पायरीअस : (ग्रीक :  पीरेएफ्स). ग्रीसमधील प्राचीन शहर व हल्लीचे अथेन्सचे तसेच देशातील सर्वांत मोठे बंदर. लोकसंख्या १,८७,४५८ (१९७१). अथेन्सच्या महानगरीय विभागातच याचा समावेश होतो. अथेन्सच्या नैर्ऋत्येस आठ किमी. फालिरॉन उपसागराच्या सारॉनिक आखातावर हे वसले असून इ.स.पू. ४९३ मध्ये त्याची स्थापना झाली. पायरीअस नगराचा अभिकल्प थेमिस्टोक्लीस याने तयार केला व त्यानुसार वास्तुरचनाकार मायलीटसचा हिप्पोडॅमस याने नगराची उभारणी केली. इ.स.पू. ४९३ – ४९२ मध्ये पायरीअसला तटबंदी करण्यात आली. इ.स.पू. ४६१ – ४५६ मध्ये ‘लाँग वॉल्स’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन समांतर भिंतीनी ते अथेन्सशी जोडण्यात आले. त्यांच्यायोगे पेलोपनीशियन युद्धांत (इ.स.पू. ४३१-४०४) अथेन्सला पायरीअस बंदरमार्गे निर्वेधपणे रसद पुरविणे शक्य झाले. इ.स.पू. ४५० मध्ये एक प्रमुख व्यापारी बंदर म्हणून याला महत्त्व आले. इ.स.पू. ८६ मध्ये रोमनांनी पायरीअस उद्ध्वस्त केले. एकोणिसाव्या शतकातील त्याच्या पुनःस्थापनेपर्यंत त्याला विशेष महत्त्व नव्हते. ग्रीक शासनाने १८३४ मध्ये जुन्या पायरीअसजवळच एक मच्छीमार केंद्र व अथेन्सचे बंदर म्हणून माँटे लेओने या गावाची स्थापना केली तेच पुढे पायरीअस या नावाने ओळखले जाऊ लागले. दुसऱ्या महायुद्धात जर्मन बाँबहल्ल्याने पायरीअस उद्ध्वस्त झाले होते.

हे लोहमार्गाचे अंतिम स्थानक असून अथेन्सशी व देशातील इतर प्रमुख शहरांशी लोहमार्गांनी व महामार्गांनी जोडले आहे. रसायने, मादक पेये, जहाजबांधणी व दुरुस्ती, सुती व लोकरी कापडनिर्मिती, कातडी कमावणे, यंत्रनिर्मिती, अभियांत्रिकी, काच, विटा व कौले, साबण, कागद, सिगारेटी, औषधे, ब्लँकेटे, मॅकरोनी (शेवयासारखा पदार्थ) इ. उद्योगधंदे येथे चालतात. येथील कारखान्यांना आसमंतातील औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्रांद्वारे वीज पुरविली जाते. येथे व्यापार, उद्योग, नाविक प्रशिक्षण व संगीतशाळांची सोय आहे. येथील इ.स.पू. ६-४ शतकांतील ब्राँझ व संगमरवरी पुतळे उल्लेखनीय असून नौसेना अकादमी व पुरातत्त्वीय सग्रंहालये विख्यात आहेत.                                                                                                           

   चौधरी, वसंत