परावटु ग्रंथि : (पॅराथायरॉइड ग्लँड). गळ्यातील ⇨ अवटू ग्रंथीच्या अगदी जवळ तिच्या पश्चभागी आणि बहुतकरून तिच्या प्रत्येक खंडाची पश्चकडा आणि तिचे आवरण यांमध्ये असलेल्या, हरभऱ्याच्या डाळीएवढ्या, प्रत्येक बाजूस दोन अशा असलेल्या छोट्या ⇨ अंत:स्त्रावी ग्रंथींना (ज्यांचा स्राव एकदम रक्तात मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रथींना) परावटू ग्रंथी म्हणतात. अंत:स्रावी ग्रंथींमध्ये त्या सर्वांत लहान आहेत. त्यांचा आकार अंडाकृती किंवा दुहेरी बहिर्गोल भिंगासारखा असून रंग पिवळसर-करडा असतो. प्रत्येक ग्रंथी सर्वसाधारणपणे ६ मिमी. लांब, ३ ते ४ मिमी. रुंद आणि १ ते २ मिमी. जाड असते व तिचे वजन साधारणपणे ५० मिग्रॅ. असते. प्रत्येक बाजूच्या वरच्या ग्रंथीला ‘ऊर्ध्वस्थ’ परावटू ग्रंथी आणि खालच्या ग्रंथीला ‘अध:स्थ’ परावटू ग्रंथी म्हणतात. अवटू ग्रंथीच्या ऊतकापेक्षा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या –पेशींच्या –समूहापेक्षा) या ग्रंथींचे ऊतक हलके असते व प्रत्येक ग्रंथी पातळ संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाच्या वेष्टनात असते.
उत्पत्ती : इ. स. १८८० पर्यंत या ग्रंथींचे अस्तित्व अज्ञात होते. १९०० च्या सुमारास त्यांचे अवटू ग्रंथीपासून असलेले स्वतंत्र स्थान मान्य झाले. भ्रूणातील क्लोमाच्या कमानींपैकी (भ्रूणमध्यस्तरापासून बनलेल्या मानेतील कमानींपैकी) तिसऱ्या व चौथ्या कमानींपासून या ग्रंथींची उत्पत्ती होते. त्या भ्रूणातील अंत:स्तरापासून बनतात. भ्रूणाच्या वाढीबरोबरच त्यांचा अवटू ग्रंथीशी जवळचा संबंध प्रस्थापित होत जातो. अध:स्थ ग्रंथी तिसऱ्या ग्रसनी (घसा) कोष्ठापासून आणि ऊर्ध्वस्थ ग्रंथी चौथ्या ग्रसनी कोष्ठापासून तयार होतात म्हणून त्यांना अनुक्रमे परावटू – ३ आणि परावटू –४ असेही संबोधितात. अधःस्थ ग्रंथी कधीकधी यौवनलोपी ग्रंथींबरोबरच (उरामध्ये अग्रभागी असणाऱ्या आणि प्रौढपणी जवळजवळ नाहीशा होणाऱ्या ग्रंथींबरोबरच) छातीतही जाऊन वाढतात, तर कधीकधी मानेत समाईक ग्रीवा रोहिणीच्या (मानेतील रेहिणीच्या) द्विशाखित होण्याच्या ठिकाणाजवळच राहतात.
संख्या आणि रचना : परावटू ग्रंथींची संख्या अनिश्चित असते. बहुधा त्या एकूण चार असतात. कधीकधी परावटू ऊतक ठिकठिकाणी विखुरलेले आढळते. मानवात परावटू ग्रंथींची जास्तीत जास्त संख्या १२ पर्यंत आढळली आहे. कदाचित त्या फक्त तीनच असण्याचीही शक्यता असते. परावटू ग्रंथी ऊतक माशाखेरीज सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळते. ग्रंथींची संख्या चारापेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘अतिरिक्त परावटू ग्रंथी’ म्हणतात.
परावटू ग्रंथींची सूक्ष्मदर्शकीय रचना वयोमानाप्रमाणे बदलणारी असते व हा बदल त्यांचे आधारद्रव्य कमीजास्त असण्यामुळे होतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षात आधारद्रव्य फार नाजूक असते.. परंतु प्रौढावस्थेत त्याचे पडदे बनून ग्रंथी खंडप्राय दिसते, तरीही रोहिण्या आणि नीला यांचे जाल जेवढे ठळकपणे दिसते तेवढे आधारद्रव्य कधीच दिसत नाही. सहाव्या वर्षापर्यंत ज्या कोशिका दिसतात त्यांना ‘स्वच्छ प्रमुख कोशिका’ म्हणतात. सातव्या वर्षाच्या सुमारास ‘ॲसि़डोफिलिक’, कोशिका आणि दहाव्या वर्षाच्या सुमारास ‘ऑक्सिफिल’ कोशिका दिसू लागतात (या दोन्ही प्रकारच्या कोशिका अम्लीय रंजकाने सहज रंगविता येतात व त्यावरून त्यांचे अस्तित्व कळून येते). या कोशिका निरनिराळ्या नसून एकाच कोशिकेच्या स्रावोत्पादनाच्या दृष्टीने होणाऱ्या अवस्था असाव्यात.
इतर अंत:स्रावी ग्रंथींप्रमाणेच या ग्रंथींना भरपूर रक्तपुरवठा असतो. कारण त्यांचा स्राव [→ हॉर्मोने] रासायनिक निरोप्याचे काम रक्तप्रवाहातूनच शरीराच्या इतर भागांत पोहोचल्यास करू शकतो. ऊर्ध्वस्थ अवटू रोहिणी व अध:स्थ अवटू रोहिणी यांच्या शाखांपासून त्यांना शुद्ध रक्त मिळते. या ग्रंथींना भरपूर लसीका वाहिन्याही (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या सूक्ष्म नलिकाही) असतात. तंत्रिका (मज्जा) पुरवठा अनुकंपी तंत्रिका तंत्रापासून [→ तंत्रिका तंत्र] होतो. मज्जावरणरहित (मायेलीन नावाच्या स्निग्ध पदार्थसदृश पदार्थाचे आवरण नसलेल्या) तंत्रिका शाखा रोहिणी शाखांबरोबरच ग्रंथींच्या ऊतकात विखुरलेल्या असतात परंतु त्या स्रावोत्पादनाशी संबंधित नसतात. अवटू ग्रंथींच्या उच्छेदन शस्त्रक्रियेच्या वेळी परावटू ग्रंथींच्या रक्तपुरवठ्यास इजा न होण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
कार्य : परावटू ग्रंथींच्या मुख्य अंत:स्रावाला ‘परावटू हॉर्मोन’ (पॅराथोर्मोन) म्हणतात. ते सरल-शृंखला पेप्टाइड आहे. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयाकरिता (शरीरातील भौतिक व रासायनिक घडामोडींकरिता) ते आवश्यक असून अग्र ⇨ पोष ग्रंथीचे या ग्रंथीवर काहीही नियंत्रण नसते. रक्त आणि ऊतकांतील या दोन खनिजांचे गुणोत्तर कायम ठेवण्याचे प्रमुख कार्य या हॉर्मोनाचे असते. प्राकृतिक (सर्वसाधारण) रक्तरसात कॅल्शियमाचे प्रमाण प्रत्येक १०० मिलि.मध्ये ८·५–१०·० मिग्रॅ. आणि अकार्बनी फॉस्फरसाचे प्रमाण तेवढ्याच रक्तरसात २·५–४·५ मिग्रॅ. असते. ग्रंथीच्या स्रावोत्पादनावर रक्तरसातील आयनीभूत (विद्युत् भारित अणूच्या स्वरूपातील) कॅल्शियमाचेच फक्त नियंत्रण असते. कॅल्शियमन्यूनता स्रावोत्पादन वाढविते, तर कॅल्शियमाधिक्य स्रावोत्पादन घटविते. आंत्रमार्गातील (आतड्याच्या मार्गातील) कॅल्शियमाचे अभिशोषण, कॅल्शियमाचा हाडातील साठा कमीजास्त करणे, मूत्र आणि मलातून होणारे कॅल्शियमाचे उत्सर्जन या क्रियांचा परावटू हॉर्मोनाशी संबंध असतो. यांशिवाय फॉस्फेटांचे मूत्रातून होणारे उत्सर्जन वाढविण्याचे कार्य हे हॉर्मोन वृक्क (मूत्रपिंड) नलिकांच्या पुन्हा अभिशोषणक्षमतेवर परिणाम करून करते. एच्. कॉप यांनी १९६१ साली परावटू हॉर्मोनाशिवाय कॅल्सिटोनीन नावाचे आणखी एक हॉर्मोन या ग्रंथीच्या स्रावात असल्याचे दाखवून दिले आहे. ही दोन्ही हॉर्मोने एकमेकांस विरोधी आहेत. परावटू हॉर्मोन हाडातील कॅल्शियम बाहेर आणून रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी वाढवते, तर कॅल्सिटोनीन नेमका उलट म्हणजे ही पातळी कमी करण्याचा परिणाम करते. या विरोधी क्रियाशीलतेमुळे रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी एकसारखी राहून तीत भरमसाठ चढउतार होत नाहीत. कॅल्सिटोनीनाचे परावटू ग्रंथीपेक्षा अवटू ग्रंथीत अधिक उत्पादन होते.
शरारातील कॅल्शियमाच्या संतुलनावरच हाडांची व दातांची वाढ व त्यांचे काठिण्य, तंत्रिका तंत्राची कार्यशीलता, स्नायूंचा ताण, रक्त क्लथन (रक्त गोठण्याची क्रिया) आणि हृदयाचे स्पंदन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात. परावटू ग्रंथींच्या स्रावाचा कॅल्शियम चयापचयाशी असलेला घनिष्ठ संबंध लक्षात घेतल्यास या ग्रंथींची जीवनावश्यकता चटकन समजते.
विकार : संख्याधिक्य व विस्तृत क्षेत्रांतील अस्तित्व या कारणांमुळे या ग्रंथींच्या विकृती व इजा सहसा आढळत नाहीत. दोन प्रमुख विकृतींविषयी पुढे माहिती दिली आहे.
परावटुस्रावन्यूनता : परावटू हॉर्मोनाची कमतरता पडल्यामुळे शरीरावर जे दुष्परिणाम होतात त्यांना परावटुस्रावन्यूनता म्हणतात. ही न्यूनता दोन कारणांमुळे उद्भवू शकते. अवटू ग्रंथीच्या उच्छेदन शस्त्रक्रियेच्या वेळी चुकून या ग्रंथीही काढून टाकल्यामुळे उद्भवणाऱ्या प्रकाराला ‘चिकित्सक प्रेरित’ प्रकार म्हणतात. दुसऱ्या प्रकाराला अज्ञातहेतुक प्रकार म्हणतात आणि त्यात कारणे अज्ञात असतात किंवा निश्चित सांगता येत नाहीत. कधीकधी ग्रंथीच्या ऊतकाचा अपकर्ष (ऱ्हास) झाल्याचे आढळते, तसेच हा प्रकार एकाच कुटुंबातील व्यक्तींना झाल्याचेही आढळते. आत्मप्रतिरक्षाजन्य अज्ञातहेतुक प्रकारही आढळतो. रक्तामध्ये कॅल्शियमाची न्यूनता आणि फॉस्फरसाची वाढ होते. तंत्रिका व स्नायू ऊतकाला हा बदल अपायकारक असतो व त्यामुळे ते अती क्रियाशील बनून ⇨ आकडी (झटके) उत्पन्न होते. आकडीशिवाय स्नायूंची अशक्तता आणि तंत्रिकांच्या संवेदनाक्षमतेत अपसामान्य वाढ ही लक्षणेही उद्भवतात. आकडी हे या ग्रंथींच्या स्रावन्यूनतेचे विशिष्ट लक्षण असून त्यात हातांची बोटे व मनगट विशिष्ट तऱ्हेने वळलेली राहतात. हे लक्षण सुप्तावस्थेतील रोगातही भुजांवर रक्तदाबमापकाचा पट्टा आवळून बांधल्यास स्पष्ट दिसते. याला ‘ट्रूसो लक्षण’ (ए. ट्रूसो या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात व हाताच्या विशिष्ट अवस्थेला ‘प्रसूतितज्ञाचा हात’ म्हणतात (आ. ३). लहान मुलांच्या आकडीत हाताबरोबरच पावलातही विकृती उत्पन्न होते, तेव्हा या लक्षणाला ‘हस्तपाद अंगग्रह’ म्हणतात (आ. ४). चिकित्सेचा प्रमुख उद्देश रक्तातील कॅल्शियमाची पातळी वाढविणे हाच असतो. त्याकरिता तीव्रावस्थेत नीलेतून कॅल्शियम ग्लुकोनेटाची अंत:क्षेपणे (इंजेक्शने) देतात. परावटुस्रावन्युनताजन्य चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारच्या आकडीकरिता ड जीवनसत्त्व (कॅल्सिफेरॉल) किंवा तत्समधर्मी डाय-हायड्रोटॅकिस्टेरॉल ही ओषधे देतात. इलाज सतत करावे लागतात व रक्तरसातील कॅल्शियमाचे अधून मधून आगणन करावे लागते, कारण कॅल्शियमाधिक्यही हानिकारकच असते.
परावटुस्रावाधिक्य : ही विकृती परावटू ग्रंथीत उद्भवणाऱ्या अर्बुदापासून (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठीपासून) होते. अर्बुदप्रकार बहुधा साधे ग्रंथ्यार्बुद असतो परंतु कधीकधी कर्करोगाचाही संभव असतो [→ अर्बुदविज्ञान]. स्रावाधिक्यामुळे मूत्रातून कॅल्शियम व फॉस्फरस यांचे उत्सर्जन वाढते. हाडातील ही खनिजे पुन:अभिशोषणामुळे रक्तरसात येतात. कॅल्शियमाची रक्तरसातील पातळी २० मिग्रॅ. प्रती १०० मिली.पर्यंत वाढते. मूत्रातून उत्सर्जन होताना मूत्रपिंड, मूत्रवाहिन्या, मूत्राशय इ. ठिकाणी लहानमोठे अश्मरी (खडे) तयार होतात. हाडातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे वेदना होणे, ती मऊ पडून वाकडी तिकडी होणे, त्यात द्रवार्बुद (द्रवयुक्त अर्बुद) तयार होणे आणि वारंवार अस्थिभंग होणे ही लक्षणे उद्भवतात. पाठीच्या मणक्यांची हाडे मऊ पडल्यामुळे दबली जाऊन व्यक्तीच्या एकूण उंचीत सु. १५ सेंमी.पर्यंत घट होऊ शकते.
कॅल्शियमाधिक्यामुळे मळमळणे, उलट्या, क्षुधानाश इ. लक्षणेही उद्भवतात. परावटुस्रावाधिक्याचे दोन प्रकार आहेत : (१) प्राथमिक आणि (२) दुय्यम. प्राथमिक रोगाचे प्रमाण अत्यल्प असून तो मूळ ग्रंथींच्या विकृतीमुळे उद्भवतो व त्यात अस्थिविकृती बहुधा आढळते. हाडांच्या या विशिष्ट रोगाला ‘तंत्वात्मक द्रवार्बुदीय अस्थिशोथ’ किंवा एफ्. डी. फोन रेकलिंग हाउझेन या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून ‘फोन रेकलिंग हाउझेन रोग’ म्हणतात. दुय्यम प्रकार नेहमी इतर कोणत्यातरी प्राथमिक विकृतीबरोबर आढळतो. मूत्रपिंडाच्या विकृती, अस्थिमार्दव यांसारख्या विकृतींबरोबर दुय्यम प्रकारचे स्रावाधिक्य आढळते.
इलाजांमध्ये शस्त्रक्रिया करून अर्बुद काढून टाकणे हा प्रमुख इलाज असतो. अर्बुदे बरीच व विखुरलेली असल्यास इलाज करणे अवघड होते. अर्बुद एकाच ग्रंथीत असल्यास तिच्या ७/८ भागाचे उच्छेदन करतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या आकडीवर योग्य इलाज करावा लागतो. ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियम हाडांच्या पुन:अस्थिभवनाकरिता उपयुक्त असतात. दुय्यम प्रकारच्या विकृतीवर अन्नातील फॉस्फेटयुक्त (दूध आणि दुधापासून बनविलेले) पदार्थ वर्ज्य करणे, सोडियम लॅक्टेट किंवा बायकार्बोनेट देऊन अम्लरक्तता कमी करणे, मोठ्या प्रमाणावर ड जीवनसत्त्व वापरणे व शस्त्रचिकित्सा यांचा उपयोग करतात. त्यावर कोणताही गुणकारी इलाज उपलब्ध नाही.
संदर्भ : 1. Davidson, S. Macleod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.
2. Grollman, S. The Human Body, New York, 1964.
3. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.
शिरोडकर, शा. ना. भालेराव, य. त्र्यं.
“