पराग : फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील ⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकोश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक–बीजुके–पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल]. पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना ⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणूंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो. बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत. एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या-शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात. परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी ॲसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षावरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्त-परागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासून निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.

आ. १ पराग संरचना व अंकुरण : (अ) परागकण : (१) अधिलेप, (२) आलेप, (३) जननकोशिका, (४) जननप्रकल, (५) नलिकाकोशिका, (६) नलिका - प्रकल (आ) परागाचे अंकुरण : (१) अधिलेप, (२) परागनलिका, (३) पुं-गंतुके, (४) नलिका-प्रकल.

 आ. २. काही पराग-प्रकार : (१) ॲश, (२) गवत, (३) फुक्सिया, (४) खजूर, (५) खापरकुटी, (६) चीड (पाइन), (७) ओक, (८) शेवंती, (९) बीच, (१०) वाळुंज, (११) दुधळ. (अधिलेपाचा तपशील स्पष्टपणे दाखविण्याकरिता त्यांचे मूळ आकारमान भिन्न प्रकारे सर्वच आकृतींत मोठे केले आहे).

परागकण : प्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी व्यास २४–५० μ  (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो द्विदलिकित वनस्पतींता तो २–२५० μ आणि एकदलिकितांत १५ – १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५–१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११–३०० μ असा व्यासांचा पल्ला आढळतो. एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०·०००००३५ ते ०·००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते. प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड ⇨ उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात. अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात. त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात. चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३·७ μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रानोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.


गवते, खजूर इत्यादींच्या परागांचा अधिलेप गुळगुळीत असतो परंतु बहुधा अधिलेप खरबरीत असतो. त्याच्यावर सूक्ष्म खाचा, कंगोरे, चरे, रंध्रे (छिद्रे) किंवा काटे असतात नक्षी केल्यासारख्या आकृत्याही असतात. द्विदलिकितांपैकी उच्च दर्जाच्या (अधिक प्रगत) जातींतील परागावर छिद्रांचे विविध आकृतिबंध असतात त्यामुळे त्या वनस्पतीची जाती, वंश वा कुल ओळखणे सोपे जाते इतकेच नव्हे, तर युगानुयुगे या आकृतिबंधात फारसे बदल होत नाहीत, त्यामुळे आजच्या विशिष्ट जातींची प्राचीन परंपरा निश्चित करता येते. छिद्राखालील आलेपाचा अतिघन भाग हॅझेल आणि बर्च [⟶ भूर्ज] यांसारख्या वाऱ्याने पराग पसरविणाऱ्या जाती ओळखण्यास उपयुक्त असतो ओक आणि बीच यांचे पराग त्यावरील छिद्रांतील पापुद्रे तडकण्यास उपयुक्त अशा काचेसारख्या गुडदीमुळे ओळखू येतात. रंगामुळेही परागांतील फरक स्पष्ट होतो बहुधा ते आरंभी म्हटल्याप्रमाणे पिवळट असले, तरी लिलिएसी कुलातल्याप्रमाणे (पलांडू कुलातल्याप्रमाणे) पांढरा ते नारिंगी, हिरवा व काळपट असा रंगाचा पल्ला दर्शवितात. अधिलेपावर गोलसर छिद्राऐवजी लांबट उथळ खोबण्याही असतात. लॉरेसी कुलातील (तमाल कुलातील) जातींत छिद्रे नसतात. प्रकटबीजीतही (उदा., देवदार, सुरू इ.) छिद्रे नसतात सेकोयात परागावर फक्त एक उंचवटा असतो सायकॅडेसीत एक खोबण असते. फुलझाडांत छिद्रे व खोबणी यांचे विविध प्रकार आढळतात. बहुतेक सर्व गवतांत परागकणांवर एकच छिद्र असते बहुतेक सर्व ताल वृक्षांच्या [उदा., खजूर ⟶ पामी] परागावर एकच खोबण आढळते. द्विदलिकित जातींत फक्त तीन छिद्रे, फक्त तीन खोबणी किंवा तीन छिद्रे व तीन खोबणी आढळतात. काही परागांवर शंभर छिद्रे असतात. गवतांच्या परागकणावरच्या छिद्रावर झाकणी असते. काकडीच्या परागकणावरही छिद्रे व त्यावर झडपा असतात. चीडच्या [⟶ पाइन] परागकणांना दोन फुग्यासारखे वायुकोश असल्याने वाऱ्याच्या साहाय्याने ते दूरवर नेले जातात.

कित्येक वनस्पतींच्या जातींत परागकण तयार झाल्यावर परस्परांपासून सुटे होतात परंतु काहींत ते दोन, चार (ॲरेसी व काही एरिकेसी, पाणकणीस), आठ किंवा सोळा किंवा चौसष्ट (बाभूळ व शिरीष यांच्या उपकुलातील काही जाती) कणांच्या गटात असतात व असे गट जनक वनस्पतीच्या परागकोशातून सुटे होतात. चौकड्यांतील परागकण पाच भिन्न प्रकारांनी एकत्र बांधलेले आढळतात. ⇨ रुई  व ⇨ ऑर्किडेसी (आमर कुल) यांच्या परागकणांचे गट विशिष्ट प्रकारे बनलेले पुंज (परागपुंज) असतात.

परागकणांचे रक्षण करणे हे अधिलेपाचे मुख्य कार्य असते व परागकणाचे कार्य सिद्धीस जाण्यासाठी मूळच्या फुलातून (पुं-केसरातून) निघून किंजल्कावर म्हणजे किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर जाऊन पडेपर्यंत ते सुरक्षित राहणे आवश्यक असते. परागकण पाण्यात किंवा दमट जागेवर पडले म्हणजे ते हळूहळू पाणी शोषून घेतात व फुटून नाश पावतात परंतु जमिनीवर किंवा पाण्यात राहणाऱ्या बहुतेक वनस्पतींच्या परागकणांचे अधिलेप पुरेसे किंवा पुष्कळसे संरक्षणक्षम असतात आणखी असे की, ओलसर हवेत परागकण परागकोशापासून सामान्यतः अलग होत नाहीत. सारांश, सामान्य परिस्थितीत परागकण सुरक्षित राहतील असेच अधिलेपाचे स्वरूप असते. फुलझाडांमध्ये (आवृतबीज वनस्पतींत) किंजल्कावर परागकण रुजतो परंतु प्रकटबीज वनस्पतींत तो बीजकरंध्रावर (बीजपूर्व अवयवावर असलेल्या रंध्रावर) रुजतो.

फुलझाडांमध्ये प्रथम परागकणातील प्राकलापासून दोन कोशिका बनतात एक ‘जनन-कोशिका’ व दुसरी ‘नलिका-कोशिका’ जननकोशिकेत एक ‘जनन-प्रकल’ व नलिका-कोशिकेत एक ‘नलिका-प्रकल’ असतो. परागणानंतर (पराग बीजकरंध्रावर पडल्यावर) जनन-प्रकलापासून दोन सारखी पुं-गंतुके बनतात (आ. १ आ ) व ती परागकणातून बाहेर पडणाऱ्या परागनलिकेत येतात. तत्पूर्वी परागनलिका वाढून नलिका-प्रकल आलेला असतो.

प्रकटबीज वनस्पतींच्या परागकणांत (उदा., पाइन) त्यातील प्रकलाच्या विभाजनामुळे काही कोशिका बनतात. त्यात एक जननकोशिका व एक नलिका-कोशिका (पुं-गंतुकधारीचा अवशेष) असतात. ⇨ ॲरॉकॅरियामध्ये अनेक शाकीय कोशिका तर बिर्मीमध्ये [यू ⟶ टॅक्सेलीझ] त्यांचा अभाव असतो. परागणानंतर पराग रुजताना जनन-कोशिकेपासून ‘वृंत-कोशिका’ व ‘तनु-कोशिका’ बनतात व त्यांपासून पुं-गंतुके बनतात. ⇨ सायकॅडेलीझ व गिंको [⟶ गिंकोएलीझ] यांची पुं-गंतुके मोठी, सकेसल व चर (चलनशील) परंतु ⇨ कॉनिफेरेलीझमध्ये ती अचर असतात [⟶ पाइन] व ही एकाच आकारमानाची किंवा एक लहान व एक मोठे क्रियाशील असते.

परागकणापासून बनलेली पुं-गंतुके व बीजकातील स्त्री-गंतुके यांचे मीलन झाल्यानंतर परागाचे कार्य संपते. यावरून प्रजोत्पादनातील परागांचे महत्त्व स्पष्ट होते. परागकणांना परागकोशापासून किंजल्कापर्यंत किंवा बीजकापर्यंत नेण्याचे काम वारा, प्राणी, पाणी यांच्याकडून घडून येते त्यासाठी अनुकूल अशी वैशिष्ट्ये परागकणांच्या वर वर्णन केलेल्या बाह्यांगात व इतर परागवैशिष्ट्यांत असतात [⟶ परागण]. परागकणांचा गुळगुळीतपणा, खरबरीतपणा, परागपुंज व परागसमूह या संरचना, हलकेपणा, सूक्ष्मपणा व कमीजास्त संख्या यांचा अंतर्भाव त्यांच्या कार्याशी पूर्णपणे अनुकूलित आहे, असे म्हणण्यास आधार आहे.

पराग-विश्लेषण : गेल्या काही वर्षांत परागांच्या अध्ययनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे व शेकडो जातींच्या वनस्पतींची सूक्ष्म तपासणी करून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती गोळा करण्यात आलेली आहे. त्यावरून परागांचा आकार, आकारमान व वर वर्णिलेली अनेक लक्षणे पाहून त्यांच्या मूळ वनस्पती ओळखून काढणे शक्य झाले आहे. काहींचे वंश व इतर काहींच्या जाती ओळखल्या गेलेल्या आहेत मात्र काहींची फक्त कुलेच, उदा., ⇨ सायपेरेसी (मुस्तक कुल), ओळखता येतात. परागांच्या अध्ययनाने मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त असल्याचे आढळल्याने त्यांच्या संशोधनात खूपच प्रगती झाली आणि आता परागांचे एक स्वतंत्र शास्त्रच झालेले असून त्याला ‘परागविश्लेषण’  किंवा ‘परागविज्ञान’ (पॅलिनॉलॉजी) म्हणतात यामध्ये मुख्यतः पराग व लघुबीजुके (पुं-गंतुकधारी ज्यापासून तयार होतात असे प्रजोत्पादक भाग) यांच्या अध्ययनाचा अंतर्भाव असला, तरी कित्येक अबीजी वनस्पतींच्या बीजुकांच्या अध्ययनाचाही समावेश केला जातो. पॅलिनॉलॉजी ही शास्त्रीय संज्ञा एच्. ए. हाइड आणि डी. ए. विल्यम्स ह्या उभयतांनी १९४५ मध्ये प्रथम उपयोगात आणली. त्यानंतर या शास्त्राची व्याप्ती वाढविणे, अनेक दृष्ट्या विचार करणे व भावी प्रगतीस प्रयत्नपूर्वक चालना देणे ही कार्ये भारतातील बिरबल सहानी, पी. के. के. नायर, व्ही. मित्तर, एस्. के. श्रीवास्तव आणि भारताबाहेरील जी. एर्टमन, के. फीग्री इ. अनेक शास्त्रज्ञांनी केली आहेत. आर्. पी. वोडहाउस ह्यांनी तत्पूर्वीपासूनही पराग संशोधन चालू केले होते. वास्तविक परागकणांचा नैसर्गिक उपयोग पूर्वीच ॲसिरियन लोकांनी केला होता परंतु परागकण व बीजुके यांचा शास्त्रीय अभ्यास व त्यानुसार त्यांचे भावी महत्त्व १६६५ मध्ये रॉबर्ट हुक यांनी बनविलेल्या सुधारित सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होऊ लागल्यानंतर कळून येऊ लागले. परागाविज्ञानाच्या पुढील प्रगतीमध्ये जी. एर्टमन व त्यांचे अनेक सहकारी यांचा निर्देश आवश्यक ठरतो. या विज्ञानाच्या पद्धतींचा व अनुमानांचा उपयोग वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पति-भूगोल, जलवायुविज्ञान (दीर्घकालीन सरासरी हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र), भूविज्ञान, सरसी जीवविज्ञान (गोड्या पाण्यातील सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र), मृदाविज्ञान, पुरातत्त्वविद्या, मानवी वैद्यक, मधमाश्यापालन, गुन्हाशोधविज्ञान इत्यादींच्या कार्यात केला जातो. निरनिराळ्या प्रदेशांत भिन्न ऋतूंत हवेत तरंगणाऱ्या किंवा वाऱ्याबरोवर वाहत जाणाऱ्या परागकणांची व बीजुकांची पद्धतशीर तपासणी करण्यात आलेली आहे. काही विशिष्ट जातींचे परागकण वा बीजुके श्वासाबरोबर श्वसनेंद्रियांत जाण्यामुळे सर्दी, ⇨ पराग ज्वर यांसारखे अधिहृषतेशी (ॲलर्जीशी) संबंधित विकार उद्‌भवतात, हे कळून येऊन अशा विकारांस प्रतिबंधक उपाय योजणे शक्य झालेले आहे. मधातून येणारे पराग मनुष्यांच्या खाण्यात येऊन ते शरीरात प्रवेश करतात. त्यांतील पराग-बीजुकांवरून ते कोणत्या वनस्पतीपासून आलेले आहेत व पर्यायाने तो मध कोणत्या वनस्पतीपासून आलेला आहे हे व त्या वनस्पतीच्या आपणास माहीत असलेल्या स्थानावरून तो मध कोणत्या प्रदेशात तयार झालेला आहे, हे कळणे शक्य असते एखाद्या मधातील परदेशी मधाची भेसळ समजून येणे यामुळे शक्य झाले आहे.


मध्य व द. स्वीडनमध्ये केलेल्या वनांच्या पाहणीवरून असा अंदाज करण्यात आलेला आहे की, त्या वनांपासून प्रत्येक वसंत ऋतूत पंचाहत्तरशे टन परागकण उत्पन्न होतात. एकूण पृथ्वीवरील वनांतून उत्पन्न होणाऱ्या परागांची राशी याच्या कितीतरी पट भरेल. निर्माण होणारे सर्वच कण वातावरणात शिरत नसले, तरी शिरणाऱ्यांची एकूण राशी प्रचंड असली पाहिजे हे सर्व कण अखेरीस खाली पडून सागर-महासागरात, खंडांच्या जमिनीवर किंवा त्यांच्यावरील दलदलीत व सरोवरात पडत असतात अशा कणांपैकी बहुसंख्य कण (पराग व बीजुके) नाश पावत असतात पण काही मात्र पाण्यात बुडून त्याच्या तळाशी जातात व तेथे साचत असणाऱ्या गाळात मिसळून जातात. तेथील परिस्थिती वातनिरपेक्ष असते. अशा परिस्थितीत प्रदीर्घ काळ टिकून राहण्याचा विलक्षण गुण कठीण वेष्टन (अधिलेप) असलेल्या बहुतेक सर्व परागांत व बीजुकांत असतो व कुजून नाश न पावता ते साचणाऱ्या गाळांच्या थरांनी झाकले जातात व त्यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) होतात. गेल्या हिमयुगाच्या अखेरीनंतर उ. अमेरिकेतील व यूरोपातील दलदलीत व सरोवरात जे गाळ साचले त्यांतील पराग व बीजुके यांच्या जीवाश्मांच्या परीक्षणाने, त्या प्रदेशातील वनांत वाढणाऱ्या वृक्षांत व पर्यायाने त्या प्रदेशांतील जलवायुमानात कोणकोणते फरक झाले, याविषयीचा सविस्तर व संगतवार इतिहास जुळविणे शक्य झाले आहे. उदा., ब्रिटनमधील पूर्व अँग्लियाच्या थरातील जीवाश्मांवरून असे दिसून येते की, हिमाचा थर नाहीसा झाल्यावर तेथे जी पहिली वने वाढली ती मुख्यतः बर्च व देवदार यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी अधिक उबदार जलवायुमानात वाढणारे हॅझेल, ओक, एल्म व लाइम हे प्रबल झाले व पुढे त्यांच्यात बीच व हॉर्नबीम यांची भर पडली. त्यापुढील काळात त्यांच्या जागी अधिक थंड जलवायुमानात वाढणाऱ्या देवदार व बर्च यांची वने आली.

समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर साचलेल्या अनेक प्रकारच्या गाळांच्या खडकांत पराग व बीजुके यांचे जीवाश्म कमीअधिक संख्येने आढळतात. जैव खडकात ते विपुल व दगडी कोळसा, ⇨ पीट यांसारख्या खडकांत ते अत्यंत विपुल असतात. भरडकणी खडकात ते जवळजवळ नसतात. साचत असताना किंवा नंतर ज्यांचे ⇨ ऑक्सिडीभवन झालेले आहे अशा गाळात किंवा मृदांत ते नसतात. पूर्व पुराजीव महाकल्पातील (४२ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील) गाळांच्या खडकांत बीजुक-जीवाश्म अत्यल्प आढळतात. डेव्होनियन कल्पात (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात) व त्यानंतर ते विपुल आढळतात. आद्य प्रकटबीज वनस्पतींचे पराग-जीवाश्म डेव्होनियन खडकांत आढळतात. कार्‌बॉनिफेरस कल्पातील (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत ते विपुल होते. पूर्व क्रिटेशस कालीन (सु. १४–१२ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत फुलझाडांचे पराग-जीवाश्म आढळतात व जुरासिक कल्पातील (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत त्यांचे लेश सापडतात, असे मानण्यास जागा आहे.

आजच्या पराग-बीजुकांचे परीक्षण करून त्यांच्या जनक वनस्पती जितक्या अचूकपणे ठरविता येतात, तितक्याच अचूकपणे सापेक्षतः अलीकडील काळातील पराग-बीजुक-जीवाश्मांच्या जनक वनस्पती ठरविता येणे शक्य असते परंतु जो जो अधिक जुन्या थरांकडे जावे. तो तो आजच्या जाती नाहीशा होत जाऊन नव्याच व आता निर्वंश झालेल्या जातींचे पराग किंवा बीजुके यांचे जीवाश्म मिळू लागतात. अशा जातींचे त्या वेळी असलेल्या परिस्थितीशी कसे संबंध होते याची निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने, त्यापासून मिळणारी माहिती मर्यादित असते परंतु थरांचे सहसंबंध दाखविण्यास त्यांचा उपयोग होणे शक्य असते [⟶ स्तरविज्ञान]. पराग-बीजुक-जीवाश्म सूक्ष्म असले, तरी त्यांची संख्या प्रचंड असणे शक्य असते व खडकांच्या किंवा चिखलाच्या लहानशा तुकड्यापासूनही तपासणीसाठी भरपूर ठरतील इतके जीवाश्म नमुने मिळविणे व सांख्यिकीय पद्धती वापरून विश्लेषण करणे शक्य असते. म्हणून पराग-विश्लेषणाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. सागरी क्षेत्रातील भरपूर भूवासी आणि तीरवासी शैवले, लघुबीजुके (पराग) आणि इतर जीवप्रकार यांवरून प्राचीन समुद्रतीरांच्या रेषा आणि त्यांंवरून खनिज तेल व नैसर्गिक इंधन वायू यांच्या निक्षेपाच्या (साठ्याच्या) स्तरांचे स्थान निश्चित करून खनिज तेलाच्या संशोधकांनी परागविज्ञानाचा विलक्षण उपयोग करून घेतलेला आहे. खनिज तेलाचे साठे शोधून काढण्याच्या कार्यात परागविज्ञान अशा रीतीने उपयुक्त ठरले आहे.

वनस्पतींच्या इतिहासात अपुष्प वनस्पती [⟶ वनस्पती, अबीजी विभाग] प्रथम अवतरल्या, ही गोष्ट बीजुके व पराग यांच्या जीवाश्मांवरून (आणि इतर काही बाबींवरून) कळून आली आहे. आज सर्वत्र आढळणाऱ्या फुलझाडांच्या क्रमविकासाला (उत्क्रांतीला) सु. ३५ कोटी वर्षे लागली आणि तितकीच वर्षे प्राण्यांपैकी कीटकांचा उगम होऊन झाली आहेत. या दोन्हींचा क्रमविकास समकालीन गटांप्रमाणे झाला आहे. सु. ५०,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाचा उदय झाला तो प्रथम जंगली व भटक्या होता. त्याने आपली वसतिस्थाने अनेक वेळा बदलली. तो जेथे जेथे धान्य पिकवी तेथे तेथे त्याने त्या धान्यांच्या परागरूपात आपली स्मृती राखली. ते जीवाश्मरूप पराग आज पुरातत्त्वज्ञांना उपलब्ध झाले असून त्यांनी त्यावरून फार महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. उदा., मेक्सिकोतील पाच हजार वर्षांपूर्वीचे पराग पाहून तेथे मक्याचा उगम झाला असावा आणि तसेच भाताचे उगमस्थान पूर्वेकडच्या देशांत असावे. कृषीचा प्रसार व मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास समजून येण्यास इतर अनेक गोष्टींबरोबर पराग-विश्लेषणाचीही मदत होत आहे. मानवी कल्याणाच्या बाबतींतील परागांची भूमिका बहुविध असून कृषी, वैद्यक, वनविद्या आणि अर्थोत्पादक भूविज्ञान यांच्या आधुनिक प्रगतीत परागविश्लेषणाचा अर्थपूर्ण वाटा असल्याचे आढळते इतकेच नव्हे, तर या भिन्न क्षेत्रांत परागांच्या माहितीचा अधिकाधिक उपयोग करून इष्ट प्रगती करण्यास वाव दिसून येतो.


लायकोपोडियमाच्या[⟶ लायकोपोडिएलीझ] बीजुकांचा तारतम्यशून्य औषधी उपयोग चर्मरोगावर आणि नाक, घसा व हृदयविकार यांवर केल्याचे ई. हॅमिल्टन (१८५३) यांनी नमूद केले आहे तत्पूर्वी ओ शॉनेसी (१८४१) यांनी त्याचे औषधी गुण निदर्शनास आणले होते. अलीकडे परागांचा उपयोग करून बनविलेली अनेक औषधे उपलब्ध झाली असून परागांपासून उद्‌भवलेल्या अनेक विकारांवर त्यांचा वापर यशस्वी रीत्या करतात (उदा., पोलोटिन, सर्निटॉन, सर्निटॉल, सर्निटिन इ. औषधे).

परागांत विपुल प्रथिने व कार्बोहायड्रेटे असून मधमाश्या, इतर कीटक आणि मनुष्य यांना परागांचा अन्नासारखा उपयोग होतो. मधमाश्यांच्या पोवळ्यातून काढलेल्या मधात त्यांनी फुलांतून आणलेल्या मधुरसाबरोबर अनेक पराग मिसळलेले आढळतात व त्यामुळे मधाची पौष्टिकता वाढते, तसेच तो मध कोणत्या झाडांच्या फुलातून आणला त्याचा बोध तो मध तपासल्यानंतर होतो. मध-उद्योगात (मधुमक्षिकापालनात) या माहितीचा उपयोग होतो. औषधे व अन्न या दोन्ही दृष्टींनी परागांना व्यापारी महत्त्व आले आहे. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये सौंदर्यप्रसाधनांच्या द्रव्यांत परागांचे मिश्रण करतात आणि ह्या प्रसाधनांमुळे सौंदर्यवर्धन होते, असा दावा करण्यात आलेला आहे. गव्हाच्या पोत्यांची चोरून केलेली इंग्लंडमधील आयात, त्यातील ग्रेव्हिलियाच्या परागांमुळे तो ऑस्ट्रेलियातून मनाई केलेला माल असावा, असा साधार तर्क करणे अधिकाऱ्यांना शक्य झाले.

एखादी वनस्पती संकरज किंवा असंकरज हे ओळखून काढण्याकरिता परागकणांची परीक्षा करणे उपयुक्त ठरले आहे, कारण कित्येक संकरजांचे परागकण जननक्षम नसतात आणि संकुचित व अस्फीत (तुडुंब न भरलेले) असतात. असंकरजाच्या ताज्या जननक्षम परागकणात भरपूर रंगसूत्रद्रव्य (गडद अभिरंजन होणारे–म्हणजे रंगद्रव्याने रंगविले जाणारे–प्रकलातील द्रव्य) असल्याने त्यांचा ॲनिलीन ब्ल्यू (कॉटन ब्ल्यू) किंवा ॲसिटो-कारमाइन विद्राव या रंगद्रव्याचा संपर्क आल्यास ते परागकण रंगद्रव्य शोषून घेतात असे दिसून येते. ते रंगद्रव्य न शोषले गेल्यास मूळची वनस्पती संकरज असण्याचा संभव अधिक असतो. परागकणातील वांझपणा, त्याची निर्मिती संकरजापासून झाली असल्याचे द्योतक समजतात. ऑस्ट्रेलियाच्या वनश्रीतील दोन प्रभावी कुलांतील (मिर्टेसी व प्रोटिएसी) सर्व प्रदेशनिष्ठ जातींत परागवंध्यत्वाचे प्रमाण जास्त आढळते. त्यावरून त्यांचा उगम संकराने झाला असून ही गोष्ट व इतर काही बाबी लक्षात घेऊन फुलझाडांच्या क्रमविकासात संकरण व नैसर्गिक निवड या प्रक्रियांचा मोठा वाटा असावा, असे मत ए. ए. लॉसन (१९३०) या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

वनस्पतींच्या शरीराच्या काही अवयवांंतील कोशिका, ऊतके (समान कार्य व संरचना असलेल्या कोशिकांचे समूह) यांसारख्या सूक्ष्म घटकांपासून कृत्रिम प्रकारे केलेल्या संवर्धनाने संपूर्ण वनस्पती बनविता येते [⟶ ऊतकसंवर्धन] असे प्रयोगान्ती आढळून आले आहे. तसेच अलीकडे धोतरा, भात, तंबाखू यांचे परागकोश कृत्रिम रीत्या वाढवून त्यांच्या परागांपासूनही नवीन वनस्पती वाढविणे शक्य झाले असल्याचे आढळले आहे. ह्या वनस्पतीतील रंगसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या नेहमीपेक्षा निम्मी असते.

पहा : एकांतरण, पिढ्यांचे गर्भविज्ञान परागण प्रजोत्पादन फूल वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग.

संदर्भ : 1. Eames, A. J. Morphology of the Angiosperms, New York, 1962.

   2. Erdtman, G. An Introduction to Pollen Analysis, Waltham, 1954.

   3. Faegri, K. Iversen, J. Textbook of Modern Pollen Analysis, Copenhagen, 1964.

   4. Nair, P. K. K. Essentials of Palynology, Bombay, 1966.

   5. Wilson, C.L. Loomis, W.E. Botany, New York, 1962.

   6. Wodehouse, R. P. Pollengrains, New York, 1935.

परांडेकर, शं. आ.