्ट्या अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या लोकसमूहांतील समानता व फरक यांचे अध्ययन करून त्यांचे सांस्कृतिक, वांशिक व भाषिक दृष्ट्या वर्गीकरण करण्यात येते. तसेच लोकांचे स्थलांतर, मिश्रण व भाषिक–सांस्कृतिक विकासाचाही विचार करण्यात येतो. त्या दृष्टीने मानवजातिवैज्ञानिकास शारीरिक मानवशास्त्र, भाषाशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र व पुरातत्त्वविद्या यांचे चांगले ज्ञान असावयास हवे. पुरातत्त्वविद्या ज्या टप्प्यावर संस्कृतीचा अभ्यास थांबविते, त्या टप्प्यापासूनचा अभ्यास मानवजातिविज्ञानात होतो. वेगवेगळ्या वंशांचा, भाषांचा, संस्कृती तत्त्वांचा, उपकरणांचा यात ऊहापोह होतो. उदा., कुटुंबसंस्था पितृसत्ताक की मातृसत्ताक, विवाहसंस्था कशी होती ? अग्निनिर्मितीस कशी सुरुवात झाली ? आर्य भारतात केव्हा आले ? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातींत सांस्कृतिक–वांशिक–भाषिक कोणती समानता वा फरक आहेत इत्यादी.

  मानवजातीविज्ञानात मानवी संस्थांचे मूळ शोधण्यावर भर दिला जातो. तसेच त्यांचा विकास कसा झाला, यावरही भर दिला जातो. त्याकरिता विशेषतः मागासलेल्या आदिवासींबाबत अध्ययन केले जाते कारण आजचे आदिवासी समाज प्राचीन काळी आधुनिक प्रगत समाज कसे होते हे दिग्दर्शित करतात, असा समज रूढ आहे. प्रमाणभूत पुराव्याअभावी इतिहास लिहिणे जिकिरीचे होते. मानवशास्त्राचा इतिहासाकडे कल असल्यामुळे व उत्क्रांतिवादी सिद्धांतावर भर दिल्यामुळे, मानवजातिशास्त्रात सिद्धांत प्रस्थापित न करता मूळ शोधण्याचेही प्रयत्न जास्त झाले. कुळीचिन्हवाद, बहिर्विवाह, भाषा, धर्म, समाज इत्यादींचे उगम शोधण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि बरेच अनुमानिक सिद्धांत मांडले गेले. हे सर्व सिद्धांत कोठलीही संस्था कशी निर्माण झाली, हे सांगतात परंतु त्या संस्था आजतागायत का टिकून आहेत, याची सबळ कारणे दाखवीत नाहीत.

मानवजातिवैज्ञानिक एका विशिष्ट संस्कृतीच्या केवळ वर्णनास महत्त्व न देता, मानवी संस्कृतीचा उगम, विकास, प्रसरण इत्यादींचा अभ्यास करतो. मॉर्गन, टायलर यांचा उत्क्रांतिवाद, ग्राफ्टन स्मिथचा प्रसरणवाद, बोॲसचा संस्कृतिक्षेत्र सिद्धांत इ. गोष्टी मानवजातिविज्ञानात प्रसिद्ध आहेत. संस्कृती व मानवी संस्था–विवाह, कुटुंब, स्तररचना, कायदा, धर्म, अर्थव्यवस्था इ.–यांचा विकास एका विशिष्ट मार्गानेच झाला व प्रत्येक समाज त्या त्या टप्प्यातून गेलेला आहे, असा उत्क्रांतिवादाचा मूळ गाभा आहे. आजचे आदिवासी समाज हे त्या उत्क्रांतीच्या शिडीवर कोठेतरी आहेत व त्यांना आधुनिक होण्यास त्याच ठरलेल्या पायऱ्याचढाव्या लागतील. त्यामुळेच आदिवासींचा अभ्यास केल्याने आधुनिक समाजांच्या भूतकाळावर प्रकाश पडतो हे अनुमान मांडण्यात येते. ब्रिटिश शास्त्रज्ञ स्मिथ याच्या मते संस्कृतीचा उगम ईजिप्त देशात झाला. तेथून पुढे तिचा जगभर प्रसार झाला. जर्मन शास्त्रज्ञ ग्रॅबनर व श्मिट यांच्या मतानुसार संस्कृतीची उगमस्थाने अनेक होती व तेथून वर्तुळाकृती प्रसार झाला. प्रख्यात अमेरिकन मानवजातिवैज्ञानिक बोॲस याने अमेरिकेतील लोककथांचा अभ्यास करून त्यांच्या प्रसरणाविषयी सिद्धांत मांडले. तसेच इतर संस्कृती–गुणांच्या प्रसरणाचा अभ्यास करून संस्कृतिक्षेत्र सिद्धांत मांडला. या सर्व विचारसरणीत अनुमानाचा भाग अधिक असल्यामुळे निष्कर्ष अशास्त्रीय होतात आणि त्यात मानवी स्वभावाविषयी सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात नाही, असे रॅडक्लिफ−ब्राउनचे मत आहे. त्याच्या मते लिखित पुरावाच इतिहासावर प्रकाश टाकू शकतो. इंग्लंडव्यतिरिक्त यूरोपात हा विचार मान्य नाही. त्यांच्या मते शारीरिक मानवशास्त्र, भाषाशास्त्र व पुरातत्त्वविद्या यांच्या मदतीने तौलनिक अभ्यास केल्यास भूतकाळातील बरीच दालने खुली होतील. इंग्लंडमध्ये रॅडक्लिफ−ब्राउनच्या प्रभावामुळे मानवजातिविज्ञान हे एक ऐतिहासिक शास्त्र समजले जाते. सामाजिक मानवशास्त्रास नैसर्गिक शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

 अमेरिकेत सामाजिक मानवशास्त्रास विशेष महत्त्व नाही. मानवजातिविज्ञानात सामाजिक मानवशास्त्रात न येणारे विषयही हाताळले जातात – जसे तांत्रिक ज्ञान, शिल्पकला, संगीत, नृत्य, साहित्य, स्वप्न विश्लेषण, धर्म, नीतिमूल्ये, लोकसंस्कृती इत्यादी.


रशियात इतर देशांप्रमाणेच, निरनिराळ्या संस्कृतींचा वर्णनात्मक अभ्यास केला जातो. त्यांचे मूळ शोधण्याचाही प्रयत्न होतो. तसेच स्थलांतर, प्रसरण, एकमेकांचे ऐतिहासिक संबंध इत्यादींसंबंधी अध्ययन होते. परंतु त्या वर्णनावरून जे सिद्धांत मांडण्यात येतात, ते पाश्चिमात्य सिद्धांतांपेक्षा वेगळे असतात.

 भारतात जुन्या पिढीतले मानवशास्त्रज्ञ मानवजातिविज्ञानाचा अमेरिकन अर्थ मान्य करतात. सामाजिक मानवशास्त्रास ते स्वतंत्र स्थान देत नाहीत. ते आजही लोकांचे मूळ, स्थलांतर इत्यादिंविषयी जास्तअध्ययन करतात व अनुमान वर्तवितात. नव्या पिढीचे शास्त्रज्ञ सामाजिक मानवशास्त्रावर जास्त भर देतात कारण त्यात वर्णनापेक्षा सिद्धांत प्रस्थापित करण्यावर जास्त भर देण्यात येतो. ते जुन्या पिढीतल्या शास्त्रज्ञांस संस्कृति−इतिहासज्ञ समजतात व संस्कृतीच्या ऐतिहासिक विकासविषयक, तसेच लोकांच्या स्थित्यंतरांविषयी त्यांच्या अनुमानास अशास्त्रीय समजतात. त्यांच्यावर रॅडक्लिफ–ब्राउनच्या ऐतिहासिक विचारसरणीचा बराच प्रभाव दिसून येतो. भारतीय विद्यापीठांतून मानवशास्त्राच्या अभ्यासक्रमात शारीरिक मानवशास्त्र व सांस्कृतिक किंवा सामाजिक मानवशास्त्र असे दोन प्रमुख भाग आढळतात. यांवरून सांस्कृतिक व सामाजिक मानवशास्त्रात विशेष फरक केला जात नाही, हे उघड आहे. सांस्कृतिक मानवशास्त्र व मानवजातिविज्ञान हे दोन्ही विषय एकच समजले जावेत, त्यांची व्याप्ती समान असावी, असाही सूर निघावयास लागला आहे.

 मानवजातिविज्ञानातील वंश व त्याविषयक विचार आता मुख्यतः शारीरिक मानवशास्त्रात केला जातो. प्रत्येक उपशाखेच्या ज्ञानाची क्षितिजे व खोली वाढल्याने, मानवशास्त्राच्या सर्व शाखांवर प्रभुत्व ठेवणे कोणत्याही शास्त्रज्ञास जड जाते. परिणामतः मानवजातिविज्ञानात केवळ संस्कृतिविषयक अध्ययन–संशोधन केले जाते.

 मानवजातिवर्णन : मानवजातिवर्णनात एका विशिष्ट मानवसमूहाच्या संस्कृतीचे वर्णन दिले जाते. जगातील, भारतातील व महाराष्ट्रातील आदिवासींविषयी वर्णनात्मक पुस्तके आहेत. जसे : (१) द बिऱ्हो (एस्.सी.रॉय), (२) आरगॉनट्स ऑफ द वेस्टर्न पॅसिफिक (बी.के. मॅलिनोस्की), (३) द तोडाज (डब्ल्यू.एच. आर.रिव्हर्स, (४) द वारलीज (के.जे. सेव्ह). भारतातील आदिवासींविषयक सर्वांत जास्त वर्णनात्मक पुस्तके व्हेरिअर एल्विन व फ्यूररहायमेनडॉर्फ या दोन ब्रिटिश विद्वानांनी लिहिली. आदिवासींप्रमाणेच जातींचीही वर्णनात्मक पुस्तके आहेत. वर्णनात्मक माहिती मिळविण्यासाठी सगळ्या अभ्यासपद्धतींचा उपयोग करण्यात येतो. त्यासाठी मानवशास्त्रज्ञ एखाद्या लहान समूहात बराच काळ राहतो, त्याच्या जीवनात सहभागी होऊन निरीक्षण करतो, त्यांची भाषा शिकतो. अभ्यसनीय समूहातील काही निवेदक निवडून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जाते. सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून मानवी स्वभाववैचित्र्याचे सिद्धांत उलगडता येतात. या वर्णनांचा उपयोग मानवजातिवैज्ञानिकांस व सामाजिक मानवशास्त्रज्ञास करता येतो. पूर्वी वर्णनात्मक निबंध केवळ आदिवासी समाज जीवनाबाबतच होते. आता वेगवेगळ्या हिंदू जाती, त्यांचे आचारविचार, राहण्याची पद्धत यांचेही वर्णन यावयास लागले आहे. खेडेगाव व शहर हे स्वतंत्र घटक मानून त्यांच्या बाहेरच्या जगाशी असणाऱ्या संबंधाची जास्त दखल न घेता वर्णनात्मक पुस्तके यावयास लागली आहेत.

 वर्णनात्मक अभ्यासाची सुरुवात पंधराव्या शतकाच्या अखेरीस झाली. प्रवास, मिशनऱ्यांचे अनुभव व वसाहतवाद या तीन कारणांमुळे वर्णनात्मक पुस्तकांचा भरणा झाला. पुढे या वर्णनात शास्त्रीय दृष्ट्या बरोबर माहिती यावी, म्हणून बरेच मार्गदर्शनपर निबंध व ग्रंथ लिहिले गेले. त्यांत आदिवासींशी प्रथम संबंध कसे प्रस्थापित करावे, सहभागी निरीक्षण, प्रश्नावली पद्धत, मुलाखत पद्धत, निवेदन निवडणे, शिरगणती, वंशवृक्षद्वारा अध्ययन, माहिती गोळा करण्याच्या पद्धती दिलेल्या असतात.

 (१) मानवशास्त्रातील अध्ययनाची सुरुवात वर्णनात्मक संशोधनाने होते परंतु त्या वर्णनाला तात्त्विक अधिष्ठान लाभावयास लागले आहे. मानवशास्त्राचे रीतसर अध्ययन केलेल्या संशोधकांच्या वर्णनात्मक लेखनालाच मान्यता मिळते. प्रवासी वर्णनास शास्त्रीय वर्तुळात मान्यता मिळत नाही.

(२) पूर्वी वर्णनपर आधारसामग्री गोळा करण्याच्या शास्त्रसंमत पद्धती अस्तित्वात नसल्यामुळे वर्णन पूर्वग्रहदूषित असण्याचा संभव असे. त्या वर्णनांवर आधारलेले सिद्धांतही शास्त्रशुद्ध नसत. प्रशिक्षित संशोधक माहिती गोळा करीत असल्यामुळे वर्णन शास्त्रशुद्ध असते, त्यांत पूर्वग्रह असत नाही.

(३) एखाद्या मानवसमूहात बराच काळ वास्तव्य करून वर्णनात्मक माहिती गोळा करताना, त्या त्या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे आणल्यामुळे ठिकठिकाणी मानवशास्त्रीय वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. या संग्रहालयांमुळे सर्वमान्य जनतेस आदिवासी राहणी–पद्धतीची थोडी माहिती झाली. आदिवासींची औजारे, त्यांची वाद्ये, मासळी पकडण्याची जाळी वगैरे बघून आदिवासी रानटी नसतात तर त्यांची संस्कृती वेगळी असते अशी छाप लोकांवर पडते.


सामाजिक मानवशास्त्र : सामाजिक मानवशास्त्रात बहुतांशी आदिवासी समाजांचा तौलनिक अभ्यास करून मानव समाजाचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला जातो. शक्य तेवढ्या जास्तीतजास्त समाजातील सामाजिक संबंधांचा व प्रक्रियांचा तौलनिक अभ्यास करून मानवाच्या भिन्नभिन्न आचारविचारांवर आधारित सिद्धांत मांडणे, हे सामाजिक मानवशास्त्राचे ध्येय असते. केवळ आदिवासी समाजांबाबतच संशोधन करावे, अशा मर्यादा सामाजिक मानवशास्त्रात आखून दिलेल्या नाहीत. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या, मानवशास्त्रात आदिवासी समाजांचाच विचार अधिक केला गेला आहे. जंगल, दऱ्याखोऱ्यातून राहिल्यामुळे आदिवासी शारीरिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या अद्यापि एकसंध राहिलेले आहेत. सुरुवातीस जैवशास्त्रज्ञ जसे मानवाच्या शरीरविकासविषयक संशोधन करावयास लागले, तद्वतच सामाजिक वैज्ञानिक मानवी संस्थांच्या उगमाबाबत व विकासाबाबत संशोधन करावयास लागले. त्या दृष्टीने आदिवासींविषयक संशोधन उपयोगी पडेल, असा अंदाज करण्यात आला. आदिवासी समाज संख्येने लहान असल्यामुळे त्यांचा सहजीवी निरीक्षणपद्धतीने शास्त्रज्ञास अभ्यास करणे शक्य झाले. मानव संस्कृतिविषयक सिद्धांत मांडण्याकरिता अगोदर सरल संस्कृतिविषयक संशोधन करणे सोपे जाते. सरल संस्कृतिविषयक संशोधनातून मानवी वर्तनाबद्दलचे घटक लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जटिल, प्रगत संस्कृतीचा अभ्यास करणे आवाक्यातील असते. त्यानंतर सर्व सरल व जटिल संस्कृतींचा तौलनिक अभ्यास करून मानवी आचारविचारांबद्दल काही ठोक सिद्धांत मांडणे शास्त्रीय ठरते. यावरून आदिवासी संस्कृतीच्या संशोधनाचे शास्त्रीय महत्त्व लक्षात येते. मानवशास्त्रात ग्रामीण, नागरी, विभागीय व राष्ट्रीय संस्कृतिविषयक संशोधन व लिखाण झालेले आहे. आदिवासी संस्कृतिविषयक संशोधन ही एक अभ्यासपद्धती झाली आहे. फार झपाट्याने आदिवासी समाज बदलत आहेत, काही ठिकाणी ते लुप्त झाले आहेत. हे समाज संपूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्याची जबाबदारी साहजिकच मानवशास्त्रावर पडली आहे. हे अध्ययन ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे. तरी मानवशास्त्रात केवळ आदिवासी संस्कृतीचेच संशोधन करण्यात येते, ही समजूत अगदी चुकीची आहे.

 सामाजिक मानवशास्त्राचे ध्येय प्राकृतिक शास्त्रांप्रमाणे समाज अध्ययनविषयक शास्त्र निर्माण करणे हे होय. प्राकृतिक शास्त्रात प्रायोगिक पद्धती हे वैशिष्ट्य असते. सामाजिक मानवशास्त्रास प्राकृतिक शास्त्रांचा दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रायोगिक पद्धती तसेच आगम पद्धतीचा अवलंब करणे अगत्याचे आहे. केवळ निरीक्षण करून आचारविचारांचे वर्णन केल्याने शास्त्रीय ज्ञानात भर पडणार नाही. काही गृहीततत्त्वांचा आधारे निरीक्षण करून नंतर सिद्धांत प्रस्थापित करणे शास्त्रीय ठरेल.

सामाजिक मानवशास्त्रात, प्रायोगिक पद्धतीनुसार भिन्न भिन्न समाजांचे तौलनिक संशोधन मान्य झाले आहे. समाजशास्त्राचेही हेच ध्येय असल्याने सामाजिक मानवशास्त्रास कधीकधी तौलनिक समाजशास्त्र ही संज्ञाही दिली जाते.

  सांस्कृतिक मानवशास्त्रात संस्कृतीचा विचार केला जातो, त्याप्रमाणे सामाजिक मानवशास्त्रात समाजाचा (सामाजिक प्रक्रियांचाह व संघटनेचा) अभ्यास करण्यात येतो. मानवशास्त्रज्ञ जेव्हा क्षेत्रकार्यासाठी जातो, तेव्हा त्यास संस्कृतीची जाणीव होत नाही. त्यास दिसतात ते सामाजिक संबंध व त्यांचे समाजावरील परिणाम. जे सामाजिक संबंध पुनःपुन्हा प्रत्ययास येतात–आणि ज्यांच्यात काही कायमपणा, टिकाऊपणा असतो, त्यांचेच अध्ययन महत्त्वाचे असते. सामाजिक रचनेचा अभ्यास करून समाज जीवनातल्या सातत्याची कल्पना येते. जसे पिता–पुत्र, पति–पत्नी इ. सामाजिक संबंध वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने असतात. प्रत्येक नातेसंबंधांत काही कर्तव्ये असतात व ती समाजपरत्वे बदलतात. आपल्या सामाजिक संबंधांत अभ्यास केल्यास समाजाबद्दल सर्व माहिती मिळते. सामाजिक रचना व सामाजिक संघटना या दोन संकल्पना सामाजिक मानवशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जातात. या संकल्पनांचे संशोधक रॅडक्लिफ–ब्राउन व रेमंड फर्थ होत. फ्रेंच शास्त्रज्ञ लेव्ही–स्ट्रॉसने सामाजिक मानवशास्त्राचा व्यक्तीच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे. पतिपत्नींमधील देवाणघेवाण इत्यादींमुळे नातेसंबंध समजू शकतात. मालाच्या व सेवांच्या देवघेवीतून आर्थिक व्यवहार समजतात. अशा प्रकारे सामाजिक मानवशास्त्रात संस्कृती या संकल्पनेचे अध्ययन केले जाते.

 सामाजिक मानवशास्त्रज्ञांत आदिवासींबाबत संशोधन चालू आहे. भारतात ग्रामीण समाजांचाही अभ्यास आदिवासी–संशोधन–पद्धतीनुसार बऱ्याच प्रमाणात झाला आहे. (१) नातेसंबंधी समूह (बांधव–समूह). (२) धर्मतत्त्वे व धार्मिक विधी. (३) कायदा व समाजनियंत्रण– राजकीय व प्रशासकीय व्यवस्था. (४) आर्थिक मानवशास्त्र इत्यादींवर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. सामाजिक मानवशास्त्रातील संशोधनामुळे बऱ्याच सामाजिक संबंधांवर प्रकाश पडला आहे. कुटुंबगटाची रचना व त्यातील व्यक्तींच्या सामाजिक भूमिका, नातेसंबंधीचे औद्योगिक व सामाजिक महत्त्व इ. आपणास समजू लागले. विशेषतः लहान समाजातील सामाजिक संबंधांचा अभ्यास साकल्यपद्धतीने करण्याची जास्त निकड आहे. त्यावरून जे सिद्धांत निघतील, त्यांचा उपयोग विशाल व जटिल समाजांच्या अध्ययनासाठी करावयाचा आहे. त्या दृष्टीने आजकाल सामाजिक मानवशास्त्रात सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग दृढ झाला आहे.

 पूर्वी मानवजातिविज्ञान व सामाजिक मानवशास्त्र या दोहोंत फरक केला जात नसे. रॅडक्लिफ–ब्राउनने यांमधील भेद स्पष्ट केला आहे. मानवजातिविज्ञानात मानवसमूहांचे ऐतिहासिक दृष्ट्या अध्ययन करण्यात येते. मानवी संस्थांच्या उगमावर जास्त भर देण्यात येतो. सामाजिक मानवशास्त्रात आगम पद्धतीवर जास्त भर देण्यात येतो व सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजविकासविषयक नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. असे नियम प्रस्थापित झाल्यास सामाजिक मानवशास्त्राचा लोककल्याणाकरिता फार उपयोग होऊ शकेल. आदिवासींच्या चालीरीतींचा अभ्यास केवळ त्यांचा इतिहास समजण्यास न करता, त्या चालीरीतींचा सामाजिक अर्थ, त्यांचे सामाजिक, मानसिक, नैतिक जीवनातील कार्य समजावून घेतले, तर त्याचा उपयोग प्रशासकास होऊ शकतो.


अनुप्रयुक्त मानवशास्त्र : कोणत्याही शास्त्रातील तत्त्वांचा व्यावहारिक उपयोग केल्यास त्यास अनुप्रयुक्त शास्त्र म्हणतात. अनुप्रयुक्त मानवशास्त्र ही मानवशास्त्राची एक स्वतंत्र शाखा नसून मानवशास्त्रातील शारीर आणि सांस्कृतिक व सामाजिक−तत्त्वांचा व्यावहारिक उपयोग यांत केला जातो. अनुप्रयुक्त मानवशास्त्राची स्वतंत्र अशी तत्त्वे अथवा सिद्धांत नाहीत. अनुप्रयुक्त मानवशास्त्राची तुलना वैद्यक अथवा अभियांत्रिकीशी केली जाते. अभियांत्रिकीप्रमाणे मानवशास्त्राने नवीन समाज घडविण्याची तत्त्वे व तंत्रे सांगावीत, ही अपेक्षा केली जाते. तसेच वैद्यकशास्त्राप्रमाणे सामाजिक विकृतींचे निर्मूलन करण्यासाठी मानवशास्त्राने ‘औषधे’(उपाय) सांगावेत ही अपेक्षा केली जाते. काहींच्या मते, सामाजिक संस्थातील परिवर्तनाचा अभ्यास अनुप्रयुक्त मानवशास्त्रीय अभ्यास समजावयास हवा. मानवी परस्परसंबंधातील परिवर्तन किंवा संस्कृति−परिवर्तन व त्याविषयक तत्त्वे यांचा अनुप्रयुक्त मानवशास्त्रात समावेश करावयास हवा. तसेच परिवर्तनाला पोषक अथवा मारक घटकांचाही अभ्यास अनुप्रयुक्त मानवशास्त्रात करावयास हवा असे काही शास्त्रज्ञ म्हणतात.

मानवशास्त्राचा व्यावहारिक उपयोग प्रथम साम्राज्यशाहीच्या काळामध्ये करण्यात आला. वसाहतींचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा, म्हणून मानवशास्त्रज्ञांनी लोकांच्या चालीरीतींची माहिती गोळा करण्यात सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी रॉयल ॲन्थ्रापॉलॉजिकल इन्स्टिट्यूटने ब्रिटिश सरकारला दक्षिण आफ्रिकेतील आदिवासींच्या सामाजिक संस्थांविषयी माहिती गोळा करण्याची सूचना केली होती. त्यामुळे प्रशासनात सुधारणा करता येतील, अशी धारणा होती.

अनुप्रयुक्त मानवशास्त्राची खरी सुरुवात विसाव्या शतकाच्या आरंभी पश्चिम आफ्रिकेतील अशांटी नावाच्या आदिवासींबरोबर झालेल्या ब्रिटिशांच्या युद्धातून झाली.

अशांटी लोकांचे एक सुवर्णासन ब्रिटिशांनी पळविले. त्यांना वाटले की त्यामुळे अशांटी लोक ब्रिटिशांची सत्ता मान्य करतील. ते सुवर्णासन स्वर्गातून आलेले आहे व ते सर्व लोकांच्या आत्मिक शक्तीचे चिन्ह आहे, अशी भावना अशांटींची होती. त्यामुळे युद्ध भडकले. शेवटी एका मानवशास्त्रज्ञाने त्या आसनाचे महत्त्व ओळखून ते परत करावयास लावले. त्या वेळेपासून मानवशास्त्राच्या उपयोगास सुरुवात झाली. साधारणतः त्याच वेळेस भारतातही शरदचंद्र रॉयनी असाच एक भांडणाचा प्रसंग टाळला होता. छोटा नागपूर भागात एका कंत्राटदाराने त्यास मदत केल्याबद्दल एका खेड्यातील देवळाचा जीर्णोद्धार केला व त्यांना रेल्वे इंजिनाचे चित्र असलेला एक झेंडा दिला. यात्रेत या नवीन झेंड्याबद्दल इतर खेड्यातील लोकांना असूया निर्माण झाली व दुसऱ्या वर्षी दुसऱ्या खेड्यातील लोकांनी रेल्वे इंजिन असलेला जास्त मोठा झेंडा आणला. तेथे छोटेसे युद्धच झाले. तिसऱ्या वर्षी रॉयनी दुसऱ्या खेड्यातील लोकांना विमान रंगविलेला झेंडा दिला व विमानाची शक्ती रेल्वे इंजिनापेक्षा जास्त असते हे पटवून दिला, तेव्हा तंटा मिटला.

वसाहतींच्या प्रशासनासाठी मानवशास्त्राचा उपयोग केल्यामुळे अनुप्रयुक्त मानवशास्त्राविषयी प्रतिकूल विचारप्रवाहही निर्माण झाले. वसाहतींच्या लोकांचे जीवनमान सुधारावे, अशी आस्था साम्राज्यवाद्यांना नव्हती. वसाहतीत केवळ स्थिरता राहावी, सुव्यवस्था रहावी हीच भावना प्रशासकांत होती. त्याकरिता मानवशास्त्रज्ञांकडून त्या त्या समाजाची माहिती गोळा करण्यात आली. १९२६ नंतर ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील वसाहतींत काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणात मानवशास्त्राचा समावेश करण्यात आला. तसेच हॉलंड व फ्रान्समध्येही तत्सम अधिकाऱ्यांना मानवशास्त्राचे शिक्षणदेण्यात येत असे. अमेरिकेत १९३४ मध्ये मानवशास्त्रज्ञाची नेमणूक ब्यूरो ऑफ इंडियन अफेअर्समध्ये करण्यात आली. १९४१ मध्ये अनुप्रयुक्त मानवशास्त्र संस्था स्थापण्यात आली. या संस्थेने मुख्यतः तीन क्षेत्रांत कार्य करण्याचे ठरविले : (१) मानसिक आरोग्य, (२) औद्योगिक संघटना, आणि (३) आर्थिक विकासांचा सांस्कृतिक परिवर्तनाशी संबंध.

 दुसऱ्या महायुद्धात बऱ्याच मानवशास्त्रज्ञांनी आपापल्या राज्ययंत्रणेस सहाय्य दिले. अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी जपानी संस्कृतींचा अभ्यास करून त्याविषयक अनेक उपयुक्त सूचना केल्या. जपानी सम्राटास जपानी लोक दैवत मानत असल्यामुळे राजेशाही नष्ट करू नये, अशी सूचना करण्यात आली. पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रभावामुळे लोक आपोआपच राजेशाहीचा सन्मान करावयाचे थांबतील, असा सूर त्यांत होता. कोठलीही संस्था बळजबरीने नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास ते साधत नाही, हे तत्त्व मान्य झाले. जपानी युद्धकैद्यांचीही सामाजिक पाहणी करण्यात आली.


महायुद्धानंतर अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. या नवस्वतंत्र राष्ट्रांना जलदीने सर्व क्षेत्रात प्रगती करावयाची आहे. सामाजिक स्थिरतेपेक्षा तांत्रिक प्रगती सर्व जगाला हवीशी वाटते आहे. जे मानवशास्त्रज्ञ स्थिरतेविषयी बोलतात, त्यांना सरकारी क्षेत्रात स्थान मिळत नाही. सर्वांना तांत्रिक प्रगती शक्य तितक्या लवकर करण्यास मदत करावी, अशी अपेक्षा सगळ्या अविकसित राष्ट्रांत आहे. जीवनमानाचा दर्जा वाढविणे व कल्याणकारी कार्यक्रम तडीस नेणे, ही नवीन राष्ट्रांची इच्छा आहे. त्याकरिता मानवशास्त्रज्ञांनी कोणते सांस्कृतिक घटक प्रगतीस पोषक ठरतात अथवा बाध आणतात, हे अभ्यासून त्याविषयक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे. तसेच आर्थिक योजनांचा समाजरचनेवर काय परिणाम होतो व समाजरचनेचा आर्थिक विकासांवर काय परिणाम होतो, हेही बघावयास हवे. भारतातील पारंपरिक समाजरचनेचा ग्रामसंस्था, संयुक्त कुटुंबसंस्था, जातिसंस्था, धर्म, मूल्ये इ. आर्थिक आणि सामाजिक विकासावर काय परिणाम होतो, या विषयीचे संशोधन इतर सामाजिक वैज्ञानिकांबरोबर मानवशास्त्रही आपल्या पद्धतीने करतात.

 संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना व राष्ट्रसंघाच्या अन्य संस्थांत मानवशास्त्रज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. मानवशास्त्रात वंश व संस्कृती या दोन संकल्पनांचा सखोल अभ्यास झालेला आहे. वंशाचा शास्त्रीय अभ्यास करून मानवशास्त्रज्ञांनी पटवून दिले आहे की शुद्ध वंशाची कल्पना अशास्त्रीय आहे. तसेच वंशात उच्च–नीचता नसते, वंशाचा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतो. वंशविषयक भांडणे ही आता राजकीय स्वरूपाची आहेत. तसेच प्रत्येक संस्कृती ही ऐतिहासिक कारणांतून निर्माण झालेली असते. संस्कृतीतही उच्च−नीचता नसते. त्यामुळे एका समाजास आपली संस्कृती दुसऱ्या समाजावर लादण्याचा काहीही नैतिक अधिकार नसतो. त्यावरूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततामय सहजीवनाचा विचार प्रसृ त झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कांचीसनद तयार करताना मानवशास्त्रज्ञांनी बरीच मदत केली.

 संस्कृतीचा वैद्यकाशी फार जवळचा संबंध आहे. प्रत्येक संस्कृतीत आजारांचे प्रकार, आजारांची कारणे व त्यांकरिता औषधेही भिन्न भिन्न असतात. आजार जादूमुळे होऊ शकतात व मंत्रसामर्थ्याने बरे होऊ शकतात, अशी भावना काही समजात असते. अशा समाजात वैद्यक सहजासहजी स्वीकारली जात नाही कारण या शास्त्रीय वैद्यकाचा त्या समाजाच्या संस्कृतीशी काहीही संबंध नसतो. आज अविकसित राष्ट्रांत संस्कृतीपरिवर्तन शक्य तितक्या कमी वेळात घडविण्याचे योजनाबद्ध प्रयत्न चालू आहेत. संस्कृतीपरिवर्तनातल्या अडीअडचणी मानवशास्त्रज्ञ जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण परिवर्तन हे शेवटी मानवामानवातल्या परस्परसंबंधांत व्हावयाचेअसते, मानवी मूल्यांत व्हावयाचे असते. संस्कृती परिवर्तनाबद्दल सर्वसाधारणपणे तीन नियम सांगितले जातात : (१) ज्या परिवर्तनामुळे लोकांची मूलभूत जीवन–मूल्ये बदलतात, ती परिवर्तने लोक स्वीकारीत नाहीत. (२) परिवर्तन लादले गेल्यास लोक ते स्वीकारीत नाहीत. (३) जे परिवर्तन लोकांस समजत नाही, ते स्वीकारले जात नाही.

शारीरिक मानवशास्त्रातील वंशकल्पनेव्यतिरिक्त इतरही संकल्पनांचा व्यावहारिक उपयोग करण्यात येतो. भिन्न भिन्न मानवसमूहांतील शरीरवाढीचे प्रश्न शारीरिक मानवशास्त्रज्ञ अभ्यासतात. यावरून कोणत्या वयात काय अन्न–आहार द्यावयास हवा हे ठरवता येते. तसेच स्त्रियांत ऋतूप्राप्ती होण्याचे वय व ऋतू–निवृत्तीचे वय वेगवेगळ्या मानवसमूहांत भिन्न असते. यावरून कुटुंबनियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच कुटुंबनियोजन स्वीकारण्यात वा नाकारण्यात बरेच सांस्कृतिक घटकही कार्य करतात. पिंडदान करण्यासाठी मुलगा हवा असतो. पतिपत्नींमध्ये कौटुंबिक समस्यांची चर्चा होत नसते. मुले झाल्याशिवाय व्यक्तीस प्रौढत्व प्राप्त होत नाही – असे अनेक सांस्कृतिक घटक नियोजनाच्या आड येतात. शारीरिक मानवशास्त्राचे इतरही व्यावहारिक उपयोग आहेत.

शारीरिक मानवशास्त्रात आनुवंशिकतेचा सखोल अभ्यास करण्यात येतो. त्यावरून आनुवंशिक रोगविषयक संशोधन करता येते. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीस काही सांस्कृतिक व शारीरिक आनुवंशिक कारणे असतात की काय ? या प्रश्नाचे उत्तर अनुप्रयुक्त मानवशास्त्राद्वारे देण्याचा प्रयत्न चालू आहे.

  भारतात पंचवार्षिक योजना सुरू झाल्यापासून मानवशास्त्राचा व्यावहारिक उपयोग वाढत आहे. आपल्या समाजात आर्थिक परिवर्तन त्वरित घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. असे आढळून आले आहे की सामाजिक व आर्थिक परिवर्तन हे परस्परावलंबी आहेत व याची जाणीव मानवशास्त्रज्ञांना आहे. पारंपारिक समाजरचना नवीन शिक्षण, नवीन वैद्यक, नवीन बी–बियाणे इत्यादींच्या आड येते, हे दिसून आले आहे. सामूहिक विकास योजना, कुटुंबनियोजन यांबाबत प्रशासनाशी मानवशास्त्रज्ञांचा सल्लागार म्हणून संबंध येतो. आदिवासींविषयक कल्याणकारी योजना, त्यांचे प्रशासन इ. मानवशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने चालत आहे. तसेच औद्योगिक व इतर संघटनांत आणि कारखान्यांत वेगवेगळ्या स्तरांतील वेगवेगळ्या स्थानांवर काम करणाऱ्याव्यक्तींच्या परस्परसंबंधांवर कार्यक्षमता अवलंबून असते. या संबंधीचा अभ्यासही मानवशास्त्रज्ञ करतात.


 नवोदित राष्ट्रांत आपापल्या समाजात व इतर अविकसित समाजांत आर्थिक–सामाजिक परिवर्तन घडविण्यात मदत करण्याची जबाबदारी मानवशास्त्रावर आलेली आहे. अशा वेळी आपला शास्त्रीय दृष्टिकोण सांभाळून मानवशास्त्रज्ञाने कोणकोणत्या भूमिका स्वीकारावयाच्या हा एक जटिल प्रश्न आहे. कसेही असले तरी मानवशास्त्रज्ञाने शुद्ध ज्ञानाचे आपल्याभोवती जाळे विणून त्यांत अल्पसंतुष्ट न राहता आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणाकरिता शक्य तितका उपयोग करून द्यावा असेच सर्वांना वाटते.

 मानवशास्त्राचा इतर शास्त्रांशी संबंध : मानवशास्त्रात मानवाचा सर्वांगीण अभ्यास होत असल्यामुळे मानवशास्त्राचा इतर सर्व विज्ञानांशी थोडाफार संबंध येतो. मानवप्राण्याचा जैवविषयक अभ्यास करण्यासाठी इतर बऱ्याच जैवशास्त्राची मदत घ्यावी लागते. त्यांत प्रामुख्याने प्राणिविज्ञान, भूविज्ञान, पुराजीवविज्ञान, शारीर, शरीरक्रियाविज्ञान, पुरातत्त्वविद्या, जनन–तंत्र, भ्रूणविज्ञान, अस्थिविज्ञान, दंतविज्ञान इत्यादींचा समावेश होतो.

उत्खननांत जीवाश्मे, अस्थी, दगडांची वा इतर हत्यारे मिळतात. त्यांचा काळ निश्चित करणे रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे तसेच कार्बन–१४ चाचणी पद्धतीमुळे शक्य झाले आहे. कोणत्या भू–प्रस्तरात हे अवशेष मिळाले, यावरूनही तारीख निश्चित करणे शक्य होते. शारीरिक अवशेषांत दातांचे अवशेष, कवटीचे, जबड्याचे व हाता–पायांच्या मोठ्या हाडांचे अवशेष जास्त प्रमाणात सापडतात कारण ते टणक असल्याने इतर प्राण्यांना खाता येत नाहीत. यावरून भूविज्ञान, पुराजीवविज्ञान, पुरातत्त्वविद्या, अस्थिविज्ञान, दंतविज्ञान इत्यादींचे महत्त्व पटते. मानवप्राण्याच्या विकासाचा अभ्यास करताना इतर प्राण्यांशी तुलना करावी लागते. या तुलनेत प्राणिविज्ञान, शारीर, शरीरक्रियाविज्ञान, भ्रूणविज्ञान इत्यादींचे बरेच साहाय्य लाभते. तसेच मानवाच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करावयाचा झाल्यास तसेच त्याचे वंशीकृत वर्गीकरण करावयाचे झाल्यास जनन–तंत्राचा उपयोग होतो. शरीरवाढीचा अभ्यास व आनुवंशिक रोगांचा अभ्यासही जनन–तंत्रामुळे जास्त परिणामकारक रीत्या करता येतो.

  सांस्कृतिक व सामाजिक मानवशास्त्राचा सर्व मानव्यकक्षांशी संबंध येतो. संस्कृतीचा उगम, विकास, संघटना, रचना, प्रसार इत्यादींचा अभ्यास मानवशास्त्रात होत असल्यामुळे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, पुरातत्त्वविद्या, भाषाशास्त्र, साहित्य, कला, कायदा इत्यादींशी कमीअधिक प्रमाणात संबंध येतो. एका संस्कृतीच्या सर्व उपांगांचे वर्णन व भिन्न भिन्न संस्कृतींचे तौलनिक विश्लेषण करताना तर दिलेल्या सर्व विषयांचे थोडे थोडे ज्ञान असणे आवश्यक असते.

 व्यक्तिमत्त्वात, सामाजिक समूहांत किंबहुना सर्व मानवांत, मानवी स्वभाव म्हणून ओळखला जातो. याच्या अध्ययनांतून मानवशास्त्राचे इतर मानव्यकक्षांशी असलेले संबंध स्पष्ट होतात. मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धतीत संस्कृतीच्या विकासाचा अभ्यास करताना पुरातत्त्वविद्या व इतिहास मदत करतात. प्रसार व संस्कृतीची आर्थिक उपांगे भौगोलिक घटकांचा विचार केल्याशिवाय समजत नाहीत. मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती जास्त शास्त्रशुद्ध व्हाव्यात, यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत. केवळ वर्णन न करता तौलनिक पद्धतीने विश्लेषण करून प्राकृतिक विज्ञानांप्रमाणे सिद्धांत मांडण्याची महत्त्वाकांक्षा मानवशास्त्रज्ञ बाळगतात. 

अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मसंघटना, साहित्य, कला इ. सामाजिक शास्त्रे वेगवेगळे आविष्कार दर्शवितात. भाषा व संस्कृती, संस्कृती व व्यक्तिमत्त्व, साहित्य व संस्कृती, संस्कृती परिवर्तनाची आर्थिक, राजकीय इ. कारणे या विषयांबरोबरच संशोधन झालेले आहे. अलीकडे वैद्यकातही सांस्कृतिक घटकांचे महत्त्व बळावले आहे.

 यावरून मानवशास्त्राचे इतर शास्त्रांशी असणारे संबंध स्पष्ट होतात. वेगवेगळ्या शास्त्रांतील समस्या, तंत्रे, पद्धती व सिद्धांत यांमधील समानतेमुळे हे संबंध प्रस्थापित झाले आहेत. मानवशास्त्राचे सर्व प्रकारच्या विज्ञानांशी व मानव्यविद्यांशी परस्परसंबंध असल्यामुळे मानवाचा सर्वांगीण, साकल्याने अभ्यास करणारे मानवशास्त्र हे एकमेव शास्त्र आहे.


 सांस्कृतिक व विशेषतः सामाजिक मानवशास्त्राचा समाजशास्त्राशी फारच घनिष्ठ संबंध आहे व दिवसेंदिवस तो जास्त वाढत आहे. समाजशास्त्र व मानवशास्त्र यांचा उगम, विकास व पद्धती स्वतंत्र आहेत, समाजशास्त्राचा उगम सतराव्या शतकात झाला व त्यात प्रामुख्याने पाश्चिमात्य समाजाचाच अभ्यास केला जात असे. आजच्या शास्त्रीय समाजशास्त्रात सामाजिक परस्परसंबंध, सामाजिक प्रक्रिया, समाजरचनाइत्यादींविषयक सिद्धांत मांडण्याकडे कल असतो. तरी समाजशास्त्रज्ञ स्वतःच्या समाजाबाबत जास्त जिज्ञासू वृत्ती दाखवितो.

 मानवशास्त्राचे मूळ प्रवासवर्णने, मिशनरी कार्य, मानव व मानवेतरांचा जैवविकास व संस्कृतीच्या विकासविषयक जिज्ञासेत सापडते. मानवशास्त्रज्ञ नेहमीच भिन्न व वैचित्र्यपूर्ण वाटणाऱ्या आदिवासी संस्कृतींचा अभ्यास करीत राहिले. हा अभ्यास पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी जगभरातील आदिवासींचा केला. विसाव्या शतकाच्या शास्त्रीयवैज्ञानिक वातावरणात मानवशास्त्र सिद्धांतांचा विचार करावयास शिकले. एरवी मानवशास्त्र केवळ वर्णनात्मक होते.

 विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, मानवशास्त्रज्ञांनी आदिवासींच्या व्यतिरिक्त इतर प्रगत संस्कृतीविषयीही संशोधन करण्यास आरंभ केला. त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासपद्धतीत फरक करावा लागला. ते संशोधन वर्णनात्मक न राहता तौलनिक व सैद्धांतिक व्हावयास लागले. समाजशास्त्रज्ञही लहान समूहांचा अभ्यास करावयास लागले. परिणामतः त्यांनाही आपल्या अभ्यासपद्धती व तंत्रे बदलावी लागली. त्यामुळे समाजशास्त्र व मानवशास्त्र यांत परस्पर देवाणघेवाण संशोधनाच्या पातळीवर वाढली. शिक्षणाच्या पातळीवर अजून दोन्ही शास्त्रे पारंपरिकच आहेत. पूर्वी मानवशास्त्रात केवळ आदिवासींविषयक व इतिहाससंबंधी संशोधन चालत असे. रचनात्मक प्रणालींच्या प्रभावामुळे समाजशास्त्र व मानवशास्त्र या दोहोंत आता संशोधन या विषयावर जास्त लक्ष केंद्रिभूत केलेले असते. त्या विषयाच्या संशोधनात्मक पद्धती समाजशास्त्रीय असाव्यात की मानवशास्त्रीय असाव्यात, हा गौण मुद्दा आहे.

समाजशास्त्रात टॉलकॉट पार्सन्स, रॉबर्ट मर्टन व पीकांसले डेव्हिस यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. मानवशास्त्रात, मॅलिनोस्की, रॅडक्लिफ−ब्राउन व इव्हान्स–प्रिचर्ड या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमील द्यूरकेमच्या कल्पनांना जास्त मूर्त स्वरूप दिले आणि त्यातून प्रकार्यवादाचा उगम झाला. टाल्फ लिंटन या मानवसास्त्रज्ञाच्या ‘प्रस्थिती व भूमिका’ या संकल्पनांना समाजशास्त्रज्ञ पार्सन्सने पुढे उजाळा दिला. अनुप्रयुक्त मानवशास्त्रात रचनात्मक प्रणालीचा बराच उपयोग केला जातो. आधुनिक काळात समाजशास्त्र व मानवशास्त्र यांचे परस्परसंबंध अधिक घनिष्ठ होणार, हे उघड आहे.

 ऐतिहासिक आढावा : विद्यमान मानवशास्त्राचे स्वरूप जेमतेम शंभर वर्षे जुने असले, तरी त्याची वेगवेगळी स्वरूपात सुरुवात फार पुरातन काळात झाल्याचे पुरावे आढळतात. हीरॉडोटसच्या (ख्रि.पू. ४८४–ख्रि.पू. ४२५) लेखनात याविषयी उल्लेख आढळतात. त्याने स्वतः प्रवास केला व समाजांचा तौलनिक अभ्यास केला. हिपोक्रेटस (ख्रि.पू. ४६०–ख्रि. पू. ३७७) शारीरिक मानवशास्त्राचा अग्रणी होता. त्याने डोक्याच्या प्रकारांचा अभ्यास केला होता. त्याच्या मते अर्जित गुण आनुवंशिक बनू शकतात. त्याहीपूर्वी ऋग्वेदात वर्ण म्हणजे रंग या अर्थी संदर्भ आढळतो. आर्य गोरे व दस्यू काळे असा उल्लेख आहे. तसेच त्यांना ‘अनास’(नाक नसलेले) व रुध्रवाचः (रुध्रपक्षाप्रमाणे आवाज करणारे) असेही संबोधलेले आहे. यावरून मानवाच्या शरीरवैचित्र्याबद्दल फार पुरातन काळापासून अध्ययन होत असावे.

 ॲरिस्टॉटलने (ख्रि.पू. ३८४–ख्रि.पू. ३२२) प्रथम ‘ॲन्थ्रोपॉलॉजिस्ट’(मानवशास्त्रज्ञ) हा शब्दप्रयोग केला. सोळाव्या शतकात लॅटिन भाषेत, मानवाच्या शरीररचनेचे अध्ययन म्हणजे मानवशास्त्र अशा अर्थी शब्दप्रयोग झाला. सतराव्या शतकात, मानवशास्त्राचे पहिले इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात मानवशास्त्राचा तत्त्वज्ञान म्हणून निर्देश केला असून त्याची शरीररचनाशास्त्राशी संबंध दर्शविणारी चर्चा आहे. १८२२ सालच्या ब्रिटिश विश्वकोशात, मानवशास्त्र म्हणजे मानवाच्या सर्वांगीण स्वरूपाचा अभ्यास असा उल्लेख आहे. १८७६ मध्ये तोपीनारने ला अँथ्रोपॉलॉजी (L Anthropologie) या ग्रंथात मानव व मानववंशाचा अभ्यास यांचा निर्देश केला आहे.


ॲरिस्टॉटलने त्या काळी प्रचलित असलेल्या धार्मिक मतप्रणालीची तमा न बाळगता मानवाचे प्राणिजगतातील स्थानाविषयी मत प्रतिपादिले. मानवप्राणी हा मेंदूचा आकार, दोन पाय व मानसिक वैशिष्ट्यांमुळे इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो, असे सांगितले. स्पेनच्या व्हेसालियसने (१५१३–६४) निरनिराळ्या लोकांच्या डोक्याच्या आकारांत का फरक असतो, याचे विवेचन केले. त्यास जिवंत माणसाचे विच्छेदन केल्याच्या आरोपावरून मृत्यूची शिक्षा धर्मगुरूंनी सुनावली होती परंतु राजाच्या हस्तक्षेपामुळे ती कमी करण्यात आली. स्पीलर्मने पिग्मी, वानर व कपि (अपुच्छ वानर) यांच्या शरीररचनेची तुलना करून पिग्मीस वानर व मानव यांच्या मधील स्थितीतील प्राणी ठरविले. कपीचा अभ्यास करणारा व तुलनात्मक अध्ययन करणारा हा पहिलाच शास्त्रज्ञ.

 स्वीडनच्या लिनीयसने (१७०७–७८) मानवप्राणी नववानर गणातील वेगळ्या जातीचा आहे, असे प्रतिपादिले. त्याने मानववंशाचे वेगवेगळे प्रकारही सांगितले. ब्लूमेनबाख (१७५२–१८४०) या जर्मन शास्त्रज्ञाने मापे घेऊन वंशांचे वर्गीकरण करण्याचा पाया घातला. डोके व चेहऱ्याच्या प्रकारांच्या भिन्न तऱ्हा त्याने नमूद केल्या. मस्तकशास्त्राचा संस्थापक असा ब्लूमेनबाख उल्लेख केला जातो. केस, वर्ण, शरीररचना व विशेषतः डोक्याचे प्रकार यांच्यावरून त्याने कॉकेशियन, मंगोलियन, इथिओपियन, अमेरिकन व मलाय असे मानवसमूहांचे पाच वंशांत वर्गीकरण केले. डोक्याचे त्याने अनुषंगाने तीन प्रकार ठरविले–मंगोलांचे चौकोनी डोके, निग्रोंचे कानांच्या बाजूंनी दबलेले अरुंद डोके व या दोहोंमधील कॉकेशिअन. रेटझियसने (१७९६–१८६०) मस्तिष्कपरिणाम शोधून काढले. मस्तिष्कपरिणाम म्हणजे डोक्याची रुंदी व डोक्याची लांबी १००, अरुंद व लांब डोक्यास दीर्घकपाल व रुंद डोक्यास पृथुकपाल अशी त्याने नावे दिली. शिवाय उंची–चेहरा इत्यादींविषयकही मापे घेण्यास सुरुवात केली. अशा रीतीने आधुनिक मस्तिष्कशास्त्र प्रस्थापित झाले. त्याच सुमारास ग्रॅटनने मस्तकमापक तयार केला.

 फ्रान्समध्ये पॉल ब्रोका (१८२४–८०) याने बरीच मापके तयार केली. या काळात यूरोपातील सर्व राष्ट्रांत डोक्याची मापे घेण्याचा सपाटा चालू होता.

 चार्ल्स व्हाईटने (१७२८–१८१३) पन्नास निग्रोंच्या शरीराच्या अवयवांची मापे घेतली. दंडाच्या मानाने निग्रोंचा हात यूरोपियनांपेक्षा लांब असतो व कपीचा हात निग्रोंच्या हातापेक्षा लांब असतो, असे त्याने दाखविले. यावरून त्यास मानवमितीचा जनक समजतात. नाक, कान, डोळे व वर्ण यांचे अध्ययन एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास व्हावयास लागले. १९१२ मध्ये बोॲसने देशांतर केलेल्या लोकांच्या शरीररचनेत काय फरक होतो, याबाबत एक प्रबंध लिहिला. त्याच सुमारास नासिका परिणाम शोधण्यात आले. यानंतर मापनातील विचलनाबाबत लक्ष वेधले गेले. कार्ल पिअर्सनने सांख्यिकी पद्धतीचा अवलंब केला. १८६५ मध्ये सर फ्रान्सिस गाल्टनने प्रजननशास्त्राविषयी लिहिले. १८२३ मध्ये बोटांच्या ठशांचा उपयोग व्यक्तीची ओळख पटण्यासाठी व वंश वर्गीकरणासाठी प्रथम केला. १८५८ मध्ये बंगालात सर हर्षल या ब्रिटिश अधिकाऱ्याने सरकारी कागदपत्रांवर निरक्षरांचे हाताचे ठसे घेण्यास सुरुवात केली. १८७७ मध्ये यास सरकारी मान्यता मिळाली. गाल्टनने तळव्याच्या अध्ययनास शास्त्रीय स्वरूप दिले.

सर आर्थर कीथने १९१९ मध्ये वंश गुणविशेष हे अंतःस्त्रावामुळे निश्चित होतात असे सांगितले. ग्रंथीच्या आनुवंशिक स्वरूपामुळे वंशगटांची विभागणी झाली. यानंतर रक्तगटांचाही वंश वर्गीकरणासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न झाला.

डार्विनच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज या ग्रंथाचे १८५९ मध्ये प्रकाशन झाले. त्यानंतर मानवशास्त्राचा सर्वांगीण विकास झाला. डार्विनच्या पूर्वीही त्याने मांडलेल्या विचारांचा जन्म झाला होता. परंतु डार्विनने त्यास शास्त्रीय स्वरूप दिले. डार्विनच्या सिद्धांतामुळे मानवशास्त्र सामाजिक व जैव क्रमविकासाचे शास्त्र बनले. १८६३ मध्ये छापलेल्या मॅन्स प्लेस इन नेचर या पुस्तकात हक्स्लीने सर्वप्रथम डार्विनच्या तत्त्वांचा मानवाच्या अध्ययनासाठी वापर केला. त्यांत त्याने गोरिला, चिंपँझी व मानव यांचा तौलनिक अभ्यास केला. हक्स्लीने वंशांचे वर्गीकरण केसांच्या प्रकारांवरून केले.


 डार्विनच्या काळापासून मानवशास्त्रासंबंधी अभ्यास करणाऱ्या बऱ्याच संस्था अस्तित्वात आल्या. १८३७ मध्ये ब्रिटिश साम्राज्यात गुलामगिरीच्या पद्धतीने कायद्याने उच्चाटन झाल्यानंतर, ‘द ॲबओरिजिन्स प्रोटेक्शन सोसायटी’स्थापन झाली. १८३८ मध्ये ‘सोसिएने एत्नोलोनिक द पारी’ ही संस्था पॅरिसमध्ये निघाली. पॅरिसमध्ये पॉल ब्रोकाने १९५९ मध्ये ‘सोसिएने दांत्रोपोलोजी द पारी’ व १८७६ मध्ये ‘लेकोल दांत्रोपोलोजी’या संस्था स्थापल्या. १८६३ च्या आसपास ‘अँथ्रॅपॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ची स्थापना झाली. १८६९ नंतर इथ्नॉलॉजिकल व अँथ्रॉपॉलॉजिकल संस्थांचे एकीकरण होऊन ब्रिटनमध्ये ‘अँथ्रॅपॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’या संस्थेची स्थापना झाली. ती पुढे ‘रॉयल इन्स्टिट्यूट’१९०७ मध्ये झाली. मॉस्कोत १८३३ मध्ये, व्हिएन्नात १८७० मध्ये, फ्लॉरेन्सला १८७१मध्ये, स्टॉकहोमला १८७३ मध्ये व १९७९ मध्ये वॉशिंग्टनमध्ये मानवशास्त्रविषयक संस्था निघाल्या. १८७९ मध्येच ‘ब्यूरो ऑफ अमेरिकन इथ्नॉलॉजी’नामक शासकीय खाते सुरू करण्यात आले. मानवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सु.३५० हून अधिक संस्था आज जगात अस्तित्वात आहेत. त्यांची माहिती इंटरनॅशनल डिरेक्टरी ऑफ अँथ्रॅपॉलॉजिकल इन्स्टिट्यूशन्स या संदर्भग्रंथात विस्ताराने दिली आहे. याशिवाय लंडन, ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्व्हर्ड, कोलंबिया इ. जगन्मान्य विद्यापीठांत मानवशास्त्राचा अभ्यास होतो.

 भारतात विल्यम जोन्स यांच्या प्रेरणेने मानवशास्त्राच्या अभ्यासास उत्तेजन मिळाले व १९२० मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव झाला. दिल्ली, कलकत्ता, लखनौ, आंध्र, पुणे इ. विद्यापीठांतून मानवशास्त्राच्या अभ्यास–संशोधनाची सोय आहे. निर्मलकुमार बोस, धीरेंद्र मजुमदार, के.पी. चट्टोपाध्याय, श्यामाप्रसाद दुबे, दिलीपकुमार सेन, पोपटलाल शहा, इरावती कर्वे इ. संशोधकांचा भारतीय मानवशास्त्राच्या प्रगतीत फार मोठा वाटा आहे. ‘अँथ्रॅपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ही भारतातील मानवशास्त्रविषयक अभ्यासाची मोठी संस्था असून तिचे मुख्य कार्यालय कलकत्ता येथे आहे. याशिवाय प्रत्येक राज्यात शासकीय स्तरावर आदिवासी संशोधन व प्रशिक्षणसंस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात या विषयाचे अध्यापन–संशोधन होते. याशिवाय महाराष्ट्र मानविज्ञान परिषद, पुणे आदिवासी जनजागृती केंद्रे, पुणे वनवासी कल्याण आश्रम, कशाळे भूमिसेना, ठाणे इ. संस्था संशोधन व प्रकाशन या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करीत आहेत.

 ब्रोकाचा मित्र झोझेफ देनिकेअर याने जगाच्या लोकसंख्येत २९ वंश–लक्षणे आहेत असे प्रतिपादिले व त्यांवर आधारित ग्रंथ इ. स. १९०० मध्ये प्रसिद्ध केला. विल्यम रिप्लीचे द रेसेस ऑफ यूरोप हे पुस्तकही इ. स. १९०० मध्ये न्यूयॉर्क व लंडनमध्ये एकाच वेळी प्रसिद्ध झाले. इ. स.१८९८ मध्ये हॅडनचे द स्टडी ऑफ मॅन इंग्लंड–अमेरिकेत प्रसिद्ध झाले. मानवशास्त्र हे मानवाचासर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र असून ते केवळ शरीरविषयक शास्त्र नाही, हे हॅडनचे मुख्य प्रतिपादन होते. त्याच्या मते मानवजातिवर्णन म्हणजे विशिष्ट समाजाचे वर्णन व मानवजातिविज्ञान म्हणजे मानवी समूहांची तौलनिक अभ्यास. ब्रिटनच्या मते (१८८६) मानवशास्त्र म्हणजे शारीरिक मानवशास्त्र व मानवजातिविज्ञान म्हणजे मानवाच्या सामाजिक अंगोपांगांचा अभ्यास. त्याच काळात इटलीतील विचारप्रवाह मानवशास्त्राच्या सर्वव्यापी स्वरूपास मान्यता देणारा होता. इंग्लंडमध्ये हर्बर्ट स्पेन्सरने सामाजिक व जैव उत्क्रांतिवादावर अनेक ग्रंथ लिहिले.

 ऑस्ट्रियन धर्मोपदेशक व शास्त्रज्ञ मँडेल याने १८६५ मध्ये ‘आनुवंशिकतेचे नियम’प्रसिद्ध केले. परंतु इ.स. १९०० पर्यंत त्याची कोणी दखल घेतली नाही. इ.स. १९०० मध्ये ऑस्ट्रियाचे एरिख केरमाक, जर्मनीचे एरिख कोरेन्स, हॉलंडचे द व्ऱ्हीस व इंग्लंडमधील विल्यम बेटसन यांनी स्वतंत्र रीत्या आनुवंशिकतेचे नियम शोधून काढले. या नियमांमुळे पिढी–पिढीतील शारीरिक, मानसिक गुणविशेषांच्या परिवर्तनाचे स्पष्टीकरण झाले. द व्ऱ्हीसने अनपेक्षितपणे होणाऱ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेस विपरिवर्तन असे नाव दिले. इ.स. १९०० नंतर गुणसूत्रांचा शोध लागल्याने जनन–तंत्राची झपाट्याने वाढ झाली. गुणसूत्रांमुळे लिंग–निश्चितीची कारणे समजली. साध्या माशीवर करण्यात आलेल्या प्रयोगांमुळे आनुवंशिकतेची सूत्रे उमगण्यास मदत झाली. यांत मॉर्गनने पुढाकार घेतला होता. या शोधांचा मानवाच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करण्यास, तसेस वनस्पतिसृष्टीत व प्राणिसृष्टीतील आनुवंशिकतेचा अभ्यास करण्यास उपयोग झाला. बऱ्याच रोगांची कारणे व त्यांचा प्रसार याविषयक ज्ञान प्राप्त झाले.

 मानवाच्या आनुवंशिकतेच्या बाबतीत उंची, बांधा, डोळ्यांचा रंग, वर्ण, केसांचा प्रकार व रंग, मानसिक गुण–दुर्गुण इत्यादिंविषयक बरेच संशोधन झाले (पहा : जनन तंत्र). मानवप्राण्याच्या उत्पत्तीबाबतचे कुतूहल जुने आहे. इ.स. १७०० मध्ये प्राचीन मानवाची कवटी मिळाली परंतु १३५ वर्षे ती स्टॅटगार्ट वस्तुसंग्रहालयात पडून होती. १८४८ मध्ये जिब्राल्टर येथे कवटी मिळाली. तिचे वर्णन ५९ वर्षांनंतर करण्यात आले. १८५६ मध्ये प्रशियातील निअँडरथल दरीत कवटीचा तुकडा सापडला. त्याबाबत, रूडोल्फ, व्हिर्‌खो, ब्रोका आणि हक्स्ली यांच्यात बरेच वादंग माजले. त्यानंतर १८६६, १८९२, १८९९, १९०७, १९०८, १९१४, १९१६, १९२५, १९३२, १९५९ असे मानवप्राण्याचे अवशेष उपलब्ध झाले आहेत व त्यांवरून मानवाच्या उत्पत्तीबद्दल व उत्क्रांतीबद्दल महत्त्वाचे दुवे सांधले गेले. या संशोधनात रेमंड डार्ट, रॉबर्ट ब्रूम, युजीन द्यू ब्वा इ. संशोधकांचा वाटा मोठा आहे. कनिग्झवॉल्ड, डेव्हिडसन ब्लेक, फ्रान्ट्स व्हायडनरिख आणि लीकी या शास्त्रज्ञांचाही या कार्यात फार मोठा हात आहे.


दुसऱ्या महायुद्धानंतर शारीरिक मानवशास्त्रात आमूलाग्र बदल झाले. निर्भेळ वंशप्रकारांची कल्पना अशास्त्रीय आहे असे सिद्ध झाले. तांत्रिक संशोधनाने बऱ्याच प्रश्नांचा उलगडा झाला. उदा., कार्बन–१४ पद्धतीने हाडांच्या अवशेषांचा काळ ठरविणे, छायाचित्रण, क्ष–किरण, इतर भौतिकी व रासायनिक पद्धतींमुळे शरीराच्या आतील रचनेची माहिती होऊ लागली. जनन–तंत्र व इतर जैव शास्त्रांशी शारीरिक मानवशास्त्राचा जबळचा संबंध प्रस्थापित झाला.

 बरेच शारीरिक मानवशास्त्रज्ञ वैद्यकात मानव−जनन तंत्रज्ञ म्हणून काम करतात. शारीरिक मानवशास्त्राचा दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतरही बराच उपयोग झाला. कमीतकमी गणवेषांचे प्रकार तयार करून लक्षावधी लोकांचे काम भागवायचे कार्य करण्यात शारीरिक मानवशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग झाला.

नवीन सांख्यिकीय पद्धतींचा शोध लागला. रक्तगटांचे अध्ययन व जनन तंत्र अध्ययन जास्त गुंतागुंतीचे झाले. मानवी जैवविषयक प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारे शारीरिक मानवशास्त्र हे एकमेव शास्त्र आहे. पारंपरिक शास्त्रात ८० टक्के मापन व २० टक्के लक्ष अनुवंश, शरीररचना इत्यादिंबाबत असे. आता ते प्रमाण उलटे झाले आहे. जनन–तंत्राचा शारीरिक मानवशास्त्रावर फार मोठा प्रभाव पडला आहे व तो वाढत आहे. आजही शारीरिक मानवशास्त्रातील मूळ समस्या म्हणजे मानवाच्या शारीर–परिवर्तनाचा−उत्क्रांतीचा−अभ्यास करणे, सांस्कृतिक घटकांमुळे उत्क्रांतीवर, परिवर्तनवर प्रभाव पडतो.

संदर्भ : 1. Abbi, B. L. Seberwal, S. Ed. Urgent Research in Social Anthropology, Simla, 1962.

           2. Aceves, J. B. King, H. G. Cultural Anthropology, Morristown (N. J.), 1978.

           3. Alland, Alexander, To Be Human: an Introduction to Anthropology, New York, 1980.

           4. Bala, L. K. Ed. Anthropology on The March: Recent Studies of Indian Beliefs, Attitudes and Social Institution, Delhi, 1964.

           5. Basu, M. N. Field Methods in Anthropology and other Social Sciences, Calcutta, 1961.

           6. Bose, M. Field in Methods in Anthropology and Other Social Sciences, Calcutta, 1970.

           7. Dey, J. M. Dey, P. J. Brief Outline of Physical and Social Anthropology, Calcutta,1968.

            8. Fuchs, S. Origin of Man and His Culture, Bombay, 1963.

            9. Ghurye, G. S. Aborigines : So Called and Their Future, Poona, 1943.

            10. Haddon, A. C. Study of Man, Chicago, 1979.

            11.Hammond, P. B. Culture and Social Anthropology, New York, 1964.

            12. Harris, M. Culture, People, Nature : an Introduction to General Anthropology, London, 1980.

           13. Herskovits, M. F. Cultural Anthropology, New York, 1965.

           14. Kroeber, A. L. Ed. Anthropology Today, Chicago, 1965.

           15. Leakey, R. E. F. Lewin, R. Origins, New York, 1979.

           16. Mead, Margaret, Anthropology: an Human Science, New Delhi, 1970.

           17. Miller, E. S Weitz, C. A. Introduction to Culture Anthropology, Englewood Cliffs, 1979.

           18. Negi, B. S. Man, Culture and Society, Allahabad, 1967.

           19. Pradhan, M. L. Anthropology in Archaeology, Bombay, 1964.

           20. Radcliffe−Brown, A. R. Method in Social Anthropology, Chicago, 1958.

           21. Wallace. A. F. C. Menand Cultures, London, 1956.

मुटाटकर, रा. के.