हिमस्थगिरी : हिमनदीच्या पृष्ठभागावर ठळकपणे वर वा पुढे आलेली व हिमनदीच्या बर्फाने सर्व बाजूंनी वेढली गेलेली आधार शिळेची एकाकी टेकडी, कटक, माथा किंवा शिखर म्हणजे हिमस्थगिरी होय. एकेकाळी हिमस्थगिरी खंडीय हिमस्तरामधून किंवा आल्प्स पर्वतातील हिमटोपाच्या प्रकारासारख्या हिमटोपातून वर आलेला मानीत. हिमस्थगिरी बहुधा हिमस्तराच्या सीमेलगत आढळत असल्याने ते वनश्रीची हिमनादेय आश्रयस्थाने व नंतर जमिनीने व्यापली जाण्याची केंद्रे मानीत. नंतरच्या अध्ययनाने आश्रयाची अधिक संभाव्य क्षेत्रे उघड झाली आणि हिमनद-पश्‍च काळातील अपक्षयाने (झिजेने) शिखरांवरील हिमनादेय पुरावा नष्ट झाला असू शकेल, हे वास्तव उघड झाले आणि अशी शिखरे भूतकाळातील तेव्हाची बर्फाची जाडी ठरविण्यासाठी पुष्कळदा वापरता येत नाहीत. अंटार्क्टिका, ग्रीनलंड, कॅनडा, हिमालय, स्कँडिनेव्हिया पर्वत व हिमालय पर्वत इ. हिमाच्छादित प्रदेशात वेगवेगळ्या उंचीवर हिमस्थगिरी आढळतात.

गोडसे, एम्. व्ही.