हिमरेषा : सर्वसाधारणपणे कायमच्या वा नित्य हिमक्षेत्राच्याखालील कडेची (सीमेची) उंची दर्शविण्यासाठी हिमरेषा ही संज्ञा वापरतात. सूर्याची उंची, अक्षांश, वारे, तापमान व आर्द्रता यांच्यावर हिमरेषेचेस्थान (उंची) अवलंबून असते. जेथे हिमवृष्टीने होणारा हिमसंचय व हिमापहरण (वितळून व बाष्पीभवन यांद्वारे हिम नाहीसा होणे) यांचे प्रमाण समान असते, अशा जमिनीच्या पृष्ठभागाला अनुसरून हिमरेषा गेलेली आढळते. याचा अर्थ हिमरेषा अनियमित असते म्हणजे सरळ नसते, तर तुटक पट्ट्यासारखी असते. हिमरेषेची उंची अगदी भिन्न असते कारण ती वरील घटकांनुसार बदलत असते. पर्वतीय भागांसारख्या उंच ठिकाणावरील वाऱ्याच्या दिशेतील बाजूच्या उतारावरील व दुपारनंतर सूर्यासमोर येणाऱ्या बाजूवरील हिमरेषेची उंची विरुद्ध बाजूच्या उतारावरील हिमरेषेच्याउंचीपेक्षा सु. १ किमी. पर्यंत वर असू शकते. अधिक मोठ्या क्षेत्रांवरील उन्हाळ्यातील तापमाने व हिमवृष्टीचे प्रमाण यांच्याद्वारे हिमरेषेचे स्थान निश्चित होते. ध्रुवांलगतच्या भागासारख्या ठिकाणी जेथे तापमान कमी असते, तेथे हिमरेषेची उंची पुष्कळच कमी असते. विषुवृत्तीय भागासारख्या ज्या ठिकाणी तापमान उच्च असते, तेथील हिमरेषेची उंची फार जास्त असते. उदा., हिमरेषेची सस.पासूनची उंची उष्ण कटिबंधात सु. ४.८४ किमी. पर्यंत, उपोष्ण कटिबंधात सु. ६.४ किमी. पर्यंत उंचीवर, तर ध्रुवीय प्रदेशांत ती समुद्रसपाटीवर असू शकते. अमेरिकेतील रॉकी पर्वतात हिमरेषेची अशी उंची सु. ३.२ किमी., पश्चिम यूरोपमधील आल्प्स पर्वतात सु. २ किमी. आणि ग्रीनलंडमध्ये ०.८ किमी. पेक्षा कमी असते. अर्थात, एकाच पर्वतरांगेवरील हिमरेषेची उंची दर वर्षाला वेगळी असू शकते.

 

विस्तृत क्षेत्रावरील हिमरेषेची सरासरी उंची जलवायुमानीय हिमरेषा काढण्यासाठी वापरता येते. दीर्घकालीन सरासरी हवामानाला जलवायुमान म्हणतात. जलवायुमानीय हिमरेषेची उंची जागतिक पातळीवरील जल-वायुमानीय बदलांनुसार कमी जास्त होते. हिमकालात जलवायुमानीय हिमरेषा आताच्या अशा हिमरेषेच्या उंचीपेक्षा ६००–१२०० मी. एवढ्या कमी उंचीवर होती.

 

काही प्रदेशांत दरी हिमनद्या सापेक्षतः कमी उंचीपर्यंत खाली येतात. उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत येथील आधारशिलेच्या पृष्ठभागावरील बर्फ पूर्णपणे नाहीसा न झाल्यास अशा मागे राहिलेल्या बर्फाच्या सर्वांत खालच्या मर्यादेला पर्वतीय हिमरेषा म्हणतात कारण हिचे नियंत्रण मुख्यतः स्थानिक परिस्थिती व भूमिस्वरूप यांद्वारे होते. हिमनदीच्या पृष्ठभागावर हिला कधीकधी हिमनदी हिमरेषा किंवा कणहिमरेषा म्हणतात. पर्वतीय हिमरेषेच्या स्थानांत वर्षानुवर्षे होणारे बदल मोठे असतात. कोणत्याही एका वर्षातील पर्वतीय हिमरेषेच्या सरासरी प्रादेशिक पातळीला प्रादेशिक हिमरेषा म्हणतात कारण प्रादेशिक हिमरेषेचे संपूर्ण नियंत्रण जलवायुमानाद्वारे होतेव तिच्यावर स्थानिक परिस्थितीचा परिणाम होत नाही. हिमनदीवैज्ञानिक कधीकधी हिला जलवायुमानीय हिमरेषा म्हणतात. दहा वा अधिक वर्षांतील हिच्या सरासरी स्थानाला माध्य (सरासरी) जलवायुमानीय हिमरेषा असे म्हणता येते. विस्तृत हिमस्तर व हिमनद्या यांच्यावरील जलवायुमानीय हिमरेषा ही कणहिमरेषाच असते. दहा किंवा अधिक वर्षे निरीक्षणांतील हिच्या सरासरी स्थानाला माध्य कणहिमरेषा म्हणता येते.

 

पहा : हिमस्तर व हिमनदी हिमानी क्रिया.

 

गायकवाड, सत्यजित