राजापूर : महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८,८८४ (१९८१). राजापूर हे मुंबई-त्रिचूर या १७ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर, रत्नागिरीच्या आग्नेयीस ७७ किमी. असून येथून पश्चिमेस समुद्र सु. २४ किमी. अंतरावर आहे. जैतापूरच्या खाडीतून राजापूरपर्यंत काही प्रमाणात जलवाहतूक करता येते.               

इतिहासकालापासून राजापूर हे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. राजापूर मुसलमानांनी १३१२ मध्ये जिंकून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६०-६१ व १६७० मध्ये राजापूरवर स्वाऱ्या करून इंग्रजांच्या वखारी लुटल्या. अठराव्या शतकाच्या पूवार्धात राजापूर आंग्रे यांच्या ताब्यात होते. जैतापूरच्या खाडीच्या काठी राजापूरचा इतिहासप्रसिद्ध किल्ला आहे. आंग्र्यांना १७१३ मध्ये हा किल्ला मिळाला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने तो घेतला. राजापूर नगरपालिकेची स्थापना १९४० मध्ये झाली.                  

शहराजवळच एक गरम पाण्याचा झरा असून त्याच्यापलिकडे सुप्रसिद्ध ‘राजापूर गंगे’ चा झरा आहे. राजापूर खाडीच्या पलीकडे टेकडीवर राजापूर गंगेचे स्थान असून ती साधारणतः तीन-चार वर्षांच्या कालावधीनंतर अवतीर्ण होते व १४ कुंडांमधून वाहू लागते. या गंगेमुळेच राजापूरची तार्थक्षेत्रात गणना केली जाते. गंगा प्रकटल्यांनतर येथे मोठी यात्रा भरते.        

राजापूरमध्ये फळे डबाबंदीकरणाचा उद्योग चालतो. येथे पुंडलिक मंदिर, विठ्ठल मंदिर, पांडव मंदिर यांसारखी मंदिरे असून जवळच धूतपापेश्‍वर मंदिर आहे. आषाढ व कार्तिक या दोन महिन्यात येथे यात्रा भरत असून भाविकांची मोठी गर्दी जमते. जुन्या इंग्रज कारखान्याच्या वास्तूमध्ये तहसिलदार कार्यालय आहे. गावात नगरपालिका दवाखाना, अद्ययावत पशुदवाखाना असून राजापूर माध्यमिक विद्यालय, तागकामविद्यालय, तसेच प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत.

पटवर्धन, मधुसूदन