पर्यावरण : विविध प्रकारची जीवसृष्टी तसेच मानवी समूह वा समाज ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील सर्व घटकांना साकल्याने पर्यावरण (इन‌्व्हायरन्मेंट) या संज्ञेने निर्दिष्ट केले जाते. पर्यावरणात सामान्यतः बाह्य परिस्थितीचे म्हणून जे नैसर्गिक घटक संभवतात, त्यांचा अंतर्भाव होतो तथापि भूगोलविज्ञानाच्या दृष्टीने ‘पर्यावरण’ ही संज्ञा अधिक मर्यादित पण नेमक्या अर्थाने वापरली जाते. त्यामुळे भौगोलिक पर्यावरणात सांस्कृतिक व सामाजिक घटकांचा समावेश होत नाही. माणसाचे आगमन होण्यापूर्वीचा जो नैसर्गिक परिसर, तोच भौगोलिक पर्यावरणात गृहीत धरला जातो. कोणत्याही परिसरात वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या यांसारख्या विविध घटकांना विविध प्रकारचे स्थान लाभलेले असते त्या परिसराच्या मर्यादेत या विविध घटकांचा एकमेकांशी येणारा स्थानविशिष्ट संबंध कशा प्रकारचा आहे, याचा विचार भौगोलिक पर्यावरणात करण्यात येतो. त्याच अर्थाची प्राकृतिक (फिजिकल) पर्यावरण अशी एक संज्ञा रूढ असून तीदेखील मानव व मानवनिर्मित गोष्टी वगळून, केवळ नैसर्गिक घटकांनाच उद्देशून वापरली जाते. पुष्कळदा अमानवी (नॉनह्यूमन) पर्यावरण असाही पारिभाषिक शब्द वापरल्याचे दिसून येते. त्यात प्राकृतिक पर्यावरणाच्या घटकांबरोबरच अभयारण्ये, उद्याने व उपवने, पुनःप्रापित भूमी, धरणे व कारखाने यांचे परिसर इ. निसर्गरूपावर परिणाम करणारे मानवनिर्मित घटक समाविष्ट होतात. तथापि या सर्वच संज्ञा काटेकोर व्याख्या करून वापरणे आवश्यक असते.

पर्यावरणवाद अशी एक तात्त्विक उपपत्तीही रूढ आहे. या उपपत्तीनुसार बाह्य नैसर्गिक वा भौगोलिक परिसराचा मानवी जीवनपद्धतीच्या स्वरूपावर कसा निर्णायक परिणाम होतो, ते दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणवाद हा एक प्रकारचा भौगोलिक नियतिवाद आहे. त्याद्वारा बाह्य परिसरामुळे मानवी जीवनपद्धत कशी निश्चित होते, हे स्पष्ट केले जाते.

नैसर्गिक साधनसामग्री, हवामान आणि भौगोलिक सुगमता इ. प्राकृतिक घटकांनी मानवी संस्कृतीची विशिष्ट घडण होते, अशी पर्यावरणवादाची भूमिका आहे. इतिहास, परंपरा, सामाजिक व आर्थिक घटक इत्यादींनी संस्कृतिरूप घडते व विकसित होते ही विचारसरणी पर्यावरणवाद मान्य करीत नाही.

यापेक्षा वेगळी आणि जवळजवळ विरोधी विचारप्रणालीही पुढे आली. मानवाचे वसतिस्थान वा परिसर हा त्याच्यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक-सांस्कृतिक विचारांचे पर्याय उभे करतो व त्यांतून कोणत्याही एका पर्यायाची निवड तो करू शकतो. या भूमिकेचे एकांतिक स्वरूपही मांडण्यात आले आहे. त्यानुसार अन्य पर्याय निवडला, की मग त्यानुसार होणाऱ्‍या सांस्कृतिक विकासावर तेथील परिसराचा काहीही परिणाम संभव नाही. अर्थात पृथ्वीच्या पाठीवर भौगोलिक सांस्कृतिक विकासाचे पर्याय सर्वत्र सारखे आढळत नाहीत हे लक्षात घेतले, तर ही एकांतिक विचारप्रणाली योग्य वाटत नाही.

तथापि प्रारंभी भौगोलिक नियतिवादाने मानवी संस्कृती व पर्यावरण यांच्यात जो निश्चित स्परूपाचा कार्यकारणभाव मानलेला होता, तो मात्र नंतरच्या काळात टिकून राहिला नाही. तरीही मानवाच्या सांस्कृतिक जीवनपद्धतीचे संपूर्ण आकलन, पर्यावरणातील नैसर्गिक घटकांचा विचार केल्याविना होणे शक्य नाही, हा विचारही पुढे आला आहे. आधुनिक अभ्यासक समग्र पर्यावरणाची कल्पना मानतात व या कल्पनेत प्राकृतिक परिसराबरोबरच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटकांचाही अंतर्भाव करतात. एवढेच नव्हे, तर समाज व त्याचे पर्यावरण यांच्यात परस्परांवर परिणाम करून परस्परांत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया चालू असते, हेही त्यांनी ओळखले आहे. या नव्या विचारप्रणालीत भौगोलिक नियतिवादाऐवजी भौगोलिक-सांस्कृतिक संभवनीयतेचे तत्त्व महत्त्वाचे ठरले आहे.

पहा : आनुवंशिकता व आसमंत परिस्थितिविज्ञान प्रदूषण.

जाधव, रा. ग.